चालणं ,
चालताना ठेचाळणं
हा प्रारब्धच!
अडचणींना घाबरून
नशीबाला दोष देऊन
कसं चालेल?
पुढं पुढं सरकताना
नवननवीन अनुभव
येत रहातील एकेक..
माणसांची पारख
होत जाईल
अनामिक वाटांवर ..
चालत रहा..
वाट संपेपर्यंत
ती संपणार नाहीच
तरीही चालत रहा..
क्षितिज गाठेपर्यंत
ते दिसत राहिल फक्त
मृगजळासारखं..
अंधार होईल हळूहळू
वाट दिसेनाशी होईल..
गोंधऴून जाऊ नकोस,
सैरभैर फिरू नकोस..
हिमतीने काम घे
कुठूनतरी प्रकाश दिसेल
धीर सोडू नकोस..
सोसाट्याचे वारे येतील
असह्य वेदना देऊन जातील..
तू अटळच रहा ;
स्वतःच्या वाटेवर
एकटाच अढळ रहा..
मुसळधार पावसात मग
गारव्यानं गारठून
थरथरू लागेल अंग अंग
सहारा नसेल
कुठेच जवळपास..
तूच तुझं छप्पर हो
फक्त काही काळ!
ज्यांना ज्यांना जवळ केलंस
तेच पळ काढतील बघ,
दूरदूरवर कुणीच नसेल
पडता तोल सावरायला..
हुंदके तुझे आवरायला..
दुनियादारी कळू लागेल
दुनिया भारी पळू लागेल..
तुला पळता येणार नाही
ओझं फेकता येणार नाही..
उगीचच थोडं हसून बघ
स्वतःवरच रूसून बघ...
जमलंच तर चालून बघ
अंधुक वाट
किंवा आराम कर थोडा
एकाकी दगडाचा
एकाकी आधार घेऊन..
पुन्हा उठ नव्या उमेदीने
अंधाराकडेच माग
चालण्यासाठी आधार..
पुन्हा पाऊस येईल
वीजांचा गडगडाट होईल
क्षणभर हायसं वाटेल
लखलखीत दिसेल पायवाट
साठवून ठेव तो प्रकाश
निस्तेज डोळ्यांत..
वीजांचं चमकणं थांबलं की
तू ही थांब पळभर ..
अजून गडद वाटेल अंधार
पूर्वीपेक्षाही गुडुप्प..
चालणं अजून अवघड वाटेल,
डगमगू नकोस ,
निराधार समजू नकोस..
बुडत्यालाही काठीचा
आधार असतोच!
तोच शोध इतस्ततः !
डोळ्यांची बुब्बुळं
एकवटून घे गडद वाटेवर..
काही वेळानं दिसू लागेल
चालू लाग पुन्हा...
गुरू शोधत राहू नकोस
पडत्या काळात.. .
सोनं जसं आगीतून
काढावं ,
की अधिकाधिक
चमकून उठतं...
तस्साच तू ही हे सारं
पार करून पुढं जा
आधीपेक्षाही चमकून
उठशील तू ही !
चालताना एव्हाना तुझे
पिकत चालले असतील केस..
दुखत असतील पाय
अखंड अविरत चालून...
प्रचंड शिदोरी असेल गाठीशी
आलेल्या अनुभवांची,
अनुभवलेल्या विचित्र माणसांची...
पुन्हा पुन्हा तपासून पहा
तुझ्याच अनुभवांची पानं
म्हणजे चुका होणार नाहीत...
वय सरकतं झालं की
उमेद ढासळू लागेल
हलक्याशा झटक्यानं मग..
बिथरू नकोस पुन्हा
भूतकाळ आठव ,
नव्यानं उभा रहा
तूच तुझा आधार हो..
आहेच कोण आता
तुझ्या पिलांना आधार...
तुलाच बघायचा आहे
गोतावळा नी सुखदुःख!
सांगून बघ पिलांना
चालून काढलेल्या
वाटेतले खाचखळगे..
झेपणार नाही कदाचित
त्यांना पुढची कठीण वाट...
उभं कर त्यांना आता
तस्साच चालण्यासाठी,
खंबीर खांबासारखं..
ऐकणार नाहीत पिलं
तुझ्या वाटेतल्या अडचणी
रागावू नकोस,
अधीर होऊ नकोस...
त्यांना समजणार नाहीत
भयानक चढउतार..
वेळेतच उभं कर पिलांना
धगधगत्या आगीसमोर,
समजू देत थोडीशीच
चटक्यातली दाहकता..
सांभाळून चालतील मग
समोरची वाट....
समजू देत त्यांना
बापाच्या पायाखालची
जमिन!
त्यांनाही पुढं बाप व्हायचंय,
एकटंच उभं रहायचंय ,
त्यांनाही चालायचंय..
तुझ्यासारखंच ,
निरंतर ... !
©मधुरा धायगुडे