दोन - तीन दिवस गेले आणि रविवार उजाडला. कॉलेजच्या गॅदरींगचा आणि पर्यायाने माझ्या सुट्टीचा शेवटचा दिवस!! दोन दिवस कसे गेले कळालंच नाही. मला सुट्टीच्या दिवसांत जे काही करायचं होतं, त्यातलं बरंचसं मी शनिवापर्यंत करून टाकलं होतं. पुढील महिन्यात असणाऱ्या परीक्षेसाठी थोडं पुस्तक घेऊन बसलो. शिवाय मेकॅनिकल इंजिनिअरिंगची लायब्ररीतुन आणलेली काही रेफरन्स बुक्सही वाचून काढली. रविवारी सकाळी माझी झोप उघडली तेव्हा सूर्य चांगलाच वर आला होता. मी डोळे किलकिले करून घड्याळाकडे पाहिले. पावणेनऊ वाजायला आले होते. आजही कॉलेजला जायचे नाहीये, हा विचार मनात येताच मी जाम खुश झालो आणि काही वेळ तसाच बेडवर लोळत पडलो. सकाळी जाग येताच दिवसभर आपल्याला काहीच काम नाहीये अशी जाणीव होणे यापेक्षा मोठे सुख कोणते असूच शकत नाही, मी विचार केला. अल्फा म्हणत होता, की कुणाचीतरी बाईक मिळवूया आणि कुठेतरी दूर भटकून येऊया. मला त्यावर हरकत घेण्याचे काहीच कारण नव्हते. तसंही पुस्तक डोळ्यासमोर ठेवून ठेवून मी पकलो होतो. माझ्या क्लासमध्ये कोणाकडे गाडी आहे का, याचा विचार करत मी बेडवर उठून बसलो.

"उठलास प्रभू?? वा वा वा.. चल आता पटकन आवर आणि इथे माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बस. " अल्फा त्याच्या नेहमीच्या खिडकीजवळील खुर्चीत बस्तान मांडून बसला होता. त्याच्या हातात छोटी डायरी आणि पेन पाहून मला आश्चर्य वाटले. कारण ती डायरी तो त्याच्या तपासकामातील नोंदी लिहायला वापरायचा.

"हो हो.. थांब. आजच्यासाठी गाडी लागणारे आणि मला समोर बसवून तू माझ्या मित्रांना फोन करायला लावणारेस, हे मला ठाऊक आहे. डोन्ट वरी!! गाडी मिळेल आपल्याला. " मी आळोखेपिळोखे देत म्हणालो, " तू आपल्याला कुठे जायचंय, ते ठरव ना आधी.. ती डायरी काय घेऊन बसलायस!! फिरायला गेल्यावर हेरगिरी नाहीये करायची आपल्याला!! "

"हो बरोबर आहे तुझं. फिरायला गेल्यावर हेरगिरी करायची नाहीये. " अल्फा डोळे बारीक करत म्हणाला, " फिरायला न जाता हेरगिरी करायचीये!! "

मी ब्रश आणायला बेसिनकडे निघालो होतो, पण अल्फाचे ते वाक्य ऐकून जागीच थबकलो.

"असा लूक देऊ नकोस मला.. ब्रश करून ये पाहू लवकर.. तुझ्याशी बोलण्यासाठी एक खमंग विषय मिळालाय मला!! " अल्फा हातांवर हात चोळत म्हणाला. त्याच्या डोळ्यांतील ती चमक माझ्या चांगलीच ओळखीची होती.

"बरं, आलो. " मी एक दिर्घ उसासा टाकत बोललो. आजच्या बाईक ट्रिपचा बट्ट्याबोळ झालाय, हे उघडच होते.

माझे दात घासून झाले आणि मी अल्फाच्या समोरील खुर्चीवर जाऊन बसलो.

"झालं?? गुड. आता हे वाच. " त्याने 'पोलीस टाईम्स' ची मोबाईलवर उघडलेली ताजी न्यूज मला दाखवली . मी सांगली जिल्ह्याच्या पेजवरील हेडलाईन वाचली,

'काळ्या खणीच्या तळ्यात सापडले एका अज्ञात पुरुषाचे प्रेत '

सांगली वृ . : आज (दि. 15 मार्च) रोजी रात्री उशिरा सांगलीतील काळ्या खणीच्या तळ्यात एका अज्ञात पुरूषाचे प्रेत पाण्यावर तरंगताना लोकांनी पाहिले. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना फोन केला आणि ते प्रेत बाहेर काढण्यात यश मिळविले. ते प्रेत अंदाजे पन्नास वर्षांच्या पुरुषाचे असून त्याची ओळख पटविण्यात अजून पोलिसांना यश आलेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार या व्यक्तिचा मृत्यू एक दिवस आधी, म्हणजे शुक्रवारी (ता. 14 मार्च) रोजी झाला असण्याची शक्यता आहे. या व्यक्तिच्या अंगावर कोठेही जखम झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे, हे स्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीसांनी तपासणी केली आहे, पण त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. दृश्य गोष्टींवरून त्या व्यक्तिने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली असावी, असे अनुमान पोलिसांकडून बांधले जात आहेत. सध्या या व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालू आहेत. या प्रकरणावर सांगली जिल्हा पोलीस खात्यातील इन्स्पेक्टर देसाई काम करत आहेत.

या वृत्ताच्या बाजूलाच एका सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या , काळी - पांढरी संमिश्र अशी मोठी दाढी असलेल्या, भटक्या दिसणाऱ्या एका माणसाचा फोटो होता. तो फोटो पाहून मी क्षणभर जागीच गोठून गेलो!! हा तोच होता - दोन दिवसांपूर्वी आम्हाला रात्री उशिरा रस्त्यावर भेटलेला वेडा..!!

ते वाचून होताच मी अल्फाकडे पाहिले. तो एक भुवई वरखाली करत आणि गालातल्या गालात हलकेच स्मित करत माझ्याकडे पाहत होता. मी एक मोठा श्वास घेतला.

"तर तुला म्हणायचंय, की या प्रकरणात काहीतरी काळंबेरं आहे.. " मी म्हणालो.

"शंकाच नाही प्रभू!! अगदी दोनशेदोन टक्के यात खोल पाणी मुरलेलं आहे. "अल्फा खुर्चीवर हात आपटत म्हणाला," मी खात्रीशीरपणे सांगू शकतो, की त्या वेड्याला नक्कीच काहीतरी गुपित ठाऊक होतं. काहीतरी म्हणण्यापेक्षा आपण 'कुणाचंतरी' असं म्हणूया. आणि तो जो कोण होता, त्याने या वेड्याचा तोंड उघडण्याआधीच खेळ संपवून टाकलाय. "

"तू हे इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकतोस?? " मी साशंकतेने विचारले, " मला म्हणायचंय, की हा एक योगायोगही असू शकतो ना.. आपण त्याला पाहणं आणि त्यानंतर दोन दिवसांत त्याचा मृत्यू होणं. त्यानं कोणालाही खून करताना पाहिलं असलं तरी शेवटी तो एक  वेडा होता. त्यामुळे तो काहीही बोलला तरी ते लोकांना पटणारच नाही. त्यामुळे त्याच्यापासून कोणत्याही खुन्याला धोका उद्भवणार नाही. आणि म्हणूनच, त्याला ठार मारण्याचा कोणी प्रयत्नही करणार नाही!! "

अल्फाची क्षणभर चलबिचल झाली. ते पाहून मी स्वतःवरच जाम खुश झालो. अशी पटण्यासारखी स्पष्टीकरणं मला क्वचितच देता यायची. अल्फाने थोडासा विचार केला आणि मग तो म्हणाला,

"हे पहा प्रभू, मी हे मान्य करतो, की एखादा वेडा मनुष्य काहीतरी बडबडत असेल, तर ती गोष्ट म्हणजे आपल्यासाठी निव्वळ कचरा असतो. पण कदाचित त्या व्यक्तीसाठी त्याला काहीतरी अर्थ असावा. आता तूच बघ ना. तुझ्या माझ्यासारखे डोकं ताळ्यावर असलेले लोक दिवसभरात बहुतांश कशाबद्दल बोलतात? आपण रोज जे आयुष्य जगत असतो, त्याबद्दल. पण हे जे मनोरुग्ण असतात ना, त्यांच्या आयुष्यात काहीतरी भयंकर घटना घडलेली असते, ज्यातून ते बाहेरच येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी ती घटना हेच भूत, वर्तमान आणि भविष्य होऊन बसतं. त्यांना वाटतं, की ती घटना अजूनही घडतेच आहे आणि त्यामुळे त्याला अनुसरून ते काहीतरी बोलतात. आता ही व्यक्ती खूनाबद्दल काहीतरी बरळत होती, याचा अर्थ तिने त्याच्या आयुष्यात जवळच्या कोणाचातरी खून होताना पाहिलं असण्याची शक्यता आहे, असा होत नाही का?? आणि ते गुपित बाहेर पडू नये, म्हणून त्यालाही कोणीतरी मारून टाकले असावे. "

अल्फाचे स्पष्टीकरण अमान्य करण्यासाठी त्याने मला जागाच ठेवली नव्हती.

"नाही प्रभू.. माझ्या शोधक बुद्धीला हे क्षुल्लक काहीतरी असेल, हे पटत नाहीये. मला वाटतंय, की यात एकदा डोकावून पाहयलाच हवंय..

"बरं बरं." मी म्हणालो,  " मला ठाऊक आहे, की तू या वेडपट माणसाच्या मृत्यूचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाहीस आणि त्यावरून मी हाही निष्कर्ष काढून ठेवला आहे, की आजची आपली बाईक ट्रिप रद्द झालेली आहे. त्यामुळे मिस्टर डिटेक्टिव्ह, आता पुढे काय करायचं आहे, हे तुम्ही सांगा.."

"शाब्बास.. फारच छान!! अशी आपल्या हातात सुत्रे आली, की कसं झकास वाटतं.. " अल्फा हसत म्हणाला. त्याच्यामध्ये असलेला 'अल्फा स्पेशल' उत्साह परत वर उफाळून आलेला मला स्पष्ट जाणवत होता. त्याला एका न उलगडलेल्या कोड्याची चाहूल लागली होती आणि ते कोडे सोडविल्याशिवाय त्याच्यातला डिटेक्टिव्ह आता शांत बसणार नव्हता.

"आता मला थोडा वेळ दे.. मी आधी घडलेल्या घटनांचा आढावा घेतो आणि मग आज काय काय काम करायचे, याची रुपरेषा आखतो. "तो खुर्चीतून उठला आणि त्याने रुममध्ये येरझाऱ्या घालण्यास सुरुवात केली. मी मस्त जांभई देत डोळ्यांवर पुन्हा झोप येतेय का, याचा अंदाज घेऊ लागलो.

"ठिकाय." अल्फा म्हणाला, " सध्या आपल्याकडे 'तो एक वेडा होता, त्याने कोणालातरी खून करताना पाहिले होते आणि त्यामुळे त्याचा खून झाला' एवढीच माहिती आहे. आता आपण तीन ठिकाणांना भेट देणे अनिवार्य आहे -पहिलं पोलीस ठाणे, जिथे इन्स्पेक्टर देसाई बसतात, दुसरं म्हणजे शवागार, जिथे त्या वेड्याचं प्रेत ठेवलं आहे आणि तिसरं म्हणजे काळ्या खणीचे तळे, जिथे ही घटना घडली आहे. गाडी तर आपल्याला मिळणार आहेच. तिचा आज चांगला उपयोग होईल, असे मला वाटतेय. "

"आणि या सर्वाआधी आणखी एका ठिकाणी जायचंय - ते म्हणजे विश्रामबाग चौकातले गणेश नाश्ता सेंटर!! " मी गुरगुरणाऱ्या पोटावर हात ठेवत म्हणालो!!

गणेश नाश्ता सेंटर म्हणजे आमच्या रूमपासून सर्वात जवळ असलेले स्वस्तात मस्त खाण्याचे ठिकाण होते. एका अस्सल मराठी माणसासारखा पोहे आणि चहा असा ब्रेकफास्ट आम्ही केला. बाईक ट्रिपच्या निमित्ताने मिळालेली टू व्हीलर आमच्याकडे होतीच. ती घेऊन मग आम्ही जिल्हा पोलीस ठाण्याकडे निघालो. इन्स्पेक्टर देसाई तेथून बाहेर पडायच्या बेतातच होते, तेवढ्यात आम्ही त्यांना गाठले.

"सर आत येऊ का? " आम्ही त्यांच्या केबिनच्या दारातून त्यांना विचारले. ते आपल्या हातातील फाईल्स बाजूला ठेवत होते. आमचा आवाज येताच त्यांनी आमच्या दिशेने पाहिले.

"कोण तुम्ही?? " त्यांनी गुरकावून विचारले. ते निघण्याच्या वेळी आमचं तिथे जाणं म्हणजे नवीन ब्याद समोर येण्याची शक्यता, असा त्यांचा समज झाला असावा.

"मी अल्फा. आणि हा माझा मित्र प्रभव. "

अल्फा हे नाव ऐकताच देसाईंच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव जाऊन त्रासलेले भाव आले.

"अरे देवा!! तू तोच अल्फा आहेस का, ज्याच्या नावाने वाघमारे सर सतत शंख करत असतात?? " त्यांनी विचारले.

"वाघमारे सर जर शंख करत असतील, तर ती व्यक्ती निःशंकपणे मीच आहे!! " अल्फा हसत म्हणाला.

"हे बघ अल्फा बीटा गॅमा जे काय ते, मी आता निघालोय कारण आज सुटीचा दिवस आहे. सर्वत्र शांततापूर्ण वातावरण आहे आणि पोलिसांना आज काहीच काम नाहीये. असा दिवस एखाद्या पोलिसाच्या आयुष्यात क्वचितच येत असतो. त्यामुळे तू माझ्या मागे कोणतेही लचांड लावू नयेस, असं मला वाटतं.. तू मस्तपैकी उद्या सकाळी ये पाहू.. "

"निघाला आहात? पण आत्ता तर काम सुरू होण्याची वेळ आहे सर..!! " अल्फा म्हणाला.

"हो का? मग या फाईल्स घे आणि तूच काम कर माझ्याऐवजी!! " त्यांनी टोला लगावला.

"सर माझं फक्त पाचच मिनिटांचं काम आहे. तुमच्या मागे कोणतंही काम लागणार नाही, याची ग्वाही मी देतो. बरोबर पाच मिनिटांनी तुम्ही या ऑफिसच्या बाहेर असाल. फक्त मला तुमची पाच मिनिटे द्या.. " अल्फा म्हणाला. देसाईंनी थोडा विचार केला आणि ते म्हणाले, " बरं. बरोब्बर पाच मिनिटं. बोला. काय हवंय तुम्हाला?? "

"मला तुम्हाला काल काळ्या खणीच्या तळ्यात सापडलेल्या प्रेताबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचंय. "

"काळ्या खणीच्या तळ्यात काल सापडलेलं पुरूषाचं प्रेत?? " त्यांनी निर्विकारपणे विचारले.

"होय. " अल्फा काही बोलणार, तेवढ्यात ते म्हणाले,

"त्या घटनेची पूर्ण माहिती आम्ही मिळविली आहे. ती एक साधी आत्यहत्येची केस आहे. मृत इसम हा एक मेंटल पेशंट होता आणि तो मिरजेतील मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमधून पळून आलेला होता. त्याने याआधी हॉस्पिटलमध्ये असतानादेखील दोनतीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने काल रात्री खणीच्या तळ्यात उडी मारून आपला जीव दिला . आम्ही ही केस क्लोज करून डेडबॉडी हॉस्पिटलच्या हवाली करणार आहोत. त्यामुळे हा विषय सोडून दुसरे काही बोलायचे असेल तर बोला. अन्यथा निघा. "

"मला माणूस तीन दिवसांपूर्वी भेटला होता "अल्फा शांतपणे म्हणाला,  "आणि त्यावेळी त्याने मला असे काहीतरी सांगितले आहे, ज्यावरून मला वाटते, की या प्रकरणाचा थोडा खोलात जाऊन तपास व्हायला हवा."

देसाईंनी त्यांचे डोळे बारीक केले.

"कुठे भेटला होता तो तुम्हाला?? आणि काय सांगितले त्याने तुम्हाला??" त्यांनी विचारले.

"शंभर फूटी रस्त्यावर. तो आमच्याशी बोलला. तो म्हणत होता, की त्याने कोणालातरी खून करताना पाहिले आहे.. " अल्फा संथपणे म्हणाला. ते ऐकताच क्षणात देसाईंचा चेहरा गंभीर झाला.

"काय?? खून?? "

"होय. " अल्फा उत्तरला.

"तुम्हाला नक्की खात्री आहे, तो हाच होता याची?? "

"हो, शंभर टक्के!! दोन दिवसांपूर्वी पाहिलेला चेहरा कोण विसरेल बरं?? " अल्फा म्हणाला.

"काय म्हणाला तो? मला सविस्तर सांगा जरा. " खुर्चीवरून पुढे झुकत ते म्हणाले.

"आम्ही गुरुवारच्या रात्री जेवण झाल्यानंतर शंभर फूटी रस्त्यावर नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो होतो तेव्हा आम्हाला हा मनुष्य भेटला होता. तो एकदम सैरभैर झाला होता आणि सतत म्हणत होता, की त्याने कोणालातरी खून करताना पाहिलंय आणि आता तो त्यालाही मारणार आहे. आम्ही त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप घाबरलेला होता. त्यामुळे त्याने आम्हाला काहीच सांगितले नाही. शेवटी आम्ही प्रयत्न सोडून दिला आणि आमच्या रूमवर परतलो. त्यानंतर आज सकाळी याचा फोटो पेपरमध्ये पाहिला आणि तुमच्याकडे आलो. "

"हं.. " देसाई विचारांत मग्न झाले, " पण तो एक वेडा होता, हे विसरून चालणार नाही. तो काही निरर्थक बोलत नसेल कशावरून?? "

"पण तो निरर्थक बोलत असेलच, असेही आपण नाही म्हणू शकत ना.. कदाचित त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असेलही. "

"मला या सगळ्याचा नक्की काय अर्थ लावायचा, हेच कळेनासं झालंय. तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की त्याचा खून करण्यात आलाय?? "

"ठाऊक नाही. पण या प्रकरणाचा थोडा आणखी अभ्यास करायला हवा , असं मला वाटतं. शिवाय मलाही यात काही मदत करता आली, तर फार बरं होईल. "

"अच्छा.. " देसाईंनी थोडं डोकं खाजवलं, " वाघमारे सर म्हणतात, की तू कामात फार लुडबुड करतोस. पण अगदीच निकामी नाहीयेस तू. बरं. हरकत नाही. तुला या प्रकरणाच्या तपासातील सगळ्या गोष्टी खुल्या आहेत. तुला हवी ती मदत तू करू शकतोस. कोणी विचारलं, तर माझं नाव सांग आणि काही लागलं, तर फोन कर. हे माझं कार्ड. आपण आणखी चौकशी करू यामध्ये. बरं आता मला साहेबांचा फोन यायच्या आत आपण निघूया का?? "

त्यांनी सगळ्या गोष्टी एकदमच गुंडाळून टाकल्या.

"हो हो. धन्यवाद सर!! " अल्फा  खूश होऊन म्हणाला, " आणखी एकच गोष्ट.. त्या व्यक्तिच्या डेडबॉडीचे फॉरेन्सिक पोस्ट मॉर्टम करावे, अशी माझी मागणी आहे. "

"बरं बरं ठिक आहे.. उठा आता.. " आम्ही तेथून उठत होतोच, इतक्यात देसाईंच्या समोरचा फोन वाजला - हेड ऑफिस!!

"सत्यानाश!! " त्यांनी आमच्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहिले आणि फोन उचलला,

"येस सर!! "

"चल पळ लवकर, त्यांनी फोन ठेवायच्या आत!! " अल्फा मला ढकलत म्हणाला. आम्ही धावतच बाहेर आलो आणि एकमेकांच्याकडे पाहून हसलो.

"अल्फा, देसाईंचा सन्डे बरबाद करून टाकलास तू!! " मी हसू आवरत म्हणालो.

"बिचारे!! " अल्फा म्हणाला, " आता पुन्हा त्यांच्या समोर जायला जागाच उरली नाही!! असो. आपण आपल्या कामाला लागू. प्रथम आपल्याला त्या माणसाच्या वस्तू पहायच्या आहेत. "

आम्ही तेथील संग्रहित वस्तूंच्या कक्षात गेलो.

"आम्हाला देसाईसाहेबांनी पाठवलं आहे. काल रात्री काळ्या खणीच्या तळ्यात मिळालेल्या प्रेताचे कपडे आणि चपला पहायच्या आहेत. " अल्फा तेथील हवालदारांना म्हणाला. हवालदारांनी मान डोलावली आणि त्याचे कपडे आणि चपला यांच्या पिशव्या दाखवल्या.

अल्फाने प्रथम त्याचे कपडे हातात घेतले.  ते कपडे आम्ही त्या रात्री पाहिले तेच होते. रुग्णालयात रूग्णांना देतात, तसे पांढरे, पण आता पिवळट पडलेले असे ते कपडे होते. अल्फाने शर्टाच्या बाह्या, कॉलर, पँटेचे गुडघे, तळ सर्वांचे त्याच्या भिंगाखालून निरीक्षण केले. शर्टामध्ये त्याला काही सूचक दिसले असावे ; कारण त्याने शर्टाचे फोटो काढून घेतले. मग ते पुन्हा पिशवीत ठेवून दिले.

मग त्याने आपला मोर्चा चपलांकडे वळवला. चपला म्हणजे अगदी साधे असे स्लीपरच होते ते. पाण्यात पडल्यामुळे त्या थोड्या स्वच्छ झाल्या होत्या. त्यातील एका चपलेवर त्याचे लक्ष बराच वेळ केंद्रीत झाले होते. त्याने ती चप्पल टेबलावर पालथी ठेवली. तिच्याकडे सर्व बाजूंनी नीट निरखून पाहिले. मग खिशातून भिंग काढून अगदी जवळून न्याहाळले. तिच्या तळव्याचा वास घेतला. त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले आणि सरतेशेवटी तो म्हणाला,

"या चपला मिळाल्यानंतर त्यावर कोणी काही प्रयोग केलेले नाहीयेत ना?? त्या होत्या त्याच अवस्थेत या पिशवीत ठेवलेल्या आहेत ना?? "

"होय. त्या घेऊन कोण काय करणार!! मिळाल्या तशा या पिशवीत ठेवल्यात. " हवालदार उत्तरले .

"अच्छा.. " अल्फा म्हणाला. त्याचे मन खूपच खोल विचारांत गढून गेले होते, असे त्याचा चेहरा सांगत होता. शेवटी तो  मनातल्या मनात एका निकालावर येऊन पोहोचला आणि म्हणाला,

"मला या चपलांवरचे आणि शर्टावरचे फिंगरप्रिंट्स हवेत. शक्य तितक्या लवकर. "

"चपलांवरचे फिंगरप्रिंट्स?? " हवालदार चक्रावलेच.

"होय. मला या प्रकरणात लागेल ती मदत देण्याचे देसाई साहेबांनी मान्य केले आहे. तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही देसाई सरांना फोन लावू शकता."

हवालदार महाशयांनी आपल्याला कोणी तिऱ्हाईत येऊन काम सांगतंय, याबद्दल नाखुशी व्यक्त केली ; पण अल्फाला फिंगरप्रिंट्स देण्याचे मान्य केले. अखेर त्यांचे आभार मानून आम्ही पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर पडलो.

"त्या शर्टात आणि  चपलेत तू काहीतरी खास पाहिलंयस, हो ना?? " मी अल्फाला विचारले. तो अजूनही त्याच्याच तंद्रीत होता.

"चल, शवागाराकडे जाऊ. " तो म्हणाला. माझा प्रश्न बहुधा त्याने ऐकलाच नसावा. मी खांदे उडवले आणि गाडीला किल्ली लावली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Manasi gadmale

nice book

Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to डिटेक्टिव्ह अल्फा आणि अंधारातील पाऊल


Khuni Kon ? World famous murders in Marathi
Detective alfa and dekhava.
Detective Alfa and a step into darkness.
Detective Alpha and the moonlight murder
Detective Alfa and the old house. Story by Saurabh Wagale.
डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
Detective Alfa ani Haravleli Angathi
Unknown stories from mahabharat.