प्रश्न --प्रकट मनाला सुप्त मन माहीत नसते .त्याप्रमाणेच प्रकट मनाला सुप्त मनाची भीती वाटत असते .तुम्ही विशेषत्वेकरुन प्रकट मनाबद्दल बोलत असता.केवळ प्रकट मन स्तब्ध होण्याने कार्यभाग साधेल काय ?कृपा करून सुप्त मन कसे हाताळावे ते सर्व बारकाव्यांसह स्पष्ट सांगा .
उत्तर--प्रकट व सुप्त अशी दोन प्रकारची मने आहेत हे आपल्याला माहीत आहेच .आपल्यापैकी बहुतेक जण प्रकट मनातच कार्यरत असतात .आपले जवळजवळ संपूर्ण आयुष्य त्या मर्यादेतच व्यतित केले जाते.आपण नेहमी तथाकथित जागृत मनातच जगत असतो .आपण कधीही खोलवर असलेल्या सुप्त मनाकडे लक्ष देत नाही.या सुप्त मनाकडून केव्हा केव्हा कांही सूचना कांही दिग्दर्शन होत असते . परंतु त्या सूचनेकडे दुर्लक्ष केले जाते .तिला चमत्कारिक स्वरूप दिले जाते .किंवा त्या त्या वेळच्या प्रकट मनाच्या मागण्यांप्रमाणे त्याचा अनुवाद केला जातो.आता प्रश्न विचारणाऱ्याचे असे म्हणणे आहे की "तुम्ही फक्त प्रकट मना बद्दलच बोलत असता व हे पुरेसे आहे काय ?"प्रथम आपण जागृत मन म्हणजे काय ते पाहू या .वस्तुत: जागृत मन हे सुप्त मनाहून वेगळे आहे काय?आपण प्रकट हे सुप्त मनाहून वेगळे केले आहे .ही विभागणी बरोबर आहे काय?ही विभागणी न्याय्य आहे काय?वस्तुस्थिती अशी आहे काय ?प्रकट व सुप्त मनात खरोखरच अशी विभागणी आहे काय ?जिथे प्रकट मन संपते व सुप्त मन सुरू होते अशी एखादी निश्चित सीमारेषा आपण दाखवू शकू काय?मनाचा वरचा थर, जागृत मन, हे दिवसभर कार्यरत असते हे आपल्याला माहित आहे .परंतु दिवसभर केवळ हे हत्यारच गतिमान असते काय? मी जर केवळ मनाच्या वरच्या थराबद्दल बोलत असेन तर मी जे काही बोलतो त्याची किंमत शून्य आहे .त्या बोलण्याला काहीही अर्थगर्भता राहणार नाही.आपल्यापैकी बरेचजण प्रकट मनाने स्वीकार केलेल्याला चिकटून बसतात .प्रकट मनाला उघड उघड वस्तुस्थितीला धरून ठेवणे सोईचे वाटते.अप्रकट मन कदाचित बंड करण्याचा संभव असतो.आणि ते बऱ्याच वेळा बंड करतेही .अशा तर्हेने तथाकथित प्रकट व अप्रकट मनात केव्हां केव्हां झगडा निर्माण होतो.
तेव्हां आपली समस्या ही आहे .बरोबर आपली हीच समस्या नाहीं काय ?खरोखर वस्तुतः फक्त एकच स्थिती आहे .प्रकट व सुप्त अशा दोन अवस्था नाहीत .जाणीवयुक्तता अशी फक्त एकच स्थिती आहे.तुम्ही प्रकट व सुप्त असे दोन विभाग पाडता . ही जाणीवयुक्तता नेहमी फक्त भूतकाळाबद्दल असते. तुम्ही वर्तमानकालाबद्दल कधीही जाणीवयुक्त नसता.जे संपले आहे त्याबद्दल तुम्ही जाणीव युक्त असता.मी तुम्हाला जे काही सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल एका क्षणानंतर तुम्ही जाणीवयुक्त होता .हे बरोबर असेच नाही काय?तुम्हाला ते एका क्षणानंतर समजते .आत्ताबद्दल तुम्ही कधीही जागृत किंवा जाणीव युक्त नसता.तुमच्या स्वतःच्या मनाची व अंत:करणाची तपासणी करा तुम्हाला असे आढळून येईल की जाणीव युक्तता ही फक्त भूत व भविष्यात कार्यवाहीत असते .वर्तमान हा फक्त भूतातून भविष्याकडे जाण्याचा दरवाजा असतो. भूताची भविष्याच्या दिशेने झालेली हालचाल म्हणजेच जाणीव युक्तता होय .
तुम्ही जर स्वतःचे मन कार्यवाहीत असताना पाहाल तर तुम्हाला असे आढळून येईल की भूताची हालचाल व भविष्याची हालचाल ही अशी एक प्रक्रिया आहे की जिथे वर्तमानच अस्तित्वात नसते .जे कदाचित कटु असेल अशा वर्तमानापासून पळण्याची केव्हां केव्हां भूतकाळ ही पळवाट असते.तर केव्हा केव्हां भविष्याबद्दलची आशा ही कटु वर्तमानापासून पळण्याची पळवाट असते.अशा प्रकारे मन हे नेहमी एक भूताने किंवा भविष्याने भरलेले असते.अशाप्रकारे वर्तमानाचा नेहमी खून केला जातो .मनोधारणा नेहमी भूताने बनलेली असते .तुम्ही हिंदुस्थानी म्हणून हिंदू म्हणून मुसलमान म्हणून ख्रिश्चन म्हणून कम्युनिस्ट म्हणून किंवा आणखी काही म्हणून आकारित केले गेलेले असता .हे आकारित मन भविष्यकाळाबद्दलचा काही आशादायक आराखडा काढीत असते .म्हणूनच ते प्रत्यक्षपणे पक्षपाताविना जे काही आहे त्याकडे वस्तुस्थितीकडे बघण्याला असमर्थ असते. एक ते धि:कार करते व वस्तुस्थिती नाकारते. नाहीतर वस्तुस्थितीचा स्वीकार करते व स्वतःला त्यात पाहते.असे मन अर्थातच स्वाभाविकपणे वस्तुस्थितीकडे वस्तुस्थिती म्हणून पाहण्याला असमर्थ असते.आपली जाणीवयुक्तता ही भूत आकारित आहे .आपला विचार म्हणजे वस्तुस्थितीच्या आव्हानातून आलेली आकारयुक्त प्रतिक्रिया होय. श्रद्धेच्या ज्ञानाच्या इत्यादिकांच्या धारणेनुसार भुताच्या धारणेनुसार तुम्ही जो जो जबाब देता तो तो भूत जास्त जास्त दृढ व पुष्ट केले जाते.भूताचे दृढीकरण व पुष्टीकरण म्हणजेच स्वसातत्य होय.त्यालाच ते भविष्य असे म्हणते.तर मग आपल्या मनाची ही स्थिती आहे .हा मागे व पुढे भूत व भविष्यात फिरणारा असा एक लंबक आहे .ही आपली जाणीव युक्तता आहे.ही केवळ मनाच्या वरच्या थरानीच बनलेली नाही तर ती वरच्याप्रमाणे आतील खोलखोल सर्व थरांनी बनलेली आहे .अशी जाणीवयुक्तता निरनिराळ्या पातळ्यांवर काम करणे अशक्य आहे.तिला फक्त दोनच हालचाली माहित आहेत मागे व पुढे मागे व पुढे .
जर तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक पाहारा कराल तर तुम्हाला असे आढळून येईल की सतत होणारी अशी ही हालचाल नाही . विचारांमध्ये लहानशी फट असते . थोडी स्तब्धता असते. कदाचित ही लहानशी फट क्षणाच्या अनंत भागा एवढीही असू शकेल . या लंबकाच्या मागे व पुढे या हालचालीत ती फट ती स्तब्धता असते.ही फट अत्यंत महत्त्वाची आहे .आपले विचार भूत आकारीत असतात व त्याचा भविष्यात आराखडा काढला जातो .तुम्ही भूत मान्य करता त्याच क्षणी तुम्हाला भविष्यही मान्य करावे लागते .वस्तुत: भविष्य व भूत अशा दोन स्थिती नाहीत.भूत व भविष्य ही एकच स्थिती आहे
प्रकट व सुप्त यासहित सामुदायिक व वैयक्तीक भूतासहित भूत व भविष्य ही एकच स्थिती आहे .वैयक्तिक व सामुदायिक भूत वर्तमानाशी संबंध आल्यावर एक विशिष्ट प्रतिक्रिया उत्पन्न करते तीच आपली जाणीवयुक्तता. जाणीवयुक्तता ही नेहमी भूता बद्दलची असते . आपल्या अस्तित्वाची ही सर्व पार्श्वभूमी आहे . ज्या क्षणी तुमच्या जवळ भूत आहे त्या क्षणी अपरिहार्यपणे तुमच्याजवळ भविष्यही आहे .भविष्य म्हणजे केवळ भूताची डागडुजी करून टिकविलेले सातत्य होय.परंतु भूत अजूनही तिथेच असते .तेव्हा आपली समस्या अशी आहे की या प्रक्रियेत दुसरी धारणा दुसरी पार्श्वभूमी दुसरे भूत निर्माण केल्याशिवाय बदल कसा काय घडवून आणावा?
हे सर्व वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर समस्या अशी आहे की आपल्यापैकी बहुतेक जण एक पार्श्वभूमी नाकारतात व दुसरीचा शोध करतात .ही दुसरी पार्श्वभूमी जास्त विस्तीर्ण जास्त महत्त्वपूर्ण जास्त सुखमय असते .तुम्ही एका धर्माचा त्याग करता दुसरा धर्म स्वीकारता .एका श्रद्धेचा त्याग करता व त्या ठिकाणी दुसऱ्या श्रद्धेची स्थापना करता .अशा प्रकारचा बदल म्हणजे जीवनाची समज असे खासच म्हणता येणार नाही .जीवन म्हणजे संबंधमयता.आपली समस्या सर्व धारणेपासून मुक्त कसे व्हावे ही आहे .यावर उत्तर म्हणून तुम्ही धारणेपासून कधीही मुक्त होता येणार नाही असे म्हणता .कोणतेही मानवी मन कधीही धारणेपासून मुक्त होणार नाही असे तुमचे म्हणणे असते .हे बरोबर आहे काय? आपण याची निश्चितपणे चवकशी केली पाहिजे .ही चवकशी करण्यासाठी हा शोध घेण्यासाठी आपण स्वतंत्र पाहिजे .धारणेपासून स्वतंत्र होता येणार नाही असे आग्रहपूर्वक म्हणणे म्हणजे शोधाला चवकशीला दिलेला नकार होय.
आता मी खात्रीलायक असे सांगतो की मनाला सर्व धारणेपासून मुक्त होणे शक्य आहे .अर्थातच माझे अनुभवी सांगणे आहे म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार करता कामा नये .जर तुम्ही श्रेष्ठीचे सांगणे म्हणून याचा स्वीकार कराल तर तुम्हाला कधीही शोध लागणार नाही .कारण या दुसऱ्या श्रद्धेची पहिल्या श्रद्धेच्या ठिकाणी स्थापना होईल.मी हे शक्य आहे असे म्हणतो कारण मला ती वस्तुस्थिती आहे .मी शाब्दिक पातळीवर ती वस्तुस्थिती तुम्हाला दाखवू शकतो . तुम्हाला त्यातील सत्य जर तुमचे तुम्हालाच शोधून काढायचे असेल तर तुम्ही एक प्रयोग केला पाहिजे .तुम्ही विचारप्रक्रियेच्या मागून चपळतेने गेले पाहिजे .संपूर्ण धारणा प्रक्रिया समज,विश्लेषण व निरीक्षण यातून येत नाही.ज्या क्षणी तुमच्या जवळ हा विश्लेषणकार चिकित्सक असतो त्याच क्षणी हा विश्लेषण कार चिकित्सक त्या पार्श्वभूमीचा एक भाग असतो .म्हणूनच त्याच्या विश्लेषणाला काही महत्त्व नसते .ही वस्तुस्थिती आहे. ती तुम्ही समजून घेतली पाहिजे .म्हणूनच तुम्ही विश्लेषण निरीक्षण चिकित्सा इत्यादींच्या भानगडीत पडता कामा नये .हा परीक्षक ज्या वस्तूकडे पाहात असेल त्याचे विश्लेषण करणारा हा परीक्षक त्या वस्तुस्थितीचा त्या धारणायुक्त स्थितीचा त्या पार्श्वभूमीचा एक भाग असतो .चिकित्सा विश्लेषण यातून पळवाट काढणे अशक्य आहे .पार्श्वभूमी उलगडणे तर आवश्यक आहे .जर नव्या आव्हानाला भेटायचे असेल, परमेश्वर सत्य किंवा तुम्ही जे काही म्हणाल ते शोधायचे असेल, तर मन ताजे असणे, मन नवीन असणे, मन भूताने बद्ध नसणे, आवश्यक आहे .भूताचे विश्लेषण, निरनिराळ्या प्रयोगातून निर्णयावर येऊन पोहचणे, काही गोष्टींची होकारात्मक व नकारात्मक खात्री करून घेणे, या सर्वांचा थोडक्यात अर्थ म्हणजे भूताचे नवीन स्वरूपात सातत्य टिकवणे हा होय .जेव्हा तुम्ही या वस्तुस्थितीतील सत्य पाहाल .तेव्हां विश्लेषणकाराचा अंत झालेला तुम्हाला आढळून येईल .पार्श्वभूमीपासून वेगळी अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नसेल.पार्श्वभूमी म्हणून फक्त विचारच अस्तित्वात असेल . विचार म्हणजे प्रकट व सुप्त वैयक्तिक व सामुदायिक स्मरण प्रतिक्रिया होय.मन हा भूत परिणाम आहे .ते भूत अपत्य आहे .हीच सर्व धारणा प्रक्रिया होय .मनाला मुक्त होणे कसे काय शक्य आहे?स्वतंत्र होण्यासाठी मनाने लंबका सारखी मनाची होणारी भूत व भविष्य यातील हालचाल केवळ समजून घेऊन चालणार नाही तर दोन विचारांमध्ये जी लहानशी फट असते तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे.त्याबद्दल जागृत असणे आवश्यक आहे .ही फट स्वयंभू असते.ती कोणच्याही प्रक्रियेतून निर्माण झालेली नसते .ती कोणत्याही इच्छेतून शिस्तीतून किंवा वासनेतून अाणलेली नसते .
जर तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक पहाल तर तुम्हाला असे आढळून येईल की जरी प्रतिक्रिया विचार या सर्व हालचाली अत्यंत जलद असल्या तरीही दोन विचारांमध्ये फट असते .दोन विचारात शांत स्तब्ध काल असतो .त्याचा विचारप्रक्रियेशी काहीही संबंध नसतो .जर तुम्ही निरीक्षण केले तर ही फट कालरहित असते .ती कालातील नसते .या फटीचा शोध व त्याचा संपूर्ण अनुभव तुम्हाला धारणामुक्त करतो .जास्त बरोबर बोलायचे झाले तर तो अनुभव तुम्हाला मुक्त करीत नाही तर तुम्ही आपोआप धारणेपासून मुक्त होता .विचारप्रक्रिया समज हीच खरी प्रार्थना होय .आता आपण केवळ विचार प्रक्रिया व विचार सांगाडा याची चर्चा करत नाही.स्मरण ज्ञान श्रद्धा अनुभव यांची पार्श्वभूमी म्हणजेच विचार प्रक्रिया होय .आपण मन स्वतःला धारणेपासून मुक्त करून घेऊ शकेल की नाही याचा शोध घेत आहोत.जेव्हा मन विचाराला सातत्य पुरवत नसेल,त्याला सातत्य देत नसेल,जेव्हा ते अनिर्मित शांततेत असेल ,म्हणजेच कारण व कार्य यांच्याशिवाय असेल,तेव्हाच आणि फक्त तेव्हांच पार्श्वभूमीपासून स्वातंत्र्य प्राप्त होईल .