** 

एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो.

सारे राम महावीर बुद्ध येशू महम्मद यांच्या बरोबर गेले याचा अर्थ काय होतो?प्रत्येकजण आपल्या मनात अनेक व्यक्तीविषयी  एक प्रतिमा निर्माण करीत असतो.त्या व्यक्ती जिवंत,मृत, पुस्तकातील,भूतकाळातील,किंवा भविष्यकाळातील असतील.आपल्या जवळच्या असतील किंवा आपल्या दूरच्या  असतील.या प्रदेशातील या देशातील किंवा परदेशातील असतील.तथाकथित लहान किंवा मोठ्या असतील .त्यांना लहान किंवा मोठे आपण करीत असतो .   लहानपणापासून आपल्यावर अनेक संस्कार होत असतात.संस्कारांची पहिली जागा म्हणजे कुटुंब होय.लहानपणी मूल आकारहीन असते.ते हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध ब्राह्मण मराठा दलित इत्यादी कोणत्याही धर्माचे जातीचे पंथाचे प्रदेशाचे राष्ट्राचे नसते.कुटुंबात त्याच्यावर तू हिंदू आहेस तू मुसलमान आहेस तू ख्रिश्चन आहेस  तू मराठी आहेस तू कानडी आहेस तू बंगाली आहेस तू भारतीय आहेस वगैरे  संस्कार होत असतात .मूल थोडे मोठे झाले की कुटुंबाबाहेरील व्यक्ती त्याच्या संपर्कात  येतात .शेजारी मित्र शाळा पुस्तके शिक्षक यामधून त्याच्यावर निरनिराळे संस्कार होत असतात . अनेक ठिकाणाहून व्यक्ती निरनिराळे विचार ग्रहण करीत असते .पूर्वी प्रचार माध्यमे प्रसार माध्यमे कमी होती .जुन्या काळी कीर्तन प्रवचन भजन श्लोक अभंग पाठांतर  इत्यादी मार्फत संस्कार होत असत.छपाई सुरू झाली वर्तमानपत्रे हळूहळू वाढत्या प्रमाणात निघू लागली .पुस्तके,वर्तमानपत्रे,व्याख्याने ही संस्कार माध्यमे झाली.हल्लींच्या स्मार्टफोनच्या डिजिटल युगामध्ये संस्कार याही  माध्यमांमार्फत होत असतात .

आवड निवड यातूनच निर्माण होत जाते.ज्यावेळी एखादा विचार येऊन आपल्यावर आपटतो त्यावेळी तो विचार अापण जसाच्या तसा ग्रहण करीत नाही .आपल्या संस्कार पार्श्वभूमीनुसार आपण त्याचा अर्थ लावत असतो.हा अर्थ एक संस्कार होतो .अशा तऱ्हेने संस्कारांची पुटे चढत जातात.यातून "मी" धष्टपुष्ट बळकट होत जातो . या संस्कारांमधून आपली मते घट्ट होत जातात .त्या विरोधी एखादा विचार ऐकला की मन पेटून उठते .त्याला पोटतिडकीने विरोध केला जातो .यातून कट्टरता निर्माण होते .

सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राम बुद्ध येशू या एक प्रतिमा  होतात.आपापल्या संस्कार धारेनुसार  विचारधारेनुसार अापण त्या त्या प्रतिमेमागून जात असतो.आपल्या मनात वरील प्रकारच्या नायकांप्रमाणे खलनायकांच्याही प्रतिमा निर्माण होत असतात.आपल्या मनात देशातील व परदेशातील अनेक नायकांप्रमाणे खलनायकांच्याही प्रतिमा निर्माण होतात.हिटलर मुसोलिनी स्टॅलीन ,वाईट; व चर्चिल रुझवेल्ट चांगले इत्यादी.आपण ज्याना खलनायक म्हणतो ते कित्येजणांना नायकही वाटत असतात.स्वातंत्र्यपूर्व काळातील जिना सावरकर गांधी नेहरू सुभाषबाबू हे काही जणांना नायक वाटत असतील तर काही जणांना खलनायकही वाटू शकतील.यामध्ये जो तो मर्जीप्रमाणे असंख्य नावांची भर घालू  शकतो. भारतावर वेळोवेळी मुस्लिम किंवा इतर राज्यकर्ते  होवून गेले त्यांच्याबद्दलही अशी विविध प्रकारची मते निरनिराळ्या जणांची त्यांच्या संस्कार संग्रहानुसार असणे स्वाभाविक आहे .

जे  आपण म्हणतो तेच खरे बाकी सर्व खोटे अशी एक विचारधारा निर्माण होते .या सर्वातून हळूहळू हट्टाग्रह निर्माण होत असतो .त्यातून हळू हळू  जो आपल्या विचारधारेचा नाही त्याचा द्वेष, तिटकारा,नावड, निर्माण होऊ लागते .

भले आपण असे म्हणत असू की मन उघडे ठेवले पाहिजे .सर्व विचार मोकळेपणाने ऐकले पाहिजेत.विचार स्वातंत्र्य पाहिजे .परंतु आपल्यापैकी बहुतेक जण त्याचा अंगीकार करतो का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.मला संस्कारानुरुप असे वाटते की आपण तसे करीत नाही.विचाराने विचाराशी लढण्याऐवजी आपण हातघाईवर येऊ लागलो आहोत .त्यामुळेच सर्वत्र हिंसा वाढलेली दिसून येते .

ऐकावे कसे ही एक कला आहे .पूर्वसंस्कार संपूर्णपणे बाजूला ठेवून  दुसऱ्यांचे विचार हार्ट टू हार्ट या हृदयातून त्या हृदयाकडे सरळ गेले पाहिजेत.तरच दुसरा काय म्हणतो ते आपल्याला खऱ्या अर्थाने कळू शकेल.आपल्यापैकी बहुतेक जण अशा प्रकारे कधीही ऐकत नाही असे मला वाटते .

आपण नेहमी दहशतवादाला नावे ठेवीत असतो.दहशतवाद संपूर्णपणे गेला पाहिजे त्याचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे असे आपण म्हणतो .परंतु आपण स्वत: कमी जास्त प्रमाणात दहशतवादी तर नाही ना? याचा विचार स्वत:शी केला पाहिजे .

 संस्कार विरोधी विचार ऐकल्यावर जर अापण अंतरंगात पेटून उठत असू तर आपण मानसिक पातळीवर तरी दहशतवादी आहोत.जर आपण कमी जास्त प्रमाणात हातघाईवर येत असू तर आपण नक्कीच दहशतवादी आहोत .काही जण असे म्हणतील की असे विचार हे गुळमुळीतपणाचे आहेत.असा विचार हाही एक संस्कारसंग्रहाचा भाग आहे !!काहींना असे वाटते की,~ हेही खरे तेही खरे~अशी विचारसरणी कणाहीन स्थिती दर्शविते.हाही एक संस्कार संग्रहाचा भाग आहे .

किंबहुना मी असे म्हणेन की प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी बरोबर आहे .जग व्यवस्थित अचूक चालले आहे .ते व्यवस्थित चालत नाही हा भ्रम आहे .हा भ्रमही संस्कार संग्रहाचा एक अपरिहार्य भाग आहे .(एखादा कदाचित या लेखकालाच भ्रम झाला आहे असे म्हणेल, तोही संस्कार संग्रहाचा एक उद्गार असेल ! )
               मी हे जे लिहित आहे तेही एक संस्कार संग्रहाचा  परिणाम आहे .कुणीही दहशतवादी असता कामा नये याचा मानसिक स्तरावर आग्रह धरणे हाही एक प्रकारचा दहशतवाद नाही का?आपल्याजवळ संस्कारसंग्रहाशिवाय दुसरे काहीही नाही.ही वस्तुस्थिती आहे .मला असे वाटते .तुम्हाला तसे वाटते.यातून मला माझा संस्कार संग्रह दिसतो.त्याचप्रमाणे तुमचाही संस्कार संग्रह दिसतो.ज्यावेळी  याची पूर्ण समज येईल त्यावेळी आपण आग्रहशून्य होऊ.हाच अनाग्रह योग होय.हेच साक्षीत्व.हीच निवड शून्य जागृतता .

विचार सारखे येत जात असतात .आपल्यावर अनेक माध्यमांच्या द्वारे असंख्य विचार आपटत असतात .त्या त्या वेळी आपल्या मनातून आपल्या संस्कारानुसार अनेक प्रतिक्रिया निर्माण होतात.
             

हे सर्व पाहात असणे म्हणजेच ~साक्षीत्व ~निवडशून्य जागृतता ~अनागृहयोग होय.      
               

*जेव्हा अशी स्थिती सतत  असेल त्यावेळी आपण प्रतिमांच्या मागे धावणार नाही.*
*मग कदाचित तो सुरुवातीच्या गोष्टीतील म्हातारा आपल्याला दिसेल भेटेल.*
*आपण त्या म्हाताऱ्याकडे जावू शकत नाही*
*तो म्हातारा आपल्याकडे आला पाहिजे *
*तो आपल्याकडे केव्हा येईल ते सांगता येणार नाही तो अकस्मात केव्हाही सूचनेशिवाय येईल*  
               
  ११/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन 

   
                   


 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel