"सामाजिक कार्यकर्त्यांचे कौटुंबिक जीवन विशेषतः लैंगिक जीवन फारसे चांगले नसते. सामाजिक क्षेत्रातल्या स्त्री -पुरुषांतील शारिरीक संबंध अनिर्बंधपणे सुरु असतात. त्यामुळे कित्येकांचे संसार मोडून पडले आहेत. याची अनेक उदाहरणे देता येतील" असे म्हणत, काही उदाहरणे स्पष्टपणे नमुद करीत "या समस्येचं नेमकं कारण काय आहे? यावर तुम्ही तुमचं मत एकदा मांडा" असा आग्रह मला एका प्रथितयश सामाजिक कार्यकर्त्याने खाजगीत बोलताना केला. या कार्यकर्त्यानं मांडलेल्या समस्येला सपशेल नाकारणं तसं खूप कठीण होतं, पण मी स्वतः व्यावसायिक समाजकार्याचा पदव्युत्तर पदवीधर असुन मागील ३० वर्षे मी सामाजिक कार्य करीत असल्याने त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे दायित्व मी स्वीकारले. मी त्याचे संपूर्ण समाधान केल्याने मलाही एक वेगळे समाधान मिळाले.
'माणसाला त्याची स्वतःची मदत करता यावी यासाठी मदत करणे म्हणजे समाजकार्य होय.' अशी समाजकार्याची व्याख्या सांगीतली जाते. समाजकार्याला व्यावसायीक दर्जा मिळाला असल्याने समाजकार्यात फार पूर्वी मोठ्या प्रमाणात जो सेवाभाव दिसून येत असे तो अलीकडच्या काळात उरलेला नाही. एकवीसाव्या शतकात व्यावसायीक समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला करीअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होवू लागल्या आहेत.
व्यावसायिक दर्जासोबत समाजकार्यात कामगार कल्याण, कुंटूब कल्याण, महिला व बाल कल्याण, शालेय समाजकार्य, समुपदेशन, वैद्यकीय व मानसोपचार, सुधारात्मक कार्य, समुदाय विकास त्यातही ग्रामीण, शहरी व आदीवासी समुदाय विकास, इ. स्पेशलायझेशन्स उपलब्ध झाली आहेत. याशिवाय संशोधन, संघर्षात्मक व रचनात्मक सामाजिक कृती, प्रशासन, विकास, सुधारणा, समुदाय संघटन, व्यक्तीसहयोग कार्य, गटकार्य इ. विविध क्षेत्रात सरकारी, निमसरकारी, खाजगी सेवाभावी संस्था आणि कार्पोरेट क्षेत्रातून करीअरच्या विविध संधी आता उपलब्ध होत आहेत. कदाचित त्यामुळे व्यावसायिक समाजकार्याकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या बरोबरीने मुलीही मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे दिसून येते.
समाजकार्य हे एकमेव क्षेत्र असे आहे जिथे आपणास जीवंत माणसाच्या मन व मेंदूशी काळजीपूर्वक समायोजन करुन त्याच्या समस्यांची सोडवणूक करावी लागते. अनेकदा अशा परिस्थितीत समस्यांचा सामना करीत असताना कार्यकर्ता किंवा कार्यकर्तीची भावना अनियंत्रित होवून त्यांची एखाद्या व्यक्तीशी भावानिक गुंतवणूक होवून बसते. आपल्यासोबत काम करीत असलेला किंवा ज्यांच्यासाठी आपण काम करीत आहोत असा 'तो' किंवा 'ती' आपली आवड बनते. कालांतराने त्या आवडीचे रुपांतर प्रेमात होते आणि क्वचित लग्नगाठही बांधली जाते. त्यामुळेच आपणास समाजकार्याच्या क्षेत्रात सर्वाधिक प्रेमविवाह झाल्याचे दिसून येते. मी कोणत्याही व्यक्तींची नावे लेखात लिहीणार नसलो तरी हा लेख वाचताना समाजकार्यात कार्यरत असणाऱ्या अशा अनेक प्रेमी जोडप्यांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे.
काही वर्ष संसारात रमल्यावर या प्रेमिक समाजकार्य कार्यकर्त्यांचा संसार फुलण्याऐवजी कोमेजायला लागतो. असे निरीक्षणात दिसून आले असून, असे का होतेय हे समजून घेवून त्यासंबंधी उपाययोजना किंवा प्रतिबंधात्मक काळजी म्हणून कार्यकर्त्यांनी नेमके काय करायला हवे याबाबत मांडणी करणे हाच या लेखाचा मुख्य उद्देश आहे.
समाजकार्याच्या क्षेत्रात अनेकदा स्त्री-पुरुष कार्यकर्ते एकत्र काम करीत असतात. कामाच्या निमित्ताने एकत्र बसणे, उठणे, कामासंबंधीच्या चर्चा करणे इ. गोष्टी नित्याच्या असतात. बरेचदा एका वाहनाने एकत्रितपणे फिल्डवर जाणे-येणे होते. एकमेकांचा एकमेकांना सहज होणारा शारिरीक स्पर्श त्यांच्यात जवळीक निर्माण करतो. एकत्र, कदाचित एकाच डब्यात खाणे- पिणे होते. नकळत एकमेकांच्या आवडी-निवडी कळतात आणि त्या जपल्याही जातात. आजकाल मोबाईलमुळे सततचा संपर्क राहतो. त्यामुळे एकमेकांच्या व्यक्तिगत व कौटूंबिक समस्यांचा एकमेकांना परिचय होतो आणि सहकाऱ्याच्या समस्येसाठी मनात आपसूकपणे सहानुभूतीची भावना निर्माण होते. निसर्गतः स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या शरीराचे आकर्षण वाटत असतेच. त्यात अशीच परिस्थिती कायम राहीली की प्रेमाचे अंकुर फुटले नाहीत तर नवलच म्हणायचे!
इथे धोक्याची पहिली घंटा वाजते. सूज्ञ माणसाला अंत:करणातून येणारा हा आवाज त्वरीत कळतो आणि हा इशारा लक्षात घेवून तो स्वतःला सावरतोही! मात्र ही लग्नाच्या वयातली मुलं- मुली असतील तर त्यांच्यासाठी जोडीदाराचा शोध इथे संपतो. ती लग्नाचं सोनेरी स्वप्न पाहू लागतात. काहींचं स्वप्न हळूहळू आकाराला येवून साकारही होतं. तर काहींच स्वप्न अनेक कारणांनी आकाराला येत नाही. त्यामूळं ते साकारही होत नाही! अशा वेळी दोघांमधल्या कुणाचं तरी शोषण होवू शकतं. असं शोषण झालं असल्यास समाजाच्या समस्या सोडवू पाहणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या जीवनातल्या समस्या मात्र वाढतात.
ज्यांनी असे प्रेमविवाह केलेत, त्यांचेही सर्वांचे सारेच आलबेल आहे असे अनेकांच्या बाबतीत दिसत नाही. लग्नानंतर काही काळातच त्यांच्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागते. कुणीतरी तिसरी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात शिरते आणि मूळ प्रेमी दाम्पत्यांमधील प्रेम विरुन जाते. प्रेमाने जोडलेला त्यांचा संसार प्रेमानेच मोडण्याची वेळ येते. समाजकार्याच्या क्षेत्रात अशा घटस्फोटीत स्त्री पुरुष कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. हे घटस्फोटीत कार्यकर्ते आपल्यासाठी नवे प्रेम शोधीत राहतात! बऱ्याचदा सर्वसाधारण माणूस अशा प्रेमाच्याच शोधात असतो. जेव्हा आपल्या घरी आपल्याला हवं तसं प्रेम मिळत नाही तेव्हा माणूस घराबाहेर अशा प्रेमाचा शोध घेत असतो. स्त्री आणि पुरुष दोघांनाही हा नियम सारखाच लागू होतो. स्वतःचा संसार असलेले स्त्री पुरुष कार्यकर्ते या प्रेमाच्या आहारी जाऊन स्वतःचा संसार जाळतात! त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर सुध्दा होतोच. कधी कधी नोकरी जाते. अखेरीस कंगाल होवून देवदास बनण्याची वेळ येते. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजुबाजुला दिसतील.
काही सामाजिक कार्यकर्त्याची कुंटूबं उध्वस्त होण्याची आणखी वेगळी कारणंही आहेत. जसं की काही कार्यकर्ते खूप वर्कोहोलीक असतात. आपलं काम हेच त्यांचं पहिलं प्रेम असतं. बऱ्याचदा असे कार्यकर्ते पुरुष असतात. त्यांचं सगळं लक्ष आपल्या कामावरच असतं. आपलं घर, दार, आई, वडील, भावंडं, मुलं, बाळं इतकंच काय आपल्या पत्नीलादेखील ते वेळ देत नाहीत. त्यांच बाहेर कितीही चांगलं नाव असलं तरी मुलगा, भाऊ, पिता आणि नवऱ्याची भूमिका त्यांना नीट निभावता न आल्यानं कौटूंबिक प्रश्न वाढतात. आपल्या पत्नीला ते प्रेम देवू शकले नाही तर प्रकरण घटस्फोटाकडे जातं किंवा पत्नी तिच्यासाठी बाहेर प्रेम शोधते आणि संसाराचा विचका होतो.
कधी कधी पती-पत्नी दोघंही समाजकार्याच्या क्षेत्रात आपापलं काम नेटानं करीत असतात. दोघांपैकी एखाद्याला आपल्या कामात प्रचंड यश मिळतं. पुरस्कार मिळतात. त्याचं नाव होतं. प्रसिद्धी मिळते. दुसऱ्याला तितकं यश मिळत नाही. अशावेळी यश पचविता आलं नाही तर संसाराचा गाडा घसरतो. तर कधी यशस्वी जोडीदाराविषयी दुसऱ्याच्या मनात मत्सर निर्माण होतो आणि सुखी संसारात ठिणगी पडते. याशिवाय पुरूष कार्यकर्ता स्त्रियांसोबत किंवा स्त्री कार्यकर्ता पुरुषांसोबत काम करीत असताना वेळोवेळी वादाचे प्रसंग उभे राहू शकतात. ही परिस्थिती नीट हाताळता आली नाहीतर जोडीदार प्रामाणिक असुन सुध्दा संशयाची भूते मनात नाचू लागतात. परिणामी सुखी संसार मातीमोल होवून जातो.
अर्थात अशा कोणत्याही प्रश्नात न अडकता आपले व्यक्तिगत जीवन आनंदाने जगुन आपल्या कामात आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे कार्यकर्ते देखील याच परिस्थितीत काम करीत होते आणि अजुनही करीत आहेत. ही बाब दुर्लक्षुन चालणार नाही. यांना जमले ते त्यांना का जमले नाही? ज्यांना जमले नाही त्यांचे
नेमके कुठे आणि काय चुकतेय? याचा शोध घेतला असता असे लक्षात येते की, या कार्यकर्त्यांनी ज्या समाजकार्याचे शिक्षण घेतलेय त्या समाजकार्याची मूलभूत मूल्ये आणि तत्वे अंगीकारली नाहीत म्हणून त्यांच्या बाबतीत हे प्रश्न निर्माण झाले असावेत.
सेवा, सामाजिक न्याय, माणसाबद्दल माणुस म्हणून आदराची भावना, मानवी नात्यांची जपणूक, एकात्मता आणि प्रत्येक माणसाच्या आंतरिक क्षमतेवरचा ठाम विश्वास ही समाजकार्याची सहा मुलभूत मूल्ये आहेत. समाजकार्याची तत्वे याच सहा मूल्यांवर आधारलेली आहेत. जसे की, समाजकार्य करताना कार्यकर्त्याने प्रत्येक व्यक्ती वेगळी, स्वतंत्र व विशेष आहे. हे लक्षात घेवून त्या व्यक्तीचे वेगळेपण समजून घेतले पाहिजे. त्याने आपल्या भावनांचे हेतूपूर्वक प्रकटीकरण करायला हवे. आपल्या भावनांचे त्रयस्थपणे संपूर्ण नियंत्रण करायला हवे. प्रत्येक व्यक्तीचा ती जशी आहे तसा स्वीकार करायला हवा. कार्यकर्त्याला स्वतः निर्णायक बनणे टाळता यायला हवे. समोरच्या व्यक्तीला स्वतःचे मत मांडण्याचा आणि स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क आहे. त्याचा तो हक्क अबाधित राहील याची काळजी कार्यकर्त्याने घ्यायला हवी. कार्यकर्त्याने त्याला मिळालेली माहिती गुप्त राखायला हवी. ही समाजकार्याची तत्वे आहेत.
विविध समाजशास्त्रज्ञांनी व्यक्ती व समाजाचा माणूस म्हणून बारकाईने अभ्यास करुनच समाजकार्याची ही मूल्ये व तत्वे निश्चित केली आहेत. त्यामुळे वरील मूल्ये आणि तत्वे समाजकार्याची म्हणून सांगीतली जात असली तरी व्यावसायिक समाजकार्य करणाऱ्या कुणाही व्यक्तीने केवळ समाजकार्यातच नव्हे तर आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक माणसाशी वागताना या मुल्यांचा आणि तत्वांचा काटेकोरपणे उपयोग करायला हवा. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्री -पुरुष कार्यकर्त्यांच्या जीवनात समस्यांचा उद्भव होणार नाही आणि त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघेल!
© अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक,
सावेडी, अहमदनगर संपर्क: ९७६६६६८२९५