एकदा संत नामदेव यांच्या सत्संगात श्यामनाथ नामक गृहस्थ आपला मुलगा तात्या याला घेऊन आले.
श्यामनाथ कट्टर धार्मिक आणि सत्संगी वृत्तीचे होते, तर त्यांचा मुलगा धार्मिक कार्य आणि साधू -संतांच्या सहवासा पासून दूर पळत असे.
श्यामनाथ नामदेवांच्या पायावर डोके टेकवत म्हणाले, "महाराज, हा माझा मुलगा तात्या आहे. तो दिवसभर तस्करी आणि भटकंती आशा कामांमध्ये वेळ घालवतो. तो सत्संगाच्या नावाने खडे फोडतो. कृपया त्याला मार्गदर्शन करावे."
संत नामदेव यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर ते त्या दोघांना मंदिराच्या मागच्या भव्य सभा मंडपात घेऊन गेले. एका कोपऱ्यात कंदील जळत होता. त्याचा मंद प्रकाश सभा मंडपात पसरला होता.पण संत नामदेव त्या दोघांना कंदिलापासून दूर दुसऱ्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात घेऊन गेले.
तेव्हा तात्या म्हणाला, "महाराज, इथे या अंधाऱ्या कोपऱ्यात का? तेथे कंदिलाजवळ जाऊया का? तिथे आपल्याला कंदिलाचा योग्य प्रकाशही मिळेल आणि आपण एकमेकांना पाहू शकू."
हे ऐकून नामदेव हसले आणि म्हणाले," बेटा, तुझे वडीलही तुला रात्रंदिवस हेच समजावत असतात. ज्याप्रमाणे कंदिलाजवळ जाऊनच आपल्याला प्रकाश मिळतो. आपण मात्र अंधारात हात पाय मारत राहतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक आणि व्यावहारिक ज्ञान आपल्याला केवळ संतांच्या सहवासात मिळते. आपल्या रिक्त किंवा मलीन मनाला सत्संग आवश्यक आहे. संत हे आपल्या मार्गातील पथदर्शक दिव्याप्रमाणे आहेत."
संत नामदेव यांनी दिलेल्या अचूक आणि उत्स्फूर्त ज्ञानामुळे तात्याचा आत्माही प्रकाशमान झाला आणि तेव्हापासून तो संत नामदेव यांचा शिष्य बनला.