बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे , व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्हास झाल्यामुळे बर्याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही . पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास या प्रयोगामुळे संस्कृत सुभाषिते माहीत होतील .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक भाषा कमनीय व सौष्ठवपूर्ण होईल.
१
कॉऽतिभारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम् ।
को विदेशस्तु विदुषां कः परः प्रियवादिनाम् ॥
समर्थ कितीही भार सहन करू शकतात . व्यवसाय करणारा जवळचे किंवा दूरचे स्थान न पाहता आपला व्यवसाय करतो.
विद्वानाला परदेशात [ राहणं फार कठीण जात ] नाही. गोड बोलणाऱ्याना कोणी परका वाटत नाही.
यातील --क; पर:प्रियवादिनाम् --हा चरण मला महत्त्वाचा वाटतो.
इतर चरण वस्तुस्थितीचे थोडय़ा बहुत प्रमाणात वर्णन करणारे आहेत .समर्थ म्हणजे शारिरिक बौद्धिक नैतिक समर्थता होय .किंबहुना ही तिन्ही जेव्हा एकत्र असतील तेव्हाच त्याला वा तिला समर्थ शब्द खऱ्या अर्थाने वापरता येईल .कोणत्याही क्षेत्रात काम करताना अर्थातच ही सर्व आवश्यक आहेत.अशी समर्थ व्यक्ती सर्व प्रकारचा भार सहज सहन करू शकते .
.जर कोणीही व्यावसायिक घेतला तर त्याला कोणताही प्रदेश आपला किंवा दूरचा त्याज्य नाही.तो कुठेही जाऊन यशस्वी व्यवसाय करू शकतो .
हे आपल्याला पंजाबी सिंधी मारवाडी गुजराथी लोकांच्या उदाहरणांवरून सहज लक्षात येते हे लोक आपल्या देशात किंवा परदेशात जाऊन यशस्वी व्यवसाय करताना आढळतात .
जो विद्वान आहे तो कुठेही जाऊन आपला जम बसवू शकतो .विद्वान सर्वत्र पूज्यते हे लक्षात ठेवण्यासारखे आहे .
चौथा चरण --क: प्रिय :परिवादिनाम्-- याप्रमाणे गोडबोले सर्वांनाच आवडतात .समर्थ ,व्यवसायी व विद्वान जर गोडबोले असतील तर त्यांचा प्रकाश व प्रभाव जास्त पडेल .या तिन्हीपैकी काहीही नसले (कमी प्रमाणात असले) तरीही असा मनुष्य(गोडबोले ) सर्वांना प्रिय वाटतो. तो सर्वांना आपलेसे करून घेतो .तो सर्वांना प्रिय होतो .
स्मरणीय
क:पर: प्रियवादिनाम
२
यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्वमविवेकिता |
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ||
तारुण्य, श्रीमंती, सत्ता आणि अविचार यापैकी एकटी गोष्ट सुद्धा अनर्थ करण्यास पुरेशी आहे तर जेथे चारही असतील तेथे अनर्थ घडेल हे काय सांगावयास पाहिजे?
याचा अर्थ सहज सोपा आहे आपल्याला श्रीमंत , सत्ताधारी, कोणत्याहि प्रकारचा अविवेक करताना नेहमीच आढळतात.तरुणाला गद्धेपंचविशी असे म्हणून तो कसा असतो हे सर्वांनाच माहित आहे .अर्थात सर्वच तरुण तसे असतात असे नाही व काही वेळा काही प्रमाणात अविवेक आवश्यक असतो हेही विसरून चालणार नाही .अविचारी लोकांबद्दल तर बोलण्याचे कारण नाही ते केव्हाही काहीही करू शकतात .सत्ताधार्यांच्या तरुण मुलांचे प्रताप अापण अनेकदा वाचत असतो .--यत्र चतुष्टयम् एवढे म्हटले तरी सर्व लक्षात येते
स्मरणीय
यत्र चतुष्टयम्
३०/८/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com