सायलेन्स प्लीज.........

प्रकरण १

 पाणिनी  पटवर्धन च्या  ऑफिस च्या दारात एक विलक्षण देखणी तरुणी उभी होती.

“ सॉरी , पटवर्धन, मला दहा पंधरा मिनिटं उशीर झाला .” ती ओशाळून म्हणाली.

“ अठरा मिनिटं ”  पाणिनी  म्हणाला. “ इथे आल्यावर आमच्या पद्धती प्रमाणे तुमची आणि कौटुंबिक माहिती, भेटायचं कारण, हे सगळं सौम्या कडे लिहून दिलंय ना? ”

तेवढयात सौम्या हातात कागद घेऊन आली आणि  पाणिनी  कडे तो दिला. “ मी हा कागद तुम्हाला देण्या पूर्वीच ही आत आली.” ती म्हणाली.

“ ठीक आहे असू दे.”  पाणिनी  म्हणाला.

“मला खाजगी बोलायचं आहे.” ती सौम्या कडे बघून म्हणाली.

“ सौम्या सोहोनी ही माझी खाजगी सेक्रेटरी आहे. तिच्या पासून मी काहीच गुप्त ठेवत नाही.आम्ही शाळे पासून चे मित्र आहोत.इथे आपल्यात होणार बोलणं ती टिपून घेईल. मला नंतर ते संदर्भ लागला तर उपयोगी पडत.”  पाणिनी  म्हणाला.त्याने सौम्या ने आणून दिलेल्या कागदावर नजर टाकली. “ अच्छा, तर तू मिस केणी आहेस तर.”

“ हो.”

“ तुला तुझ्या काकांच्या संदर्भात मला भेटायचं आहे तर.”  पाणिनी    म्हणाला.

“ मामाच्या ” ती म्हणाली.

“ आर्या केणी ”  पाणिनी  पुटपुटला. “ किती वय आहे तुझं?”

“ वीस ते तेवीस च्या दरम्यान.” आर्या म्हणाली.

“ याचा अर्थ तेवीस ते पंचवीस असाही होऊ शकतो?”  पाणिनी    ने विचारलं

“ चौवीस. तुम्हाला अगदीच अचूक पणे हवे असेल तर.” आर्या म्हणाली.

“ मला कायमच अचूक हवं असतं.”  पाणिनी    म्हणाला.  “  तू तुझ्या मामाच्या संदर्भात आली आहेस. काय नाव आहे त्यांचे?”

“ विहंग खोपकर ”

“ काय वय आहे त्यांचं? “  पाणिनी    ने विचारलं

“ छपन्न ” आर्या म्हणाली.

“ तू आणि ते एकत्रच एका घरात राहता?”  पाणिनी    ने विचारलं

“ हो. गेली तीन वर्षे. माझे आई वडील गेले.तो माझ्या आईचा भाऊ आहे.” आर्या म्हणाली.

“ तुला त्याची काळजी वाटत्ये असं दिसतंय”  पाणिनी    म्हणाला.

“ त्याच्या झोपेत चालण्याच्या सवयीची काळजी वाटते आहे.”

“ जरा सविस्तर माहिती दे तुझ्या या मामा बद्दल.”  पाणिनी    म्हणाला.

“ नेमकी कुठून सुरुवात करू कळत नाहीये.” आर्या म्हणाली.

“ अगदी सुरुवाती पासून सांग. सर्वात पहिल्यांदा कधी झोपेत चालले तुझे मामा?”  पाणिनी    ने विचारलं

“ साधारण वर्षं झालं.” आर्या म्हणाली.

“ कुठे घडलं हे पहिल्यांदा?”  पाणिनी    ने विचारलं

“ तुम्ही खूप घाई करताय मला. मी माझ्या पद्धतीने सांगते. म्हणजे व्यवस्थित सांगू शकेन.” आर्या म्हणाली.

“ ठीक आहे.”  पाणिनी    म्हणाला.

“ विहंग मामा  खूप मोकळा, उमद्या स्वभावाचा आहे पण कधीतरी एकदम टोक गाठतो.” आर्या म्हणाली.

“ यातून मला फायदा होईल अशी काहीच माहिती मिळत नाहीये.”  पाणिनी    म्हणाला.

“ मी त्याच्या बायको बद्दल सांगायचा प्रयत्न करत्ये.” आर्या म्हणाली.

“ लग्न झालंय होय त्याचं ! मला तो अविवाहित आहे अशी समजूत झाली होती.”  पाणिनी    म्हणाला.

“ एका भांडकुदळ मांजरीशी लग्न केलाय त्याने.” आर्या म्हणाली.

“ एकत्रच राहतात का ते दोघे?”  पाणिनी    ने विचारलं

“ नाही. ती घटस्फोट घेणार होती. पण आता तिने विचार बदललाय ” आर्या म्हणाली.

“ का बरं ? ”

“ मामाच्या झोपेत चालायच्या सवयीचं कळल्यावर तिने घटस्फोटासाठी अर्ज केलं होता, तिला वाटत होत की तो तिला ठार मारेल.पण आता तिला नको आहे. तिला फक्त पुरुषांना नादाला लाऊन त्यांच्या कडून पोटगी मिळवण्यातच  रस असतो. या आधीच्या नवऱ्याला पण तिने असेच  पिळून काढलंय. शेवटी त्याने आत्महत्या केली.” आर्या म्हणाली."

“ तुला ती अजिबातच आवडत नाही असं दिसतंय.“  पाणिनी    म्हणाला.

“ अशी बाई कशी आवडेल?”आर्या  ने विचारलं

“ तुझ्या मामाला तिने घटस्फोट दिला तेव्हा त्यात पोटगी किती ठरली?”  पाणिनी    ने विचारलं

“ पंधरा हजार दरमहा.” आर्या म्हणाली.

“ किती वर्षं झाली होती लग्नाला?”  पाणिनी    ने विचारलं

“ एक वर्षं सुध्दा नाही.”

“ तरी दरमहा पंधरा हजाराची पोटगी कोर्टाने मान्य केली हे विशेष आहे.”  पाणिनी    म्हणाला.

“ कोर्टाचे काय जातंय दुसऱ्याने तिसऱ्याला पैसे द्यावेत अशी ऑर्डर द्यायला ! ”

“ तुझ्या मामीचे नाव काय आहे?”  पाणिनी    ने विचारलं

“ शेफाली ”

“ तुझ्या मामाने खरोखर तिला मारायचा प्रयत्न केलाय? ”  पाणिनी    ने विचारलं

“ अजिबात नाही.तो झोपेत चालत होता, त्याच्या हातात टोकदार सुरा होता. शेफाली किंचाळून बाहेर पळाली.तिने पोलिसांना फोन केला, पोलीस आले तेव्हा त्यांना विहंग हातात सुरा घेऊन नाईट ड्रेस मधे  दाराच्या मुठीशी झटापट करत असताना दिसला.”आर्या म्हणाली.

“ या प्रकारा नंतर काय झालं?”  पाणिनी    ने विचारलं

“ डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. त्याने त्याचा धंदा पूर्ण पणे भागीदाराच्या ताब्यात दिला आणि तो आमच्याकडे राहायला आला.” आर्या म्हणाली.

“ आणि इथे ही त्याचा झोपेत चालण्याचा प्रकार चालूच राहिला?”  पाणिनी    ने विचारलं

“ मी त्याच्यावर लक्ष ठेऊनच होते. विशेषतः पौर्णिमेच्या रात्री त्याचा हा प्रकार घडायचा. तुम्हाला माहित्ये ना, चंद्राचा मोठा परिणाम अशा माणसावर होतो.”

“ तुझ या गोष्टीवर बरंच वाचन दिसतंय “  पाणिनी    म्हणाला.

“ हो एका जर्मन लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद वाचलाय.” आर्या म्हणाली.

“ झोपेत चालायची सवय पुन्हा सुरु झाली आहे याची मामाला कल्पनाच नाही? “  पाणिनी    ने विचारलं

“ कल्पना नाही त्याला. मी त्याच्या खोलीला लॅच  लावलं होत. त्याने काहीतरी करून ते उघडलं असावं कारण दुसऱ्या दिवशी मी खोलीत गेले तेव्हा दार उघड होतं , मामा अंघोळीला गेला होता ,त्याच्या उशी खाली मला  चाकू ची मूठ दिसली.” आर्या म्हणाली.

“ अच्छा “  पाणिनी    म्हणाला.

“ मामा तुम्हाला भेटायला येणारे.मीच ते जमवून आणलंय आज दुपारी तो येतोय. कसं आहे ना, त्याला आता लग्न करायचय “ आर्या म्हणाली.

“ का SSSS य ?  ”  पाणिनी  आश्चर्याने ओरडला.

“ एक नर्स आहे, लीना माईणकर नावाची. मला माहिती आहे ती. मुख्य म्हणजे तिला मानसिक नैराश्य आलेल्या  लोकांच्या मनस्थितीची जाणीव आहे.”आर्या म्हणाली.”

“ किती आहे वयाने?”

“ चौतीस –पस्तीस “ आर्या म्हणाली.

“ ती शेफाली सारखी पैशाला हपापलेली, पोटगी मिळवणारी नसेल कशावरून? “  पाणिनी    ने विचारलं

“ ती मामाशी लग्नापूर्वीच करार करायला तयार आहे, त्यात ती तिचे पोटगी विषयी चे किंवा वारस म्हणून तिला मिळणाऱ्या लाभाचे हक्क सोडायला तयार आहे. मामा स्वतःहून काही द्यायला तयार असेल तर तेवढेच ती स्वीकारेल.”%

“ लग्न पूर्वी असा करार सामाजिक धोरणाला धरून नाही रहात.”  पाणिनी    म्हणाला.  “ समजा तिने आधी लग्न केलं आणि नंतर पोटगी आणि हक्क सोडण्याबाबत करार केलं तर? तसं करायला ती तयार होईल? ”

“ नक्की होईल. ती खूपच उमद्या स्वभावाची आहे. तिच्या कडे बऱ्यापैकी पैसा आहे.ती म्हणते लग्नानंतर दुर्दैवाने काही वाईट घडलं आणि विहंग पासून अलग व्हायची वेळ आली तर स्वतः ला ती मूळ स्थितीत आणील, म्हणजे कोणतीही रक्कम मागणार नाही.” आर्या म्हणाली.

“ ती एवढी चांगली आहे तर तुझा मामा तिच्याशी करार करण्यापूर्वी लग्न का करत नाही?“  पाणिनी    ने विचारलं

“ शेफाली तयार होणार नाही.ती त्रास देईल.म्हणजे ती त्याला वेडा ठरवेल.तो कोणाचा तरी खून करायला निघालाय असं ती भासवण्याचा प्रयत्न करेल.त्याला एखाद्या नर्सिंग होम मधे ठेवायला हवं असा कांगावा ही ती निर्माण करेल.आणि तुम्हाला माहित्ये, तिला मामाच्या सर्व मालमत्तेची काळजी घेणारी व्यक्ती  म्हणजे कस्टोडियन व्हायचंय.“ आर्या म्हणाली.

“ मामाला याच गोष्टीची काळजी वाटत्ये का? “  पाणिनी    ने विचारलं

“ तो एक भाग झाला, इतरही बाबी आहेत.मामा तुम्हाला त्या बद्दल बोलेलच. तूर्तास तुमच्या कडून मला वचन हवय की त्याला उत्तम वैद्यकीय  उपचार मिळतील असे तुम्ही बघाल. “ आर्या म्हणाली. तेवढ्यात अचानक इंटरकॉम ची रिंग वाजली.सौम्या ने फोन घेतला. थोडावेळ पलीकडचे ऐकत राहिली, नंतर फोन वर हात ठेऊन म्हणाली, “ विहंग खोपकर बाहेर आलाय. स्वागत कक्षात आहे.”

त्याचे नाव ऐकल्या ऐकल्या आर्या उडी मारूनच खुर्चीवरून खाली उतरली.  “ त्याला कळता कामा नये मी इथे आहे.आणि नंतरही त्याच्या समोर भेट झाली तर असं भासवा की प्रथमच भेटतोय आपण.” ती म्हणाली.

“ खाली बस.आपलं बोलणं अजून पूर्ण नाही झालं.”   पाणिनी  म्हणाला   “ मामा बसेल बाहेर थोडा वेळ. ”

“ नाही,नाही. ते शक्य नाही. तुम्हाला माहीत नाही त्याचा स्वभाव. एकदा त्याने ठरवलं की ते  तो करतोच. तो कोणाचही न ऐकता आत घुसेल बघा.”

“ एक मिनिट,घरात अस आणखी कोण आहे का ज्याचा  खून मामा करू इच्छितो?”  पाणिनी  म्हणाला .

तिचा चेहेरा एकदम पडला. “ मला वाटतंय की कोणीतरी असावं ; पण.. नाही.. नाही, मला नाही माहिती.मला नका विचारू.”

“ विहंग खोपकर बाहेरच्या टेलिफोन ऑपरेटर ला न जुमानता आत घुसलाय. कोणत्याही क्षणी तो या केबिन मधे येईल.” सौम्या म्हणाली.

आर्या कोणाचेही न ऐकता दुसऱ्या दाराने बाहेर पडली , आणि त्याच वेळी एक उंच शिडशिडीत माणूस  पाणिनी  च्या केबिन च्या दारात उभा राहिला .आत या बसा असे  पाणिनी  ने म्हणायच्या आतच तो  पाणिनी  समोरच्या गुबगुबीत खुर्ची बसला.  “ मी  विहंग खोपकर तो म्हणाला ”

( प्रकरण १ समाप्त)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel