आंत व बाहेर सर्वत्र आपल्याला विरोध आढळून येतो.आपण स्वतःच एक विरोध केंद्र असतो. अंतर्यामी शांततेचा अभाव आहे .अंतर्यामी आपण सतत कांहीतरी नाकारत असतो .नामंजूर करीत असतो व कांहीतरी स्वीकारीत असतो.मान्य करीत असतो .आपल्याला कांहीतरी बनायचे असते व आपण कांहीतरी असतो .विरोध व झगडा निर्माण करतो .झगड्यातून शांती कधीही निर्माण होणार नाही .हे सर्व साधे सरळ व अगदी स्पष्ट आहे.तात्त्विक द्वैत वादाने या विरोधाचे स्पष्टीकरण करणे चूक आहे.ही एक पळवाट आहे .आपण म्हणतो हे जगच द्वैतावर आधारलेले आहे .येथे विरोध असणारच . असे म्हणून अापण आपली सुटका करून घेतो .नंतर आपण म्हणतो प्रश्न सुटलेला आहे .स्पष्टीकरणासाठी खरी मानलेले ही एक कल्पना झाली .खऱ्या वस्तुस्थितीपासून पलायन करण्याची ही एक पळवाट आहे .
विरोध ,झगडा, म्हणजे आपली काय कल्पना आहे ?अंतर्यामी सतत विरोध कां बरे चाललेला आहे ?मी जो कांही आहे, त्याहून वेगळे बनण्याची मला इच्छा आहे .मी असा आहे आणि मला तसे व्हायचे आहे .असा हा झगडा आहे .हा अध्यात्मिक द्वैत सिद्धांत नव्हे.वस्तुस्थिती आकलन होण्यासाठी अध्यात्माची कांही गरज नाही.तिचे काही प्रयोजनही नाही .द्वैत सिद्धांत म्हणजे काय?खरोखरच द्वैतआहे काय?वगैरे वगैरे अापण खूप चर्चा करू. परंतु जर आपल्या आंत विरोध आहे,परस्पर विरुद्ध वासना,परस्पर विरुद्ध ध्येये,परस्पर विरुद्ध इच्छा ,मनांत आहेत हे ओळखले नाही ,तर त्या चर्चेचा काय उपयोग ? मला चांगले व्हायचे आहे ,आणि तसे व्हायला मी असमर्थ आहे .हा विरोध,हे द्वंद्व ,समजून घेतले पाहिजे .या विरोधामुळे झगडा क्लेश गोंधळ निर्माण होतात.मनांतर्गत विरोधात,व्यक्तिमत्त्वाचा विकास अशक्य आहे .
ज्या स्थितीत आपण आहोत त्याबद्दल स्पष्टता येउद्या .त्याबद्दल आपण स्पष्ट होऊया.विरोध तिथे झगडा अपरिहार्य आहे .झगडा म्हणजे विनाश विघटन अपव्यय .या स्थितीत द्वेष मत्सर कटुता क्लेश दुःख याशिवाय काय बरे निर्माण होणार ?जर आपण हा विरोध संपूर्णपणे समजावून घेतला, आणि अश्या तर्हेने जर आपण त्यापासून मुक्त झालो, तरच आत शांती नांदेल. आणि आपण एकमेकांना समजून घेऊ शकू . झगडा हा विनाशकारक आहे .झगडा म्हणजे अपव्यय आहे .तरीही आंत विरोध कां आहे ?खरा प्रश्न हा आहे .जेव्हा एखादी वासना, मन चिरंतन म्हणून बळकट धरून ठेवते,तेव्हाच विरोध निर्माण होतो .
मन जेव्हा सर्व वासना चंचल आहेत असे न मानता, त्यातली एखादी विशिष्ट वासना जीवनाचे ध्येय म्हणून ठरवते,तिला बळकट पकडते, तिला चिरस्थायी स्वरूप देते,आणि मग जेव्हा इतर वासना निर्माण होतात, तेव्हा विरोध निर्माण होतो .सर्वच वासना चंचल आहेत. कोणतीही वासना चिरंतन असूच शकत नाही.वासना वस्तुतः चिरंतन नाहीत परंतु मन त्याला चिररूप देते .बाकी सर्व गोष्टी हे तिथे पोहोचण्याचे साधन समजते .हे प्रवास करणे, मिळविणे, पोचणे, बनणे,जोपर्यंत आहे तोपर्यंत विरोध अपरिहार्य आहे.तुम्हाला एखाद्या ठिकाणी पोहोचावयाचे आहे. यशस्वी व्हायचे आहे .तुम्हाला कांहीतरी मिळवायचे आहे .तुम्हाला ईश्वरप्राप्ती हवी आहे.तुम्हाला सत्यदर्शन हवे आहे .तुम्हाला त्या सत्य दर्शनाने चिरंतन समाधान प्राप्त होईल असा विश्वास आहे.वस्तुतः तुम्हाला सत्यदर्शन नको आहे. तुम्हाला ईश्वरप्राप्ती नको आहे.तुम्ही ईश्वराचा तपास चालवलेला नाही .तुम्ही अविनाशी समाधानाचा शोध चालविलेला आहे.
त्या समाधानाला अापण कपडे चढवितो आणि म्हणतो आम्ही सत्याच्या ईश्वराच्या शोधात आहोत .वर म्हटल्याप्रमाणे वस्तुस्थिती अशी आहे कि,आपण चिर अवीट समाधानाच्या शोधात आहोत.आपण एक समाधान उच्च बिंदू म्हणून ठरवितो व दुसरे समाधान नीच बिंदू म्हणून ठरवितो.उदाहरणार्थ ईश्वरप्राप्ती व मद्यपान.जोपर्यंत मन समाधानाच्या तपासात आहे तोपर्यंत ईश्वरप्राप्ती व मद्यपान यात तात्विकदृष्ट्या कांहीच फरक नाही .सामाजिक दृष्टिकोनातून मद्यपान ही कदाचित गर्ह्य गोष्ट नसेलही ,(तेही समाजावर अवलंबून राहील )प्रकृतीच्या दृष्टीने ती गोष्ट कदाचित वाईट असेलही,परंतु कांहीतरी मिळविण्याची, समाधान मिळविण्याची ही इच्छा जास्त धोकादायक नाही काय?
जर तुम्हाला खरोखरच सत्य हुडकायचे असेल, तर तुम्ही नुसत्या शाब्दिक पातळीवरच नव्हे ,तर सर्व आंतरिक पातळ्यांवरही, संपूर्णपणे प्रमाणिक असले पाहिजे. तुमच्या विचारांची स्पष्टता परमावधीची पाहिजे .जर तुमची वस्तुस्थितीला तोंड द्यायची इच्छा नसेल तर स्पष्टता अशक्य आहे.आपल्यापैकी प्रत्येकात विरोध केंद्र कां बरे आहे?आपल्याला कांही तरी बनावे अशी वासना आहे ,म्हणून हे विरोध केंद्र आहे.आपणा सर्वांना काहीतरी मिळवायचे आहे. यशस्वी व्हायचे आहे . आम्हाला अंतर्यामी कांहीतरी अनुभवायचे आहे.जोपर्यंत आपण काल, फल, स्थल, मान, यांच्या फूटपट्ट्या वापरीत आहोत तोपर्यंत विरोध अपरिहार्य आहे .शेवटी मन हे कालाचे अपत्य आहे.विचार हा गेल्या दिवसांवर भूतकाळावर उभा आहे .विचार हे भूतकाळातील धारणेचे अपत्य आहे .जोपर्यंत विचार भूत व भविष्य यांतच घोटाळत आहे, मिळविणे बनणे होणे या कुंपणात फिरत आहे, तो पर्यंत विरोध अपरिहार्य आहे .यामुळे जे आहे त्याला तोंड द्यायला आपण असमर्थ आहोत . फक्त आणि फक्त हेच समजून घेऊन, उमजून घेऊन ,त्याबद्दल निवड रहित जागृत राहून, या विघटनप्रद व अपव्ययप्रद अशा विरोधापासून मुक्त होण्याची शक्यता आहे .
त्यामुळे विचाराचा विचार, विचारांची संपूर्ण प्रक्रिया, समजणे अत्यावश्यक नाही काय ?विचार हाच विरोधप्रद आहे .विचार हेच विरोध स्थान आहे .आपण स्वतःला संपूर्ण समजत नाही, म्हणून विचार हा विरोधमय बनला आहे.स्व-समज हा अखंड संपूर्ण निवडरहित स्व-जागृतीतूनच शक्य आहे.जागृती ही केवळ विचार करणारा म्हणून विशेष कांही करू शकणार नाही.विचारांच्या संपूर्ण हालचालींबद्दल ,निवड रहित जागृती आणि अखंड स्व-सर्व-साक्षित्व ,ही अत्यावश्यक परंतु अत्यंत बिकट गोष्ट आहे .हे जर शक्य होईल ,तरच क्लेशकारक, नाशकारक, अपव्ययकारक, अशा विरोधाचे निर्मूलन शक्य होईल .जो पर्यंत तृष्णा आहे, काहीतरी खटपट आहे, जोपर्यंत आपल्याला सुरक्षितता पाहिजे आहे, तोपर्यंत जीवनात विरोधही अपरिहार्य आहे .
या विरोध अस्तित्वाबद्दल आपण पुरेसे जागृत झालो आहोत असे मला वाटतं नाही .घरी कधी तरी त्याची आपल्याला जाणीव झाली असली, तरी त्याचे खरे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही .उलट विरोध हा जगण्याला प्रोत्साहन देतो, जगण्याला इंधन पुरवितो, हे घर्षणच आपल्याला जिवंतपणा देते, प्रयत्न झगडा हा आपल्याला तरतरी देतो, जीवन देतो, उत्साह देतो ,भौतिक संशोधनाला वाव देतो ,आणि म्हणूनच आपण युद्धावर प्रेम करतो .ज्यामधून निष्फळताच निर्माण होते अशी युद्धे आपण आनंदाने उपभोगतो.जोपर्यंत मनाला कसल्या ना कसल्या फल प्राप्तीची वासना आहे, जोपर्यंत सुरक्षिततेची वासना आहे,तो पर्यंत विरोध अपरिहार्य आहे .विरोध आहे तोपर्यंत मन शांत होणे अशक्य आहे .
मनाची निस्तरंगता जीवनाचा अर्थ समजण्यासाठी आवश्यक आहे.विचार हा कधीच स्तब्ध होऊ शकत नाही .विचार म्हणजेच तरंग. विचार हे कालाचे अपत्य आहे .आणि म्हणूनच कालरहित आणि कालातीत अशा वस्तूला ते शोधू शकणार नाही .मिळवू शकणार नाही. विचाराचे स्वरूपच विरोध-मय आहे .आपण नेहमी भूत किंवा भविष्यात असतो .त्यामुळेच वर्तमानाबद्दल संपूर्ण जागृत नसतो .वर्तमानाला आपण ओळखू शकत नाही . केवळ वर्तमानातच असणे, वर्तमानाबद्दल संपूर्ण जागृत असणे, ही अत्यंत बिकट गोष्ट आहे .म्हणूनच वर्तमानाकडे सरळ बघण्याला, फसवणुकी शिवाय बघण्याला, ते असमर्थ आहे .
विचार हे भूतकालाचे अपत्य आहे .भूत किंवा भविष्य या कालातच ते राहते . त्या दृष्टीनेच सर्व विचार चालतात. वस्तुस्थिती बद्दल संपूर्ण जागृती, वर्तमानाबद्दल संपूर्ण जागृती, ही गोष्ट म्हणूनच अशक्य .जोपर्यंत कालबालक असा विचार , विरोध नष्ट करायचा, विरोध उखडून टाकायचा, व त्यानेच निर्माण केलेले प्रश्न सोडवायचा प्रयत्न करीत आहे,जो पर्यंत फक्त फल प्राप्तीची ध्येयप्राप्तीची धडपड चालली आहे, आणि असे विचार आंत व बाहेर जास्त विरोध निर्माण करीत आहेत ,तोपर्यंत जास्त झगडे, जास्तीत जास्त गोंधळ, याशिवाय काय बरे निर्माण होणार ? विरोधापासून मुक्त होण्यासाठी वर्तमान काळातच असण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे .
अखंड निवडरहित वर्तमान जागृती असली पाहिजे. वस्तुस्थिती ही नेहमी एकच असते .जेव्हां वस्तुस्थितीशी तुमची गाठ पडते तेव्हां निवडण्याचा प्रश्नच कुठे येतो ?विचार, वस्तुस्थितीकडे बनणे, होणे, बदलणे, सुधारणे, उलटून टाकणे, दाबून टाकणे, या दृष्टीने पाहात आहे आणि म्हणूनच वस्तुस्थिती-समज अशक्य होऊन बसली आहे.
स्व-ज्ञान ही खर्या शहाणपणाची समजुतीची सुरुवात आहे .स्व-ज्ञान नसेल तर विरोध झगडे हे चालूच राहणार .स्व-ज्ञानासाठी बुद्धी लागत नाही .विद्वत्ता लागत नाही .तज्ञता लागत नाही. कुशलता लागत नाही.श्रेष्ठता अनुकरण फक्त भीती निर्माण करते .कोणताही तज्ज्ञ कोणताही श्रेष्ठी कोणताही ज्ञानी तुम्ही कसे आहात ,तुमच्या सर्व प्रक्रिया कशा आहेत,ते तुम्हाला दाखवू शकणार नाही .तुम्ही व मी त्याबद्दल चर्चा करून एकमेकांना मदत करू शकू .परंतु कोणीही कधीही तुम्हाला तुमची संपूर्ण स्व-विचारप्रक्रिया उघडून दाखवू शकणार नाही .फक्त आपण सदैव जागृत असले पाहिजे .त्याबद्दल जागृत असणे म्हणजेच स्व-संबंध जागृती. मालमत्ता स्थावर जंगम शेजारी पाजारी मित्र सहकारी अनोळखी व्यक्ती इत्यादींशी असलेल्या आपल्या संबंधांबद्दल जागृती .कर्म व कल्पना, वस्तुस्थिती उलटवण्याचा जेव्हां प्रयत्न करीत असतात, तेव्हाच विरोध निर्माण होतो, असे आपल्याला आढळून येईल .कल्पना हे विचार प्रक्रियेचे प्रतीकरूप घनीकरण आहे.या प्रतिकापर्यंत पोचण्याचे प्रयत्न आहेत तोपर्यंत विरोधही अपरिहार्य आहे. जोपर्यंत विचाराला आकार आहे तोपर्यंत विरोध राहणारच .हा आकार हा विरोध नष्ट होण्यासाठी स्व-ज्ञानच आवश्यक आहे .स्व-ज्ञान हे श्रेष्ठींचे कुरण नाही.स्व-ज्ञान ही दिवसातून घटकाभर बसून मिळवण्याची गोष्ट नव्हे.आपला प्रत्येक शब्द विचार भावना व परस्परांशी वागणूक यांतून समजण्याची ती गोष्ट आहे .
प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना, प्रत्येक भावना, याबद्दल जर आपण क्षणाक्षणाला सदैव निवड रहित जागृत असू, तर या संबंधातून स्वतःची ओळख पटेल .या अखंड निवड रहित साक्षित्वातूनच निस्तरंग मन होण्याची व अंतिम सत्य प्रगट होण्याची शक्यता आहे.