एका गावात एक त्यागी महात्मा राहत होते. एकदा एक इसम त्यांच्याकडे दोन हजार सोन्याची नाणी घेऊन आला आणि म्हणाला, "महाराज, माझे वडील तुमचे मित्र होते. आपल्या कृपेने आणि मार्गदर्शनाने त्यांनी पुष्कळ धन योग्य मार्गाने कमावले. त्यातील काही द्रव्य आपणास द्यावे म्हणून मी आपल्याकडे आलो आहे." असे म्हणत इसमानी धनाची थैली महात्म्यांसमोर ठेवली.
महात्मा त्यावेळी मौन होते, काही बोलले नाहीत. नंतर त्यांनी आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाले , "बेटा, त्या सज्जनाला धनाची थैली परत दे. त्याला सांग, त्याच्या वडिलांसोबत माझे पारमार्थिक आणि मैत्रीचे प्रेम होते, त्यांच्या पैशामुळे मी त्यांचा मित्र नव्हतो.”
हे ऐकून मुलगा म्हणाला," बाबा! तुमचे हृदय कोणत्या मातीचे बनलेले आहे? तुम्हाला माहिती आहे, आपले कुटुंब मोठे आहे आणि आपण काही फार गडगंज श्रीमंत नाही. जर त्या सदगृहस्थाने न मागता धन दिले असेल तर तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांचा विचार करून ते स्वीकारा. "
महात्मा म्हणाले, "बेटा, तुझी इच्छा आहे की माझ्या कुटुंबातील सदस्यांनी या पैशावर मजा करावी आणि मी माझे दैवी प्रेम विकून टाकावे ? त्या बदल्यात सोन्याची नाणी घेऊन दयाळू देवाचा अपराधी बनू? नाही, मी ते कधीही करणार नाही. मला क्षमा कर"
हे ऐकून इच्छा नसतानाही त्यांच्या मुलाला ते धन त्या व्यापाऱ्याला परत करावे लागले.