प्रार्थना -----आपण प्रार्थना कुणाची करतो यापेक्षा का करतो हे मला जास्त महत्त्वाचे वाटते.
जो तो आपापल्या श्रद्धे प्रमाणे प्रार्थना करील .ख्रिस्त अल्ला गुरू गोविंद सिंग बुद्ध राम विष्णू शंकर यापैकी किंवा आणखी कुणाचीही प्रार्थना असेल ते महत्त्वाचे नाही. परंतु ती आपण का करतो याला माझ्या दृष्टीने महत्त्व आहे .आपण प्रार्थना करतो ती आपल्या समाधानासाठी करतो म्हणजेच आपण असमाधानी असतो आणि म्हणून आपण प्रार्थना करतो.हे पटण्यात अडचण असू नये . .हे असमाधान कोणत्याही बाबतीतील असेल . भौतिक गोष्टींची कमतरता किंवा ताणतणाव अशांतता क्लेश दुःख इ.कारणामुळे मानसिक असमाधान असेल.कदाचित शब्द कठोर वाटेल परंतु आपण प्रार्थना करतो म्हणजे भीक मागत नाही काय? याचना करीत नाही काय ?एखादा स्वाभाविक पणे म्हणेल की परमेश्वराजवळ त्या उच्च शक्ती जवळ याचना करण्यात भीक मागण्यात काय चूक आहे.?प्रार्थना करण्यात नामोच्चरण करण्यात अंगभूत समाधान नाही काय? त्या अंगभूत समाधानासाठी प्रत्यक्षात किती जण प्रार्थना करीत असतात ?मैदानी किंवा बैठय़ा खेळांमध्ये केवळ समाधानासाठी आनंदासाठी आम्ही खेळतो दुसरे काहीही कारण त्यामागे नाही असे ज्याप्रमाणे काही लोक म्हणतील त्याप्रमाणे आम्ही प्रार्थना केवळ अंगभूत समाधानासाठी शांतीसाठी व आनंदासाठी करतो असे काही जण म्हणू शकतील .त्याशिवाय दुसरे काहीही उद्दिष्ट मनामध्ये नाही असे ठामपणे किती जण म्हणू शकतील ?इतर कोणत्याही उद्दिष्टा शिवाय (धर्म प्रसार, धर्मबांधव एकीकरण ,धर्म दृढीकरण,मनातील इतर वांच्छित गोष्टी साध्य होणे, काही राजकीय हेतू इत्यादी )प्रार्थनेसाठी प्रार्थना असे किती जण म्हणू शकतील? ती परमोच्च शक्ती तुमचे दुःख दूर करण्याला खरोखरच येईल असे तुम्हाला वाटते का? जर अशा प्रार्थनेने दुःख दूर होते तर आज सर्वच सुखी दिसले नसते काय ? तुम्ही परमेश्वर म्हणून जी प्रतिमा निर्माण केली ती तुम्हाला कदाचित भेटेलही परंतु ते अंतिम सत्य असेल का ? तुमच्या मनातील प्रतिमा तुम्हाला भेटली तरी ती पुन्हा पुन्हा भेटावी असे स्वाभाविकपणे तुम्हाला वाटत राहील.ती भेटली नाही तर तुम्हाला असमाधान वाटेल, सतत भैटीची तृष्णा मनात निर्माण होईल. म्हणजेच प्रतिमेच्या भेटीमुळे आपल्याला चिरंतन समाधान निर्माण होईल का?क्लेश दुःख अशांतता असमाधान का आहे याचा आपण कधी विचार केला आहे काय?शारीरिक पातळीवरील दुःखाचा परिहार भौतिक मार्गाने केला जाईल .उपलब्ध विज्ञान व आर्थिक परिस्थिती यावर ते अवलंबून राहील .परंतु आपल्या मनात जे अनेक तरंग उठतात त्यामुळे जे ताणतणाव दुःख निर्माण होते हे दुःख निर्माण होण्याला, क्लेश असमाधान अशांततेला ,कोण जबाबदार आहे ?आणि जर आपण स्वतः याला जबाबदार असू तर आपणच आपले दुःख दूर करू शकणार नाही काय ? दुसरे कोणी येवून आपणच निर्माण केलेले दुःख दूर करू शकेल का ?दुःख निर्माण का होते तर आपण अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणजे दुःख निर्माण होते .अपेक्षा कशावर अवलंबून असतात? अपेक्षा आपल्या धारणेवर अवलंबून असतात .धारणा कशावर अवलंबून असते? आपल्या लहानपणापासूनच्या असंख्य संस्कारांच्या समुच्चयावर धारणा अवलंबून असते .संस्कार आपला परिसर मित्रमंडळी आईवडील या सर्वांवर अवलंबून असतात.यातील काहीच आपण निवडू शकत नाही .सर्व काही आपोआप होत असते .आणि जरी आपण निवड केलीअसे आपल्याला वाटले , तरी निवडीसाठी आपल्यापुढे असलेले पर्याय व निवडीसाठी आपली असलेली क्षमता ही आपोआप अपरिहार्यपणे अस्तित्वात नसते का ? आपण निवड केली असे वाटणे हा एक भास नाही का ?असे आहे तर दुःख क्लेश इत्यादीला आपण स्वतः कसे काय जबाबदार असू ?सर्व अपरिहार्यपणे होत आहे. यातील कोणीच काही करत नाही. आपण काही करतो असे वाटणे हाच एक मोठा भास आहे .हे सर्व लक्षात येणे किंवा न येणे पटणे किंवा न पटणे हे ही सर्व आपोआपच होत असते .समजून सांगण्याची क्रिया प्रयत्न हाही एक अपरिहार्यतेचा भाग आहे .जीवनाची अपरिहार्यता लक्षात येणे किंवा न येणे हेही सर्व अापोआप होतअसल्याचाच एक भाग आहे .अशा वेळी बोलण्यासारखे काही शिल्लक राहत नाही .
एकाग्रता---- आपण प्रत्येक गोष्टींमध्ये एकाग्रता पाहिजे असे म्हणतो.प्रार्थना करताना आपले लक्ष प्रार्थनेवर बरेच वेळा नसते .अनेक विचार कल्पना आपल्या मनामध्ये गर्दी करीत असतात. त्यामुळे आपले प्रार्थनेवरील लक्ष विचलीत होते .त्याचा आपल्याला त्रास होतो हा त्रास होऊ नये म्हणून एकाग्रता पाहिजे, इतर विचार कल्पना मनात येता कामा नयेत ,असे आपल्याला वाटते .एकाग्रतेची इच्छा ही प्रार्थनेशी संबंधित नसून पुन्हा आपल्याला होणाऱया क्लेशाशी त्रासाशी संबंधित आहे . एकाग्रता म्हणजे मनात विचार कल्पना यांचा जो कल्लोळ उठतो तो त्रासदायक वाटतो, कारण आपल्याला प्रार्थना महत्त्वाची वाटत असते .विचार कल्पना त्यामुळेच येता कामा नयेत असे वाटते .त्यापासून सुटका होण्यासाठी एकाग्रता पाहिजे असे अापण म्हणतो .प्रार्थना ,हा विचारांचा कल्लोळ ,एकाग्रतेचा आग्रह, दुःख दूर करण्यासाठी असतो हेआपल्या लक्षात आले आहे का ? प्रार्थना काय किंवा एकाग्रतेची इच्छा काय ,दोन्हीं मध्ये दुःख परिहार ही मूलभूत इच्छा नसते काय ?
ध्यान -----ध्यानामुळे ज्ञान प्राप्त होईल असे म्हटले जाते. परंतु मला असे वाटते की ध्यान आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी एकच आहेत .ध्यान म्हणजे ज्ञान हे सततअसले पाहिजे .ज्ञान मिळविले आणि नंतर पूर्णविराम असे कसे होईल?ज्ञान ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे असे मला वाटते .मनाचाच एक भाग वेगळा होऊन मनांमध्ये जी काही उलाढाल हालचाल खळबळ चाललेली असते ती सतत निरखीत असतो .त्यासाठी काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत .हे पाहणे आपोआपच होतअसते .या हालचाली मागे कोणते संस्कार आहेत ,ते कसे कसे केव्हा गोळा झाले, त्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मन कसे कार्य करीत आहे ,या सर्वांची होणारी जाणीव ,जी सातत्य पूर्णं असते.जिला साक्षित्व, निवड रहित जागृतता, असे म्हणता येइल .जागृतता हा एकच शब्द पुरेसा आहे .निवड रहित किंवा निवड शून्य हे शब्द जास्त समज येण्यासाठी वापरलेले आहेत . जेव्हा निवडशून्य सावधपणा ,पाहाणे असेल,तेव्हाच त्याला जागृतता असे म्हणता येईल .ही जागृतता म्हणजेच ध्यान म्हणजेच ज्ञान होय .मानसिक पातळीवर अापण निष्कारण दुःखमय अशांत असतो ,किंवा जे काही असतो ते सतत लक्षात येणे ,त्यांची सतत जाणीव दर्शन होत राहणे ,म्हणजेच ज्ञान ध्यान जागृतता असे म्हणता येईल .
१८/७/२०१८
©प्रभाकर पटवर्धन