प्रश्न --साधेपणा म्हणजे काय? आवश्यक अत्यंत स्पष्टपणे पाहणे व बाकी सर्वांचा त्याग करणे हा साधेपणातील गर्भितार्थ नव्हे काय ?
उत्तर--आपण साधेपणा नव्हे म्हणजे काय ते पाहू या .कृपा करून हा नकार आहे किंवा "आम्हाला काही तरी भरीव सांगा"असे विचारू नका, असे मी म्हणत आहे, असे समजणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे .ती विचारशून्य प्रतिक्रिया आहे. जे लोक तुम्हाला काही तरी भरीव देतो असे सांगतात ते तुमची लूट करीत असतात. तुम्हाला जे काही हवे असते ते त्यांच्या जवळ आहे आणि त्यातून ते लूट करतात. आपल्याला त्यातील काहीही करावयाचे नाही.आपण फक्त साधेपणातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत.तुम्ही कल्पनांचा त्याग केला पाहिजे. कल्पना दूर सारल्या पाहिजेत .नाविन्याने निरीक्षण केले पाहिजे.ज्या मनुष्याजवळ बरेच काही आहे तो कुठच्याही आतील किंवा बाहेरील क्रांतीला घाबरत असतो .
साधेपणा नाही ,म्हणजे काय ते शोधण्याचा अापण प्रयत्न करू या .गुंतागुंतीनी भरलेले असे मन साधे नाही. ते साधे आहे काय?हुषार मन साधे नाही. ते साधे आहे काय ?ज्या मनाला साध्य दृष्टीसमोर आहे ,जे भीती किंवा बक्षीस यामुळे ध्येयपूर्तीसाठी काम करीत आहे, ते साधे नाही.जे मन ज्ञानाने भारावलेले,जड झालेले आहे ते साधे नाही.ते साधे आहे काय ?जे मन श्रद्धांनी भारावलेले आहे आहे ते साधे नाही. ते साधे आहे काय ?ज्या मनाने काहीतरी भव्य वस्तूंमध्ये स्वतःला पाहिलेले आहे,त्यामुळे ते भारावलेले आहे ,भावनानी ओथंबलेले आहे,त्याच्याशी समरस झालेले आहे, ती समरसता टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे,असे मन साधे नाही . ते साधे आहे काय ? एक अथवा दोन जाडेभरडे सुती कपडे असणे म्हणजे साधेपणा असे आपण समजतो. आपल्याला साधेपणाचा बाह्य तमाशा हवा असतो . अशा तमाशाने आपण सहजच फसले जातो .यामुळेच श्रीमंत मनुष्य ज्या व्यक्तीने सर्वाचा त्याग केला आहे अशा इसमाची पूजा करतो.
साधेपणा म्हणजे काय ?आवश्यकतेचा अवलंब करणे, अनावश्यकतेचा त्याग करणे, म्हणजेच निवड प्रक्रिया असणे हा साधेपणा होउं शकतो काय ? म्हणजेच ही निवड नव्हे काय ?आवश्यकतेची निवड व अनावश्यकतेचा त्याग ही निवड प्रक्रिया काय आहे ?ही निवड करणारी वस्तू कोण आहे ?हे निवड करणारे मनच नव्हे काय ?तुम्ही त्याला काहीही म्हटले तरी त्याला अर्थ नाही .तुम्ही असे म्हणता कि"मी हे निवडतो कारण हे आवश्यक आहे " परंतु आवश्यक काय आहे हे तुम्हाला कसे काय माहित आहे ?एक तुमच्याजवळ इतर लोक काय म्हणतात त्याचा आराखडा आहे .किंवा तुमचा अनुभव तुम्हाला असे सांगतो की हे आवश्यक आहे .तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवू शकता काय ?जेव्हा तुम्ही निवड करता तेव्हा ती निवड तुमच्या वासनेवर अवलंबून नसते काय?ज्यामुळे तुमचे समाधान होते त्याला तुम्ही आवश्यक असे म्हणता .अशाप्रकारे तुम्ही पुन्हा पूर्वीच्याच प्रक्रियेत येऊन पोहोचता .तुम्ही पुनः होते तिथेच अाला नाहीत काय ?गोंधळलेले मन कधी तरी निवड करु शकेल काय?आणि जर त्याने निवड केली तर ती निवडही गोंधळलेली असेल .
तेव्हा आवश्यक व अनावश्यक यातील निवड हा विरोध आहे .हा साधेपणा नव्हे .गोंधळात विरोधात असलेले मन कधीही साधे असू शकत नाही . जेव्हा तुम्ही खरोखरच त्याग करता, जेव्हा तुम्ही निरीक्षण करता, या सर्व असत्य गोष्टी पाहता, मनाच्या या सर्व क्लुप्त्या लक्षात घेता,जेव्हां त्याच्याकडे फक्त पाहता व सदैव अखंड जागृत असता,तेव्हा तुमचे तुम्हालाच साधेपणा म्हणजे काय ते कळेल.जे मन श्रद्धांनी बद्ध आहे ते कधीही साधे असणार नाही . जे मन ज्ञानाने पांगळे झालेले आहे ते कधीही साधे असू शकणार नाही.जे मन परमेश्वर स्त्रिया नाटक सिनेमा नृत्य गायन इत्यादींकडे आकृष्ट झालेले आहे ते साधे असणार नाही .जे मन ऑफिसचे कार्यक्रम असंख्य धार्मिक व्रते प्रार्थना इत्यादींमध्ये गुंतलेले आहे ते साधे असणार नाही.साधेपणा म्हणजे कल्पनारहित कर्म होय .ही फारच क्वचित आढळणारी गोष्ट आहे .कल्पनारहित कर्म म्हणजेच सृजनशीलता . जोपर्यंत सृजन नाही तोपर्यंत आपण चावटपणा बाष्कळपणा क्लेश दुःख नाश यांचे केंद्र असतो .साधेपणा ही अशी गोष्ट नाही की जिचा तुम्ही पाठलाग करू शकाल .जिचा तुम्ही शोध घेऊ शकाल व अनुभव घेऊ शकाल .ज्याप्रमाणे योग्य वेळी फूल उमलते, त्याच प्रमाणे जेव्हा एखादा संपूर्ण अस्तित्व प्रक्रिया, संबंधमय प्रक्रिया, समजतो तेव्हा साधेपणा आपोआप येतो.अापण साधेपणा म्हणजे काय याबद्दल कधीही विचार केलेला नसल्यामुळे,निरीक्षण केलेले नसल्यामुळे, त्याबद्दल जागृत नसल्यामुळे, आपण बाह्य तमाशाला अल्प संग्रहाला महत्त्व देतो .हा साधेपणा नव्हे.साधेपणाचा शोध घेता येणार नाही .साधेपणा अंगी बाणवता येणार नाही.आवश्यक व अनावश्यक यातील निवडीमध्ये साधेपणा नाही.जेव्हा मी हरपतो तेव्हा साधेपणा अस्तित्वात येतो .जेव्हा मन कुठल्याही प्रकारचे तर्क ,कल्पनाकरण, श्रद्धा ,निर्णय ,रचित नसते तेव्हा तो अस्तित्वात येतो .असे स्वतंत्र मनच सत्य शोधू शकेल .असेच मन अगणित अनाम अनंत असे ते ग्रहण करू शकेल.तोच साधेपणा .
++++++++++++++++++