कोणतीहि व्यक्ती स्त्री किंवा पुरुष ,ती कोणत्याही जातीची, धर्माची  ,कोणत्याही राज्यातील, राष्ट्रातील, खंडातील किंवा कोणत्याही काळातील असो ,त्या व्यक्तीला एकच प्रश्न विचारा तू सुखी समाधानी आहेस का ?तुला काही बदल हवा आहे का ?अमुक अमुक आणखी काही मिळाले, की मी जास्त समाधानी सुखी होईनअसे तुला वाटते का? मला खात्री आहे की एकच उत्तर मिळेल व्यक्ती आहे त्या परिस्थितीत सुखी समाधानी नाही .त्याला आणखी काहीतरी हवे आहे . वरवर एखाद्याने हसतहसत मी सुखी व समाधानी आहे असे सांगितले ,तरी त्याने जर अंतरंगात डोकावले ,तर तेथे कोणते ना कोणते असमाधान खदखदत असलेले त्याला दिसेल .आणखी काहीतरी हवे असणे, म्हणजेच तोअतृप्त असमाधानी असल्याची खूण आहे  .मी भौतिक स्थिती बद्दल बोलत नाही तर स्वतंत्रपणे किंवा त्यावर अवलंबून अशा मानसिक स्थितीबद्दल बोलत आहे . प्रत्येकाला काही ना काही बदल झाला म्हणजे मी सुखी होईन असे वाटत असते .  बदल झाला की व्यक्ती समाधानी होईल असा तिचा समज आहे.आणि म्हणून काहीतरी बनण्याची तिची सतत धडपड चालू असते  .प्रथम ही धडपड मानसिक पातळीवर असते व नंतर ती प्रत्यक्ष स्थितीत (बाहेर जगात) उतरते . मनुष्याच्या उत्क्रांतीच्या निरनिराळ्या अवस्था घेतल्या ,तरी त्यामध्येही तो असमाधानी होता असे आढळून येईल. कोणीहि म्हणेल की गुहेत असल्यापासून मनुष्य सतत असमाधानी होता म्हणूनच आजची प्रगती शक्य झाली आहे .  भौतिक प्रगती कशासाठी ?समाधानासाठी ना ?आणि जर त्यातून समाधान निर्माण होणार नसेल तर त्या प्रगतीचा उपयोग काय ?असमाधानी आहे तोपर्यंतच त्याची भौतिक  प्रगती शक्य आहे का?.केवळ स्व -सुखाय संशोधन होऊ शकत नाही काय?आनंदासाठी संशोधन व त्यातून प्रगती होणार नाही का?निर्लेप मानसिक स्थितीमध्ये संशोधन व भौतिक प्रगती होऊ शकणार नाही का ? भौतिक प्रगती झाली की समाधान जरूर वाटते पण ते चिरंतन असते का?.थोड्याच काळात आणखी काहीतरी हवे असे वाटू लागते .माझा प्रश्न असा आहे की आपल्याला नक्की काय हवे आहे जास्त मोटारी? जास्त  हायग्रेडच्या मोटारी? जास्त रस्ते ?  जास्त विमाने ?  जास्त भौतिक सुखसोयी! जास्त गॅजेट्स?जास्त श्रीमंती ? जास्त उपभोगाची सुख साधने ? जास्त सत्ता? मानमरातब ? लौकिक आर्थिक सामर्थ्य ?सैनिकी सामर्थ्य ?जगावर सत्ता ?--व्यक्ती म्हणून आपल्याला आंतरिक सुख समाधान आनंद यांची इच्छा असते असे मला वाटते .मनुष्य गुहेत राहत होता तेव्हापासून ते आत्तापर्यंत जर प्रगती पाहिली ,तर भौतिक प्रगती  अकल्पनीय अविश्वसनीय झालेली आढळून येते  परंतु जर मानसिक समाधानाचा आनंदाचा स्तर पाहिला तर त्यात वाढ झाली आहे का ?असा मला प्रश्न पडतो . मला तरी वाढ झालेली आढळून येत नाही .कदाचित तुमचे उत्तर वेगळे असू शकेल .समाधान ज्याच्या त्याच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते  .आपण नेहमी कळत नकळत  तुलना करून समाधानाची पातळी मोजत असतो .तुलना करताना ज्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर आपल्यापेक्षा कमी आहे त्यांच्याशी आपण तुलना करत नाही तर ज्यांचा स्तर आपल्यापेक्षा वरचा आहे पण फार वरचा नाही अशा लोकांशी तुलना करीत असतो.तुलना ज्ञात गोष्टींशी होते अज्ञाताशी नाही. अश्या होणार्‍या तुलनेमुळे असमाधान  निर्माण होते.तसे नसते तर हत्तीवरून जाणार्‍याकडे पाहू नका तर चालणाऱ्या कडे पाहा .आहे त्यात सुख मानून घ्या असे सांगण्याची वेळ आली नसती .क्रोध राग लोभ मत्सर द्वेष इत्यादी दुर्गुण सोडून द्या असे सांगण्याची वेळ आली नसती .मनात काही ठेवू नका.कटू आठवणींचा त्याग करा .मनावर पूर्वीच्या कटू संबंधांचा बोजा बाळगू नका .मन मोकळे करा मुक्त करा  असे सांगण्याची वेळ आली नसती . विचार करा ,सोडा असे म्हणून काही सोडता येते का? कोणीही मनुष्य असा त्याग करू शकेल का ?हे दुर्गुण सोडा याचा अर्थ ते आपल्या जवळ आहेत असा होत नाही का ?हे करा आणि ते करू नका असे सांगणरे कितीतरी लेख पुस्तके आहेत .हल्लीच्या जमान्यात अशा पोस्ट कितीतरी येत व जात असतात.आपण वाचून फार छान आहे असेही मोठ्याने किंवा मनात म्हणतो .अश्या सांगण्याप्रमाणे आपल्यात किती सुधारणा झाली हे ज्याने त्याने  विचार करून पाहण्यासारखे आहे .अशा लेखनाने जर जग सुधारले असते तर ते केव्हाच मंगलमय झाले असते .आतापर्यंत कितीतरी संत महंतांनी  अनेक प्रकारे प्रयत्न केले परंतु पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती आहे .कुत्र्याचे शेपूट जोपर्यंत नळीमध्ये आहे तोपर्यंतच सरळ असते नंतर पुन्हा वाकडे ते वाकडेच या म्हणीप्रमाणे आपली अवस्था नसते काय ? आत्तापर्यंत उपदेशांच्या पुस्तकांचा समुद्र निर्माण झालेला आहे .पण मनुष्य सुधारला आहे का ?
तुम्ही कदाचित म्हणाल की हे तुमचे म्हणणे पटते पण मग यावर उपाय काय?एखादा म्हणेल की तुम्ही फारच निराशावादी आहात .समस्या आली की आपल्याला त्यांच्यावर उपाय पाहिजे . प्रश्न आला की त्यावर उत्तर पाहिजे .प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर हवे असते .या प्रमाणे केले की सर्व प्रश्न व समस्या सुटतील .असा असा बदल घडवून आणला कि सर्व काही व्यवस्थित होईल . असे आपल्याला वाटत असते . आपल्याला एखाद्या गाइड प्रमाणे उत्तर. पाहिजे असते .रेडी रेकनर ज्याप्रमाणे पटापट उत्तरे देतो त्याप्रमाणे आपल्याला उत्तर हवे असते . समस्या कशी सोडवता येइल  याचा आपण विचार जरूर करू शकतो परंतु प्रश्न ज्याचा त्याने सोडवावयाचा आहे.समस्या आपण निर्माण केली आहे आणि ती फक्त आणि फक्त आपणच सोडवू शकतो .आपआपल्या संस्कारानुसार निरनिराळ्या  कसोटय़ा लावून आपण लोक व घटना मोजत असतो .त्यामुळे आपणच असमाधान निर्माण करीत असतो. निरनिराळ्या लोकांच्या कसोट्या निरनिराळ्या असतील हे आपण सहज मान्य का करीत नाही?हे योग्य की अयोग्य, हे चांगले की वाईट ,हे असावे की नसावे, हे कोण ठरवतो आणि त्यातून कोण असमाधानी होतो ? बाहेरून कोणताही साधू संत महंत पुस्तक आपली समस्या  सोडवू शकणार नाही .आपले मन कसे आहे तर ते चंचल आहे हे सर्वांनाच माहित आहे .ते अस्थिर आहे चंचल आहे क्षणात ते कुठेही भरारी मारू शकते.मनात कोणता विचार केव्हा कसा येईल हे सांगता येणार नाही हेही मनच सांगत असते.मनामध्ये असा असा बदल घडवून आणला की सर्व काही सुरळीत होईल असे काही जणांचे म्हणणे असते.योग्य बदलाने अापण समाधानी होऊ असे  बऱ्याच जणांचे म्हणणे असते .
ज्या प्रमाणे टाकू म्हणून काही गोष्टी टाकता किंवा सोडता येत नाहीत त्याचप्रमाणे आणू म्हणून सद्गुण अंगी आणता येत नाहीत आणि जरी एखादा अपवाद म्हणून  केव्हातरी आणू शकला तरी .एकाच्या ठिकाणी दुसरे आणून समस्या सुटेल असे मला वाटत नाही .आपण इतक्या वर्षांमध्ये काहीतरी बनण्यासाठी सतत धावत होतो,  भौतिक पातळीवर आपण काही कदाचित साध्य केलेही, पण समाधानी मात्र होऊ शकलो नाही. बनू म्हणून आपण बनू शकलो नाही.आपले तथाकथित सद्गुण  किंवा दुर्गुण आहेत तिथेच आहेत.मला दोन म्हणी आठवतात "जे गुण बाळा ते जन्मकाळा"आपला जो स्वभाव असतो त्यामध्ये कितीही वर्षे गेली तरी फारसा फरक पडत नाही.दुसरे एक उदाहरण दिले जाते .निखाऱ्यावर राख जमते .आपल्याला असे वाटते की तो थंड झाला.प्रत्यक्षात तो निखारा तसाच असतो .राख झटकली की पुन्हा धगधगू लागतो .हे समाजाच्या अनुभवातून निर्माण झालेले बोल आहेत.या सगळ्यावर उत्तर म्हणून  काही बनण्याचे थांबले( आपण थांबवले ?)तर ?आपण कसे आहोत ते त्रयस्थपणे पाहिले तर ?आपण काहीही करावयाचे नाही .फक्त साक्षीत्व करीत रहायचे.ते सुद्धा करावयाचे नाही ते समंजसपणातून आपोआपच अस्तित्वात येईल . मनाचे खेळ मनाचे हेलकावे कसे होत आहेत ते फक्त पहावयाचे(एकदा समज आली की तेही आपोआप पाहिले जाईल ).मनाला आपल्या स्वभावाप्रमाणे नाचू दे.आपण मन काय करीत आहे ते पाहत असू तर मन त्यावेळी काहीच करीत नाही असे दिसेल .आपण म्हणजे कोण तर शेवटी मनच.मनाचाच एक भाग .काही वेळानंतर असे लक्षात येईल की आपले पाहणे,मनावर लक्ष ठेवणे , साक्षित्व हरवले आहे .मन सगळीकडे भरकटत आहे .मनात एकावेळी अनेक विचार येऊ शकत नाहीत. एका मागून एक असंख्य विचार येतात .आपण पुन्हा सावध होऊ जागृत होऊ त्यावेळी अनेक विचार मनात येऊन गेलेले आढळतील.मनाचेआपोआप निरीक्षण होतअसताना आपण कसे आहोत ते आपल्या लक्षात येईल .मन म्हणजेच मी. मनाची ओळख म्हणजे  स्वतःची ओळख या निवडशून्य जागृतीतून स्वतःची ओळख होऊ लागली की स्वतःच्या अस्तित्वाचे अनेक पदर उलगडू लागतील. नेहमी आपल्याला आपण जे काही करतो ते योग्यच असे वाटत असते . या  जागृततेतून आपण करतो व म्हणतो ते बरोबर असा आग्रह व आवेश सुटू लागतो.आपण कसे आहोत ते लक्षात येऊ लागते .आपण जे करतो तेच योग्य असे म्हणून त्याची वकिली करण्याची प्रवृत्ती आपोआपच कमी होत नाहीशी होते .आपले सद्गुण दुर्गुण कमतरता खऱ्या अर्थाने लक्षात येते .त्यामुळे त्यात काहीही केल्याशिवाय बदल होतो .  हळूहळू आपण द्वंद्वातीत होऊ लागतो . ही बनण्याची प्रक्रिया नाही तर केवळ असण्याची स्थिती आहे .समजण्याची स्थिती आहे . ज्ञानाची स्थिती आहे .एकदा उमजले की जागृतता साक्षित्व अापोआप असेल.मनाचा होय मनासी संवाद असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे ते हेच .ही बदलण्याची प्रक्रिया नाही .ही बदलाची प्रक्रिया नाही ही केवळ असण्याची स्थिती आहे. मूलगामी बदल क्रांतिकारी बदल असे शब्द यासाठी कदाचित  वापरता येतील .येथे आपण काहीही करीत नसून-- राम हमारा जप करे हम बैठे आराम --असे जे कबीरांनी म्हटले आहे ते हेच .असत्यातील सत्य आणि सत्यातील असत्य अनुभवण्याची स्थिती ती हीच .
२३/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel