रमा ताई रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या इतक्यात त्यांचा फोन वाजला. पाहिले तर नचिकेत चा अमेरिकेहुन कॉल होता. हॅलो नची बोल कसा आहेस? आई मी मजेत आहे बाबा आणि तू बरे आहात ना? हो रे आमची काळजी नको करुस पण तू यंदा दिवाळी ला येतोस ना इकडे आता फ्लाईट पण सुरू झाल्या ना? आई अग त्यासाठीच कॉल केला आता नाही जमणार यायला . लॉक डाऊन ,कोरोना मुळे काम खूप पेंडीग राहिली त्यामुळे सुट्टी देत नाही आहेत कामावरून. बर मग कधी येतो ? आई दिवाळी नन्तर नक्की येऊन जाईन. हा चालेल. विभा आणि चिन्मय सई कसे आहेत. सगळे छान आहेत. चल ठेवतो आता फोन म्हणत नचिकेत ने कॉल कट केला.नचिकेत अमेरिकेला जाऊन आठ नऊ वर्ष झाली. कधी तरी दिवाळी ला यायचा तो भारतात. इकडे रमा ताई आणि माधव राव दोघेच राहायचे. नचिकेत एकटाच त्यांना . नंतर त्यांना मुल झालेच नाही. माधव राव घरी आले भाजी आणायला गेले होते. रमा चहा ठेव मला . आत येत ते बोलले. रमा ताई आपल्याच विचारात होत्या त्यांनी ऐकले नाही. तसे माधव राव जवळ आले आणि म्हणाले रमा लक्ष कुठे आहे तुझे कोणता विचार करतेस इतका?. काही नाही ओ नचि चा कॉल आलेला तो नाही येत यंदा ही दिवाळीला. गेल्या वर्षी पण नाही आला. आपण नुसतं त्याच्या नातवंडांच्या आठवणीतच दिवस काढायचे का? एकूलता एक मुलगा तो ही परदेशी. रमा आपणच ठरवले ना की त्याच्या प्रगतीच्या आड नाही यायचे आणि जमेल तसे नचि येतो भेटतो विभा ही छानच आहे काळजीने सगळं आपल्या साठी तिकडून वस्तू पाठवत असते. फोन करते ती आपल्याला तिकडेच या म्हणते पण आपणच जात नाही आहोत. या वर्षी नाही जमत तर नन्तर येईल ना नचिकेत. हा बोलला तो नन्तर येऊन जाईल म्हणून. मग का काळजी करतेस. चल चहा ठेव. मग रमा ताई उठल्या. सकाळी माधवराव म्हणाले रमा दिवाळी पंधरा दिवसा वर आली.सामानाची लिस्ट बनव आपण बाजार करू.अहो मला काही उत्साह वाटतच नाही या वर्षी . नको काही करायला. रमा दरवर्षी आपण दिवाळी साजरी करतो ना मग आणि हा सण वर्षं भराची काळजी ,चिंता,दुःख सार विसरून आनंदाने आपलं जगणं प्रकाशमय करण्यासाठी असतो. सण साजरा करायचा त्यामुळे जीवनात सकारात्मकता येते. आणि विभा नचि ला आवडणार नाही आपण असे उदास असलो तर. बर आणूया आपण सामान रमा ताई म्हणाल्या. रमा या वेळेस जरा नेहमी पेक्षा जास्तच फराळ बनव. का ओ कोणाला द्यायचा आहे का? हो माझ्या मित्रांना द्यायचा आहे. तो तर दरवर्षी देतो आपण. या वर्षी अजून मित्र वाढले आहेत. तू सुमन ला सांग या वेळेस तिची मदत जास्त लागेल . आणि जास्ती कामाचे पैसे ही देऊ तिला. बर करते मी सगळं. रमा ताई म्हणाल्या. माधवराव ही खुश झाले. त्यांना माहीत होते की नचि येणार नाही म्हणून रमा ला वाईट वाटते आहे ती उदास राहू नये म्हणून त्यांनी फराळाचे सांगितले. रमा ताई फराळ उत्तम बनवायच्या. दरवर्षी नचिकेत ला ही फराळ पाठवला जायचा. रमा ताई दिवाळीच्या तयारी ला लागल्या सुमन स्वयंपाक करायला यायची मग स्वयंपाक झाला की फराळ करायला मदत करायची. दिवाळी जवळ आली. उद्या लक्ष्मी पूजन होते. सकाळीच माधवराव आणि रमा ताई छान तयार झाले नचिकेत विभा ने त्यांना फोन केला. सगळे बोलले सई चिन्मय ही आजी आजोबा सोबत बोलले. . रमा ते फराळाचे घे आणि चल निघुया आपण अहो पण कोणते मित्र ते तरी सांगा. अग चल तू प्रत्यक्ष भेट घालून देतो. मग दोघे एका ठिकाणी आले. निवारा वृद्धाश्रम इथे. रमा ताई नी विचारले हे काय कुठे आलो आपण?. रमा हे निवारा वृद्धआश्रम इथेच माझे मित्र आहेत. मग ते दोघे आश्रमात गेले. तिथले केयर टेकर माधवरावाचे मित्र होते. रमा ताई नी पाहिले तिथे काही स्त्रीया पणत्या सजवत होत्या. काही जणी रांगोळी ची तयारी करत होत्या. काही पुरुष मंडळी आकाश कंदील लावत होते. कोणी फुलांचे हार बनवत होते. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य होते आनंद होता. कोणी ही दुखी कष्टी दिसत नवहते. माधवराव म्हणाले,बघ रमा इथे कोणी स्वहताच्या मर्जीने आले आहेत तर कोणाचे सुने सोबत पटत नाही मग आपल्या मूळे मुलाला त्रास नको म्हणून इथे आले आहेत. कोणाला मुलं नाहीत तर कोणाचा जोडीदार त्यांना कायमचा सोडून गेला आहे. तरी ही हे लोक आनंदाने इथे मिळून मिसळून राहतात. आज बघ लक्ष्मी पूजनाची तयारी सगळेजण करत आहेत. अग दिवाळी म्हणजेच आपल्या आयुष्यातील दुःख रुपी अंधकार दूर करून प्रकाशा कडे नेणारा सण आहे. मग का उगाच काळजी चिंता करत जगायचे. आपला नचिकेत आपल्याला सोडून नाही गेला. तो सातासमुद्र पार आहे पण आपलाच आहे. पण या लोकांना आपलं म्हणणारी माणस खूप कमी असतात. यांच्या जीवनातील अंधकार थोडा तरी कमी केला आपण तर आपण भाग्यवानच ठरू. आपला आनंद यांच्या सोबत वाटला तर त्यांना ही छानच वाटेल ना? हो मला या सर्वांशी बोलायचे आहे. चला आपण बोलू आणि फराळ ही देऊ त्यांना रमा ताई म्हणाल्या. मग दोघांनी सर्वांना फराळ दिला खूप गप्पा मारल्या. सगळ्याची आपुलकीने विचारपूस केली. मग आनंदाने उत्साहाने रमा ताई घरी आल्या. संध्याकाळी लक्ष्मी पूजन केले. आश्रमात जाऊन आल्या मुळे त्यांचे मन आनंदी होते. एखाद्याच्या चेहऱ्यावर हासू फुलवणे किती छान असू शकते हे समजले. दिवाळी असतेच या साठी की आपल्या सोबत सर्वांना आनंद आणि सुख वाटण्यासाठी. आनंद सुख वाटल्याने ते अजूनच वाढते. दिवाळी आयुष्य प्रकाशमय बनवते.
समाप्त.
Sangieta Devkar
Print & media writer, Pune