बर्‍याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल
                               
न गणस्याग्रतो गच्छेत्सिद्धे कार्ये समं फलम् |
यदि कार्यविपत्तिः स्यात्‌ मुखरस्तत्र हन्यते ||

जमावाच्या पुढे [मोर्चात प्रथम] जाऊ नये. काम झालं तर सगळ्यांना सारखाच वाटा मिळतो. [म्हणजे फायदा असं काहीच नाही] पण काही उलट घडलं तर पुढचा माणूस मारला जातो. 

हे सर्वच चरण कठीण आहेत त्यातल्या त्यात  शेवटचा चरण लक्षात ठेवणे शक्य आहे .---मुखरस्तत्र हन्यते---

हल्लीच्या काळी विशेष करून बरेच जण तरुणांना  भरीला घालतात आणि पुढे ढकलतात असा अनुभव आहे. मोर्चात पुढे असणारे लाठ्या खातात  ,गोळ्या खातात ,मरतात आणि त्यांना पुढे पाठवणारे सुरक्षित राहतात . आपल्याला भरीला घालणारे कोण आहेत त्यांचा हेतू काय आहे हे लक्षात घेऊन अापण काय करावे ते ठरविले पाहिजे .आपल्याला पुढे करणारे आपले कौतुक करतात पाठ थोपटतात बरोबरीने वागवतात  म्हणून पुढे जाणे योग्य नव्हे .जर हेतू साध्य झाला तर सर्वांनाच फायदा होतो.सुरक्षित अंतरावर बसून चिथावणी देणार्‍याना, तथाकथित नेत्यांना ,जास्त फायदा होतो .परंतु जर काही विपरीत घडले तर पुढे असणार्‍याना ,तुरुंगवास लाठीमार गोळ्या शिव्या सर्व काही खावे लागते .थोडक्यात उगीचच पुढे पुढे करणे  मिेरवणे गोत्यात आणू शकते .

             स्मरणीय
        मुखरस्तत्र हन्यते

२३/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel