प्रश्न ---रिकामपणच्या बडबडीला स्वसाक्षात्कार दृष्टीने महत्त्व आहे .विशेषत: इतरांचा साक्षात आकार मला समजतो .मी गंभीरपणे विचारतो की बडबड गप्पा हे जे काही आहे ते शोधण्यासाठी साधन म्हणून का वापरू नये . अनेक युगे गप्पा हा शब्द धि:कारला गेला आहे. पण मी त्याचा धि:कार करीत नाही.
उत्तर---मला आश्चर्य वाटते की आपण मुळात बडबडच का करतो?इतरांचे अंतरंग आपल्या दृष्टीला पडावे म्हणून अर्थातच नाही. आणि इतरांचे अंतरंग आपल्याला कळून काय करायचे आहे?तुम्हाला इतरांना का जाणून घ्यायचे आहे ?हे इतके असामान्य कुतूहल दुसर्यांच्या बद्दल का आहे ?प्रथम आपण बडबड का करतो?अत्यंत अस्थिरमयतेचा तो एक प्रकार आहे.तो तसा नाही काय?काळजीखोरपणा हा जसा एक अस्थिर मनाचा निदर्शक आहे, त्याचप्रमाणे बडबड करणे हाहीअस्थिर मनाचा निदर्शक आहे .ही लोकांच्यामध्ये डोकावण्याची अडमडण्याची वासना का ?
लोक काय करतात हे आपल्याला का जाणून घ्यायचे आहे ?अत्यंत उथळ मन बडबड करते . हे बरोबर असेच नाही काय?चवकशी करणारे परंतु अयोग्य दिशेने जाणारे मन बडबड करते .दुसरे जे काही करतात त्यांच्या हालचाली त्यांचे विचार त्यांची मते ही माहिती करून घेण्यातून, इतरांची आपल्याला ओळख पटेल असे प्रश्नकर्त्याला वाटत आहे .जर आपण स्वतःला ओळखत नसू तर आपण इतरांना ओळखू शकू काय ?आपण कसा विचार करतो, आपण कसे कर्म करतो, अापण कसे वागतो, हे जर आपल्याला माहित नसेल,तर आपण इतरांचे मूल्य कसे काय ठरवू शकणार?दुसऱ्यांबद्दल हे अतोनात असामान्य कुतूहल कां ? दुसरे कशाबद्दल विचार करीत आहेत. दुसरे काय बडबडत आहेत. दुसरे काय करीत आहेत . दुसरे काय अनुभवीत आहेत .हे जाणण्याची इच्छा असणे म्हणजे एकप्रकारे ही मनाने शोधून काढलेली पळवाट नाही काय ?स्वतःपासून दूर पळण्यासाठी ही एक सुरेख पळवाट आपल्याला सापडत नाही काय?इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करण्याची वासनाही यांत अंतर्भूत नाही काय ?इतरांच्या जीवनात हस्तक्षेप केल्याशिवायच आपले जीवन हे भरपूर बिकट भरपूर गुंतागुंतीचे भरपूर दुःखमय नाही काय ?इतरांबद्दल अशाप्रकारे बेढब निर्दय कुटाळकी पूर्ण पद्धतीने विचार करण्यासाठी आपल्याजवळ वेळ आहे काय ?आपण हे का करतो? जवळजवळ प्रत्येकजण कोणाबद्दल तरी काही तरी बडबडत असतो. असे का?
आपण इतरांबद्दल विचार करतो कारण आपण स्वतःच्या विचारप्रक्रियेत व कर्मात पुरेसा रस घेत नाही.अापल्याला इतर काय करीत आहेत ते पाहावयाचे असते .सौजन्यपूर्णतेने सांगायचे झाल्यास आपल्याला इतरांची नक्कल करायची असते .साधारणपणे बहुतेक वेळा जेव्हा अापण गप्पा मारतो तेव्हा आपल्याला इतरांचा धि:कार करायचा असतो .परंतु ओढाताण करून दयाळूपणे बोलायचे झाल्यास आपल्याला इतरांची नक्कल करायची असते.आपल्याला नक्कल कां करायची असते ?या सर्वातून आपल्या मनाचा विलक्षण उथळपणा प्रतिबिंबित होत नाही काय ?असामान्य सुस्त मनाला काहीतरी उत्तेजक लागत असते.स्वतःच्या बाहेर ते मन ती उत्तेजकता मिळवण्याचा प्रयत्न करते .आपले आकर्षण आपली उत्तेजकता काहीही असो, संवेदना कोणत्याही प्रकारची असो, त्याच्या पाठीमागे उत्तेजकता तहान, आकर्षण आवश्यकता, व फरफट हौस,ही असतात .जर एखादा या प्रश्नात खोलवर गेला तर त्याला असे आढळून येते की तो स्वतः अत्यंत उथळ आहे. दुसर्यांबद्दल चर्चा करून तो बाह्य आकर्षण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे .जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही दुसऱ्यांबद्दल बडबड करीत असाल तेव्हा स्वतःला पकडा.जर तुम्ही त्याबद्दल जागृत असाल तर तुम्हाला स्वतःबद्दल फार विलक्षण गोष्टी आढळून येतील .केवळ कुतूहलाने आपण हे सर्व करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे म्हणून कृपा करून पांघरूण घालू नका .अस्थिरता, उथळपणा, लोकांबद्दलच्या खऱ्या प्रामाणिक कुतूहलाचा अभाव, ही सर्व येथे अस्तित्वात आहेत .या बडबडीला खऱ्या प्रामाणिक कुतूहलाशी काहीही कर्तव्य नाही हाच याचा अर्थ आहे .
या पुढील समस्या अशी आहे की ही बडबड कशी थांबवावी बरोबर हाच पुढचा प्रश्न नाही काय? जेव्हा तुम्ही या बडबडी बद्दल जागृत होता तेव्हा तुम्ही ही बडबड कशी काय थांबविता?जर ही केवळ एक सवय बनली असेल, दिवसांमागून दिवस चालणारी एक कुरूप सवय बनून गेली असेल, तर ती तुम्ही कशी काय थांबविणार आहात ?हा प्रश्नच मुळात उद्भवतो काय ?जेव्हा तुम्ही नक्की काय करीत आहात हे ओळखता, त्याबद्दल पूर्ण जागृत असता, त्यातील सर्व गर्भितार्थासह जागृत असता, तेव्हा तुम्ही स्वतःला हे मी कशी थांबवू असे विचारता काय?ज्याक्षणी तुम्ही स्वतः उगीचच बडबड करीत आहोत याबद्दल जागृत असता तेव्हा ती आपोआपच थांबत नाही काय?कशी बडबड थांबवू हा प्रश्न जेव्हा तुम्ही जागृत असता तेव्हा उद्भवत नाही.बडबड कशी थांबवू हा प्रश्न जेव्हा तुम्ही जागृत नसता तेव्हाच उद्भवतो .तुम्ही बडबड करीत आहा ही परिस्थिती तुम्ही जागृत नसल्याचे निदर्शक आहे.याचा पुढच्या वेळेला प्रयोग करून पाहा. जेव्हा तुम्हाला आपण कशाबद्दल बोलत आहोत हे लक्षात येईल, आपण निष्फळ बडबड करीत आहोत हे लक्षात येईल, आपली जीभ आपल्यापासून दूर कशी चालली आहे हे लक्षात येईल, तेव्हा तत्क्षणी तात्काळ तुम्ही बडबड करण्याचे थांबवाल.ही बडबड थांबवण्यासाठी इच्छाशक्ती क्रिया अजिबात लागत नाही .तुम्ही काय बोलत आहा, त्यातील गर्भितार्थ काय आहे, याबद्दल तुम्ही जागृत असणे पुरेसे आहे.बडबडीचा तुम्हाला धि:कारही करावा लागत नाही किंवा समर्थनही करावे लागत नाही. जागृतता असेल तर ती बडबड आपोआपच थांबते. जागृतता असते तेव्हां बडबड किती तत्काळ थांबते ते तुम्ही पाहा .या जागृतीतून स्वक्रियामार्गांचा साक्षात्कार होतो . स्वहालचालींचा साक्षात्कार होतो. स्वविचार आकार साक्षात्कार होतो. .त्या साक्षात्कारात स्वतःच स्वतःला सापडतो .दुसऱ्यांबद्दल बडबड करीत बसण्यापेक्षा, दुसरे कसला विचार करीत आहेत, ते कसे वागत आहेत, ते काय करीत आहेत,याची चवकशी करण्यापेक्षा,स्वतःचा स्वतःला साक्षात्कार होणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे .
आपल्यापैकी जे वर्तमानपत्र वाचतात ते बडबडीने ,जागतिक बडबडीने, आकंठ भरलेले असतात . स्वतःच्या क्षुद्रपणापासून, हलकटपणापासून, कुरुपपणापासून, पळण्याची ही एक पळवाट आहे .जागतिक घटनेत असलेल्या उथळ आवडीने,अापण जास्त जास्त शहाणे बनत आहोत.त्यामुळे आपण आपल्या जीवनात जास्त आत्मविश्वासाने, यशस्वीपणे, जास्त योग्य पद्धतीने, वावरू शकू असे म्हणणे व्यर्थ आहे .हे सर्व स्वत:पासून पळण्याचे मार्ग आहेत .ते तसे नाहीत काय ?आपण किती रिकामे उथळ क्षुद्र हलकट पोकळ व स्वतःचे स्वतःला घाबरलेले असतो.आपण स्वतः इतके दरिद्री आहोत की या बडबडीतून, आपल्याला उंची करमणूक मिळते, असा आपण आपला गैरसमज करून घेतो .प्रार्थना बडबड श्रद्धा सण सभा मिरवणुका या सर्वांनी आपण आपला पोकळपणा भरून काढण्याचा प्रयत्न करीत असतो .अशा अनंत पळवाटांमुळे पळवाटा महत्त्वाच्या बनतात .या सर्वामुळे, जे काही आहे त्याची समज, बिन महत्त्वाची ठरते .जे काही आहे ते समजण्यासाठी सतत लक्ष लागते .आपण पोकळ आहोत, आपण क्लेशात आहोत, हे कळण्यासाठी सतत असामान्य लक्ष लागते.सर्व पळवाटांचा त्याग करावा लागतो. परंतु आपल्यापैकी बहुतेक जणाना पळवाटा आवडतात . कारण या पळवाटा कितीतरी सुखमय आहेत .त्या पळवाटा गोड असतात .जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा अशी परिस्थिती हाताळणे निश्चितच बिकट असते .आणखी एका समस्येला आपल्याला तोंड द्यावे लागते. अशा वेळी निश्चित काय करावे ते आपल्याला कळत नाही .मी रिकामा आहे मी क्लेशात आहे. मी दुःखात आहे. हे मी जेव्हा ओळखतो,तेव्हा मी काय करावे,त्याच्याशी मुकाबला कसा करावा, ते मला माहीत नसते .मग मी पुनः पळवाटातून पळ काढतो .
प्रश्न असा आहे की मी काय करावे ?अर्थातच स्वाभाविकपणे मी पळू शकत नाही.पळणे हे अत्यंत मूर्खपणाचे व बालिश आहे.तुम्ही जे काही आहे त्यांच्याशी जेव्हा भेटता तेव्हा तुम्ही काय करावे ?नाकारल्याशिवाय किंवा समर्थन केल्याशिवाय, जे काही आहे त्याच्या बरोबर रहाणे शक्य आहे काय ?हे फारच कठीण आहे .मन त्याच्या स्वभावाप्रमाणे स्पष्टीकरण, धि:कार,समर्थन,समरसता, शोधते.जर ते यातील काहीही करणार नाही व फक्त जे काही आहे,त्याच्याबरोबर राहील, तर खराच स्वीकार केल्यासारखे होईल .जर मी काळा आहे आणि मी त्याचा स्वीकार केला तर समस्येचा प्रश्नच कुठे येतो?समस्येचा इथेच शेवट होत नाही काय ?जर मी मला जरा उजळ होण्याची इच्छा करीत असेन तर मात्र इथे समस्येला सुरुवात होते.जे काही आहे त्याचा जसाच्या तसा स्वीकार करणे महाभयंकर कठीण आहे.जेव्हा कुठलीही पळवाट नसेल तेव्हाच हे एखादा करू शकेल .लक्षात ठेवा धि:कार किंवा समर्थन ही एक पळवाट आहे.जेव्हा आपण बडबड का करतो याची संपूर्ण प्रक्रिया व कारणमिमांसा समजतो ,जेव्हा त्याला त्यातील मूर्खत्व समजते , जेव्हा त्याला त्यातील क्रूरता ,व इतर गोष्टी उमजतात,तेव्हा तो जे काही आहे त्याच्या बरोबर राहतो .नंतर जे काही आहे त्याचा नाश करणे किंवा त्यात बदल करणे या दृष्टिकोनातून हाताळणी करण्याला सुरुवात करतो .जर आपण यातिल काहीही केले नाही ,फक्त समजून घेण्याच्या भूमिकेतून त्याच्या बरोबर राहिलो ,तर आपल्याला असे आढळून येईल, की ज्याची आपल्याला भीती वाटली,त्यात भीती वाटण्यासारखे काहीही नाही.ती वस्तूच मुळी अस्तित्वात नाही.तेव्हांच जे काही आहे त्याच्यात बदल होण्याची शक्यता आहे.