प्रश्न --मला कशातही रस वाटत नाही .बहुतेक लोकांना कशात ना कशात तरी रस असतो. ते आपल्या आवडीच्या विषयात गुंग असतात.मला काम करावेसे वाटत नाही .मी एखादे उपयुक्त काम हाती घ्यावे का?
उत्तर--तुम्हाला सामाजिक राजकीय किंवा धार्मिक कार्यकर्ता बनावे असे वाटत आहे काय ?तुम्हाला काहीही करता येत नाही म्हणून तुम्ही कसली ना कसली पुनर्घटना करण्यासाठी तयार होता .तुमच्या जवळ काहीही करता येण्यासारखे काम नसेल, जर तुम्हाला काहीही करू नये असे वाटत असेल ,तर मग आहे तिथेच म्हणजे कंटाळवाणेपणामध्ये तुम्ही का रहात नाही ?जे तुम्ही असाल तिथेच का रहात नाही?तेच का पहात नाही?जर तुम्ही दुःखात असाल तर तिथेच राहा.बाहेर पडण्याचा मार्ग शोधू नका .जर तुम्ही तिथेच राहून हा कंटाळवाणेपणा समजून घ्याल तर त्यासारखी दुसरी मोठी कोणतीही गोष्ट नाही.या कंटाळवाणेपणाला असामान्य महत्त्व आहे .जर तुम्ही म्हणाल "मी आता कंटाळलो आहे मी आता दुसरे काही करीन" तर हा कंटाळवाणेपणापासून दूर पळण्याचा मार्ग आहे .दूर पळण्याचा प्रयत्न आहे .आपल्या बहुतेक हालचाली या पळवाटा आहेत. त्यामुळे आपण सामाजिक दृष्ट्या व इतरही सर्व दृष्टींनी विघातक ठरतो .तुम्ही जे काही असाल त्याच्याबरोबरच न रहाता, जर तुम्ही आणखी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल ,तेथून पळण्याचा प्रयत्न करत असाल ,तर तुमच्याकडून होणारा खटय़ाळपणा व विनाश हा कितीतरी जास्त आहे .अडचण अशी आहे की जे काही आहे त्याबरोबर आपण राहू शकत नाही .आपण जे काही असू त्याच्या बरोबरच कसे राहावे, पळण्याचा प्रयत्न का करू नये, ते आपल्याला माहीत नाही.ज्या अर्थी आपल्या बहुतेक हालचाली या पळवाटा आहेत, त्याअर्थी आहे तिथेच राहणे हे नक्कीच फार बिकट आहे. पळण्याचा प्रयत्न न करणे व जे आहे त्याला तोंड देणे हे फार बिकट असणार .जर तुम्ही खरोखरच कंटाळलेले असाल, तर मला त्यात अतिशय समाधान व आनंद आहे .मी आता म्हणतो "चला पळण्याला पूर्णविराम देऊया.आता आपण इथेच थांबू या ,या कंटाळवाणेपणाकडे नीट पाहू या . आपण आणखी काही तरी कां करावे ?"
जर तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही का कंटाळला आहात ?कंटाळवाणेपणा हे काय आहे ?तुम्हाला कशातही रस का वाटतं नाही?तुम्हाला असा कंटाळवाणेपणा वाटण्यामागे काही कारण परंपरा ज़रूर असली पाहिजे .दुःख, क्लेश, त्रास, हालअपेष्टा, श्रद्धा, ज्ञान, अविरत हालचाल, यासर्वांनी तुमचे मन सुस्त व अंतःकरण अतरल बनले आहे .जर तुम्ही कंटाळा का आला आहे, कशातही गम्मत का वाटत नाही, हे शोधून काढू शकाल, तरच तुम्ही ही समस्या सोडवू शकाल .तुम्हाला ती सोडविता येणार ऩाही काय ?अशा प्रकारे जागृत झालेली रसपूर्णता योग्य कार्य करील .जर तुम्ही कंटाळलेले आहात, कशातही तुम्ही रस घेऊ शकत नाही, तर अर्थातच जबरदस्तीने तुम्ही कशातही रस घेऊ शकणार नाही .ते केवळ पिंजऱ्यांमध्ये अडकलेल्या खारीने पिंजऱ्यात गोलगोल फिरण्यासारखे होईल .मला माहीत आहे कि अशा प्रकारच्या क्रियेत आपल्यापैकी बरेचजण स्वतःला गुंतवून घेतात .अंतर्मुख होऊन या कंटाळवाणेपणाच्या स्थितीमध्ये आपण का आहोत ते अापण शोधू शकतो .बौद्धिक व मानसिक दृष्ट्या आपण थकलेले आहोत .आपण कितीतरी निरनिराळ्या प्रकारच्या हालचाली करून बघितलेल्या आहेत .किती तरी संवेदना आपण अनुभवलेल्या आहेत .कितीतरी प्रयोग, कितीतरी करमणुकीचे प्रकार, अापण हाताळलेले आहेत .शेवटी आता अापण सुस्त व कंटाळवाणे बनलेले आहोत .आपण एक काहीतरी धरतो, काही वेळाने आपल्याला त्याचा कंटाळा येतो, ते नंतर आपण सोडून देतो.नंतर आपण दुसरीकडे जातो, तिथेही पुन्हा तेच करतो,अशी आपली धरसोड वृत्ती झाली आहे .आपण धार्मिक ग्रंथ वाचतो .नंतर हा धार्मिक ग्रंथ तो धार्मिक ग्रंथ असेही करून बघतो .आपण देवळात जातो, नंतर आणखी एखाद्या मोठ्या तीर्थस्थानी जातो, नंतर धर्मगुरूकडे जातो, तिथे आपले समाधान झाले नाही तर आणखी कोणा एका महात्म्याकडे जातो .आपण येथून तिथे, तिथून आणखी कुठे तरी, असे सारखे चालतच राहतो .हे सारखे ताणणे व ढिले सोडणे यामुळे आपण थकून जातो .सर्व संवेदनां प्रमाणे इथेही आपले मन लवकरच काही काळानंतर थकून जाते.
आपण एका संवेदनेकडून दुसर्या संवेदनेकडे,एका आकर्षणाकडून दुसऱ्या आकर्षणाकडे, असा बराच प्रवास आतापर्यंत केला आहे .आता आपण अशा एका ठिकाणापर्यंत येऊन पोहोचलो आहोत कि आता आपण पूर्ण थकून गेलो आहोत .आपण खरोखरच दमले आहोत ,हे लक्षात घेऊन आता कृपा करून आणखी धावपळ करू नका .विश्रांती घ्या. शांत पडून राहा. मनाला आपली ताकद एकत्र करू द्या .मनावर जोरा करू नका.ज्या प्रमाणे हिवाळ्यात जमीन पुन्हा नवीन होते,त्याचप्रमाणे मन जेव्हा शांत राहते,तेव्हा ते आपोआपच आपल्याला नवजीवन प्राप्त करून घेत असते .मनाला शांत पडून राहायला देणे फार कठीण आहे .या मनाला कितीही दमले असले तरी सतत काही ना काही करीत राहावयाचे असते .जेव्हा तुम्ही खरेच जे काही असाल तिथेच स्वतःला सोडून देता .कुठे पळण्याचा प्रयत्न करीत नाही. या बिंदूपर्यंत शेवटी तुम्ही येऊन पोचता.तुम्ही कुरूप विद्रुप ओंगळ हिडीस कंटाळलेले दमलेले जे काही असाल तिथेच तसेच राहा .आता या परिस्थितीला तोंड योग्य पद्धतीने देणे शक्य आहे.
परिस्थिती योग्य रितीने हाताळता येण्याची शक्यता आहे .
जेव्हा तुम्ही एखाद्याचा स्वीकार करता, जेव्हा तुम्ही जे काही आहे ते आपोआपच मान्य करता,तेव्हा काय होते ?जेव्हा तुम्ही जे काही आहे ते संपूर्ण खुषीने मान्य करता,तेव्हा मग समस्या कुठे उरली? जोपर्यंत तुम्ही जे काही आहे ते मान्य करीत नाही, जोपर्यंत तुम्ही जे काही आहे त्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहा, तोपर्यंत समस्या आहे. परंतु तुम्ही जे काही आहे ते एकदा मान्य केले की समस्या तिथेच संपते.हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे .मी जे जसे आहे,तसा त्याचा स्वीकार करा, मान्य करा,असे म्हणतो तेव्हा जे आहे त्यात समाधानी रहा, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही.जर आपण जे काही आहे, ते सर्वार्थाने प्रामाणिकपणे पूर्णपणे कोणत्याही कुरकुरी शिवाय मान्य केले ,तर ज्या वस्तूची आपल्याला भीती वाटली, जी वस्तू आपल्याला कंटाळवाणी वाटली, ती मूलगामीरित्या बदललेली असते .कंटाळवाणेपणा निराशा दुःख भीती जे काही असेल ते आता पूर्णपणे बदललेले असते.
म्हणूनच आपली विचारप्रक्रिया समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे .स्वज्ञान कोणत्याहि पुस्तकातून, कोणाहि गुरूकडून, कोणाहि इसमाकडून,कोणाहि महात्म्याकडून, कबुली जबाबातून, मानसशास्त्रातून, मनोविश्लेषणातून, प्राप्त होणार नाही .ते ज्याचे त्यानेच अखंड जागृतीतून प्राप्त करून घ्यावयाचे आहे .ते ज्याचे त्यानेच शोधावयाचे आहे .कारण ते तुमचे जीवन आहे .स्वज्ञानाची रुंदी व खोली वाढल्याशिवाय, अंतर्यामी व बाह्यात्कारी तुम्ही जे काही कराल, त्याची परिणीती दुःख क्लेश व निराशा यांमध्ये होईल .स्वकोंडी करणाऱ्या मनाच्या क्रियांच्या पलीकडे जाण्यासाठी, प्रथम तुम्ही त्या समजून घेतल्या पाहिजेत .त्या समजून घेणे म्हणजे लोक, वस्तुजात, निसर्ग, कल्पना, यांच्याशी असलेल्या संबंधरूपतेमध्ये जागृत रहाणे होय.जर आपण खरेच जागृत असू, तर अारशामध्ये जसे आपले योग्य अयोग्य रूप दिसते, त्या प्रमाणेच या संबंध रूपतेमध्ये आपण कसे आहोत ते स्वतःच्याच लक्षात येईल .समर्थन किंवा धि:कार याशिवाय अापण पाहिले पाहिजे .जेव्हा असे पाहण्याला आपण सुरुवात करतो तेव्हा मनाच्या निरनिराळ्या गूढ मार्गांचे व हालचालीचे सखोल व रुंद ज्ञान होते.या स्वज्ञानातून मन शांत व स्तब्ध होणे शक्य आहे. असे होईल तेव्हाच मन सत्य ग्रहण करू शकेल.