निळ्या रंगाचे केळे? कसं शक्य आहे?
काही वर्षांपूर्वी हीच प्रतिक्रिया जांभळ्या रंगाच्या कोबीबद्दल देखील होती. आपण लहानपणापासून एखादे फळ एखा विशिष्ट रंगामध्ये पाहत आलो आहोत, त्यामुळे लहान मुलं जरी ते फळ वेगळ्या रंगाने रंगवत असतील तर आपण त्यांना सांगतो, सफरचंद लाल रंगाचे असते, संत्री नारंगी, इ.
फळांना निसर्गतःच विशिष्ट रंग असतात. पण वैज्ञानिक आपल्या प्रयोगांमधून निसर्गाला आव्हान देत आले आहेत. (आव्हान- नाविन्याची आणि प्रगतीसाठी. निसर्गाचा समतोल बिघडवण्यासाठी नाही)
ही केळी आग्नेय आशियातील - मुसा बालबिसियाना आणि मुसा अमुमिनाता या दोन प्रजातींपासून संकरीत करण्यात आली आहे. या केळीला मुख्यतः निळी जावा केळी म्हणतात, आणि त्या प्रामुख्याने आग्नेय आशियात उत्पादित केल्या जातात. हवाईमध्ये ही केळी प्रचंड लोकप्रिय असून चवीमुळे या केळीला 'आईस्क्रीम केळी' सुद्धा म्हणतात.
काही महिन्यांपूर्वी या केळीच्या रंग आणि चवीच्या वैशिष्ट्याने इंटरनेटवर खळबळ उडवली होती. आधी सर्वांनी या केळीच्या फोटोकडे एडिट केलेला फोटो समजून दुर्लक्षित केले, पण जेव्हा ओगल्वीचे माजी ग्लोबल चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर थम खाई मेंग यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून याबाबाबत ट्विट केल्यानंतर अनेकांनी हे केळं खरोखरच अस्तित्वात असल्याचे मान्य केले.
ट्विट - 'ब्लू जावा केळी लावण्यास मला कुणी कधी कसे सांगितले नाही? ते आइस्क्रीमसारखे चवदार आहेत.'
पुढे त्याने एक ट्विट सामायिक केले जेथे त्यांनी अॅमेझोपीडिया दुव्याचा उल्लेख केला. ज्यामध्ये या अनोख्या फळाबद्दल सर्व तपशीलवार माहिती आहे. अॅमेझोपिडियाच्या मते, हे निळे जावा केळे मूसा अकिमिनाटा आणि मुसा बालबिसियाना या सीड केळीचे ट्रिप्लोइड संकर आहेत. आणि ते 15 ते 20 फूट उंचीपर्यंत वाढू शकतात. यांच्या झाडाची पाने चांदी-हिरव्या रंगाची असतात. तसेच इष्टतम वाढीसाठी त्यांना 40 फॅरेनहाइट तापमान आवश्यक आहे.
फिजीमध्ये, त्यांना 'हवाईयन केळी' म्हणून ओळखले जाते, फिलिपिन्समध्ये त्यांना 'करी' म्हटले जाते आणि मध्य अमेरिकेत ते 'सेनिझो' या नावाने लोकप्रिय आहेत.