प्रथम प्रयोग
मराठी नाट्यसृष्टीचे आधुनिक भरतमुनि बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील गुर्लहोसर ह्य गावी ३१ मार्च १८४३ रोजी, गुढी पाडव्याच्या दिवशी झाला.
त्यांच्या शालेय शिक्षणाचा आणि बालपणाचा काळ गुर्लहोसर, कोल्हापूर, पुणे इत्यादि गावी गेला. अण्णासाहेब बेळगावच्या शाळेत सात आठ वर्षे शिक्षक म्हणून काम करीत होते. काही काळ ते रेव्हिन्यू कमिशनरच्या ऑफिसात नोकरीला होते. परंतु अण्णासाहेबांचा ओढा लहानपणापासून काव्य आणि नाटक यांकडे होता. बेळगावला 'भारत शास्त्रोत्तेजक मंडळी' काढून अण्णासाहेबांनी काही संस्कृत नाटकांचे प्रयोग केले होते. एकदा 'तारा' नाटकातील संगीताने अण्णासाहेबाचे मन वेधून घेतले आणि त्यांनी 'शकुंतला' चे मराठी भाषांतर करण्याचे ठरविले. १८८० च्या दिवाळीत या नाटकाचा प्रथम प्रयोग पुणे येथे झाला. नंतर त्यांनी 'संगीत सौभद्र' हे पूर्ण नाटक आणि 'रामराज्यवियोग' हे अपूर्ण नाटक व 'चितोडावर स्वारी' 'शांकरदिग्जय' ही लहान नाटकेही लिहिली. पौराणिक कथानके निवडून त्यावर बरीच काव्यरचनाहि त्यांनी केली आहे. शिवाजी महाराजांवर पाचशे पद्यांचे काव्यहि त्यांनी रचलेले आहे.
मराठी भाषेत विष्णुशास्त्री चिपळुणकर यांनी केलेली कामगिरी किंवा राष्ट्रकार्यासाठी लोकमान्य टिळक यांनी केलेली कामगिरी जितक्या राष्ट्रीय स्वरूपाची केलेली आहे. तितक्याच राष्ट्रीय स्वरूपाची कामगिरी, अण्णासाहेबांनी नाट्यसृष्टीसाठी केलेली आहे. ह्या थोर नाटककाराच्या जीवनाची समाप्ति २ नोव्हेंबर १८८५ ह्या दिवशी झाली.
साग्र संगीत 'सौभद्र' नाटक मार्च १८८३ मध्ये पुणे मुक्कामी 'आनंदोद्भव' नाट्यगृहात प्रथम रंगभूमीवर आले. सतत १२० वर्षे लोकरंजन करण्याचे भाग्य लाभलेले मराठी रंगभूमीवरचे पहिले नाटक 'सौभद्र' हेच होय. सदर नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
पहिल्या प्रयोगांतील भूमिका
सूत्रधार, बलराम - श्री. अण्णासाहेब किर्लोस्कर
नटी, सुभद्रा - श्री. भाऊराव कोल्हटकर
नारद, कृष्ण - श्री. बाळकोबा नाटेकर
अर्जुन - श्री. मोरोबा वाघोलीकर
रुक्मिणी - श्री, शंकरराव मुजुमदार
वक्रतुण्ड - श्री. गोपाळराव दाते
राक्षस - श्री. गोविंदराव निपाणीकर