रात्रीची वेळ होती. मी दोन गड्यांबरोबर घरी परतत होतो .काळोखी रात्र होती चांदण्या चमचम करीत होत्या .आमच्या गावाला येतांना सड्यावर( डोंगर पठारावरील उंच सखल केवळ कातळ म्हणजे दगड असलेला भाग ))आम्ही तिघेही भराभर चालत होतो .अगोदर बराच चढ आहे.त्या काळात सुमारे पासष्ट वर्षापूर्वी या रस्त्यावर दिवसाही कोणी भेटणे शक्य नव्हते .रात्री कोणी भेटणे शक्यच नव्हते (.आणि हल्ली तर मोटारीचा चांगला रस्ता बसेसची सोय मोटारसायकली मोटारी इत्यादीमुळे हल्ली त्या रस्त्याने वाघांशिवाय दुसरा कुणी जात असेल की काय याबद्दल मला शंका आहे ) आम्ही एका मागोमाग एक गडगे(दगडी कंपाउंड) ओलांडत जात होतो .घरी काळजी करीत असतील म्हणून ,आणि रात्रीची वेळ असल्यामुळे , गती जरा जास्तच होती .काळोखी रात्र असल्यामुळे तार्यांच्या प्रकाशात रस्ता अंधुक दिसत होता .एवढ्यात लांब गडग्याच्या पलीकडे गवतावरून कुणीतरी दबक्या पावलांनी चालत असल्याचा आवाज आला.आम्ही चपापलो .काळोखात काहीच दिसत नव्हते .गडी म्हणाले जनावर आहे .जनावर याचे दोन अर्थ होतात पहिला वाघ बिबट्या तरस इ. दुसरा सापाचा एखादा प्रकार.येथे जनावर म्हणजे वाघ वगैरे .आम्ही आमची गती वाढवली .मोठमोठ्याने बोलण्याला सुरुवात केली .पलीकडचे जनावरही आमच्या बरोबर गडग्याच्या पलीकडून चालत होते . चढ संपला. आम्ही उताराला लागलो.आमची गती स्वाभाविकपणे वाढली .पलीकडून गवतावरूनही घसघस आवाज येत होता कोण ते दिसत नव्हते. समुद्रावरून छान वारा येत होता. नेहमीप्रमाणे उल्हसित वाटत नव्हते. रात्रीच्या अंधुक प्रकाशात लांबवर दोन डोंगर, त्यामध्ये समुद्र किनारा व किंचित पाण्याची फेसाळलेली कडा दिसत होती .आकाशात चांदण्या चमचम करत होत्या.वाट नेहमीची होती.वाऱ्यावर घाम सुकून अल्हाद वाटण्याऐवजी आणखी घाम फुटत होता !. सौंदर्यही नेहमीचे होते परंतु आमचे तिकडे लक्ष नव्हते .दगड गोट्यांचा वाटेतून डावीकडे सतत नजर ठेवीत व मोठ्याने बोलत आम्ही चालत होतो . जनावरही पलीकडून चालत होते. नक्की कोण आहे ते कळत नव्हते.तेवढ्यात गडग्यापलीकडून दोन तेजस्वी दिवे चमकले.दोन तेजस्वी बॅटऱ्या एखादा फूट अंतरावरून लांबून प्रज्वलीत व्हाव्या त्याप्रमाणे ते दृश्य दिसत होते.तो आमच्याकडे अगोदरही पाहत असावा परंतु उंच गडग्यामुळे त्याचे डोळे दिसत नव्हते.त्या दोन तेजस्वी बॅटर्या पलीकडून आमच्या बरोबर चालत होत्या. अगोदर उंच गडग्यामुळे तो दिसत नव्हता.आता गडगा सखल असल्यामुळे तो दिसत होता .आत्तापर्यंत वाघ मी पिंजऱ्यात, सर्कशीमध्ये,पण पूर्ण उजेडात पाहिला होता .काळोखात उघडय़ावर आणि नुसते डोळे पाहण्याची वेळ पहिलीच होती. (प्राण्यांचे डोळे अंधारात चमकतात हे मला माहीत नव्हते बैल इत्यादीचेही डोळे अंधारात चमकातात ).ते दोन डोळे आणि आम्ही चालणारे तिघे याशिवाय जगाचे भान नव्हते .एवढ्यात आमची गुळ्याची घाटी आली .तो लांबवर गुरगुरला आणि उड्या मारून लांब जात आहे असे वाटले .दिसले काहीच नाही .घाटी उतरताना तो झाडीतून आमच्यावर उडी तर मारणार नाही ना असे वाटत होते .आपण वाघाला घाबरतो तसा तो आपल्यालाही घाबरतो हे माहित असूनही आठवत नव्हते. आणि हे त्याला माहीत नसले तर असाही विनोदी विचार मनात चमकून गेला !घाम फुटणे, छाती धडधड उडणे, हे वाक्प्रचार अगोदर ऐकले होते ,आज ते मी अनुभवत होतो !!!अनेकदा मी अनेक सड्यावरून रात्रीचा चालत आलो आहे. परंतु असा अनुभव पुन्हा कधी आला नाही .
१८/६/२०१८ ©प्रभाकर पटवर्धन .
pvpdada@gmail.com