काही जणांना ही दोन्ही एकच आहेत किंवा परस्परावलंबी आहेत असे वाटेल .जागृतता असल्याशिवाय मनुष्य स्वतःतील दोष कमतरता शोधणार नाही. त्यासाठी स्वनिरीक्षणाची गरज आहे .अनेक प्रकारच्या भौतिक कमतरता व मानसिक कमतरता या स्वनिरीक्षणातून स्पष्ट होतील. नंतर प्रयत्नातून त्या कदाचित  दूर करता येतील. या सर्वांसाठी जागृतता आवश्यक आहे .असे वाटण्याचा संभव आहे .

स्वनिरीक्षणासाठी जागृतता आवश्यक आहे असे मला वाटत नाही .प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत आपले निरीक्षण कळत नकळत अपरिहार्यपणे स्वाभाविकच करीत असते .नीट विचार केला तर असे आढळून येईल की प्रत्येक व्यक्ती कमी जास्त प्रमाणात असमाधानी असंतुष्ट असते .हे असमाधान दोन मुख्य कारणांनी असते एक भौतिक व दुसरे मानसिक .अर्थात असमाधान हे मानसिक पातळीवरच ,दोन्ही वेळेला असते.आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय इत्यादी कारणांनी जी असमानता असते त्यामुळे खालील स्तरावर असलेल्या व्यक्तीला असमाधान भासत, वाटत असते .त्यामुळे मत्सर द्वेष असूया ईर्षा  चिंता इत्यादींनी मन ग्रस्त होते.याला भौतिक कारणे म्हणता येईल .यामुळे मनात अशांतता निर्माण होते. मन अस्वस्थ होते व चिंताक्रांतही होते .मानसिक कारण म्हणजे स्वतःवर किंवा आपल्या आप्त स्वकीयांवर भूतकाळात जो अन्याय झाला, त्याच्या आठवणीमुळे मनात काही वेळा द्वेष व अस्वस्थता निर्माण होते.वर्तमानकाळातील  म्हणजेच जवळच्या भूतकाळातील आपल्याला वाटणार्‍या  अन्यायामुळेहि अस्वस्थता निर्माण होते.भूतकाळातील ओझे घेऊन आपण वावरत असतो .आपला प्रवास भूतकाळातून भविष्याकडे सतत मनातल्या मनात चाललेला असतो व वर्तमान काळ मात्र जिथे आपण प्रत्यक्षात असतो तो हातातून सतत सुटत असतो .ही अस्वस्थता हे असमाधान मनात निष्कारण कमी जास्त खळबळ निर्माण करते .हे असमाधान दूर करण्यासाठी मानसिक पातळीवर प्रयत्न केले जातात. थोडक्यात मानसिक शांतता मिळवण्यासाठी जपजाप्य तत्वज्ञान वाचन चिंतन संत गुरू इत्यादीचा आधार घेतला जातो . आपण असूया द्वेष चिंता इत्यादी करता कामा नये असे मनाला शिकविले जाते .वाइट विचार करता कामा नये ,चांगले विचार असले पाहिजेत असे बजावले जाते परंतु मनातील खळबळ अशांतता ढवळलेले मन तसेच राहते .मन शांत करण्याचे प्रयत्न विफल होतात .हे सर्व कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या बाबतीत  आपोआप होत असते त्यासाठी काही जागृतता लागत नाही 

जागृतता ही स्वतंत्र स्थिती आहे .जागृतता म्हणजे मनात ही जी सर्व खळबळ चढउतार चाललेले असतात ते वेगळेपणाने पाहणे म्हणजे च साक्षीभूत असणे होय. हे सर्व मनच करीत असते. त्याशिवाय आपले जवळ दुसरे काही साधन नाही.मनाचाच एक भाग वेगळा होऊन हे सर्व जे मनात चाललेले असते ते अखंडपणे पहातो' म्हणजे त्याबद्दल सावधान असतो, म्हणजेच जागृतता होय. ही सर्व प्रक्रिया एकदा समजली की मन आपोपच सावध होते वेगळे होते जागृत होते.जागृतता म्हणजे मनाच्या नेहमीच्या खेळात अस्तीपक्षी किंवा नास्तीपक्षी कोणताही सहभाग न घेता जे काही चालले आहे त्याचे फक्त अवलोकन करीत राहणे होय. हे पाहाणे सातत्यपूर्ण नसते ,वेळोवेळी ते हरवते, परंतु ते आपोआपच पुन्हा येते.एकदा जागरुकता अस्तित्वात आली म्हणजे मनाचे हेलकावे कमी होतात व प्रक्षुब्ध झालेले मन लवकर स्थिरावते असा अनुभव येतो. जागृतता आणण्यासाठी काही प्रयत्न करायचे नसतात .प्रयत्न म्हणजे फरफट होय.एकदा समज आली म्हणजे ही सर्व प्रक्रिया आपोआपच होत असते.धारणा त्यामुळे निर्माण होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया  त्यातून निर्माण होणाऱया निरनिराळय़ा भावना या सर्वांची अपरिहार्यताही लक्षात आली म्हणजे जागृतता अापोआपच निर्माण होते.

थोडक्यात स्वनिरीक्षणही आपोआपच होत असते व ही सर्व प्रक्रिया लक्षात आली की जागृतता ही आपोआपच अस्तित्वात येते ही सर्व प्रक्रिया लक्षात येणे हेही केव्हा तरी आपोअापच होते .स्व निरीक्षणातून बदलासाठी प्रयत्न केले जातात त्याचा हेतू आपल्याला जे चांगले वाटते त्या दिशेने सुधारणा घडवून आणणे हा असतो.अश्या प्रयत्नातून विशेष काही  मानसिक स्तरावर साध्य़ होत नाही.  तर जागृततेतून फक्त पहाणे असते .दोन्हीही अपरिहार्यपणे घडत असतात हे एकदा लक्षात आले म्हणजे आपण काही करावयाचे किंवा न करावयाचे असे काही नसते.अापण आपोआपच मनाचा खेळ पाहात रहातो .राम हमारा जप करे हम बैठे आराम ही स्थिती कदाचित  हीच असावी !!

५/६/२०१८ © प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel