प्रत्यक्ष घटना जेव्हा आपण पाहतो किंवा ऐकतो त्यावेळी हिमनगाप्रमाणे त्याचे एक लहान टोक आपल्याला दिसत असते. शितावरून भाताची परीक्षा करता येत नाही.हिमनगाच्या टोकावरून ज्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण हिमनगाचे आकलन होत नाही त्याप्रमाणे घटना पाहून वाचून ऐकून तिचे संपूर्ण आकलन होत नाही. हे एकदा लक्षात आले की आपल्याकडून स्वाभाविकपणे शेरेबाजी केली जात नाही. आपण स्वाभाविक अंतर्मुख होतो.

   एखादी घटना अापण प्रत्यक्ष पाहतो वाचतो किंवा दुसऱ्याच्या तोंडून ऐकतो.

त्यानेही ती कदाचित दुसऱ्याच्या तोंडून ऐकून आपल्याला सांगितलेली असते.अशा वेळी त्यामध्ये भर घातली जाते किंवा बदल केला जातो.हा बदल बर्‍याच  वेळा नकळत असतो. आपली जी मते त्याप्रमाणे घटनेला आकार दिला जातो . परंतु यथा  तथ्य म्हणून जी घटना सांगितली जाते त्यामध्येही पाहणाऱ्यांच्या दृष्टिकोनाप्रमाणे नकळत  बदल केला जातो.रस्त्यावर एखादा अॅक्सिडेंट झाला तर त्यांमध्ये रिक्षा, मोटारसायकल ,मोटार ,चालणारा माणूस ,यापैकी कोणाची चूक होती याबद्दल मतभिन्नता राहील .प्रत्यक्षात कोणाचीही चूक नसून, एखाद्या वाहनातील अकस्मात निर्माण झालेला दोषही कारणीभूत असू शकेल किंवा आणखी काही कारण असेल .

एखादी घटना पाहिल्यावर वाचल्यावर ऐकल्यावर आपल्याला त्यावरती काही ना काही मत मांडावयाची घाई  झालेली  असते..जर आपल्याला याची जाणीव झाली की आपण पाहिले ते एक टोक आहे व तेही एका बाजूने पाहिलेले, तर स्वाभाविकपणे अशा वेळी मत मांडण्याची, टीका करण्याची ,ताशेरे झाडण्याची ,आपण गर्दी करणार नाही .बऱ्याच वेळा आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतो. आपल्याला घाईघाईने काही ना काही मत मांडल्याशिवाय चैन पडत नाही.घटने मागे अनेक भौतिक व मानसिक लागेबांधे असतात .  आपण जी पार्श्वभूमी समजतो तशीच पार्श्वभूमी असेल असे नाही .छापतांना बातमी सांगताना घटनेचे प्रत्यक्ष पाहिल्याचे वर्णन करताना हेतू पुरस्सर किंवा नकळत अनेक बदल संभाव्य असतात .हे एकदा लक्षात आले की आपण नकळत मौनी बाबा होतो .मनो व्यापारासंबंधी मनाचाच एक भाग जागृत होतो .निवड रहित जागृतता आपोआपच निर्माण होते .जागृतता ही निवड रहितच असते परंतु जास्त स्पष्ट करण्यासाठी निवड रहित हे विशेषण वापरलेले आहे .

© प्रभाकर  पटवर्धन
२१/४/२०१८
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel