“ब्रिजलाल, तुझे काय म्हणणे?” घनाने विचारले.

“आपल्या मागण्या निश्चित करू या. त्या मालकाकडे पाठवून त्यांना मुदत द्यावी. मालक काहीच करायला तयार न झाला तर संप करावा. संपाच्या आगीतून जायलाच हवे. टक्केटोणपे खाल्ल्याशिवाय प्रगती होणार नाही.” ब्रिजलाल शांतपणे म्हणाला.

“कुछ ना कुछ करना चाहिये. खालीपिली फजूल बाते करणेकसे कुछ नही होता. झंडा उठाकर आगे बढना यही हमारा फर्ज है. चूप बैठना आदमीके लिये अच्छा नहीं.” कुतुब म्हणाला.

“तुमचे काय मत घनाभाऊ? तुम्ही काहीच बोलत नाही.” अर्जुन म्हणाला.

“मी काय बोलू? परंतु एकदा शेठजींना भेटणार आहे. त्यांच्याजवळ बोलणार आहे. संप पुकारणे सोपे, परंतु यशस्वी करणे कठीण. आपल्याकडे बेकारी फार. कामावरून एक दूर झाला तर हजारो त्या जागेसाठी येतील. मालकांचे हस्तक गावोगाव हिंडून कामगारभरती करतील. आपणास सारे शांततेने करायचे. जोवर मी येथे आहे तोवर मी वेडेवाकडे काही एक होऊ देणार नाही. तुम्ही दगडधोंडे मारू लागलेत तर आधी माझे डोके पुढे करीन. परंतु मला तशी भिती नाही. सुंदरपुरचे वातावरण सुंदर आहे. मालक काय म्हणतात, त्यावर पुढचे पाऊल अवलंबून. तुम्ही आपल्या युनियनचे आधी भरपूर सभासद तरी करा. साधी साधी कामेही आपण आधी मनापासून करीत नाही. एकदम क्रांतीच्या चर्चा! मला मूठभर लोकांची क्रांती नको आहे. लाखो लोक जागृत होऊन जेव्हा उभे राहतात तेव्हा एक निराळीच क्रांती होते.” घना म्हणाला.

ते सारे मित्र निघून गेले. घना एकटाच मनाशी विचार करीत बसला. संपासंबंधीचा तो विचार करीत होता. स्वत:ला अटक झाली तर पुढे कसे होणार? सखाराम येईल का? येथील कामगार मायबहिणींत काम करायला मालती नाही का येणार? इत्यादी विचार त्याच्या मनात येत होते. मुख्य गोष्ट ही होती की, संप पुकारावा लागलाच तर खेड्यापाड्यांतून नवीन कामगारांनी येऊ नये, यासाठी प्रचार करणे अवश्य होते. एक मोटार घेऊन सर्वत्र हिंडावे असे त्याच्या मनात आले. प्रचारार्थ गाणी वगैरे करायला हवीत. तो मनात योजना आखू लागाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel