परंतु एके दिवशी त्याने राजीनामा दिला. त्याने सर्वांचा निरोप घेतला.
“तुम्ही कोठे जाणार, दादा?” गणाने विचारले.
“मी गावातच एक खोली घेतली आहे. तेथे राहीन. सुंदरपूरातच मी राहणार आहे. कामगारांत काम करणार आहे. आपण भेटत जाऊच.” घना प्रेमाने म्हणाला. रुपल्याही धावत आला.
तो म्हणाला, “काय दादा, चाललेत? ते गेले. तुम्हीही चालला. येथे राहणे तुम्हांला आवडत नाही. होय ना?”
“रुपल्या मी या गावातच राहणार आहे. परंतु येथे नाही. माझ्या खोलीवर येत जा.” घना म्हणाला.
एका टांग्यात त्याने आपली ट्रंक, वळकटी ठेवली. सर्वांना नमस्कार करुन तो गेला.
जा, घना जा. गरिबांच्या सेवेसाठी जा. तुझ्या जीवनातील निराळा अंक सुरु होऊ दे. परंतु तुझ्या मार्गात अडचणी आहेत, उपहास आहेत, निराशा घेरील, अंधार पसरेल, कर्तव्यबुद्धीने जा. फळ मिळो वा न मिळो. तू तुझी धडपड कर.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.