👍👌👌  उंदीर  दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात.
पण जर तो  जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही....
   
जर साप दगडाचा असेल तर सर्व  त्याची पूजा करतात.
पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात....

जर आई वडील फोटो त असतील तर प्रत्येकजण पूजा करतो.
पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.!

फक्त हेच मला समजत नाही
जीवनापासून इतका द्वेष आणि
दगडांबद्दल इतका प्रेम का आहे?

वरील पोस्ट वाचून सुचलेले काही विचार ही किंवा अशा प्रकारच्या पोस्ट बऱ्याच वेळा  येतात .पोस्ट वाचायला चांगली वाटते . काही वेळा बऱ्यापैकी संदेशही देऊन जाते . परंतु जर आपले पायापाशी वेळ येऊन ठेपली तर आपण काय करू असा प्रश्न मला नेहमी पडतो .स्वसंरक्षण  ही कोणत्याही जिवाची मूलभूत प्रवृत्ती आहे.स्वार्थ ही दुसरी प्रवृत्ती आहे .जर घरामध्ये उंदरांनी आपले जिणे असह्य़ करून टाकले तर आपण काय करू ?उंदीर मारण्यासाठी हर एक उपाय करणार नाही काय  ?दगडाचा उंदीर आपल्याला काही त्रास देत नाही . आपण उंदराला गणपतीचे वाहन समजतो .म्हणून त्याची पूजा करतो .जो आपल्या अस्तित्वाच्या  आड येतो जो आपल्या सुखाच्या आड येतो तो आपल्याला नकोसाच वाटणार !उंदीर बिळे करतात त्यामुळे जमीन भुसभुशीत  होते व पाणी मुरते.उंदीर आपला मित्र आहे .जेव्हा तो त्रासदायक ठरतो तेव्हा त्याला मारणे स्वाभाविक आहे .


जी गोष्ट उंदरांची तीच सापाची सर्पमित्र फार थोडेच असतात .फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतके .सापामुळे आपल्या जिवाला धोका असेल (वाटला)तरच आपण साप मारतो.जनमेजयाप्रमाणे काही सर्पयज्ञ करीत नाही .कुणीच करीत नाही .साप उंदराला  खातात .उंदीर शेताचे नुकसान करतात.त्यामुळे सर्प आपला मित्र आहे त्यापासून आपल्याला धोका निर्माण झाला तर आपण त्याला स्वाभाविकपणे मारणारच. 
आई वडिलांची गोष्ट थोडी वेगळी आहे.आई वडील व मुले आणि सुना यांच्या परस्परांबद्दल काही अपेक्षा असतात  .सर्व अपेक्षा कुठेच पूर्ण होऊ शकत नाहीत पती पत्नीमध्ये तरी सर्व अपेक्षा पूर्ण होतात का ?शेवटी तडजोड ही करावीच लागते जीवनात प्रत्येक ठिकाणी तडजोडीशिवाय इलाज नसतो .अपेक्षापूर्तीच्या कुठच्या श्रेणीमध्ये आपण बसतो हे ज्याचे त्याने ठरवावयाचे आहे .ज्या अपेक्षा पूर्ण होतात त्या लक्षात ठेवायचा की ज्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्या लक्षात ठेवायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .इथेच बरेच मार खातात आणि त्यामुळे परस्परांबद्दल मनात कटुता  निर्माण होते.इथेही तडजोड केली पाहिजे हे तरुण रक्ताच्या व दमलेल्या रक्ताच्या लक्षात येत नाही .


आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात भरडले जाणार आहेत हे माणसाच्या लक्षात येत नाही .त्यामुळे जिवंत असताना दुर्लक्ष व मृत्यूनंतर हार अशी परिस्थिती निर्माण होते  .हार आपण केलेल्या पापाचे परिमार्जन स्वरूप असतात.किंवा काही वेळा तो लोकाना दिखावा असतो. अर्थात लोक काय जाणावयाचे ते जाणून घेतात .जीवनाबद्दल ओढ आहे प्रेम आहे द्वेष  नाही  म्हणूनच उंदीर  व साप मारले जातात .
काही वाक्ये काही पोस्ट या एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावयाच्या असतात .टाळीची वाक्ये ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे त्या असतात.फारश्या गंभीरपणे घ्यावयाच्या नसतात  असे बरेच जण म्हणतील मी ती पोस्ट फारच गंभीरपणे घेतली असे काही जणांना वाटेल . 


अशा प्रकारच्या पोस्ट बऱ्याच वेळेला येतात त्यामुळे त्यावर आपले काही विचार मांडावे असे वाटले .एवढेच .इतर पोस्ट ज्याप्रमाणे गंभीरपणे घेतल्या जात नाहीत केवळ टाइमपास म्हणून वाचल्या जातात त्याप्रमाणेच ही वाचली जावी अशी विनंती हे विज्ञप्ती .


२४/७/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel