फ्लॅशबॅक
आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ:- 5 pm. ( सायंकाळची वेळ.)
( अशोक बाहेरून घरात पाऊल ठेवतो, रमा त्याला पाणी देते, अशोक आणि रमा दोघे काॅटवर बसतात.)
अशोक:- मिळाला बरं का जाॅब.
रमा:- काय सांगताय, छानचं की, देवाचीच कृपा म्हणायची.
अशोक:- देवाची कृपा आहेच, शिवाय मेहनतही आहे बरं आमची.
( हसत प्रत्युत्तर देतो.)
रमा:- हो ना, प्रारब्धाच्या गोष्टी असतात, नाही का?
अशोक:- तू आणि तो प्रारब्धाचं तुझं ज्ञान, धन्य आहात दोघे.
( रमा ला हात जोडत.)
रमा:- अहो काय करतायं, मला असे हात नका जोडू, देवाकडे जोडा आपलं वन बीएचकेचं स्वप्नही तो पूर्ण करायला मदत तरी करेल किमान.
अशोक:- असं का? बरं,
( असं म्हणत जोडलेले हात देवाच्या फोटोच्या दिशेने नेत, डोळे बंद करून म्हणतो), होऊ दे एकदाचं तेही स्वप्न पूर्ण.
रमा:- हे असं. काही गोडधोड आणलत का या चांगल्या बातमीवर ?
अशोक:- नाही ना, आनंदाच्या भरात विसरलोच मी.
रमा:- बरं जाऊ द्या, पैसे किती मिळतील वगैरे, काही बोलणं झालं?
अशोक:- हो झालं ना.
रमा:- मग ठिकयं.
अशोक:- 15 हजार मिळणार आहेत.
रमा:- अरे देवा, आणि एवढ्यात भागेल का आपलं?
अशोक:- हो, भागेल. मी अजून मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी नंतर प्रयत्न करेन की.
रमा:- की, मीही काही मदत करू का? निदान शिलाई मशीन चालवता येते मला.
अशोक:- नको, तू राहू दे, मी करतो व्यवस्थित सगळं, तू निश्चिंत रहा.
रमा:- तुम्ही म्हणालं तीच पूर्व दिशा, काय आता. ( दोघेही हसतात.)
रमा:- बरं मी जरा आलेच बाहेरून.
अशोक:- हो, ये.
( रमा घरातून बाहेर जाते, अशोक काॅटवर थोडसं उल्हसित चेहऱ्यावर भाव ठेवतं, डोळे भिंतीकडे लावून पाहत बसतो.)
प्रसंग समाप्त