प्रश्न --मी तुमची सर्व भाषणे लक्ष देऊन ऐकली आहेत .तुमची पुस्तके लक्ष देऊन वाचली आहेत .मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे विचारतो की तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर सर्व विचार नष्ट व्हायचे असतील ,सर्व ज्ञान संपुष्टात यायचे असेल, सर्व स्मरण नष्ट व्हायचे असेल, तर माझ्या जीवनाचा हेतू काय ?ती स्थिती मग कशीही असो परंतु तुम्ही त्या स्थितीचा या जगाशी संबंध कसा काय जोडता ?आमच्या क्लेशदायक व दु:खी अस्तित्वाशी त्याअस्तित्वाचा संबंध कसा काय आहे ?

उत्तर--सर्व ज्ञान जेव्हा नसेल, जेव्हा ओळखणारा नसेल, तेव्हा असलेली स्थिती आपल्याला जाणून घ्यावयाची आहे .त्याचप्रमाणे त्या स्थितीची आपली दैनंदिन क्रिया व धडपड यांच्याशी असलेली संबंधमयताही आपल्याला जाणून घ्यायची आहे.हल्लींचे आपले जग काय आहे ते आपल्याला पुरेपूर माहित आहे.दुःख क्लेश सतत भीती जुनाटपणा (सतत भीती व जुनाटपणा याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही परंतु दुःख व क्लेशच केवळ आहेत असे नाही .काही सुख व आनंदाचे प्रसंगही आहेत परंतु प्रश्नकर्त्याचा मूड लक्षात घेऊन उत्तर दिलेले आहे. तुकारामबुवांनी म्हटले आहे की सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे ) याशिवाय यात काहीच नाही .हे सर्व आपल्याला माहित आहेच . या स्थितीची त्या स्थितीशी(कालातीत सत्य प्रेम जे काही आपण म्हणू ते ) असलेली संबंध रूपता आपल्याला जाणून घ्यावयाची आहे.जर सर्व ज्ञान सर्व स्मरण आपण बाजूला सारले तर मग जीवनाचा हेतू काय तेही आपल्याला जाणून घ्यायचे आहे .

आपल्याला जे काही माहित आहे त्याप्रमाणे जीवित हेतू, अस्तित्व हेतू, काय आहे ?एखाद्या काल्पनिक प्रणालीप्रमाणे नव्हे,तर प्रत्यक्षात आपल्या दैनंदिन अस्तित्वाचा  जीविताचा हेतू काय आहे .केवळ जिवंत राहणे व न मरणे हा आपल्या अस्तित्वाचा हेतू नाही काय ?दुःखे क्लेश युद्धे गोंधळ व विनाश यांच्या सहित  केवळ जगणे ,तग धरून राहणे ,हाच आपल्या अस्तित्वाचा हेतू नाही काय ? आपण निरनिराळ्या प्रणालींचा शोध जरूर लावू शकू,उदाहरणार्थ अापण असे म्हणू शकू की हे असे असले पाहिजे किंवा हे असे नसले पाहिजे. या केवळ प्रणाली आहेत ही वस्तुस्थिती नव्हे जे काही आहे जे काही  आपल्याला माहित आहे ते म्हणजे दुःख क्लेश गोंधळ ज्याला शेवट नाही असा झगडा .जर आपण जागृत असू तर हा झगडा कसा निर्माण झाला तेही आपल्याला माहित आहे .क्षणोक्षणी  प्रतिदिनी एकमेकांचा नाश करणे,एक मेकांना लुटणे, एकमेकांची पिळवणूक करणे, हा जीवनाचा हेतू आहे (सहकार्य सामंजस्य सहानुभूती सर्वसमावेशकता लोकशाही  इत्यादींच्या गप्पा मारणे )हेही आपल्याला माहीत आहे .ही लूट व पिळवणूक व्यक्ती म्हणून केलेली असो किंवा समूह म्हणून केलेली असो,आपल्या एकाकीपणात आपल्या दुःखात आपण इतरांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो .स्वतःपासून दूर पळण्यासाठी अापण  निरनिराळ्या  प्रकारची करमणूक, परमेश्वर,ज्ञान,श्रद्धा,  समरसता, यांचा उपयोग करतो .जे जीवन आपण जगत आहोत त्यातील सुप्त किंवा प्रगट हेतू हा वरील प्रमाणे आहे .जो हेतू गोंधळातून निर्माण झालेला नाही,जो हेतू अधाशीपणातून निर्माण झालेला नाही, असा एखादा खोल हेतू आपल्याजवळ आहे काय ?प्रयत्नरहित स्थितीचा आपल्या दैनंदिन अस्तित्वाशी काही संबंध आहे काय?

त्या स्थितीचा आपल्या जीवनाशी कुठल्याही प्रकारचा संबंध अर्थातच नाही.  त्या स्थितीचा संबंध कसा काय असू शकेल ?जर माझे मन गोंधळलेले एकाकी व विव्हळत असलेले असेल, तर अशा मनाचा ज्या स्थितीचा(सत्य,कालातीत) या मनाशी संबंध नाही, त्याच्याशी कसा काय संबंध असू शकेल ?परंतु ही गोष्ट आपल्याला मान्य करावी असे वाटत नाही .कारण आमच्या आशा आमचे गोंधळ आम्हाला काहीतरी भव्य दिव्य श्रेष्ठ वस्तूंवर विश्वास ठेवण्याला भाग पाडतात. मग आपण म्हणतो त्याचा संबंध आपल्या या स्थितीशी आहे .शोकमग्नतेत आपण सत्य शोधतो व आशा करतो की या शोधांमधून आपली शोक मग्नता ही हलाखीची स्थिती विपन्नावस्था नष्ट होईल .

तेव्हा आपल्या लक्षात आले असेल की गोंधळलेले, दुःखात असलेले, स्वतःच्या पोकळपणाबद्दल व एकाकीपणाबद्दल जागृत नसलेले मन,स्वतःच्या पलीकडे सत्य शोधू शकणार नाही . जेव्हा गोंधळ व दुःख यांची कारणे पूर्णपणे समजून घेतली आहेत, अशा प्रकारे समजुतीतून ती नष्ट झाली आहेत, तेव्हाच मनातीत असे ते प्रगट होईल . मी जे काही म्हणत आहे, मी ज्याच्या बद्दल काही बोलत आहे, ते म्हणजे स्वतःला समजून कसे घ्यावे.कारण स्वज्ञानाविना सत्य नाही .स्वज्ञानविना सत्य म्हणजे केवळ आभास .जर आपण स्वतःच्या मनाची संपूर्ण प्रक्रिया नीट समजून घेऊ,जर क्षणाक्षणाला क्षणाक्षणाची संपूर्ण प्रक्रिया आपल्याला कळेल, तर या गोंधळाचे निराकरण होता होता ते सत्य प्रगट होईल .त्याचा अनुभव घेतल्यावर नंतर त्या स्थितीचा या स्थितीशी जरूर संबंध असेल .परंतु या स्थितीचा त्या स्थितीशी संबंध असणार नाही. पडद्याच्या या बाजूला असताना आपल्याला प्रकाशाचा स्वातंत्र्याचा अनुभव कसा येईल ?परंतु एकदा तुम्हाला सत्याचा अनुभव आला की नंतर मात्र तुम्ही त्याचा या जगाशी, ज्या जगात आपण जगतो त्याच्याशी,संबंध निश्चितपणे जोडू शकाल .

आपल्याला जर प्रेम म्हणजे काय हे मुळीच माहीत नाही. परंतू दुःख क्लेश गोंधळ झगडे लपंडाव आपल्याला माहित आहेत,तर आपल्याला यापैकी नव्हे अशा प्रेमाचा अनुभव कसा येणार?परंतु एकदा आपल्याला प्रेमाचा अनुभव आला म्हणजे त्याचा या अस्तित्वाशी संबंध जोडण्याचा प्रयत्नही आपल्याला करावा लागणार नाही.तो संबंध काय आहे ते आपल्याला आपोआपच कळून येईल.प्रेम, शुद्ध बुद्धी ,आपोआपच योग्य तो संबंध जोडून देईल .परंतु त्या स्थितीचा अनुभव येण्यासाठी सर्व ज्ञान,सर्व संग्रहित स्मरण, सर्व स्वसमरस क्रिया,

थांबल्या पाहिजेत.अशा वेळी मन स्वरचित संवेदना अनुभवण्यासाठी असमर्थ असेल .त्याच्या (सत्याच्या)अनुभवातून योग्य खरी क्रिया जगात घडून येईल .

मनाच्या स्वकेंद्रीत क्रियेच्या पलीकडे जाणे हाच जीवनाचा हेतू आहे .एकदा त्या स्थितीचा अनुभव आला एकदा त्या न मोजता येण्यासारख्या स्थितीचा अनुभव आला की त्या अनुभवातूनच आंतरिक क्रांति घडून येईल.नंतर फक्त प्रेम असेल कुठलीही सामाजिक समस्या असणार नाही .जेव्हा प्रेम असते तेव्हा कुठलीच समस्या नसते .आम्हाला प्रेम म्हणजे काय ते माहित नाही आणि म्हणूनच असंख्य नाना प्रकारच्या सामाजिक समस्या आहेत .मग त्या समस्या सोडविण्यासाठी नाना प्रकारच्या असंख्य प्रणाली आहेत .मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की या कुठल्याही प्रकारच्या वैयक्तिक व सामाजिक समस्या डाव्या उजव्या किंवा मधल्या कोणत्याही गटाकडून सोडवल्यास जाणार नाहीत .त्या समस्या म्हणजेच आपली दुःखे क्लेश गोंधळ झगडे भांडणे विरोध व स्वनाश होय.मी तुम्हाला खात्री देतो की या सर्व समस्या जेव्हा स्वरचित नाही अशा त्या स्थितीचा अनुभव घेऊं तेव्हाच सुटतील .

++++++++++++++++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel