कोर्टातला दिवस चांगला जाऊन सुध्दा पाणिनी बेचैन होता. आपल्या ऑफिसात येरझऱ्या घालत होता.

“ काहीतरी गडबड आहे,सौम्या ”

“ नेमकं काय झालंय सर ? ”

“ त्या शेफाली खोपकर च काय कळत नाही.”

“ सर, तुम्हाला तिच्याकडून काहीच निरोप नाही? ” 

“ नाही ना ! तुला वाटतंय ना गोरक्ष भेटला असेल तिला म्हणून? ”  पाणिनी म्हणाला.

“ शंभर टक्के. आधी माझ्याशी तो उर्मटपणे वागत होता, त्रास देत  होता, पण जेव्हा मी त्याला शेफाली खोपकर च्या आर्थिक स्थिती बद्दल सांगितलं तेव्हा गरम बटाटा चटका बसल्यावर आपण जसं हातातून टाकतो ना तसंच त्याने मला सोडून दिलं. ” –सौम्या

“ दिसायला कसा आहे? खरंच चिकणा आहे? ”

“ मदनाचा पुतळा.” –सौम्या 

“ छातीत धक् धक् वगैरे होईल तरुणींच्या? ”

“ नक्कीच.छान तपकिरी-काळे केस आहेत.डोळे ही तसेच आहेत.निरागस चेहेरा आहे, नाचतो ही चांगला.”

“ शेफाली बळी पडल्ये त्याला? ”  पाणिनी म्हणाला.

“ मला वाटतंय तसं. ती त्याला बघते तेव्हा तिच हृदय डोळ्यात  उतरल्यासारखा भास होतो.”

“ कमाल आहे, एखाद्या बाईचं हृदय डोळ्यात कसं उतरू शकत सौम्या? ”  पाणिनी म्हणाला.

“ बघायचं आहे तुम्हाला? करून दाखवते ! पण फक्त अभ्यासासाठी तुमच्या.” सौम्या म्हणाली आणि पाणिनी च्या जवळ आली , तिने थेट त्याच्या डोळ्यात असं काही पाहिलं की पाणिनी चे हात तिच्या कमरेभोवती जाऊ लागले. “ फक्त तुमच्या माहितीसाठी असं मी म्हणाले होते.” सौम्या मिस्कील पणे म्हणाली आणि त्याच्या पासून दूर झाली. तेवढयात दारावर टकटक झाली.

“ पैजेवर सांगतो, शेफाली आली असणार. ”

“ मी लायब्ररी च्या खोलीत पळते. तुम्ही मायक्रोफोन चे बटन आठवणीने चालू करा , तुमच्यातले संवाद मी टिपून घेते.” सौम्या म्हणाली आणि बाहेर पळाली. शेफाली आत आली.  “ मला वाटलंच होत तुम्ही इथेच भेटाल म्हणून.” ती म्हणाली.

पाणिनी ने तिला बसायची खूण केली.

“ खूप काम दिसतंय.” संवाद सुरु करायच्या दृष्टीने ती म्हणाली.

“ हं ” पाणिनी म्हणाला.

“ माफ करा तुम्हाला त्रास देत्ये , पण मला वाटलं तुम्हाला ऐकण्यात स्वारस्य वाटेल.”

“ तुमचा वकील आहे बरोबर? ”  पाणिनी म्हणाला.

“ सध्या नाहीये माझा कोणी वकील.”

“ बऱ्याच गोष्टींचा मी पुन्हा पुन्हा विचार केला पटवर्धन.” तिने सुरुवात केली. “ खांडवामधे मी ती कायद्याची प्रक्रीया चालू केली कारण मला माहीत होत की विहंग पुन्हा लग्न करणार आहे.त्याची मिळकत त्याला एखाद्या उनाड तरुणीवर मी का उधळू देऊ? मला कळलं की ती तरुणी नर्स आहे. नर्स ! विहंग लग्न कोणाशी करणारे तर नर्स शी !!  ” 

“ नर्स शी लग्न करण्यात काय गैर आहे? ”  पाणिनी म्हणाला.

“ सगळंच गैर आहे , पटवर्धन ! अहो तिला उदरनिर्वाह चालवण्यासाठी नोकरी करावी लागत्ये.” ती उपरोधाने म्हणाली

“ स्वावलंबी पणाने जगण्यासाठी नोकरी करणाऱ्या तरूणींचा अभिमान वाटतो मला.”  पाणिनी म्हणाला

“ मी तिला तुच्छ लेखत नाहीये पटवर्धन, पण ती विहंग च्या संपत्ती च्या मागे होती.”

“ मला वाटत नाही तसं ”  पाणिनी म्हणाला

“ या गोष्टीवर आपण चर्चा करायची काय गरज आहे? ” 

“ विषय तू काढलास.”  पाणिनी म्हणाला

“ मी फक्त खुलासा द्यायचा प्रयत्न करत होते की माझं मत का बदललं.”

पाणिनी ने फक्त भुवया उंचावल्या.

“ मी अचानक ठरवलं की जरी विहंग मानसिक विकृत होवून, पैसे उधळत असला तरी करू दे त्याला तसं, त्याला जर त्यातून शांतता मिळत असेल तर.मी त्याला थाबवाणार नाही.” शेफाली म्हणाली

“ म्हणून मग काय? ”  पाणिनी म्हणाला.

“ तुम्ही विश्वास नाही ठेवणार, तुम्हाला मी थंड डोक्याची आणि लोभी बाई वाटेन,तुम्हाला मी कसं समजाऊ समजत नाही. तुमच्या मताचा आदरच करते मी,  एवढे वकील मी पाहिले, पण  तुमच्या सारखा  प्रामाणिक,स्पष्ट वक्ता आणि जोमदार काम करणारा वकील मी कधीच पहिला नाही.  मला जाणवतयं की तुम्हाला मी आवडत नाही, अनेक पुरुषांना मी आवडते.तुम्हाला पण आवडावे मी अशी इच्छा आहे माझी.”

“ पुढे.”  पाणिनी म्हणाला

“ सरकारी वकील मला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे करू इच्छित आहेत.”

“ काय सिध्द करण्यासाठी? ”  पाणिनी म्हणाला.

“ की, विहंग ने धारदार चाकू ने मला मारायचा प्रयत्न केला.”

“ त्यांना वाटतंय की हे सिध्द करण्यासाठी ते तुझी साक्ष घेतील? ”

“ अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते म्हणाले की पटवर्धन  अनावधानाने असे काही प्रश्न विचारेल की मला तुझी साक्ष घेऊन विहंग ला दोषी ठरवायचा मार्ग मोकळा होईल.” – शेफाली

“ आणखी काय? ”

“ पटवर्धन, तुम्ही मला अपेक्षित मदत करत नाही ”

“ तुझ्या मनात काय आहे मला कळू तर दे.” पाणिनी म्हणाला

“ विहंग ला घटस्फोट घेऊ दे.”

“ का? ”  पाणिनी म्हणाला.

“ कारण मला वाटत की तेच त्याच्या हिताचं आहे.”

“ तर मग त्या दृष्टीने तू पुढची पावलं काय उचलणार आहेस? ”

“ मी त्याच्या विरुध्द केलेल्या सर्व कायदेशीर कारवाया रद्द करणार आहे. त्याला घटस्फोटाची डिक्री मिळालीच आहे. मी डिक्री विरोधात घेतलेली कारवाई रद्द केली की अपोपच डिक्री  कायदेशीर ठरेल.” –शेफाली

“ हे करण्यासाठी तुला विहंग कडून किती रक्कम हव्ये? ”

“ मला काही हवयं असं का वाटलं तुम्हाला, पटवर्धन? ”

“ नको आहे का तुला त्या बदल्यात काहीच? ”

“ मी लोभी नाहीये पैशाची. पण त्याच बरोबर मी स्वत: काही नोकरी,उद्योग  ही करू शकत नाही.नं मला कॉम्पुटरवर काम येत, ना दुसरे काही.”

“ किती पाहिजेत? ”  पाणिनी म्हणाला.

“ माझी स्थिती अशी आहे.....” 

“ किती पाहिजेत? ”  पाणिनी म्हणाला.

“ तुम्हीच सुचवा.” शेफाली नाजुकपणे म्हणाली.

“ मी नाही सुचवू शकत ”

“ विहंग किती देऊ शकेल याचा अंदाज तुम्हाला असेल त्यावरून सुचवा.” 

“ नाही.” पटवर्धन ठाम पणे म्हणाला.

“ मी दोन लाख रोख द्या असं म्हणते. मला विहंग ने ज्या पद्धतीचे आयुष्य उपभोगायला दिलंय, तसचं पुढे जगायला मिळावं म्हणून तेवढी रक्कम लागेलच मला ” 

“ तसं नको करूस. तेवढी योग्यता नाही.” पाणिनी म्हणाला

“ आता तुम्ही मला सांगणार आहात का , की मी कसं आयुष्य जगायचं ते ? ”

पाणिनी ने मान हलवली आणि म्हणाला,“  मला म्हणायचयं तू कसंही जगायचं ठरव, तुला तेवढी रक्कम मिळणार नाही.”

“ मी त्यापेक्षा कमी रकमेत कशी काय जगू? ”

“ तुला दरमहा पंधरा हजार मिळताहेत. एकदम मोठी रक्कम घेण्यापेक्षा दर महा मिळत आहेत तेच चालू ठेव ना. ”  पाणिनी म्हणाला

“ हे दरमहा मिळणारे, किती दिवस मिळत राहतील? ” शेफाली ने शंका विचारली

“ कायमचेच.”  पाणिनी म्हणाला     “...... तुझं लग्न होई पर्यंत पुन्हा.”

“  नाही,नाही. विहंग ला दरमहा त्या रकमेला लुबाडणं मला पटत नाही.त्या पेक्षा एकदाच मोठी रक्कम घेऊन त्याच्या पासून दूर होणं बरं”  

“ माझं अशील, एवढया रकमेला तयार नाही होणार.त्यापेक्षा तू दरमहा मिळणारी रक्कम कायम घेत बस.”  पाणिनी म्हणाला

“ समजा मी रक्कम कमी केली तर?”

“ किती कमी ? ”  पाणिनी म्हणाला.

“ अगदी शेवटची तडजोड म्हणून समजा, एक लाख ” –शेफाली

पाणिनी ने मान हलवून नकार दिला.

“ ओह,पटवर्धन, तुम्ही फारच ताणून धरताय. तुमच्याशी सौदा करणं अवघड आहे.”

“ म्हणूनच सुरुवातीलाच विचारलं मी, एखादा वकील घेऊन ये, तुझ्या वतीने बोलायला.मी त्याच्याशीच सौदा करतो.”  पाणिनी म्हणाला

“ नाही, मी नाही नेमणार वकील वगैरे. तुम्ही इथे माझ्याशी गोलगप्पा मारत बसलाय, माझा संयम जायला लागलाय. तुमचा प्रस्ताव सांगा ,किती रकमेचा आहे तो ”.  ती खुर्चीतून उठत म्हणाली.  “ बरीच काम आहेत मला.”

“ काय कामं आहेत? ”  पाणिनी म्हणाला.

“ तुम्हाला काही घेणं नाही त्याच्याशी. रक्कम बोला.”

“ कशाची रक्कम ? ”  पाणिनी म्हणाला.

“ विहंग ला सर्व, कायदेशीर कचाट्यातून मोकळ करण्याची.आणि त्याच्या आयुष्यातून बाहेर पडायची.”

“  तू निघून जाशील खरंच ? ”

“ संगत्येना मी.” –शेफाली

“ विहंग ला कधीही भेटणार नाहीस? ” 

“ नाही.” ती म्हणाली पाणिनी पटवर्धन ने मान हलवली आणि सावकाश म्हणाला. “ कालच विहंग म्हणाला मला की दुसरं लग्न करायचा विचार त्याने बदललाय.मला त्यामुळे वाटतं की पुन्हा आपण  तुमचे संबंध जुळवू शकतो.विहंग काल तुझ्य सौंदर्याची स्तुती करत होता.” 

“ मला परत जुळवायचे नाहीये त्याच्याशी.”

“ तुझी मर्जी.”  पाणिनी म्हणाला

“ इकडे बघा ,पटवर्धन, मी पेपरात खटल्याच्या बातम्या वाचल्या आहेत.” शेफाली म्हणाली

“ बर,मग ? ”  पाणिनी म्हणाला.

“ मरुद्गण ला रात्रीच्या फोन बद्दल प्रश्न विचारले गेलेत.”

“ बर,मग ? ”  पाणिनी म्हणाला.

“ समजा तो खोटं बोलतो आहे असं तुम्ही सिध्द करू शकलात तर? ” –शेफाली

“ खूपच फायद्याचे ठरेल ते.”  पाणिनी म्हणाला

“ समजा मी अशी साक्ष दिली की मला त्या रात्री मरुद्गण चा फोन आला होता , तर तुम्हाला किती फायदा होईल त्यातून? ”

“ एक दमडा सुध्दा नाही.मला कोणाची खोटी साक्ष विकत घ्यायची नाही ”  पाणिनी म्हणाला

“ तशी वस्तुस्थिती असेल तर? ” –शेफाली

“ तशी आहे वस्तुस्थिती ? ”  पाणिनी म्हणाला

“ अत्ताच या प्रश्नाचं उत्तरं मी नाही देणार.”

“ कोर्टात देशील उत्तर.”  पाणिनी म्हणाला

“ त्या वेळी मला जे फायद्यात आहे ते बघून मी उत्तर देईन.” शेफाली म्हणाली. “ तुम्ही मला दमदाटी करू शकाल असं नका समजू.”

“ सत्य सांगण्याची शपथ घेऊन खोटी साक्ष देशील असं तर तुला म्हणायचं नाहीये ना? ”

“ नक्की खोटी साक्ष देईन मी , वेळ आली तर.पुरुष बायकांशी हातोहात खोट बोलतात,बायकांनी तसं केलं तर मात्र म्हणतात की बायका फसवणूक करतात.” शेफाली म्हणाली  “ ते सगळं जाऊ दे, मला पन्नास हजार द्या,विषय संपवा.”

पाणिनी पटवर्धन ने सावकाश नकारार्थी मान हलवली.  “ मी माझ्या अशिलाला पंचवीस हजार पर्यंत रकमेची शिफारस करीन जास्तीत जास्त.”

“ तुम्ही शिफारस केलीत तर तो देईल मला? ”

“ तू जर मला सत्य सांगितलस, पूर्ण पणे तर मी शिफारस करीन.”

“ पुन्हा तडजोड ! पटवर्धन, नीच आहात तुम्ही.हट्टी.” शेफाली म्हणाली. “ विहंग तुरुंगात नसता तर मी त्याच्याकडून सहज दोन लाख वसूल केले असते,कदाचित जास्तच.”

“ तू माझा करायचा आहे तेवढं धिक्कार कर”  पाणिनी म्हणाला

“ करीन.तरीही मी कशात अडकले तर तुम्हीच माझे वकील असाल.”

“ म्हणजे तुझ्या नवऱ्याला  गोली घालायचा विचार आहे? ” पाणिनी म्हणाला.

“ एवढी मूर्ख वाटले का? सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला मारायला?”

“ ठीक आहे तुला पंचवीस हजार मिळवून देतो मी.” पाणिनी म्हणाला

“ कधी? ”

“ तू उद्या साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहण्या पूर्वी.”  पाणिनी म्हणाला  “ म्हणजे तुझ्या आणि विहंग च्या मधे चालू असलेल्या वादात काही समस्या येणार नाही.”

“ तीस हजार करा.” शेफाली  म्हणाली.

“ पंचवीस.”  पाणिनी म्हणाला

 शेफाली ने उसासा सोडला.

“ तुझ्या आणि मरुद्गण मधे झालेल्या संभाषणाचे काय? ”  पाणिनी म्हणाला.

“ तुम्हाला सर्वच्या सर्व हकीगत हवी आहे? ”

“ अर्थात ”

“ रात्री अकरा वाजता प्रथम दुर्वास चा फोन आला मला . तो म्हणाला मी मरुद्गण चा वकील आहे आणि आपली एकत्र मिटींग घ्यायची आहे त्यांना.त्याने सुचवलं की माझ्या वकीलांच्या ऑफिसात सर्व जण भेटू. नंतर रात्री तीन वाजता मरुद्गण चा फोन आला.त्याला मी सांगितलं की तुझ्या वकिलाशी मी आधीच बोलली आहे.”

“ ठरल्याप्रमाणे तुमची एकत्रित मिटींग झाली? ”  पाणिनी म्हणाला.

“ झाली.”

“ त्यांनी काय सुचवलं? ”  पाणिनी म्हणाला.

“ मी मूर्ख आहे असं त्यांना वाटलं असावं.त्यांना माझ्याशी एक करार करायचा होता, ज्या नुसार विहंग ला मानसिक दृष्टया नालायक सिध्द करण्यासाठी ते मला मदत करणार होते.नंतर मी विहंग च्या मरुद्गण कंपनीतले सर्व हक्क सोडून द्यायचे होते.आणि विहंग च्या सर्व मालमत्तेचा ताबा माझ्याकडे आला की मी त्यांना एक लाख रोख द्यायचे होते.” शेफाली म्हणाली.

“ तू त्यांना काय सांगितलसं ? ”

“ मला विचार करायला वेळ द्या म्हणून.”

“ किती वेळ हवंय असं तू काही सांगितलं नाहीस? ” पाणिनी म्हणाला.

“ नाही.”

“ त्याने घाई केली नाही का? ”

“ अर्थात, घाई करतच होते ते.”

“ दुर्वास ने तुला रात्री नेमका किती वाजता फोन केलं सांगू शकशील?” पाणिनी म्हणाला.

“ नेमकेपणाने नाही ,पण दहा ते अकराच्या दरम्यान.”

“ आणि मरुद्गण ने किती वाजता केलं फोन ? ”  पाणिनी म्हणाला.

“ तो बरोबर तीन ला. करण उठल्यावर मी घड्याळ बघितलं होत.”

 पाणिनी ने आपल्या टेबलातून काही कागद बाहेर काढले. “मरुद्गण शी बोलताना तू , मी आता वाचून दाखवतो ,ती वाक्ये उच्चारालीस का? किंवा त्या अर्थाची वाक्ये?  ”   पाणिनी म्हणाला.

“ हो, मी मिसेस खोपकर बोलत्ये. खांडवाहून शेफाली खोपकर.नाव काय म्हणालात? पुन्हा सांगा. मरुद्गण ? अच्छा. या भलत्याच वेळेला फोन का केलात मला समजत नाही.का बर? मला वाटलं सगळ नक्की ठरलंय.तुमच्याच वकिलाने मिटींग ठेवल्ये.तुम्ही माझ्या वकिलांशी संपर्क ठेवा, आणखी काही लागलं तर. हटकर वकिलांशी.” पटवर्धन ने वाचन पूर्ण केलं.

“ माय गॉड , अगदी हेच शब्द बोलल्याचं आठवतंय मला.पण तुम्हाला कसं कळलं ? ”

“ त्या नंतर तू काय केलंस? ” तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत  पाणिनी म्हणाला.

“ पुन्हा झोपायचा प्रयत्न केला.तासभर पडून राहिले, नंतर  गाडी काढून निघाले.”

“ गाडी कुठे होती तुझी? ” पाणिनी म्हणाला.

“ गाडी शेजाऱ्याच्या गॅरेज मधे ठेवली होती.म्हणजे माझ्या घरापासून थोडया अंतरावर.” शेफाली म्हणाली

“ तू तुझ्या घरातून बाहेर कशी सटकलीस? ” पाणिनी म्हणाला.

“ तुम्हाला काय म्हणायचं आहे समजलं मला. माझ्या घरावर कोणीतरी नजर ठेऊन होते मला संशय होता.बहुतेक विहंग ने माणसे ठेवली होती.मूर्ख आहे तो. यापूर्वी सुध्दा मी त्याच्या माणसांना गुंगारा दिला होता.”

“ तू मागच्या दाराने बाहेर पडलीस का? ”

“ हो.”

“ सिमेंट च्या पायवाटेवरून गेलीस? ”

“ नाही, हिरवळीवरून चालत गेले.” –शेफाली.

“ पायाचा आवाज येऊ नये म्हणून? ”

“ हो.”

“ इंदूरला येई पर्यंत तुझा कोणी पाठलाग केला ? ”

“ नाही, पण मी माझ्या वकीलांच्या ऑफिस मधे आले तेव्हा एक माणूस मला दिसला तो हेर असावा असं मला वाटलं त्या वेळी.मी घाबरले आणि माझ्या वकीलांना सांगितलं की काहीतरी करा आणि मी बाहेर पडल्यावर एक तासा नंतर दुर्वास  आणि  मरुद्गण बाहेर पडतील असं करा. ”

“ आणखी एक प्रश्न, तेरा तारखेला तू कुठे होतीस? ”  पाणिनी म्हणाला.

“ खुनाच्या आदल्या दिवशी? ”

“ बरोबर.”

“ मी इंदूरला होते.”

“ काय करत होतीस तिथे? ” 

“ शॉपिंग, आणि वकिलांशी चर्चा.”

“ आणखी काय? ” पाणिनी म्हणाला.

 ती हसली. “ मला विहंग दिसला,रस्त्यात.मी थोडा वेळ त्याचा पाठलाग पण केला. ”

“ का केलास पाठलाग? ”

“ एक उत्सुकता म्हणून.खास असं कारण नाही.तुमच्या या ऑफिस पर्यंत मागावर होते मी त्याच्या.तेव्हा कळलं मला की तो तुमचा सल्ला घेतोय.मग मी माझ्या सांता बर्बाराच्या वकीलांना चांगलच फैलावर घेतलं.तुमच्या ऑफिसात विहंग आला असं मला समजल्यावर माझ्या लक्षात आलं की सगळ्या गोष्टी माझ्या अपेक्षेनुसार घडत आहेत.मग मी हटकर ला भेटायला गेले.”

“ तू तुझे वकील हटकर मार्फत  कोर्टात केस लावली असल्याने, विहंग ला मुक्त करायची कागदपत्रे पण त्यांच्याच सहीने सादर करावी लागतील. तशी व्यवस्था कर त्यांच्या मार्फत आणि लगेच तुला पंचवीस हजार चा चेक मिळेल अशी व्यवस्था करतो. ”  पाणिनी म्हणाला

“ मी त्यांच्या सह्या घेतलेली कागदपत्रे आधीच घेतली आहेत माझ्या ताब्यात.अत्ता आहेत माझ्याकडे.” –शेफाली

पाणिनी ला नवलच वाटले. “ कसं काय पटवलंस त्यांना ? ”

“ मी त्यांना सांगितलं की माझ्या तक्रारीत मी धादांत खोटे आरोप केलेत, तर त्या आधारे ही केस पुढे चालवण्यात त्यांना रस आहे ना? मी एका सुंदर तरुणी शी गप्प मारताना खोटे आरोप केल्याचं तिला बोलले होते ,नंतर मला कळलं की ती तरुणी म्हणजे हेर आहे.तिच्यामुळे विहंग ला समजलंय की मी खोटी तक्रार केली म्हणून.असं माझ्या कडून कळल्यावर वकीलांनी मला सांगितलं की लगेच केस काढून घ्या.असलं खोटारडं अशील नको आम्हाला.मी त्यांना पाचशे रुपये दिले आणि सगळी कागदपत्रे काढून घ्यायला सांगितली.पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस असं सांगून वकिलांनी मला घालवून दिलं ” ती निर्लज्ज पणे कसून म्हणाली.

“ दर वेळेलाच दोन्ही दगडावर हात ठेऊन चालातेस तू, याच पद्धतीने? ”  पाणिनी म्हणाला.

“ नक्कीच.माझ्याशी पुरुष प्रेमासाठी लग्न नाही करत.मी आकर्षक आणि मादक आहे पटवर्धन.स्त्री म्हणून टे माझ्यापाशी येतात. पण आता मी पुन्हा लग्नाचा विचार केला,तर तो प्रेमासाठीच असेल.”

“ विचार दिसतोय पुन्हा लग्न करण्याचा.”  पाणिनी म्हणाला

“ अर्थातच नाही.” शेफाली म्हणाली

“ बरं आहे तर मग.तुझा चेक तयार असेल उद्या.”

पाणिनी पटवर्धन तिला दारा पर्यंत सोडायला गेला. बाहेर पडताना पाणिनी कडे वळून पुन्हा ती म्हणाली,  “हटकर ना ज्या थापा मारून मी गंडवलं आणि केस पेपर वर सह्या घेतल्या टे तुम्ही त्यांना सांगणार नाही ना? ”

“ बिलकुल नाही. ”  पाणिनी म्हणाला  “ मला फक्त कायदेशीर मसुद्यात आणि पद्धत वापरून विहंग मुक्त होण्यात आणि त्या बदल्यात तुला पंचवीस हजार मिळवून देण्यात  रस आहे. तुला बचाव पक्षातर्फे साक्ष देण्यासाठी समन्स पाठवला जाईल. पिंजऱ्यात उभी राहिल्यावर तू मला अत्ता सांगितलेली गोष्ट आयत्यावेळी बदलायचा प्रयत्न करू नको.”  पाणिनी म्हणाला

“ काळजी करू नका पटवर्धन. कोणत्या पुरुषांना  वेडं करायचं मला कळतं ”

“ धन्यवाद.”  पाणिनी म्हणाला आणि तिला निरोप दिला.

“ काय बाई आहे ! ” शेफाली  बाहेर जाताच सौम्या आत आल्या आल्या म्हणाली. “ डबल क्रॉस करत्ये ती सगळ्यांनाच. तुम्ही सावध रहा सर. मला तर वाटत होत तिच्या झिंज्या उपटाव्यात.”

“हटकर ना सुध्दा गंडवणाऱ्या बाई बद्दल तुला असं वाटणं स्वाभाविकच आहे.काट्याने काटा काढावा अशी ही बाई आहे.दुर्वास आणि मरुद्गण तिला ओळखू शकले नाहीत.त्यांना वाटलं आपण सहज गुंडाळू तिला, प्रत्यक्षात तीच त्यांना भारी पडली. ”  पाणिनी म्हणाला

“ तुम्ही तिला पंचवीस हजार द्यायला का तयार झालात? ती त्या गोरक्ष वर एवढी फिदा झाल्ये की त्याला मिळवण्यासाठी आणि त्याच्याशी लग्न होण्यासाठी तिने पंचवीस हजारावर पाणी सोडले असते आणि तरीही विहंग वरची केस काढून घेतली असती.”  -सौम्या

“ काळजी करू नको.”  पाणिनी म्हणाला  “ तुझा मित्र गोरक्ष ला च ती रक्कम मिळेल आणि शेवटी ती त्याला देणे भाग पडेल तुझी मैत्रीण मायरा देसाई ला.कारण ती त्याने नाही दिली तिला तर ती त्याला आयुष्यातून उठवेल.तिचे देणे पूर्ण करता यावे म्हणून तर त्याने शेफाली शी प्रेमाचे नाटकं करून तिला लुबाडायचे ठरवलंय ना ! ”

“ आणि  तुम्हीच त्याची आणि शेफाली ची भेट माझ्या करवी घडवून आणलीत ना ! म्हणजे शेफाली ला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात तुम्हीच ओढलत ! ” –सौम्या.

“ आपण वकीली न घेतलेल्या मायराला मदत करायचा माझा विचार होता.”  पाणिनी म्हणाला

“ म्हणजे  पैसे शेफाली चे  आणि मदत मायरा देसाई ला , आणि त्याचं श्रेय मात्र तुम्हाला. वा सर. तुम्ही काय शेफाली पेक्षा कमी राजकारणी नाही ! ” सौम्या कौतुक मिश्रित टोमणा मारत म्हणाली.

“ सौम्या आता मायराला फोन लाऊन सांग की लौकरच गोरक्ष ला पैसे मिळणार आहेत तेव्हा हीच वेळ आहे त्याला गाठून  पोलिसांकरवी अटक करण्याचा   पाणिनी म्हणालादम देण्याची  ”

“ या कामाचा मात्र मला प्रचंड आनंद होईल.” सौम्या म्हणाली आणि तिने फोन हातात घेतला.

 

( प्रकरण २० समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel