वा-याची झुळुक आज फारच जोरात आली ..नुकतच उमलेलं प्राजक्ताचं फूल नाजूक देठामुळे आपल्या रिते होण्याच्या गुणानं अचानक झाडावरून गळून पडलेलं कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं.
मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, "काही त्रास नाही ना झाला ?"
झाडावरुन पडल्याने ते नाजूकस फूल थोडं कोमेजून गेलं
सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा प्रयत्न  केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं.
काही क्षण असेच गेले...

आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, "झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?"पणहे तुझं प्रारब्ध तुझी माझी साथ एवढीच होती ...थोडं स्वीकारण्याच्या धाडसाने बळ आलं त्या म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकलं.

फुल म्हणालं, "निमिषार्धासाठी वाईट वाटलं..

कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं.
पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, आज जरा फारच जोरात घोंघावला ...माझी वेळ आली होती झाडाची  आणि फांदीची साथ सोडून देण्याची ...

कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं.

पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो... "

"तू आता स्वतंत्र झालास खरा पण आता तू क्षणा क्षणाला कोमेजत चाललायस .... आता काय करणार ?" - मातीचा प्रश्न.

दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, "आता हवा जिकडे नेईल तिकडे मी जाईन...
वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असे तोवर जमेल तितके जग पाहून घेईन...
मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन.

पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होवून पुन्हा नव्याने अंकुरेन..पण या झाडाशी माझे नाते संपायला नको होते एवढ्यात पुन्हा ती वेळ येईल का ?? पण हे माझ्या हातात असते तर...

काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली...


आपलं कुटुंब आप्तेष्ट मित्र ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना इतरांच्या सुखासाठी सर्वात एकाकी झाल्याने बाहेर पडावं लागतं  

मग सुरु होते जीवघेणी स्वतः ला सिद्ध करण्याची जीवघेणी धावपळ ...जे आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देते. पण समृद्ध करत करत ..इतरांना आपल्या मुळे मिळणाऱ्या आनंदाने कधी  सुखावता येते  कारण कुणाचा तरी त्यागच ...इतरांच आयुष्य सावरत जाते ... नव्याची नांदी होणार अशीच भावना या नकळत अजाणतेपणे गळलेल्या  फुलाची......

आयुष्यातली चांगुलपणाची पुंजी, वृत्ती ची शुद्धता मजबूत असली की हा प्रवास सुसह्य होतो, इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं.आपलं आपल्याला उभं राहवं लागतं..तसच हे गळून पडलेलं फूल...

नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विरुन ....पण  पुन्हा नव्याने एखाद्या फुलांच्या  ताटव्यात आपलं अस्तित्व दाखवण्यासाठीची ही वेळ नव्हे काळ....अशा विचारातच आपलं असणं नसण्याची जाणीव करुन  देत जमिनीवर पडून राहिलं ते फूल....
पुढच्याच क्षणी कुणामुळे तरी  पायदळी तुडवत निष्प्राण झालं ....
पुन्हा ती वेळ यावी असा आक्रोश मनात करत पंचतत्वात विलिन झालं आता झाडाची ती हळहळ व्यर्थ च...
झाडावर इतर फुले आनंदाने विहरत राहिली त्या  फुलाचा त्याग नसणं त्यांच्या गावी ही नव्हतं .आम्हांला काय करायचे आम्ही मस्त अशीच भावना सुखावत होती...त्यांची वेळ अजून यायची होती ....फुलाची ती अंतयात्रा आयुष्याचे मर्म सांगून गेली  ...शेवटचे त्याचे शब्द पुन्हा ती वेळ येईल ......पण गेलेली वेळ च ती.....परत थोडीच येईल.....??..!!

असलेल्या क्षणात जगत जगत .....एखाद्या विसाव्याच्या क्षणी  इतरांना वेदना होणार नाहीत याची काळजी घेत  घेत...आनंदी राहायला हवं ... हेच आयुष्य .अनंतात विलीन झालेलं ते फूल अंतर्मुख करुन गेलं ........!!!

सहजच कोमजलेल्या फुलाकडे बघताना सुचलेला हा विषय .....मांडण्याचा प्रयत्न ....!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel