१)प्रकाश लहरी संदर्भातील काळोख: बऱ्याच जणांना काळोखाबद्दल एक सुप्त आकर्षण असते.जशा भूतकथा गूढकथा लोकांना आवडतात तसेच हे आहे.भूत हे काळोखात असते अशी एक समज आहे.त्याचप्रमाणे गूढतेचाही काळोखाशी कमी प्रमाणात परंतु थोडाबहुत संबंध आहेच.मी भूत पाहिले आहे. त्याला हॅलो केले आहे.असे सांगणारा एखादा तरी मनुष्य आहे की नाही सांगता येत नाही.असे असले तरी भूत आहे असे मानणारे बहुधा निदान नव्वद टक्के किंवा कदाचित त्याहून जास्त लोक असतील अशी माझी समज आहे.अज्ञाताबद्दल मनुष्याला एक प्रकारचे आकर्षण असते.त्या आकर्षणातून काळोखाबद्दल एक आकर्षण, भूतकथा, गूढकथा,याबद्दल आकर्षण निर्माण झाले असावे.

प्रकाशात मनुष्याला सुरक्षित वाटते.निदान त्याच्यावर जो हल्ला होईल तो हल्लेखोर दिसेल अशी त्याला खात्री असते.काळोखात हल्लेखोर दिसत नाही.हल्लेखोर अमानवी(वाघ सिंह अशा पशुंबद्दल मी बोलत नाही.) असेल अशी कल्पना असते.हल्ला करण्याची पद्धतही माहीत नसते. म्हणूनच रात्र झाली की मनुष्याला भीती वाटू लागते.प्रकाशात अमानवी अस्तित्व येत नाही अशी समज आहे.म्हणूनच प्राचीन काळापासून निरांजन, समई, ठाणवी,इत्यादी तेलाचे दिवे अस्तित्वात आले.चौवीस तास देवासमोर दिवा लावून ठेवण्याची प्रथा त्यातूनच निर्माण झाली. दिवा निर्माण करण्याची अन्यही कारणे आहेत.

काळोख म्हणून कांही प्रत्यक्षात आहे का असा मला प्रश्न पडतो.शास्त्रीयदृष्टय़ा काळोख म्हणजे कमी तीव्रतेचा प्रकाश होय.ज्या प्रकाशलहरी आपल्याला दिसत नाहीत त्या काळोखात असतातच.जास्त तीव्रतेच्या प्रकाशलहरीही आपण पाहू शकत नाही.तेथेही काळोखच वाटतो. मांजर वाघ सिंह अशा अनेक पशूंना रात्रीचे व्यवस्थित दिसते.आपल्याला ती शक्ती प्राप्त झाली तर आपणही काळोखात स्वच्छ पाहू शकू.

खोलीत जाण्यापूर्वी हल्ली विजेचा दिवा लावण्याचे बटन असते.आपण अगोदर बटण दाबतो.प्रकाश पडतो.अमानवी अस्तित्त्व निघून जाते.रात्रीही नाइट लॅम्प तेच काम करीत असतो.ज्यांना डोळे आहेत त्याना प्रकाशाचे महत्त्व.जे जन्मांध आहेत त्यांना प्रकाश माहीतच नाही.ते केवळ कल्पना करू शकतात की नाही तेही   माहीत नाही.त्यांच्या भूताबद्दलच्या काय कल्पना आहेत कांही सांगता येत नाही. थोडक्यात असे म्हणता येईल की ज्याला जो काळोख वाटतो तो त्याचा काळोख.ज्याची भीती वाटते ती त्याची भीती.भीती वाटते त्याला इलाज नाही. 

२)समग्र ज्ञान म्हणजेच प्रकाश या दृष्टिकोनातून काळोख:काळोखाकडे दुसर्‍या एका दृष्टिकोनातून पाहता येईल.काळोख म्हणजे अज्ञान. अंध:कार.तसे आपण सर्वच कमी जास्त प्रमाणात अंधारात काळोखात असतो.एकदा कुणीतरी आइन्स्टाइनचे कौतुक करीत होता.त्यावेळी आइन्स्टाइन समुद्रकिनाऱ्यावर होते.तेव्हां हातात वाळू घेऊन  ते म्हणाले,या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या एका कणा एवढेही माझे ज्ञान नाही.ही नम्रता तर आहेच.परंतु सत्य वचनही आहे.या सृष्टीमध्ये एवढी रहस्ये,एवढे ज्ञान भरलेले आहे की आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी, तत्त्वे, नगण्य आहेत.म्हणजेच आपण एकप्रकारे अंधारात राहात आहोत.याला आपण अज्ञानाचा अंधार म्हणू शकतो.जे थोडेबहुत ज्ञान आपण मिळवितो त्याचीच आपण टिमकी वाजवीत राहतो.या दृष्टीने विचार करता आपल्यापैकी  सर्व अंध आहेत असे म्हणता येईल.आपण काळोखात असतो असे म्हणता येईल.ज्ञानाच्या अत्यंत कमी प्रकाशात असतो.

३)भविष्य ज्ञान: तथाकथित भविष्यवेत्ते भविष्य कितपत जाणतात माहित नाही. ते अंदाज बांधतात. प्रत्यक्ष भविष्य समजू शकत नाहीत. अशी माझी प्रामाणिक समजूत आहे.   भविष्यात म्हणजे अगदी पुढच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही.   भविष्याबद्दल वस्तुतः पूर्ण अंधार असतो.म्हणजेच भविष्याबद्दल आपण काळोखात असतो.

तात्पर्य : एकूण विचार केला तर आपल्यापैकी प्रत्येक जण 

*ज्ञान या संदर्भात बऱ्याच प्रमाणात काळोखात असतो.* 

*भविष्य या संदर्भात पूर्णपणे काळोखात असतो.*

* प्रकाश लहरी संदर्भात कांही प्रमाणात काळोखात असतो..

१६/१०/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel