करण आणि कामिनी कुलकर्णी यांचं एक आदर्श कुटुंब होतं. ते मुंबईत आपल्या स्वतःच्या बंगल्यात राहत होते. त्यांना कौस्तुभ आणि कबीर हि जुळी मुले होती. दोघेही नुकतेच १२ विच्या परीक्षेतून मोकळे झाले होते. करणचा स्वतःचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय होता. ते आणि त्यांचे मेव्हणे मिळून तो करायचे. करणनी सर्व व्यवसायाचा व्याप सांभाळून आपली भटकंतीची आणि फोटोग्राफीची आवड जपली होती. त्यांनी काढलेले फोटो म्हणजे फोटोग्राफीचे उत्कृष्ट नमुने होते.
करण मुळातच हसतमुख आणि मनमिळाऊ होते. त्यामुळे त्यांना मित्रसुद्धा भरपूर होते. त्यामुळे त्यांच्याघरी सतत ये जा चालू असायची. कामिनीसुद्धा आवडीने सगळ्यांची उठबस करायची. आपल्या नवऱ्याचा मनमिळाऊ स्वभाव तिला खूप आवडायचा. छोट्यात छोटी गोष्ट तो तिला सांगायचा. पण गेले काही दिवस करण अस्वस्थ होते. गप्प गप्प राहत होते. आधी तिला वाटलं कि कामाचं टेन्शन असेल. पण कितीही कामाचा ताण असला तरी करण तो घरापर्यंत आणायचे नाहीत. यावेळी काहीतरी वेगळं झालं होतं. कामिनी सुज्ञ होती. वेळ आली कि स्वतःहूनच ते सांगतील याची तिला खात्री होती म्हणून ती गप्प बसली.
ते मुळचे कोकणातले. कोकणात दापोलीजवळ त्यांचे लहानसे खेडे होते. राजवाडी नावाचे. तिथे त्यांच्या जमिनी, वाड्या होत्या. त्यांना जमेल तेंव्हा ते आवर्जून तिकडे जात असत. करण चे मोठे दोघे भाऊ, आई-वडील एक विधवा बहीण तिचा २० वर्षांचा मुलगा आणि करणचे ९६ वर्षांचे आजोबा असा मोठा परिवार गावी राहत असे. यावेळीही गावी जायचे ठरले होते. करण काही दिवसांनी त्यांचा मीटिंग आटोपून येणार होते. मुले कंटाळली होती म्हणून त्यांनी मुलांना आणि कामिनीला पुढे जायला सांगितले. मुले तयारच होती. त्यांना राजवाडीला खूप आवडायचे. तिथे रोज वाडीत फिरायचं, मनात आलं तर काम करायचं नाहीतर समुद्रात मनसोक्त डुंबायचं, दोन्ही काकूंनी केलेलं सुग्रास जेवण जेवायचं. इकडच्या कितीही महागड्या जेवणाला गावच्या जेवणाची चव नाही असे दोघांचेही एकमत होते. मोठ्या काकांची दोन मुले आणि मधल्या काकांची दोन मुले आणि आत्याचा एक अशी सगळी मुले मिळून धमाल करत. मग काय कौस्तुभ आणि कबीर गावी येऊन थडकले. येताना त्यांनी आठवणींनी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आणलं होतं. ते आल्यामुळे गावाकडच्या सर्वांनाही आनंद झाला.
मग एका रात्री कबीर आणि कौस्तुभनि सगळ्यांना गप्पा मारत बसायचा आग्रह केला. मुले रात्री उशिरापर्यंत जागी असायची पण घरातले मोठे झोपायचे करण त्यांचा दिवस लवकर सुरु व्हायचा. मग मुलांच्या आग्रहासाठी सगळे बसले. "आबा आबा आम्हला बाबांच्या लहानपणीचे फोटो बघायचेत दाखवाल का ? कबीर म्हणाला. " का रे लबाडांनो बाबाची मस्करी करायची आहे का ? " आबांनी विचारतच सगळे हसले. बरं बरं दाखवीन हो ." आबा म्हणाले. आजोबा त्यांच्या वडिलांना आबा म्हणायचे. ९६ वर्षांचे होऊनही त्यांची नजर आणि स्मरणशक्ती तीव्र होती. आबा हसत म्हणाले," तुम्हाला मुलांना बघायचेत का फोटो ? मोठा खजिना आहे आठवणींचा बरं का !" उद्या दुपारी जेवणे झाली कि दाखवतो." दुसऱ्या दिवशी दुपारीच सगळी मुले आबांच्या मागे लागली. काका-काकूंना आश्यर्य वाटत होते कि मुलांना जुने फोटो कशाला बघायचे आहेत? इतक्यात मुंबईवरून करणसुद्धा आले. मग थोडा आराम करून तेही फोटो बघायला लागले. कबीर आणि कौस्तुभ बाबांच्या लहानपणीचे फोटो बघत होते. ब्लॅक अँड व्हाईट फोटो. सगळे छोटे छोटे. बाबा, काका, आत्या. इतक्यात कबीर म्हणाला," बाबा हे काय तुमच्या फोटोमागे एक शॅडो आहे बघाना" " तो असे बोलल्यावर सगळेच नीट बघायला लागले. "अरे ! जुने फोटो . त्या काळी फोटोग्राफर काढतील तसा फोटो. लोक तरी कुठे जाणकार होते ? आणि इतके जुने फोटो आहेत बहुतेक वातावरणाचा परिणाम झाला असेल." आबा म्हणाले. मग कौस्तुभ म्हणाला," नाही हो आबा. बाकी कोणाच्या मागे नाही फक्त बाबांच्या मागेच आहे शॅडो. हे पहा ना सगळ्या फोटोंमध्ये. हे बाबांचे कॉलेजचे फोटो. यातही बाबांच्या फोटमागे एक शॅडो दिसतेय." "जाऊ दे सोडा विषय. पोरांनो तुम्हला सगळ्यांना आणि घरातल्या बायकांना आज पाटलांनी जेवायला बोलावलंय रात्री. त्यांच्याकडे जागरण आहे देवीचं. मी सांगिलंय आम्ही पुरुष काही येत नाही. आमचं जेवण कमला करेल. बायकांनाही कामातून तितकाच आराम. तुम्ही सगळे तयारी करून जा. चला पळा लवकर." आबा करणकडे बघत होते. मुलांनी फोटोमधली सावली दाखवल्यावर करणला फुटलेला घाम त्यांच्या नजरेतून सुटला नव्हता. सगळे गेल्यावर निवांतपणे त्यांनी करणबरोबर बोलायचं ठरवलं. जेवण झाल्यावर करण त्यांच्या खोलीत गेले. त्यांनी त्यांच्या सगळ्या ट्रिप्स चे फोटो पाहायला सुरवात केली. त्यांनी ऍडव्हान्स्ड कॅमेरा घेतला होता. फोटो स्वतः एडिट केले होते. म्हणजे ते खराब होण्याचा चान्स नव्हता. त्या फोटोंमध्येही करणच्या मागे एक सावली दिसत होती. काळी कुट्ट ती एखाद्या स्त्रीची असल्यासारखी वाटत होती. खूप लांब केस असलेल्या. आता मात्र कारण थरथर कापू लागले. इतक्यात दारात आबा आले," काय झालं करण कशाला घाबरला आहेस इतका?" " काही नाही आबा. खरंच काही नाही. कामाचं टेन्शन आहे बस." करण घाम पुसत म्हणाले. मग आबा त्यांच्या शेजारी बसून म्हणाले," जगाला फसवशील पण ९६ पावसाळे पाहिलेल्या या आबाला नाही फसवू शकणार तू. काहीतरी गडबड आहे हे तू आल्यापासूनच लक्षात आलंय माझ्या. आता आडपडदा न ठेवता सांग." "हो मलाही ऐकायचं आहे, कि माझा हसतमुख नवरा इतका कशामुळे अस्वस्थ झालाय ते !" कामिनी आत येत म्हणाली. आबा आणि करण चकित झाले. आबा म्हणाले," काय ग बाळा तू गेली नाहीस ?" कामिनी म्हणाली," नाही आबा मी थांबले घरी करणबरोबर बोलायला. सांगा आता काही लपवू नका." कारण पांढऱ्या फटफटीत चेहऱ्याने म्हणाले," कामिनी मी तुझा अपराधी आहे. माफी तरी कशी मागू ? मी स्वतःच्या हातानी स्वतःवर संकट ओढवून घेतले आहे. ही गोष्ट ५ वर्षांपूर्वी चालू झाली. तेंव्हा मी आपल्या बिझनेस मिटिंग साठी कोलकात्याला जायचो. आपली एक शाखा तिकडेही आहे. तुला माहित आहेच. मला कधी कधी महिनाभरही राहावं लागायचं. मुंबईहून आपले काही लोकही तिकडे यायचे. सारखं हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा मी तिकडे एक बंगला भाड्यानी घेतला. कोलकत्त्याजवळ एक छोटं गाव आहे मायोंक नावाचं तिथे बंगला स्वस्तात मिळाला. मी ५ वर्षांपूर्वी तिकडे सुमारे २ महिने राहायला होतो. माझ्या शेजारीच एक बांगला होता. तो बऱ्याच वेळा बंद दिसायचा. मी येता जाता बघायचो. बंद गोष्टींबद्दल आपल्या मनात नेहेमीच उत्सुकता असते. एका रात्री अशीच जाग आली. झोप येत नव्हती म्हणून बंगल्याच्या बाल्कनीत उभा राहिलो. तर समोरच्या बंगल्यात लाईट दिसला. आणि त्याच्या गॅलरीत ती दिसली. एखाद्या स्त्रीने किती सुंदर असावं ! ती तिच्या स्वतःच्याच तंद्रीत केस विंचरत होती. केसही किती लांब अगदी गुढग्यापर्यंत. तिनी बंगाली साडी नेसली होती. ती बंगाली भाषेत गाणं म्हणत होती. भाषा समजत नव्हती पण तिचा आवाजाची मोहिनी पडत होती. मी एकटक तिच्याकडे पाहत होतो. हि गोष्ट तिच्याही लक्षात आली. ती माझ्याकडे पाहून हसली. तिचे डोळे खूप सुंदर होते मस्त्यकृती. मीही हसलो. मग ती आत निघून गेली. मी रोज त्या बंगल्यावरून जात असे. बाहेरून पाहिलं तर तो बांगला बंद असल्यासारखा वाटत होता. बागेचीही निगा ठेवली नव्हती. तिच्याबद्दलची उत्सुकता वाढत होती. मग एक दिवस माझा सहकारी मला बंगल्यापर्यंत सोडायला आला. तो गेल्यावर मी आत शिरणार तोच ती दिसली. तिच्या बंगल्याच्या गेटमध्ये. ती मला बोलवत होती. मी गेल्यावर ती म्हणाली," नमोष्कार मै जोयती राय. आप मेरी मदद करेंगे ? मै बाहर थी तब मेरे बंगलेका दरवाजा अंदरसे बंद हो गया | आप please खोलनेमें मदद किजीये|" तिची मागणी नाकारणं शक्यच नव्हतं. मी जाऊन हॅण्डल फिरवलं आणि दार उघडलं. ती लाजून म्हणाली," माफ किजीये मुझसे नहीं खुलं रहा था| खामखा आपको तक्लीफ दि |" मी काही बोलणार इतक्यात तिनी नुकसानभरपाई म्हणून मला जेवायचं आमंत्रण दिलं. मी लगेच हो म्हणालो. तिच्या रूपाची मोहिनीच इतकी जबरदस्त होती. मग असं करत करत मी तिच्या कधी जवळ गेलो समजलेच नहीं. ती साक्षात रती होती. मला भरभरून सुख देत होती. मुंबईला आल्यावरही तिची खूप आठवण यायची. कधी एकदा तिकडे जातो असे व्हायचे. मग अशातच चार वर्ष झाली. मला तिची इतकी भुरळ पडली होती कि तिच्या नावाशिवाय मला दुसरे काही माहित नव्हते. मला चौकशी करावीशी वाटलीसुद्धा नाही. मग ती माझ्या लग्न करण्यासाठी मागे लागली. मी तिला मी विवाहित असल्याचं सांगितलं. लग्न करू शकत नाही असंही सांगितलं. मग ती चिडली मला अंगाला हातही लावू देईना. एकच हट्ट करू लागली. जीवाचं बरावाईट करून घेईन अशी धमकी देऊ लागली. मी परोपरीनं तिला समजावत होतो. मग एक रात्री तिनी मला घरी बोलावलं आणि म्हणाली," बाबू आप ये गाव के बारेमे जानते है ? ये मायोंक है | जो पुरी बेंगॉल मे काली जादू के लिये मशहूर है | अगर आपने आपकी बीबी को छोडकर मुझसे शादी नाही कि तो मै तो मर जाऊंगी लेकिन उके बाद भी आपको नाही जाने दूंगी | मै काले जादू कि मदद से आपसे जुड जाऊंगी | जाब तक आपको मेरे साथ लेकर नहीं जाती मुझे चैन नहीं आयेगा|" त्यानंतर मी तिच्याकडे गेलो नाही. मुंबईला आलो ते परत तिकडे गेलो नहीं. मग काही दिवसांपासून ती मला आसपास असल्याचे जाणवत आहे. तिच्या केसांचा वास, ती लावायची तो अत्तर हे जाणवायला लागले. आता तर मला ती दिसतेय. ती म्हणते ती मला घेऊन जाणार आणि मी तयार झालो नाही तर ती कामिनीला इजा करेल. आताही ती माझ्या समोर आहे. जे तिचे डोळे मला आवडले होते ते माझ्याकडे बघून आग ओकत आहेत. " करणनी आपलं बोलणं संपवलं. कामिनी ओक्सबोक्शी रडू लागली. " कामिनी मी चुकलो ग. वाहवत गेलो. तिच्याबरोबर जाणे हाच एक उपाय आहे. माझ्या चुकीची शिक्षा मला भोगलीच पाहिजे. मी तुला आणि मुलांना काही होऊ देणार नाही." करण रडत म्हणाले. आबा आणि कामिनीलाही आसपासचा अनैसर्गिक गारठा जाणवत होता. मग आबा म्हणाले," कामिनी हा तुझा गुन्हेगार आहे. त्याला तू योग्य ती शिक्षा दे. पण हि बंगाली बाई मला गूढ वाटते. याच्या म्हणण्यानुसार ती त्याला फक्त रात्रीच दिसायची. इतरवेळी तो बांगला कोणी राहत नसल्यासारखा दिसायचा. काहीतरी गडबड आहे." कामिनी म्हणाली," आबा करण माझे गुन्हेगार आहेतच. पण मी त्यांना माफ केलंय कारण माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही म्हणताय तसं हे साधंसुधं प्रकरण वाटत नाहीए. काहीतरी उपाय काढावाच लागेल. माझी मुंबईत एक बंगाली मैत्रीण आहे. तिच्या सासऱ्यांना यातलं कळतं. अनेक लोक त्यांच्याकडे मदतीला येतात. ते मदतही करतात. त्यांच्याकडे काही सिद्धी आहेत. आम्ही मुंबईला जाऊन त्यांना भेटतो." करण एकदम म्हणाले," नाही ती मला असं काही करून देणार नाही. मी त्यांच्याकडे जायच्या आतच ती तुला आणि मुलांना अपाय करेल. ती माझ्यामागे सावलीसारखी आहे." मग आबा म्हणाले," पोरी हे काम तुला एकटीलाच करावं लागेल. उद्या सकाळीच तुम्ही मुंबईला जा. मुलांना असू दे इकडेच." दुसऱ्या दिवशी सकाळीच करण आणि कामिनी महत्वाच्या मीटिंग च निमित्त सांगून निघाले.
मुंबईला आल्यावर कामिनीने तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधला तिच्या सासऱ्यांची भेटीची वेळ मागून घेतली. निघण्यापूर्वी करणकडून तिने सर्व माहिती नीट विचारून घेतली. गावाचं नाव ते गावात कुठे राहत होते ? मग ती गेली. मैत्रिणींनी तिचं जोरदार स्वागत केलं. ती तिच्या सासऱ्यांकडे काय काम आहे असं खोदून विचारायला लागली. पण कामिनीने तिला काहीच सांगितले नाही. शेवटी अवांतर गप्पा मारून ती आशुतोष बॅनर्जी म्हणजे तिच्या मैत्रिणीच्या सासऱ्यांना भेटायला गेली. जन्म मुंबईतला असल्यामुळे ते उत्तम मराठी बोलत असत त्यांनी प्रेमानी तिला बसायला सांगितले. मग कामिनीने काहीच आडपडदा न ठेवता त्यांना सर्व हकीगत सांगितली. ते थोडावेळ डोळे मिटून बसले. मग म्हणाले," बेटा तुझा नवरा अतिशय वाईट अशा संकटात अडकला आहे. मुळात मायोंक गाव हे संपूर्ण बंगालमध्ये जारण-मारण, जादू-टोणा यासाठी प्रसिद्ध आहे. इथे घराघरात या विद्येचा वारसा पिढ्यानपिढ्या चालू आहे. तुझा नवरा महाराष्ट्रातून गेल्यामुळे त्याला या गोष्टीची कल्पना असणे शक्य नाही. म्हणूनच त्याला स्वस्तात बंगला मिळाला. ती जोयती राय नावाची बाई काहीतरी वेगळी वाटते. ती तुझ्या नवऱ्याला सहज मारू शकली असती ती कशाचीतरी वाट बघतेय. ती त्याच्याबरोबर सावलीप्रमाणे असते. त्यामुळे त्याला काही देवाचे करायला सांगण्यात अर्थ नाही. तू आता घरी जा. मी थोडी चौकशी करतो. कदाचित आपल्याला मायोंकला जावे लागेल. हि गोष्ट तुझ्या नवऱ्याशी बोलू नकोस." मग कामिनी घरी आली. घरात आल्यावर तिच्या अंगावर काटा आला. करणच्या आसपास एक वाईट शक्ती असल्याची जाणीव होत होती. घरात एक वेगळाच गारवा जाणवत होता. दुसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणीचा फोन आला. तिने घरी बोलावले होते. ती जाताच मैत्रिणीने सासऱ्यांच्या खोलीकडे बोट दाखवले. ते खूप गंभीर दिसत होते. ते म्हणाले ," ज्याप्रमाणे आपल्यात आमावस्या वाईट समजतात तसे बंगाली लोकांमध्ये काही खूप वाईट दिवस मानले जातात. आजपासून ३ दिवसांनी एक ग्रहण आहे. ते २० वर्षांनी येणार आहे. जोयती त्याचीच वाट बघते आहे. त्या दिवशी ती करणला मारेल. त्यामुळे त्याचा आत्मा कधीच मुक्त होणार नाही तिच्या आधीन राहील. मुळात मला हि जोयती आधीपासूनच जिवंत नसावी असे वाटते. मन घट्ट करून ऐक. तुझ्या नवऱ्यानी एका आत्म्याबरोबर संबंध ठेवले होते. ती साधीसुधी नाही तर एक शक्तिशाली जारण-मरणात प्रवीण असलेली. जेंव्हा तू मला जोयतीबद्दल सांगितलेस तेंव्हा मी समाधी लावली. जोयती जर नुकतीच मेली असती तर ते मला जाणवले असते. पण ती आधीपासूनच मृत आहे. त्यातून ती काळ्या जादूत माहीर असावी. अशी माणसे मेल्यावर अधिक शक्तिशाली होतात. आता काय होऊन गेलं याचा विचार करण्यात अर्थ नाही आपल्याला खूप घाईनी पावले उचलावी लागणार आहेत. यश देणं देवाच्याच हातात आहे. खूप शक्तिशाली आत्मा आहे. माझी परीक्षा आहे. पण आता मी मागे हटणार नाही. कदाचित हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं काम असेल. उद्या सकाळच्या विमानाची तिकिटे काढली आहेत. आपण कोलकत्याला मग तिकडून लगेच मायोंक साठी निघणार आहोत. माझ्या स्नेह्यांकडे राहण्याची सोय केली आहे. करणला यातले काही सांगू नकोस." हे एकूण कामिनीच्या अंगावर काटा आला करणनी नको त्या मोहात पडून हे काय करून घेतलं होतं. काहीही होवो तिला करणला वाचवायलाच हवे होतं.
दुसऱ्या दिवशी ते कोलकत्त्यासाठी निघाले. कामिनीने करणला फक्त तिकडे काम असल्याचे सांगितले. आशुतोष बॅनर्जी त्यांच्यासोबत येणार आहेत हे सांगितले नाही. विमानात त्यांनी करण आणि कमीनेचे तिकीट त्यांच्यापसून लांब असलेल्या सीट चे काढले होते. कामिनीला त्यांनी कोणतीही ओळख दाखवली नाही. कारण जर त्यांनी असे केले असते तर करणसोबत सावलीसारखी असलेल्या जोयतीला त्यांची जाणीव झाली असती. विमानात बसल्यावर करण अस्वस्थ झाले," जोयती म्हणतेय तिला आपल्या आसपास काहीतरी जाणवतंय. दुसरी शक्ती. तू कोणाला भेट्लेलीस का ?" " नाही हो ! असं काहीच नाही." कामिनी म्हणाली. खरंतर ती मनातून खूप घाबरली होती. जोयतीचं आसपास असणं तिलाही जाणवत होतं. मग करण बोलले," जोयतीनी आपल्याला मायोंक ला जायला सांगितलंय. तिच्या बंगल्यावर. नाही गेलो तर ती तुला काहीतरी करेल. आपण उतरल्यावर लगेच मायोंक साठी निघू." करणं च बोलणं आशुतोष ना ऐकू जात होतं. त्यांनी कामिनीला खूण करून बोलावलं व जोयती सांगते तसं कर असं सांगितलं. करण ला परवापर्यंत धोका नाही. मी तुमच्या मागून येतोच असे सांगितले.
कोलकत्याला उतरल्यावर त्यांनी जेवण केले. मग लगेच टॅक्सी करून ते मायोंकसाठी निघाले. संध्यकाळ झाली होती. करण आता अधीर झाले होते. त्यांच्यावर भूल पडल्यासारखे झाले होते. ते बंगल्यासमोर उतरले तेंव्हा काळोख झाला होता. त्यांनी आवारात पाऊल टाकले. इकडे कामिनी तो भयंकर बंगला बघून घाबरली होती. ते बंगल्यात शिरताच बाहेरचे गेट बंद झाले. घुबडांचा आवाज, कुत्रांच्या रडण्याचा आवाज अंगावर शहारे आणत होता. इतक्यात कामिनीच लक्ष आवारातल्या मोठ्या वृक्षाकडे गेले. त्यावर ती बसली होती. ती फिदीफिदी हसत होती. तिचे पाय खाली जमिनीपर्यंत येत होते. कामिनी घाबरून थरथर कापायला लागली. मग तिचे लक्ष बंगल्याजवळ असलेल्या विहिरीकडे गेले. ती त्यावर बसली होती आत पाय सोडून. तिचे केस पायापर्यंत लांब होते. मग कामिनीचे लक्ष बंगल्याच्या वरच्या मजल्यावर गेले. तिथे जोयती सारखी दिसणारी वयस्कर बाई होती. तिचे केस वरच्या मजल्यावरून खालपर्यंत येत होते. तिच्या डोळ्यात बुबळे नव्हती. तीसुद्धा जोरजोरात हसत होती. कामिनी घाबरून बेशुद्ध पडली.
इकडे आशुतोष बॅनर्जी कोलकत्त्यात आपल्या मित्राकडे आले होते. सुश्रुत राय. सुश्रुत राय हे पुजारी होते. त्यांनी काशीला जाऊन तेथील विद्यापीठात पदवी घेतली होती.त्यांच्या गुरूंनी त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्यांना काही शक्ती बहाल केल्या होत्या. आशुतोषनी यायच्या आधी त्यांना करणची सर्व कहाणी सांगून माहिती काढायला सांगितले होते. ते आल्यावर जेवण झाल्यावर सुश्रुतनी त्यांना मायोंक गावाची आणि जोयतीची गोष्ट सांगितली.
फार पूर्वीपासून मायोंक गाव हे जारण-मारण, वशीकरण यासाठी प्रसिद्ध होतं. त्या गावातल्या लोकांना जन्मतःच या शक्ती मिळत असत. कदाचित तो त्या जागेचा गुणधर्म असेल. त्या गावात एकही देऊळ नाही. तर १९४० सालची गोष्ट आहे. तेव्हा भारत पारतंत्र्यात होता. या गावाचा बाहेरच्या जगाशी काहीच संबंध नव्हता. याच गावात दोघी मायलेकी राहत होत्या. अरुंधती राय आणि जोयती राय. मायोंक मध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्तीला त्यांचा प्रमुख नेमत असत. अशी हि अरुंधती होती. खूप लांबून लोक तिच्याकडे येत असत. ती त्यांच्याकडून काही मोबदला घेऊन त्यांचे काम करत असे. मोबदला पैशातच असायचा असे नाही तो कधीकधी एखादा मनुष्यबळीही असायचा. जोयतीलाही जन्मताच त्या शक्ती होत्या. एक दिवस ती आईची जागा घ्यायचे स्वप्न बघत होती. अशातच एक दिवस त्यांच्याकडे जॉन आला. जॉन ब्रिटिश होता. तो दुभाषा बरोबर घेऊन आला होता. तो कोलकत्याच्या गव्हर्नरचा मुलगा होता. त्याला वडिलांची जागा हवे होती. अरुंधतीने त्याला वडिलांचे केस आणायला सांगितले. जाता जाता त्याची नजर जोयतीवर पडली. तिच्या रूपाने तो मोहित झाला. तिलाही तो खूप आवडला. मग त्यांच्या भेटी चालू झाल्या. भाषेचा अडसर त्यांना कधीच वाटलं नाही. एकमेकांच्या सहवासात त्यांना आनंद मिळत होता. जॉननी तिला तो गव्हर्नर झल्यावर लग्न करीन वचन दिले होते. अरुंधतीने त्याचे काम केले. त्याच्या वडिलांवर जादूटोणा करून त्यांना मारले. इकडे एक दिवस जोयतीला आपल्याला दिवस गेल्याचे समजले. अरुंधतीच्या हि गोष्ट लक्षात येताच तिने जोयतीला खूप मारझोड केली. जोयतीचा जॉनवर खूप विश्वास होता. ती त्याला भेटायला कोलकत्याला गेली. जॉन गव्हर्नर झाला होता. त्यांनी जोयतीला भेटायला साफ नकार दिला. तिला त्याच्या हवेलीतून धक्के मारून हाकलून दिले. इकडे पडलेल्या चेहऱ्यानी जोयती मायोंक मध्ये आली. जॉनने केलेल्या फसवणुकीमुळे तिला धक्का बसला होता. तिनी बंगल्याजवळच्या झाडाला फास लावून जीव दिला. अरुंधतीला ह्या सगळ्यामुळे खूप दुःख झाले. तिनी आपल्या शक्तींनी जोयतीला जिवंत करायचे ठरवले. त्याप्रमाणे तिनी सुरवातही केली. तीन दिवसांनी सूर्यग्रहण होते. काळी जादू करणाऱ्यांसाठी दुर्मिळ दिवस. २० वर्षांनी येणाऱ्या या ग्रहणाला ती जोयतीला जिवंत करणार होती. जॉनचा बदला तिनी घेतला. जॉन त्याच्या खोलीत काळा-निळा पडलेला मिळाला.
ग्रहणाच्या दिवशी तिनी जोयतीच्या देहाला समोर ठेऊन मंत्र म्हणायला आरंभ केला. तिच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. जोयती हळूहळू हालचाल करू लागली. इतक्यात तिच्या विरोधात असलेला एक गावातला मांत्रिक ब्रिटिश सैनिकांना घेऊन आला. जॉनला हिनेच मारले अशी खबर त्यानी त्यांना दिली. त्यानी येऊन अरुंधतीच्या पूजेत बाधा आणली. ती त्यांना खूप परोपरीने समजावत होती. इतक्यात ग्रहण संपले. अरुंधतीला ब्रिटिशांनी शिक्षा म्हणून तिचे डोळे फोडून तिथेच तिचा वध केला. तेंव्हापासून जोयती आणि अरुंधती तिकडे भटकत आहेत. जोयती अर्धमृत आहे. हे असे झाल्यावर गावात पसरले कि त्यांचे आत्मे तिथे वावरत आहेत. त्यामुळे तिकडे कोणी जात नाही. जॉननी तिला धोका दिला म्हणून ती इतर पुरुषांना तिच्या जाळ्यात अडकवायला बघते आणि मन भरलं कि त्यांना मारून टाकते. सगळे पुरुष तिच्या दृष्टीने गुन्हेगार आहेत. करण तिला आवडलाय ती या ग्रहणाला त्याच्या आत्म्यावर कब्जा मिळवेल. मग करणसुद्धा आत्मा बनून तिच्यासोबत राहील.
तिला थांबवायचा एक उपाय आहे तो मी तुला सांगतो."
इकडे कामिनी शुद्धीवर आली. तिने पहिले कि ती बंगल्याच्या दिवाणखान्यात आहे. समोर जोयती एका होमकुंडासमोर बसली आहे. एका वाडग्यात काहीतरी आहे जे ती आगीत टाकत आहे. समोर करण झोपले आहेत. तिनी करणला खूप हाका मारण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही तिच्या तोंडातून आवाजच फुटत नव्हता. तिला काय करू कळत नव्हते. तिचे शरीर तिच्या ताब्यात नव्हते. ती कणभरही हालचाल करू शकत नव्हती. ती सैरभैर झाली होती. मग तिनी मन शांत केले ती योगासनांच्या क्लासला जायची तेंव्हा तिथल्या शिक्षिकेने तिला मन एकाग्र करायला शिकवले होते. डोळ्यासमोर दिवा आहे असे समजून ज्योतीवर लक्ष एकाग्र करायचं असं तिला सांगितलं होतं. तिनी डोळ्यासमोर नवऱ्याचा चेहरा आणला आणि लक्ष एकाग्र केलं आणि तिचं मन करणबरोबर जोडलं गेलं. करण खूप घाबरले होते. तिनी त्याला धीर दिला. मी तुमच्याबरोबर आहे घाबरू नका असं सांगितलं. इकडे जोयतीला याची कल्पना नव्हती सूर्यग्रहण फक्त ३५ मिनिटांसाठी होतं. त्यावेळेत तिला तिचं काम पूर्ण करायचं होतं. ग्रहण लागलं आणि बंगल्याचा दरवाजा मोडून पडला. समोर आशुतोष बॅनर्जी होते. "तू त्याला नेऊ शकणार नाहीस." ते गरजले. इकडे आशुतोष आल्यावर कामिनीवरची बंधने गळून पडली. मग त्यांनी तिला काहीतरी सांगितले व जोयतीवर लक्ष केंद्रित केले. इकडे कामिनी संपूर्ण बंगल्यात फिरू लागली. वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत ती गेली. तिकडे अरुंधतीचा फोटो होता. ती तिची खोली होती. कामिनी फोटोपुढे हात जोडून बसली म्हणाली," आई. हो मी तुला आईच म्हणणार आहे. आज माझं सौभाग्य तुझी मुलगी घेऊ पाहत आहे. त्यांची चुक नाही असं नाही म्हणणार. पण आई मी त्यांना माफ केलंय. जोयती करतेय ते चूक आहे. तिला मुक्ती देण्यासाठी तू मदत कर. तिच्या यातना तुला तरी बघावतात का ? आजपर्यंत तिनी अनेक जणांना मारले हे कमी नाही का ? थांबावं आता आई. " समोरच्या फोटोमधून अरुंधती बाहेर आली. तिला डोळे नव्हते. त्याजागी खाचा होत्या. कामिनीला तिची भीती वाटली नाही. ती बंगालीत बोलत होती पण कामिनीला ते मराठीत ऐकू येत होते ," मुली मी आयुष्यभर खूप पापं केली. आम्ही काळी जादू करणारे लोक जोपर्यंत आमची विद्या दुसऱ्या कोणाला देत नाही तोपर्यंत आम्हला मुक्ती मिळत नाही. माझी विद्या जोयतीला द्यायच्या आतच माझा मृत्यू झाला. त्यामुळे मी अशी भटकत राहिले. जोयतीला मी मुक्ती देईन. तुझ्या नवऱ्याला काही होणार नाही. पण त्याबदल्यात माझी विद्या तुला घ्यावी लागेल. तुला माझी वारस बनावे लागेल." ती अशी अट घालणार हे कामिनीला आशुतोषनी सांगितले होते. कामिनी म्हणाली," मला मान्य आहे. मी तुझी वारस होते." ती असे म्हणताच अरुंधतींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. कामिनीला आपल्या आत काहीतरी जात असल्याची जाणीव झाली. मग अरुंधती कामिनीला घेऊन खाली आली. इकडे आशुतोष जोयतीबरोबर लढत होते. आपली शक्ती कमी पडत असल्याची जाणीव त्यांना झाली. मग अरुंधती त्या दोघांच्या मध्ये आली आणि मंत्र पुटपुटू लागली. जोयती जोरजोरात किंचाळू लागली. सुटायची वेळ जवळ आली. आणि जोयतीभोवती एक आगीचे रिंगण आले. त्यात ती जळू लागली. तिच्याबरोबच अरुंधतीहनेही त्यात प्रवेश केला. मग आशुतोषनी कामिनीच्या हातावर मंतरलेले पाणी घातले आणि तिला ते आगीत सोडायला सांगितले. तिने असे करताच तिला अरुंधतीने दिलेल्या शक्ती काळ्या धुराच्या रूपाने त्या आगीत जाऊन नष्ट होऊ लागल्या. कामिनीला अतिशय त्रास होत होता. पाचच मिनिटात ग्रहण संपले त्याचबरोबर जोयती आणि अरुंधतीला मुक्ती मिळाली. त्यांच्या शक्ती त्याच्याबरोबर नष्ट झाल्या. सुश्रुत ने सांगिल्याप्रमाणे आशुतोषनी त्या शक्ती कामिनीला घ्यायला लावल्या. ग्रहण संपायच्या आत त्याही नष्ट करणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी आशुतोषला मंतरलेले जल दिले होते. इकडे करण शुद्धीवर आले. कामिनी खूप थकली होती. तिला आधार देऊन त्यांनी बाहेर आणले. मागे वळून करण नी बंगल्याकडे पहिले. त्यांना जोयतीबद्दल वाईट वाटले. तिला आयुष्यात खरं प्रेम मिळालं नाही. देव तिच्या आत्म्याला शांती देवो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
इकडे राजवाडीत कबीर आणि कौस्तुभनी बाबांचे लहानपणीचे फोटो काढले त्यांना ते मुंबईला न्यायचे होते. इतक्यात कौस्तुभ ओरडला, "आबा आबा बघा आता बाबाच्या कोणत्याच फोटोमध्ये शॅडो दिसत नाहीए. अरे असं कसं झालं?" आबा हे ऐकून गालातल्या गालात हसले. करणच्या मागची वाईट सावली कायमसाठी गेली होती. त्यांना पुरावा मिळाला होता. " चला देवाचीच कृपा म्हणायची."……………………………………………
समाप्त
सौ. संपदा राजेश देशपांडे
ही कथा पूणपणे काल्पनिक आहे. फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे.