प्रश्न --भूत ताबडतोब नष्ट होईल काय? का त्याच्या नाशासाठी काही काल लागतो? 

उत्तर--आपण भूताचा परिणाम आहोत.आपला विचार हा गेल्या दिवसावर व अशा मागील हजारो दिवसांवर उभा आहे .आपण कालाचे अपत्य आहोत . आपल्या प्रतिक्रिया आपला जबाब आपले दृष्टिकोन हे गेले अनेक हजारो क्षण घटना व अनुभव यांचा परिपाक आहेत.अशाप्रकारे आपल्यापैकी बहुतेक जणांना भूत हे वर्तमान आहे .ही सत्य वस्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही . तुमचे जबाब तुमच्या प्रतिक्रिया तुमचे विचार हे सर्व भूतकाळाचा परिणाम आहेत.प्रश्न विचारणाऱ्याला हे भूत ताबडतोब पुसून टाकता येईल की हे भूत पुसून टाकण्यासाठी काही काल, दिवस महिने वर्षे लागतील असे विचारावयाचे आहे .एकातून दुसरा दुसऱ्यातून तिसरा अशाप्रकारे बळकट व दृढ होत गेलेल्या या भूतापासून आपल्याला तात्काळ मुक्त होता येईल काय? असे विचारावयाचे आहे .का यासाठी काही काळ लागेल  हे जाणण्याची इच्छा आहे .प्रश्न समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे .आपल्यापैकी प्रत्येक जण काल अपत्य आहे .सतत बदलणाऱ्या वाढणाऱ्या अशा अनेक प्रकारच्या ठशांची आपली पार्श्वभूमी आहे .एवढी प्रदीर्घ पार्श्वभूमी नष्ट होण्यासाठी काही काळ तर लागणारच ?प्रदीर्घ कालाशिवाय ती कशी नष्ट होईल? काल प्रक्रियेविना ती कशी नष्ट होईल असे वाटणे स्वाभाविक आहे.
            
भूत हे काय आहे? भूत आपण कशाला म्हणतो?इथे भौतिक काल आपणास निश्चितच अभिप्रेत नाहीं .संग्रहित अनुभव, संग्रहित प्रतिक्रिया ,स्मरण ,रुढी,परंपरा, ज्ञान ,अगणित विचार, भावना, आव्हाने व जबाब, यांचा सुप्त मनात खोलवर असलेला साठा म्हणजे भूत हे विसरता कामा नये .या पार्श्वभूमीवर सत्य समजण्यास आपण असमर्थ आहोत, कारण भूत हे काल अपत्य आहे, तर सत्य कालातीत व कालरहित असे आहे.प्रश्नकर्त्याला असे विचारायचे आहे की कालोत्पन्न मनाला ताबडतोब  असण्याचे  थांबवता येणे शक्य आहे का ?का स्वनिरीक्षण स्वपरीक्षण व स्वविश्लेषण अशा लांबलचक मालिकेतून गेल्यानंतरच हळूहळू मन पार्श्वभूमीपासून स्वतंत्र होईल .
            
मन म्हणजेच पार्श्वभूमी  मन हेच काल अपत्य आहे .मन म्हणजेच भूत, मन म्हणजे भविष्य नव्हे, मन हे भविष्याबद्दल जरूर विचार करू शकते .हे मन भूतातून भविष्याकडे जाण्याचा दरवाजा म्हणून वर्तमान वापरते.अशा प्रकारे या मनाची प्रत्येक हालचाल, प्रत्येक क्रिया, त्याची भविष्यकालीन क्रिया वा भूतकालीन क्रिया, ही सर्व कालाच्या जाळ्यांमध्ये पकडलेली असतात. ती कालामध्येच असतात .मनाला असण्याचे थांबणे विचार प्रक्रिया संपुष्टात येणे शक्य आहे काय ? मनाला अनेक थर असतात या सर्वाला आपण जाणीव असे म्हणतो.प्रत्येक थर दुसऱ्या थराशी संलग्न असतो.प्रत्येक थर दुसऱ्या थरांवर अवलंबून असतो .या सर्व थरांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया होत असतात . आपली सर्व जाणीव म्हणजे केवळ अनुभव घेणे नव्हे. 
नाव देणे, वर्गीकरण करणे, संग्रह करणे, ही सर्व प्रक्रिया म्हणजे जाणीव नव्हे काय?
                
जेव्हा आपण जाणिवे बद्दल बोलतो त्या वेळेला अनुभव घेणे,नाव देणे, वर्गीकरण करणे, स्मरण म्हणून संग्रह करणे,  हे सर्व आपल्याला अभिप्रेत असते .निरनिराळ्या पातळ्यांवरील हे सर्व म्हणजेच जाणीव .कालोद्भव अश्या मनाला पार्श्वभूमीपासून स्वतंत्र होण्यासाठी पायरी पायरीने, विश्लेषण प्रक्रिया करीत, मुक्त होत जाणे शक्य व आवश्यकआहे की पार्श्वभूमीपासून कालापासून ताबडतोब मुक्त होणे व सत्याकडे सरळ पाहणे शक्य आहे?
           
बर्‍याच विश्लेषण कारांचे असे म्हणणे आहे की तुम्ही प्रत्येक जबाब प्रत्येक गुंतागुंत प्रत्येक अडथळा प्रत्येक अडवणूक ही तपासणे जरूर आहे .याचाच अर्थ काल प्रक्रियेपासून स्वतंत्र होण्यासाठी काल प्रक्रिया आवश्यक आहे. याचा अर्थ विश्लेषण काराला तो ज्याचे विश्लेषण करीत आहे त्याचा अर्थ बरोबर समजला पाहिजे .चुकीचा अर्थ त्याने लावता कामा नये. चुकीचे भाषांतर त्याने करता कामा नये.जर त्यांने विश्लेषण करताना पार्श्वभूमी तपासताना चुकीचा अर्थ लावला, चुकीचा निर्णय घेतला ,चुकीचे भाषांतर केले ,तर एक नवीनच पार्श्वभूमी तयार होईल  .विश्लेषण करताना विश्लेषण करण्यासाठी विश्लेषणकार पूर्णपणे समर्थ पाहिजे .त्याने एकही पायरी चुकता कामा नये.चुकीची पायरी म्हणजे चुकीची वाटचाल चुकीचे निर्णय व एक नवीनच पार्श्वभूमी तयार होणे होय.या सर्वातून एक अशी नवीन समस्या निर्माण होते की विश्लेषण करणारा ज्याचे विश्लेषण करीत आहे त्यापासून स्वतंत्र आहे काय ?विश्लेषणकार व ज्याचे विश्लेषण केले जात आहे ही सर्व घटना एकच नाही काय ?  
           
अनुभवणारा व अनुभव ही एक संलग्न घटना आहे .या दोन वेगवेगळ्या  प्रक्रिया नाहीत.विश्लेषण करताना येणार्‍या अडचणी आपण पाहूया.आपल्या जाणिवेच्या सर्व गाभ्याचे विश्लेषण करणे व अशा प्रकारे त्यापासून मुक्त होणे हे अशक्य आहे . शेवटी हा विश्लेषण कार कोण आहे जरी त्याला आपण विश्लेषण करीत असलेल्या वस्तूंपासून वेगळे  आहोत असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही.विश्लेषण करावयाच्या वस्तूंपासून तो स्वतःला वेगळा पाहू शकेल, परंतु प्रत्यक्षात तो त्या पार्श्वभूमीचाच एक भाग आहे.माझ्याजवळ एक विचार आहे. माझ्याजवळ एक भावना आहे.मी क्रोधायमान आहे.जो मनुष्य क्रोधाचे विश्लेषण करीत असतो तो त्या क्रोधाचाच एक भाग असतो.त्यामुळे विश्लेषणकार व विश्लेषण करावयाची वस्तू ही एकच संलग्न घटना आहे .या दोन निरनिराळया  प्रक्रिया नाहीत .अशा प्रकारे स्वविश्लेषण, स्वगुंडाळी उघडणे, स्वतःचे प्रत्येक पान पाहणे, प्रत्येक प्रतिक्रिया पाहणे ,प्रत्येक जबाब समजून घेणे, हे अत्यंत कठीण व वेळकाढू आहे आणि ते अशास्त्रीयही आहे .  पार्श्वभूमीपासून स्वतंत्र होण्याचा तो मार्ग नव्हे.अत्यंत साधा अत्यंत सरळ अत्यंत सोपा अत्यंत प्रत्यक्ष असा एखादा मार्ग असलाच पाहिजे .तो शोधून काढण्याचा तुम्ही व मी प्रयत्न करणार आहोत .
          
अशा परिस्थितीत तुमच्या जवळ आता उरले काय ?तुम्हाला आतापर्यंत फक्त विश्लेषणाची सवय आहे .ती तशी नाही काय ?द्रष्टा व दृश्य ही संलग्न किंबहुना एकच घटना असताना,द्रष्टा दर्शन घेत असतो .द्रष्टा दृश्याच्या विश्लेषणाचा प्रयत्न करीत असतो ही प्रक्रिया पार्श्वभूमीपासून दृष्ट्याला स्वतंत्र करणार नाही.जर हे असे असेल व ते तसे आहे तर ते तसे समजताच तुम्ही ती प्रक्रिया ताबडतोब टाकून देता .जर हा योग्य मार्ग नाही हे तुमच्या लक्षात येईल खरोखरच अंतर्यामी ते तुम्हाला पटेल  तर मग अशा परिस्थितीत तुम्ही विश्लेषण करण्याचे ताबडतोब सोडून द्याल.आता तुमच्या जवळ काय उरते?पाहा लक्ष द्या. नीट लक्ष द्या.त्याचा पाठलाग करा. जागता पहारा करा. मग तुम्हाला असे आढळून येईल की तुम्ही किती जलद तात्काळ सहजतेने द्रुतगतीने ताबडतोब चपळतेने पार्श्वभूमीपासून मुक्त झाले आहात .जर हा मार्ग नसेल तर मग तुम्हाला दुसरा कुठचा मार्ग उरला आहे?जे मन विश्लेषण करणे चौकशी करणे डोकावणे विभाजन करणे निर्णय घेणे वगैरे गोष्टींमध्ये गुंतलेले आहे त्या मनाची स्थिती काय असते? आणि सतत पहाऱ्यामुळे, जागृततेमुळे या सर्व गोष्टींचे आकलन झाल्यामुळे मन एकदम मुक्त झाले तर मग मनाची स्थिती काय असते ? पाहा आणि तुलना करा.या दुसर्‍या परिस्थितीमध्ये                 तुम्ही म्हणाल मन कोरे असते          ठीक आहे .चला त्या कोर्‍या मनात खोल चला .दुसर्‍या  शब्दांमध्ये जेव्हा तुम्ही असत्य हे असत्य म्हणून टाकून दिलेले आहे  तेव्हा तुमच्या मनाचे काय झाले?शेवटी तुम्ही काय टाकले आहे?तुम्ही पार्श्वभूमीतून निर्माण झालेली चुकीची प्रतिक्रिया टाकून दिलेली आहे .एका ठोश्यात तुम्ही सर्व त्याग केला आहे .तुमचे मन अशाप्रकारे असत्य हे असत्य  असे जाणून त्याचा सर्व गुंतवळ्यासकट विश्लेषण प्रक्रियेसकट एका फटक्यात त्याग करून गेल्या दिवसांपासून स्वतंत्र होते व म्हणून पार्श्वभूमीचा क्षणार्धात संपूर्ण त्याग करून कालप्रक्रियेविना प्रत्यक्ष पाहण्याला समर्थ होते.
           
सर्व प्रश्न जर आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडावयाचा असेल तर विचार हा कालोद्भव नाही काय ?सभोवतालची परिस्थिती सामाजिक धार्मिक संस्कार यांचा ,विचार हा परिणाम नाही काय ?हे सर्व कालाचा भाग नाही काय?आता विचार कालापासून मुक्त होऊ शकेल काय?काल अपत्य असा विचार स्तब्ध होऊन कालप्रक्रियेपासून स्वतंत्र होईल काय?विचार ताब्यात ठेवता येईल त्याला वाटेल तो आकार देता येईल.परंतु विचारावरील ताबा हा कालाच्याच क्षेत्रातील नाही काय ?आपली अडचण अशी आहे की काल अपत्य असे मन, गेल्या अनेक हजारो दिवसांवर उभे असले मन,निमिषार्धात या अत्यंत गुंतागुंतीच्या अशा पार्श्वभूमी पासून कसे स्वतंत्र होईल ?तुम्ही त्याच्यापासून स्वतंत्र व्हाल,पण उद्या नव्हे आत्ता या क्षणी वर्तमानात, जेव्हा तुम्ही असत्य हे असत्य म्हणून ओळखाल,(असत्य म्हणजे ही चुकीची विश्लेषण प्रक्रिया आणि आपल्याजवळ तेवढेच भांडार आहे ),तेव्हा तुम्ही स्वतंत्र व्हाल.ही चुकीची विश्लेषण प्रक्रिया जेव्हा तुम्हाला चुकीची आहे असे  कोणत्याही दबावाने नव्हे तर असत्य हे असत्य म्हणून तुम्हाला उमजेल, त्यावेळी तुमचे मन भूतापासून स्वतंत्र झालेले असेल .याचा अर्थ ते भूत विसरले असेल असा नव्हे तर त्याचे भूताशी दळणवळण थांबलेले असेल .अश्या प्रकारे ते स्वतःला भूतापासून तात्काळ स्वतंत्र करून घेऊ शकेल.भूतापासून विलगीकरण, गेल्या दिवसापासून स्वतंत्रता, अस्तित्वात येईल .भौतिक दिवसांपासून स्वातंत्र्य नव्हे तर मानसिक दिवसांपासून स्वातंत्र्य अस्तित्वात येईल .हे शक्य आहे सत्य समजण्याचा हा एकच मार्ग आहे .
           
जर सोप्या शब्दात सांगावयाचे झाले तर जेव्हा तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट समजून घ्यायची असते तेव्हा  तुमचे मन कोणत्या स्थितीत असते ?जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा कोणाला तरी समजून घ्यायचे असते तेव्हा तुमच्या मनाची स्थिती कशी असते .तुम्ही विश्लेषण करीत नसता, तुम्ही टीका करीत नसता ,तुम्ही समर्थन करीत नसता, तुम्ही योग्य अयोग्य ठरवत नसता, तुम्ही फक्त ऐकत असता' हे असेच नसते काय ?जिथे विचार प्रक्रिया नाही परंतु विलक्षण उत्कट तत्पर मन मात्र आहे अशी तुमच्या मनाची स्थिती असते .तुम्ही फक्त तत्पर गतिशून्य उत्सुक आणि तरीही पराकाष्ठेचे संपूर्ण जागृत असता.जेव्हां मन चळवळ करीत असते, प्रश्न विचारीत असते, काळजी करीत असते, विभाजन करीत असते, विश्लेषण करीत असते, चिकित्सा करीत असते, तेव्हा समज नसते .जेव्हा समजून घेण्याची तीव्रता असते तेव्हा मन ताबडतोब स्थिर होते .अर्थात यासाठी तुम्ही प्रयोग केला पाहिजे. माझ्या शब्दांवर विसंबून राहून चालणार नाही .प्रयोगांती तुम्हाला असे आढळून येईल की जो जो जास्त जास्त चिरफाड, विश्लेषण, चिकित्सा, करावी तो तो समज कमी होत जाते.तुम्हाला काही घटना, काही प्रसंग, काही घडामोडी, काही अनुभव, हे विश्लेषणाने जरुर समजू शकतील .परंतु विश्लेषणाच्या मार्गाने तुम्हाला तुमचे मन जाणिवेच्या संपूर्ण द्रव्यापासून रिकामे करता येणार नाही .विश्लेषणाने उदाहरण सोडविण्याची चुकीची पद्धत जेव्हा तुमच्या लक्षात येईल ,तेव्हाच वर सांगितलेली नुसते ऐकण्याची मोकळ्या मनाने समजून घेण्याची पद्धत  शक्य होईल. जेव्हा तुम्ही असत्य हे असत्य म्हणून पाहाल तेव्हा तुम्हाला सत्य म्हणजे  काय ते समजू लागेल . हे सत्यच तुम्हाला पार्श्वभूमीपासून स्वतंत्र करणार आहे .

++++++++++++++++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel