गौतमी नावाच्या महिलेचा मुलगा मरण पावला. दुःखाने व्याकुळ झालेली ती रडत महात्मा बुद्धांजवळ पोहोचली.
ती त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली, "काही तरी करा आणि माझ्या मुलाला पुन्हा जिवंत करा. काहीतरी चमत्कार करा एखाद्या मंत्राचे पठण करा की माझा बाळ पुन्हा उठेल.”
महात्मा बुद्धांनी शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि म्हणाले,
" गौतमी, दु:ख करू नकोस. मी तुझ्या मृत मुलाला पुन्हा जिवंत करेन. यासाठी मला काही मोहरीचे दाणे हवे आहेत आणि ते अशा एखाद्या घरातून हवे आहेत ज्या घरात आजवर कोणीच मेला नाही."
हे ऐकून गौतमी थोडी शांत झाली आणि लगेच ती गावाच्या दिशेने धावली आणि एक घर शोधू लागली जिथे कोणी मरण पावले नव्हते. गौतमीने बरीच वणवण केली. खूप शोध घेतला. पण तिला असे कोणतेही घर सापडले नाही.
शेवटी ती निराश होऊन परत आली आणि महात्मा बुद्धांना म्हणाली, "प्रभु, एकही घर नाही जिथे कोणीही मेलेले नाही."
हे ऐकून महात्मा बुद्ध म्हणाले, "गौतमी, आता तुला लक्षात आलेच असेल की अशी संकटे केवळ तुझ्यावरच आली नाहीत, जगात नेहमी असेच घडते आणि लोक धीराने आपल्या वाट्याला आलेले दुःख सहन करतात."