मीराने मोबाईल मध्ये तारिख पाहिली आज तर १३-०४-२०२१. तिचा पगार आला होता. ती ऑफिसवरुन निघाली.संध्याकाळची वेळ होती. पक्ष्यांचे थवेच्या-थवे निरभ्र आकाशात घरट्याकडे परतीचा प्रवास करत होते. दिवसभर आग ओकणारा सूर्यनारायण आता थोडा थंड होऊन डोळ्याला आनंद देत होता. ते नीळ आभाळ आता एखाद्या नववधूप्रमाणे केशरी शालू पांघरून होतं. अश्या धुंद वातावरणात मीराची पाऊले आपोआप घराकडे वळली होती. क्षणार्धात काही कळायच्या आता तीच पावलं त्या अथांग, उसळणाऱ्या, सागराकडे वळली. कधी शांत तर कधी भयावह वाटणाऱ्या या सागराला जणू मीरा आज पहिल्यांदा पाहणार होती असं वाटत होतं.

मग काय? मीराचं मन एका लहान मुलासारखं प्रफुल्लीत झालं. जणूकाही त्या लहान मुलाला आपल्या आवडीची खेळण्यातली गाडी मिळाली होती. हृदयाची धडधड वाढली होती.जणूकाही ती तिच्या प्रियकराला समोर पाहत होती. तिचे मन बावरे होऊन उसळू लागले त्या उन्मत्त सागराप्रमाणे. सरतेशेवटी ती त्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचली. तिथे फक्त ते  दोघे होते. समुद्र आणि मीरा..! समुद्राच्या आज शांत असलेल्या लाटा, त्या लाटांवरून वाहत येणारा तो खारा  वारा आणि मीराचं वेड्यासारखं उसळणारं मन... या तिघांचा सुंदर मिलाप झाला होता. तिने दूरवर एक नजर टाकली...  या मोठ्या किनाऱ्यावर आजही कोणीच दिसते नव्हते... ती थोडावेळ पाण्यात थांबली. समुद्राच्या लाटांनी तिच्या पायाला थंडगार स्पर्श केला. दुपारभर तापुन त्या पाण्यात एक शितलता होती. तिला एक चाहुल लागली. मीराने त्या दिशेने पाहिले. मीराला आभाळाच्या  केशरी कॅनव्हासवर एक काळी आकृती दिसली.

"यावेळी इथे कोण आलं..? माझ्याप्रमाणे कुणीतरी वेडं दिसतंय..!!" मीरा स्वतःशीच बडबड.

"जा... जाउन बघ.. भेट... बोल..जा बघतरी कोण आहे..?"मीराचं मन म्हणाले. मनाने सांगितले आहे तर मीरा जाणारच ना...!! म्हणुनच मीरा पुढे सरसावली...

"कोण आपण..??" मीराने त्याला विचारले.

त्याचा चेहरा त्या मावळत्या सूर्याच्या प्रकाशाने प्रज्वलित झाला होता. त्याची चर्या केशरी रंगाने उजळली होती. घारे डोळे.. सरळ नाक.. भरदार दाढी-मिश्या... दाढीवर दवबिंदू सारखे पाण्याचे थेंब ओघळले असावे... कदाचित त्याच समुद्राच्या पाण्याने त्याने चेहरा धुतला असावा...  मीरा त्याच्या तेजःपुंज चेहर्‍याकडे एकटक बघत उभी राहिली... त्याच्या मनात नक्की काय आहे हे कळायला मार्ग नव्हता..!! त्याच्या डोळ्यात दुखाचे सावट दिसत होते... पण चेहर्‍यावर समाधानाचे भाव होते...  ते या समुद्राच्या सहवासात त्याला लाभलेले समाधान असावे...

"मी तुम्हाला त्रास तर देत नाहिये ना..?? तुम्ही काय करतायं इथे..?? यावेळी इथे कोणीही नसतं..!!" मीराने विचारलं.

मीराच वेड्यासारखं बोलत होती. तो मात्र निशब्द उभा होता. त्यांच्या दोघांच्या पायांवरुन समुद्राच्या लहरी येत-जात होत्या. पाच-सहा मिनिटे झाली. तरी तिथे निशब्द शांतंता होती.तो एक चकार शब्दही बोलला नाही.

"किती गर्व आहे त्याला? मी इतकं काळजीने विचारलं तरी उत्तर द्यायची पद्धत नाही..!" मीरा मनात म्हणाली. पण त्याच्या खर्जातल्या  आवाजात मीराची तंद्री तुटली.

"आज समुद्राला विचारतोय की, प्रेम खरंच होतं का?? आणि होतं तर लवकर मिळत का नाही??" तुम्हाला.

त्याच्या आवाजात एक अगतिकता होती. तरीही मीराला मात्र हसू आवरले नाही. या प्रेमवीरांच्या वाक्याने मीरा जोरात हसु लागली. त्या हसण्याने त्याची तंद्री तुटली.

"मी काही चुकलो का? माझ्या बोलण्यात काही गफलत झाली का ?? तुम्ही का हसताय?" त्याने विचारले.

"नाही मित्रा, तुला एका चांगल्या मैत्रीची गरज आहे. तुझी प्रेमकहाणी मला सांग..! उगाच या समुद्राला कशाला त्रास देतोयस.. मला तुझी नवी मैत्रीण समज..! मी मीरा दाते.. आणि तु??" मीराने विचारलं.

"मी प्रितीश समेळ. इथेच मागे शिवजी पार्कच्या पलिकडे माझं घर आहे. मी एकटाच राहतो सध्या..!" प्रितीश म्हणाला.

"एकटा? आई-बाबा, बहिण-भाऊ कुणी नाही?" मीराने आश्चर्यचकित होऊन विचारले

"आई- बाबा मी कॉलेजला असताना वारले. तो वैष्णव देवीला अपघात झालेला ना त्यात गेले ते...!"  प्रितिश थोडा हताश होऊन म्हणाला.

"आय एम सॉरी प्रितिश...!" मीरा जरा खजील होऊन म्हणाली.

"कित्येक वर्ष मी एकटा होतो. पण ऑफिसमध्ये माझी भेट प्रणालीशी झाली. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.. इतरांसारखे आम्हीपण ठरवले की खूप फिरायचं.. एकमेकांना वेळ द्यायचा.. पण कदाचीत नियतीला ते मान्य नव्हतं..मागच्या वर्षात याच दिवशी तिने एकदा मला भेटायला बोलवलं... " प्रितीश बोलता बोलता थांबला.

आसवं टिपुन तो म्हणाला, " मी तिच्यासाठी एक छानसं गिफ्ट घेऊन गेलेलो. ती आज माझ्या आधी पोहोचली होती. मला जसं हे कळलं तसं मी पळत-पळत तिथे पोहोचलो. तिला तिथे गेल्या गेल्या मी जोरात मिठी मारली. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिला मी आणलेलं गिफ्ट दिलं. तिने हसत-हसत ते स्वीकारलं."

मग मला म्हणाली,"प्रितीश मला तुला काहीतरी सांगायचं आहे. माझंच चुकलं हे तुला आधीच सांगायला हवं होतं."

"काय बरळतेयस..??" मी तिला म्हणालो.

"प्रितिश मला लास्ट स्टेज कॅन्सर आहे माझ्याकडे फक्त एक वर्ष आहे." तिचं हे वाक्य संपेपर्यंत प्रितिश धाडकन खाली कोसळला.

"प्रणाली, माझं नशीब किती वाईट आहे बघ..!! आधी आई-बाबा देवाघरी गेले आणि आता तु ही मला सोडुन चालली आहेस.."प्रितिशचे अश्रु थांबत नव्हते.

प्रितिश पुढे बोलु लागला," अाज तिचा वाढदिवस आहे. तिला हि जागा खुप आवडते. म्हणुन मी आज इथे आलो."

"तुमच्यातलं प्रेम पाहुन मला खरंच खुप हेवा वाटतो. हेच ते प्रेम जे मरणोत्तरही जिवंत राहतं." मीरा म्हणाली. मीराने प्रितिशकडे पाठ केली होती. तिला त्याचे अश्रु बघवत नव्हते.

"चला मी जातो आता माझी जायची वेळ झाली. तुला कधी प्रणाली भेटली तर तिला सांग मी खुप प्रेम करतो तिच्यावर ." प्रितिश म्हणाला.

हे वाक्य ऐकुन मीरा पटकन मागे वळली.तिने पाहिले तर तिथे कोणीही नव्हते... तिचं किनार्‍यावर पडलेल्या कागदाकडे लक्ष गेलं. 

कागदावर लिहिले होते..

"हरवला आहे दिनांक १३-०४-१९९८ आणि खाली प्रितिशचा फोटो..!

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel