प्रास्ताविक                                        

एक नवीन कल्पना घेऊन काही पोस्ट लिहिण्याचा विचार आहे .बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक  भाषा कमनीय व सौष्ठवपूर्ण   होईल      
                       
                   १            
वितरति यावद्दाता तावत्सकलोऽपि भवति कलभाषी |
विरते पयसि घनेभ्यः शाम्यन्ति शिखण्डिनां ध्वनयः ||

उदार मनुष्य जोपर्यंत दान करत असतो तो पर्यंत सर्वजण [ त्याच्या बद्दल] गोड बोलत असतात. [त्याला गरिबी आल्यावर किंवा तो देत नाही म्हटल्यावर कोणी तसं गोड बोलत नाही.] मोरांचा केकारव ढगातील पाणी संपल्यावर थांबतो .   

      ----शाम्यन्ति शिखण्डिनां ध्वनयः ||. ----हा चरण लक्षात राहण्यासारखा आहे .समानार्थी एक चरण मला आठवतो .- मृदंगो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम्--लोक, त्यात काही तथाकथित मित्रआणि काही नातेवाईकही आले .जोपर्यंत स्वतःचा फायदा आहे तोपर्यंत उदो उदो  गुणवर्णन व स्तुती करीत राहतात .फायदा होत नाहीसा झाला की मग ढुंकूनही पाहत नाहीत .एरवी आदराने या बसा करणारे ,अापण आल्यावर उठून उभे राहणारे ,स्टेजवर आपल्याला खुर्ची देणारे,लाभ होणार नाही असे लक्षात आल्यावर बघून न बघितल्यासारखे करतात .यासाठी उपमा मोराची दिलेली आहे जोपर्यंत पाऊस पडत असतो तो पर्यंत मोर केकारव करीत असतो .मृदंगाला चांगला आवाज देण्यासाठी (बहुधा चरबीचे )लेपन करावे लागते .त्यानंतर त्याचा आवाज  खुलतो.लोक आपल्याला मान देत आहेत ,कौतुक करीत आहेत ,आदर दर्शवित आहेत ,याने हुरळून न जाता त्याचे कारण लक्षात ठेवले पाहिजे .आपण खरेच मोठे झालो अश्या भ्रमात राहता कामा नये .स्तुती करणारे लोक खरेच आपले सुहृदआहेत अशा भ्रमात राहता कामा नये .आपण खरेच अद्वितीय  आहोत असा गैरसमज करून घेता कामा नये .खरे सुहृद कोण हे ओळखता आले पाहिज     
       
                   २                  
दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् |
बलं मूर्खस्य मौनित्वं चौराणामनृतं बलम् |

राजा [शासनसंस्था] ही दुबळ्यांची ताकद आहे. लहान मुलांची ताकद म्हणजे त्याचं रडणं. गप्प बसणं ही मूर्खांची ताकद आहे आणि खोटेपणा ही चोरांची ताकद आहे.

-- दुर्बलस्य बलं राजा-- राजा कसा असला पाहिजे हे सांगितलेले आहे असे मला वाटते .लोकशाहीच्या काळात राजा म्हणजे शासन यंत्रणेतील खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व अधिकारी वर्ग येतो .हातात सत्ता आहे म्हणून कसेही वर्तन न करता दुर्बलांचे रक्षण  जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .अत्याचारी लोकांपासून दुर्बलांचे रक्षण केले पाहिजे .दुर्बलांना राजा (शासन यंत्रणा )आपला आहे 'तो आपल्या मदतीसाठी केव्हाही धावून येईल ,अशी खात्री पाहिजे .तसा त्यांचा अनुभव पाहिजे .
मौनं सर्वार्थ साधनम् असा एक वाक्प्रचार आहे.शहाणे लोक बऱ्याच वेळा  गप्प बसतात . त्याचप्रमाणे मुर्खांनी गप्प बसले पाहिजे म्हणजे ते शहाणे आहेत की नाही त्याचा सुगावा इतराना लागणार  नाही.काही बडबड केली तर त्यांच्या कुवतीचा सर्वांना लगेच सुगावा लागेल .म्हणून गप्प बसणे ही मुर्खांची ताकद आहे .उरलेल्या दोन चरणांचा अर्थ साधा सोपा व सरळ आहे .लहान मुले रडली की आपण त्यांची मागणी बऱ्याच वेळा पूर्ण करतो .आणि चोर चेहऱ्यावरील हावभाव न बदलता सराईतपणे खोटे बोलण्यात कुशलअसेल तर   त्याची चोरी शोधून काढण्यास कठीण पडेल .सराईतपणे न गांगरता खोटे बोलणे ही त्याची ताकद असेल .

               स्मरणीय 
१)शाम्यन्ति शिखण्डिनां ध्वनयः |
  २) दुर्बलस्य बलं राजा        

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel