बद्रीनाथ(स्वर्गदार) नंतर आम्ही दुसरे धाम केदारनाथच्या दर्शनासाठी निघालो .बद्रीनाथला जातांना  आणि येताना ज्योतिर्मठ उर्फ जोशीमठ लागतो .जिथे बद्रीनाथची ज्योती तेवत असते तो मठ म्हणजे ज्योतिर्मठ होय.हा मठ आद्य शंकराचार्यांनी स्थापन केला. 

बद्रीनाथ मंदिर जेव्हा थंडीमध्ये पाच  महिने बंद असते त्यावेळी बद्रीनाथची पूजा येथे होत असते .त्यावेळी बद्रीनाथ येथे वस्ती करतो असा समज आहे .येथून अौली येथे जाण्यासाठी रोप वे आहे .येथे थ्री स्टार हॉटेल्स अनेक आहेत .थंडीमध्ये सर्वत्र बर्फ पडतो त्या वेळी स्केटिंगसाठी स्केटर्स येतात .अौलीला जाताना रोपवे थांबवून ठिकठिकाणी उतरण्यासाठी चबूतरा व पायऱ्या केलेल्या आहेत .पाळण्यातून स्केटर्स उतरून स्केटिंग करीत खाली जोशी मठापर्यंत येतात. ट्रेकिंगला जाण्यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे .येथून निरनिराळ्या पर्वत शिखरावर जाण्यासाठी गिर्यारोहक जातात .चारी बाजूला बर्फाचे मुगुट घातलेली शिखरे मनोहारी दिसतात.नंदादेवी पर्वतशिखर, जोशी मठ परिसरातून कुठूनही दिसते . अौली रोपवे जेथपर्यंत जातो,त्या अंतिम ठिकाणाला अौली असे नाव आहे म्हणून अौली रोप वे. तिथून नंदादेवी पर्वत फारच मनोहारी दिसतो. पर्वत फार दूर असूनही अगदी पुढ्यांत आहे असा भास होतो . जोशीमठ येथे व आसपास बरीच मंदिरे आहेत .आम्ही वेळेच्या अभावी जिथे थंडीमध्ये बद्रीनाथाची पूजा केली जाते ते स्थान ज्योतिर्मठ व नृसिंहमंदिर पाहून पुढे केदारनाथकडे जाण्यासाठी निघालो .

वाटेत रुद्रप्रयाग लागते.तिथे आम्ही थांबलो होतो .येथे मंदाकिनी नदी अलकनंदा नदीला मिळते.मंदाकिनी केदारनाथच्या पायाजवळून वहात येते. तेथील पर्वतांमध्ये एका ग्लेशियरमध्ये तिचे उगमस्थान आहे .दोन नद्यांच्या संगमाला प्रयाग असे म्हणतात.प्रयाग म्हणजे विशेष यज्ञाचे स्थान होय .सर्व मानवी संस्कृती नद्यांच्या काठी विकसित झाली .पाण्याला आपण जीवन म्हणतो.पाणी आपला जीवनाधार आहे .यज्ञ नदीकाठी केले जात. संगमाकाठी विशेष प्रकारचे यज्ञ केले जात म्हणून प्रयाग.रुद्रप्रयाग जिल्ह्याचे ठिकाण आहे .येथून ऐशी नव्वद किलोमीटरवर केदारनाथ मंदिर आहे.हृषीकेश  बद्रीनाथ या मुख्य रस्त्याला लागून बरीच हॉटेल्स आहेत .रस्ता उंचावरून गेलेला आहे.रस्त्यावरून विशेषत: हॉटेल्सच्या पाठीमागच्या बाजूने अलकनंदा नदी फारच भव्य रम्य रौद्र व  प्रेक्षणीय दिसते.हॉटेल्सच्या मागच्या बाजूच्या खोल्यांना काचेची संपूर्ण तावदाने असल्यामुळे  खोलीतून रम्य दृश्य  दिसते .

कुठूनही आले तरी रुद्रप्रयागवरून केदारनाथला जावे लागते.जाताना वाटेत सोनप्र्‍ायाग हे गाव आहे.हे मोठे तीर्थस्थान  आहे. येथे वासुकीगंगा नदी, मंदाकिनी नदीला मिळते. 

गौरीकुंड हे केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या  पायथ्याला वसलेले गाव आहे.येथे गौरी म्हणजे पार्वती हिचे महात्म्य फार मोठे आहे .मंदाकिनी नदीच्या तीरावर हे गाव आहे.येथील गौरीकुंड हे तप्त उष्ण कुंड आहे . कुंडाच्या किनाऱ्यावर मस्तक नसलेला गणपती आहे.गौरीने या कुंडामध्ये स्नान करीत असताना रक्षक म्हणून गणपतीला ठेविले होते.शंकर आल्यानंतर त्यांनाही गणपतीने आत जाऊ दिले नाही .शंकराने रागाने त्याचे मस्तक उडविले.व नंतर त्यावर हत्तीचे शिर बसविले.त्याचे प्रतीक म्हणून मस्तक नसलेला गणपती येथे आहे .

अशीही कथा सांगितली जाते की रजस्वला झाल्यानंतर गौरीने येथे स्नान केले त्यामुळे हे कुंड उष्ण आहे .

गौरीकुंड येथून केदारनाथला जाण्याचा चढ सुरू होतो .येथे पायथ्याशी घोडे डोली मिळतात .डोलीवाले बहुश: नेपाळमधून आलेले असतात .(स्थानिक डोलीवाले असल्याचे मला आढळले नाही.) हे अत्यंत काटक असतात.व तरुणही असतात .जरा वयस्क लोक हा चढ डोली घेऊन चढून जाऊ शकणार नाहीत.एवढा हा चढ बिकट आहे. डोली घेऊन वर जाणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.चढ इतका बिकट आहे की त्यांना मधून मधून  डोली खाली ठेवून  विश्रांती घ्यावी लागते.काही वेळा तर आपल्याला चालत जावे लागते आणि डोलीवाले मागून डोली घेवून येतात.रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे चौघे जण डोली नेऊ शकत नाहीत.डोली त्यांना भाड्याने घ्यावी लागते .त्यांना फक्त मेहनतीचे पैसे मिळतात .त्यांच्याशी बोलताना पाच सहा महिन्यांमध्ये त्यांची वर्षाची जवळजवळ बेगमी होते असे समजले. खाली उतरताना ते जवळजवळ धावत उतरतात .कारण त्यांना पुन्हा डोली घेऊन  केदारनाथला जायचे असते.ते धावत उतरत असताना  आपल्याला भीती वाटते .त्यांचा पाय घसरला व आपण सर्वजण खोऱ्यात गेलो तर ?केदारनाथाला वर जाण्यासाठी पायऱ्या बांधण्याचे काम सुरू होते .ते पूर्ण झाल्यास वर जाणे थोडे बहुत सुलभ होईल .तेरा सालच्या ढगफुटीने किती वाताहात झाली माहीत नाही. 

गौरीकुंड येथून केदारनाथ मंदिर दहा किलोमीटरवर आहे . रस्ता अत्यंत बिकट व खडतर आहे .वर जाईपर्यंत सुमारे पाच तास लागतात.वर जाण्यासाठी पालखी(डोली) घोडी मिळतात .हल्ली हेलिकॉप्टरचीही सोय आहे असे ऐकतो.(हरिद्वार येथून केदारनाथ व बद्रीनाथ येथे जाण्यासाठी रेल्वे मार्ग बांधणार  आहेत असे ऐकिवात होते.परंतु तशी काही हालचाल दिसत नाही) 

केदारनाथ स्थान अति अति प्राचीन आहे .येथे द्वापार युगात पांडवांनी केदारनाथाची स्थापना केली अशी एक कथा आहे. महाभारत युद्धानंतर पांडव जिंकले तरी त्यांना आपल्या नातेवाईकांचा व काही ब्राह्मणांचा(द्रोणाचार्य इ.) वध करावा लागला.गोत्र हत्या व ब्रम्हहत्या यांचे पाप दूर करण्यासाठी त्यांनी शंकराची प्रार्थना करावी व शंकराचे आशीर्वाद घ्यावे असे सुचविण्यात आले.

पांडव शंकराला भेटण्यासाठी काशी विश्वेश्वर येथे गेले.शंकरांना पांडवांना शक्यतो भेटायचे नव्हते .पांडवांनी पुरेसे सायास ,प्रयास,म्हणजेच तपश्चर्या  केल्यानंतरच त्यांना दर्शन द्यायचे होते .काशी विश्वेश्वर येथे शंकर हिमालयात गेले आहेत असे कळले .शंकराचा शोध घेत पांडव  हरिद्वार ऋषिकेश येथून हिमालयात आले.देवप्रयाग येथे शंकर रुद्रप्रयाग येथे आहेत असे कळल्यानंतर ते तिथे आले.तिथे शंकर पुढे मंदाकिनीच्या तीरावर काशीस्थानी आहेत असे कळले.पांडव तिथे येईपर्यंत शंकर तिथूनही गुप्त झाले.त्यामुळे या स्थानाचे नाव गुप्त काशी असे पडले .तिथून पुढे गौरीकुंड व नंतर हिमालयात शंकराच्या शोधात फिरत असताना त्यांना एक अत्यंत आडदांड असा म्हैसा म्हणजे रेडा दिसला. शंकरांनी रेड्याचे रूप घेतले होते .पांडव आपल्याला ओळखतात की नाही ते त्यांना पाहायचे होते .नकुल सहदेवाने त्या रेड्याला शंकर म्हणून ओळखले .भीमाने जावून आपली गदा त्या पळणार्‍या  रेड्याच्या पार्श्वभागावर मारली .आणि त्याचे शेपूट घट्ट पकडले .शंकराला हालचाल करता येईना .तेव्हा त्याने जमिनीमध्ये आपले(रेड्याने) तोंड खुपसले .त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर केवळ पार्श्वभागाचा त्रिकोणी भाग राहिला .

पांडवांनी आपल्याला बरोबर ओळखले व पकडले .त्याचप्रमाणे त्यांनी पुरेसे प्रयास सायास साहस धैर्य दाखविले.व  पुरेशी तपस्या केली .तेव्हा शंकराने त्यांना दर्शन दिले .त्यांना आशीर्वाद दिला .त्यांचे गोत्रहत्येचे व ब्रह्महत्येचे पाप नाहीसे झाले .येथे त्यांनी शंकराची मनोभावे पूजा केली . केदारनाथ मंदिरात पांडवच्या प्रतिमा आहेत .

केदारनाथ मंदिरात सर्वत्र  सामान्यतः असते त्याप्रमाणे शिवलिंग नाही.  केवळ त्रिकोणी आकाराची एक पिंडी आहे.शंकराने जमिनीमध्ये जे तोंड खुपसले ते नेपाळ येथे पशुपतीनाथ येथे बाहेर काढले.त्यामुळे केदारनाथ यात्रा पशुपतीनाथ यात्रेशिवाय पूर्ण होत नाही असा समज आहे.

आपण शंकराला गदा मारली म्हणून भीमाला फार दुःख व क्लेश झाले. त्याने तूप घेऊन ते त्या शंकररूपी रेड्याच्या  त्रिकोणी पार्श्वभागाला चोळले.त्यामुळे येथे पिंडीवर बेलपत्र फूल इत्यादी वाहण्याची प्रथा नाही.तर त्रिकोणी भागावर तूप चोळले जाते .

हल्लीचे मंदिर दहाव्या शतकात एका गढवाल राजाने बांधले. प्रशस्त चौथऱ्यावर मंदिर बांधलेले आहे .

केदारनाथ येथे कायम वस्ती पाच सातशे लोकांची असेल .तीही अर्थात कपाट बंद असते त्यावेळी म्हणजे थंडीच्या काळात नसते .परंतु रोज सरासरी पाच हजार भाविक दर्शनासाठी पाच सहा महिने येत असतात .जवळजवळ बारा हजार पाचशे फूट उंचीवर हे स्थान आहे.येथे प्रचंड थंडी नेहमीच असते .आम्ही सप्टेंबरमध्ये गेलो होतो. त्यावेळीही खोलीत शिरल्यावर फ्रिजमध्ये शिरल्या सारखे वाटले.थंडीमध्ये मंदिर बंद करून ठेवले जाते.बर्फवृष्टीने मंदिर थंडीमध्ये झाकून जाते .मे मध्ये बर्फ फोडून मंदिर मोकळे करावे लागते .मंदिर बंद करताना तुपाची ज्योत तेवत ठेवली जाते .भीमाने त्रिकोणी भागाला चोळलेल्या तुपाचे ते प्रतीक आहे.सहा महिन्यांनंतर जेव्हा पुन्हा दरवाजे उघडतात त्यावेळी ती ज्योत तशीच तेवत असते असे म्हणतात .त्या ज्योतीचे त्यावेळी दर्शन घेऊन भाविक धन्य होतात .थंडीमध्ये दरवाजे बंद करून मंदिर बंद करणे व पुन्हा उन्हाळ्यात ते उघडणे याला कपाट  बंद करणे व कपाट उघडणे असा शब्दप्रयोग वापरला जातो. जेव्हा केदारनाथ मंदिर थंडीमुळे बंद असते तेव्हा उखीमठ येथे केदारनाथाच्या पालखीची पूजा केली जाते .त्यावेळी केदारनाथ येथे येऊन राहतात अशी भावना आहे .

केदारनाथाचा चढ अत्यंत बिकट आहे .सृष्टी सौंदर्य अत्यंत रौद्र व भव्य स्वरूपाचे आहे .उजव्या बाजूला मंदाकिनीचे खोरे व डाव्या बाजूला उंच पहाड ,अशा चिंचोळ्या वाटेतून बर्‍याच  वेळा प्रवास करावा लागतो .जर पाय घसरला तर खोल खोऱ्यांमध्ये मंदाकिनी नदीमध्ये जलसमाधी निश्चित . खोरे इतके खोल आहे की नदी वाहण्याचा फक्त आवाज ऐकू येतो. मंदाकिनी दिसत नाही .पाच सहा तासांमध्ये आपण वर चढून जातो .किंवा डोलीवाले आपल्याला घेऊन जातात. त्या दिवशी तिथे वस्ती केली जाते.दुसऱ्या दिवशी सकाळी भाविक तिथून निघतात . डोलकरी, घोडेवाले, सर्व तिथे वस्तीला असतात.

केदारनाथ दर्शनाशिवाय तिथे विशेष काही पाहण्यासारखे नाही.सर्वत्र पटांगणा सारखा हिरवळीने व्यापलेला परिसर आहे.ते सर्वत्र दूरवर पसरलेल्या हिरवळीचे दृश्य छान वाटते .केदारनाथ मंदिराला पाठ लावून एक उंच कडा केदारनाथपर्वत आहे.त्याची उंची जवळजवळ तेवीस हजार फूट आहे .त्याच्या व आजूबाजूच्या सर्व पर्वतावर बर्फ नेहमीच असते.या पर्वतातील ग्लेशियरमधून मंदाकिनीचा उगम झालेला आहे .

दोन हजार तेरामध्ये जूनमध्ये येथे प्रचंड जलवृष्टी झाली.ढगफुटी झाल्यामुळे मंदाकिनीला एवढा प्रचंड पूर आला की त्यात मंदिर सोडून सर्व वस्ती वाहून गेली .ही घटना रात्री घडली .त्याच वेळी बर्फाचे कडे कोसळले .एक मोठा प्रचंड पाषाण मंदिराजवळ येऊन अडकला.त्यामुळे मंदाकिनीचे दोन प्रवाह झाले.मंदिर सोडून बाकी सर्व वाहून गेले. हजारो मृत्युमुखी पडले.केदारनाथ मंदिराच्या चौथऱ्याची हानी झाली .परंतु मंदिर संपूर्णपणे सुरक्षित राहिले .हाही एक चमत्कारच समजला जातो .या खोऱ्यामध्ये झालेल्या त्या वेळच्या हानीमध्ये सर्वात जास्त हानी केदारनाथ  येथे झाली.

केदारनाथ मंदिरा शेजारी आद्य श्री शंकराचार्यांची समाधी आहे .हे स्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे .शंकराच्या नावांमध्ये साधारणपणे ईश्वर किंवा नाथ हे आवर्जून असते .क्वचित उदाहरणार्थ मल्लिकार्जुन यांमध्ये नाथ किंवा ईश्वर नाही.

बद्रीनाथ येथे विष्णूचे प्रमुख स्थान असूनही नाथ आहे कारण येथे विष्णू व शिव एकत्र नांदतात अशी समज आहे .

*अापण भाविक असा किंवा नसा यात्रा म्हणून किंवा पर्यटन म्हणून पण एकदा केदारनाथ मंदिराला अवश्य भेट दिली पाहिजे*   

७/४/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel