माणुस हा सवयींचा गुलाम आहे, जीवनाच्या प्रत्येक बाबतीत यशस्वी व्हायचे असेल तर विशिष्ट सवयी आपल्याला असणे महत्वाचे आहे. आत्मपरीक्षण करुन आपल्यातील वाईट सवयी शोधुन काढल्या पाहीजेत. स्वतःतील दोष ओळखणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. आज मी तुम्हाला मानसिकरित्त्या मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष सवयी सांगणार आहे, त्या सवयी आपण आत्मसात केल्या तर आपणही मनाने आणखी मजबूत वृत्तीचे बनू शकू.
१) कधीही स्वतःकडुन झालेल्या चुकीबद्दल अपराधी वाटून घेवून त्यात वेळ वाया घालवू नये.
स्वतःबद्द्ल अपराध भाव ठेवल्यास, आत्मविश्वास खचतो. त्यामुळे भुतकाळाचा, अपराधीपणाचा कचरा डोक्यात साठवुन ठेवायचा नाही.
"मी कधीही मागे वळुन पाहत नाही, मी पुढे पाहतो, तुमच्यासमोर जी गोष्ट आहे, त्याकडे तुमचे लक्ष असले पाहीजे." – जॅनेट बेकर
२) स्वतःच्या शक्तिला कधी कमी लेखू नये.
स्वतःला तुच्छ लेखणे म्हणजे अगदी आत्महत्या करण्यासारखेच आहे. जेव्हा आपण मनापासुन एखाद्या गोष्टीची किंवा तिच्या प्राप्तीची इच्छा करतो, तेव्हा ती गोष्ट हमखास मिळते. एखादे ध्येय गाठण्यासाठी ते काया-वाचा- मने फक्त आणि फक्त आपलं इप्सितच समोर ठेवायचं असतं.
प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश असतो, त्याप्रमाणे तो तुमच्यातही आहे, त्यामुळे तुम्ही हातात घेतलेले कार्य तडीस जाणार आहे. कोणतंही काम करताना मनात नेहमी सकारात्मक विचारांनाच थारा द्यावा. स्वतःला कमी लेखणारे नकारात्मक विचार मनात अजिबात येऊ देवू नयेत.
३) आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर परिस्थितीमध्ये होणाऱ्या अपरिहार्य बदलांपासुन पळ काढू नये.
माणसाजवळ प्रचंड सामर्थ्य आहे, जोपर्यंत आपल्यावर कुठलीच जबाबदारी पडत नाही, कुठलेच मोठे संकट येत नाही, तोपर्यंत ही ताकद प्रगट होत नाही, जर यादवी युद्ध झाले नसते तर अब्राहम लिंकनला युगपुरुषाचा मान मिळाला नसता. समाजात अनेक मोठे व्यापारी असतात, उद्योगपती असतात, या लोकांना आपल्यातल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव व्यापारात ठोकर बसल्यावर होते. फाळणीतुन सर्वस्व गमावलेल्या लोकांनी अंतरंगातले सामर्थ्य वापरले आणि सर्व शुन्यातुन उभे केले. अशी विलक्षण ताकत प्रत्येक माणसात असते, आणि ती प्रकट व्हायला संकटं आणि जबाबदारी येत असतात.
४) नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टींवर विचार करण्यात वेळ वाया घालवू नये.
प्रसिद्ध लेखक स्टीफन कोवे म्हणतो, आपल्या विचारांचे दोन परीघ आहेत. एक चिंतेचे वर्तूळ आणि दुसरे कृतीचे वर्तुळ!
चिंतेच्या वर्तुळात अशा अनेक चिंता असतात, ज्या आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात.
"लोक सार्वजिक ठिकाणी किती घाण करतात."
"भ्रष्टाचार आणि आरक्षणाने ह्या भारताचं वाट्टोळं केलय!"
या गोष्टी सहन करणं निश्चितच त्रासदायक आहे, पण नुसती चर्चा करणं, आणि उदास होवुन, विचार करत बसण्याने काय साध्य होईल? त्याऐवजी परिस्थितीचं निरीक्षण करा आणि आपण परिस्थिती बदलण्यासाठी काय काय करु शकतो, त्या कृतीने सुरुवात करा. जर प्रश्न आपल्या आवाक्या बाहेरचा असेल तर आपला आवाका वाढवायला हवा !
५) प्रत्येकाला खुष ठेवण्याची चिंता करु नका.
लोकांच्या मताला किंमत किती द्यायची, याचा विवेक प्रत्येकाने बाळगला पाहीजे नाहीतर, लोक सहज आपला पाहिजे तसा वापर करुन घेतात. लोक आज डोक्यावर घेतात, उद्या पायाखाली तुडवतात, तेव्हा गीतेमध्ये सांगीतलेली, सुख आणि दुःखात समान वर्तन ठेवण्याची ही स्थितीच आपल्याला खरा आनंद प्राप्त करुन देते, आनंदी माणुसच यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पात्र असतो.
६) विचारपुर्वक जोखीम घेण्यात यांना कसलीच भिती बाळगू नका.
पुर्वी कोळशाच्या खाणीत काम करताना दिवा वापरत नसत, कारण तिथे वायु असतो, आणि वायुमुळे खाणीत स्फोट व्हायची शक्यता असते; पण सर हम्फ्रे डेव्ही यांनी धाडस दाखवले, आणि प्रयोग करुन सुरक्षा दीप बनवला, कामगार तो दिवा खाणीत वापरायला तयार नव्हते, तेव्हा डेव्ही स्वतःच तो दिवा घेऊन खाणीत शिरले.
विशेष काही करुन दाखवायचे तर तुमच्याजवळ धाडस पाहीजे. धाडसाचं आयुध वापरुन मानसिकरीत्या मजबुत व्यक्ती आपले दुःख कष्ट आणि कमतरता दुर करतात. धाडस दाखवायचे क्षण आयुष्यात पदोपदी येतात, अशा वेळी आपण मागे सरकायचे नाही. समोर दिसणाऱ्या संकटांचा सामना करायचा.
७) भुतकाळाच्या चांगल्या वाईट आठवणींत अडकुन पडू नका.
"अतीत चाहे कितना भी मुश्किल क्यों ना रहा हो, आप हमेशा दोबारा शुरुवात कर सकते हो"! – गौतम बुद्ध.
आपल्याला जर भुतकाळात रमायची सवय असेल तर ती आपलं नुकसान करणारी आहे, समजा, भुतकाळात आपल्यासोबत एखादी वाईट घटना घडली, आता "ती का घडली?" "असे का झाले?" "दोष कुणाचा होता?" "असे भोग माझ्याच वाट्याला का आले?" इथुन सुरु झालेली नॉनस्टॉप गाडी, "माझं नशीबच फुटकं" या स्टेशनवर येऊन पोहचते.
घडलेल्या घटनांवर असं इन्क्वायरी कमिशन बसवुन, आपली अमूल्य उर्जा खर्च करणं, फालतु आहे. जे व्हायचं ते होवून गेलं, ते आता विसरायलाच हवं. नवा दिवस नव्या उमेदीने सुरु करायला हवा.
८) चुकांपासुन शिकावे, पण त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करु नयेत.
अनेकदा माणसांच्या हातुन चुका होतात. त्या चुका मान्य करुन त्या दुरुस्त करण्यातच शहाणपणा आहे. तुम्ही जास्तीत जास्त चुका करत असाल, तर तुम्ही यशाच्या वाटेवर आहात.
एक प्रसिद्ध तत्ववेत्ते म्हणाले होते, "खुप चुका करा, अधिक चांगल्या चुका करा, अधिक सफाईदार चुका करा, आणि शरमेच्या भावनेतुन बाहेर पडुन चुकांबद्द्ल जिज्ञासा वृत्ती बाळगा! प्रत्येक चुकीचा रस्ता हा योग्य रस्त्याकडे नेतो.
९) इतरांनी मिळवलेल्या यशाचा सन्मान करा.
मानसिकरित्त्या मजबूत लोक इतरांवर जळत नाहीत, त्यांच्या यशाचा दुःस्वास करत नाहीत. उलट खुल्या दिलाने ते आपल्याला भावलेल्या गोष्टींचे कौतुकच करतात. कारण त्यांच्यात कसलीच हीनभावना नसते, ईर्ष्या, असुरक्षितता अशा भावनांवर त्यांनी विजय मिळवलेला असतो.
१०) एखाद्या अपयशानंतर ते दुप्पट जोमाने पाय रोवुन उभे रहायला हवे, मैदानातुन पळ काढायचा नसतो.
निसर्गात तुम्ही पाहीलेच असेल, प्रत्येक झाडाला, वृक्षाला फुलं, फळं त्याच्या विशिष्ट मोसमात येतात, जर योग्य वेळी झाडाला फुल, फळ आलं नाही तर काहीतर चुकतंय असं खात्रीने समजावं, वेळेअगोदर जर झाड कोमेजुन गेलं, किंवा योग्य वेळी त्याला फळ आलं नाही तर ते झाड वाढविण्याच्या बाबतीत काहीतरी गफलत होतेय हे नक्की. हाच निसर्गनियम माणसांच्या बाबतीतही लागू पडतो.
मानसिकरित्त्या मजबूत असलेल्या लोकांना आरोग्य, सुख, शांती आयुष्यभर लाभते, कारण ते आपल्या आकांक्षांचा पाठपुरावा करत राहतात, हळुहळु यश दृष्टिपथात येते. ते आपल्या अवतीभवती आपल्या विचारांना पोषक असे वातावरण तयार करतात.
११) एकटेपणाचं ओझं बाळगू नये.
एकटं कुणाला वाटतं, जो स्वतःला अपुर्ण समजतो, त्यालाच एकटं वाटतं! मानसिकरित्त्या मजबूत असलेले लोक स्वतःला पुर्ण मानतात. त्यांना आनंदी होण्यासाठी किंवा मन रमवण्यासाठी, कुठल्याच व्यक्तिची किंवा वस्तुची (जसे की टीव्ही, गाणे किंवा मोबाईल- इंटरनेट) अशा कुठल्याच गोष्टीची गरज नसते.
१२) जगाबद्दल तक्रार नसावी.
हे जग, हे ब्रम्हांड हे त्या परमेश्वराची निर्मिती आहे, इथली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तु त्यानेच बनवलेली आहे, मग तो / ती वाईट कशी असेल? जर आपण कुणाला शिव्या देत असु, तर त्याही देवाला लागतील. परमेश्वराची निर्मिती उत्कृष्टच आहे, असे मानल्यास ह्या जगाबद्दल आणि जगातल्या लोकांबद्द्ल तुमची कसलीच तक्रार राहणार नाही.
१३) मनासारखा परिणाम मिळण्यासाठी प्रतिक्षा करण्याची तयारी असली पाहिजे.
कांदा दोन महीन्यात उगवतो, पण बदाम उगवायला चौदा महीने लागतात, तुरीची दाळ आणि मुगाची दाळ या दोघातही हाच फरक आहे, निसर्गाचा गंमतीशीर नियम आहे, जी दाळ लवकर उगवते, ती पचायलाही जड आहे, जी थोडा वेळ घेते, ती पचायला हलकी असते. आपल्याला अपेक्षित असलेला परिणाम मिळवण्यासाठी वाट पाहण्याची सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे.
©श्री अनिल उदावंत,
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर,
संपर्क : 97666 68295