फ्लॅशबॅक
आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 10 am. ( सकाळ.)
( अशोक व रमाच्या घरात वाद होतात, रवी अशोक व रमा यांना बोलत आहे, रवीची बायको तिथे नाहीये.)
( अशोक काॅटवर थोडासा चिंतेत बसला आहे.)
रमा काय ओ, एवढं काय टेन्शनमधे आलात? काही बोलला का फोनवर रवी?
अशोक काय सांगू तुला आता, पोरानं काळजाचा लचकाच तोडायचा ठरवलायं आता, तो आल्यावर तूच बोल.
( अशोकच्या डोळ्यात पाणी येतं.)
रमा मी समजावते, नेमकं काय झालयं ते तर सांगा.
( तेवढ्यात रवी घरात येतो.)
रमा काय रे? काय बोललास फोनवर त्यांना, बघं त्यांच्याकडे अरे रडतायेत ते? काय झालयं सांगशील का? आणि सुमन कुठयं? तुमची भांडणं झालीत का? मला सांग मी समजावते.
रवी आई, आई थोड शांत हो, मला काही बोलू दे.
रमा हां बोल, तू बोल बाबा, तुच बोलणं गरजेचयं, बोल काय झालयं कळू दे तरी.
रवी मी वेगळं राहतोय.
रमा म्हणजे?
रवी मी, माझी बायको आम्ही कुटुंबातून वेगळं होतोयं. मला नाही रहायचयं तुमच्यासोबत.
रमा अहो काय बोलतोयं हा असं? तू ठिक आहेस का? कुणाची दृष्ट बिष्ट तर नाही ना लागली?
रवी आई, मी बरोबरचं बोलतोयं. मी काल परवा जे तुम्ही दोघं घरी नसताना सामान शिफ्ट केलं ते त्यासाठीच होतं.
( रमा उभ्यानेच थरकाप होऊन थेट जमिनीवर खाली बसते, तिच्या अंगातली शक्ती गेल्यासारखं होतं.)
रमा आमची भाबडी नवरा बायकोची जोडी, इतके दिवस संसार केला, मुलाला एवढं लायकं बनवलं आणि आता हे दिवस पहायचे राहिले होते रे देवा.
( तिच्या डोळ्यात पाणी येत आहे.)
रवी मी जातो.
अशोक हो, येत जा अधूनमधून, जगलो वाचलो आहेत का हे तरी कळतं जाईल.
( रवी ते शब्द इग्नोर केल्यासारखं करून घराबाहेर निघून जातो.)
प्रसंग समाप्त