गेली दहा पंधरा वर्षे मला हाय बीपीच्या गोळ्या चालू आहेत .
मधूनमधून डॉक्टरांना भेटून बीपी चेकिंग करीत असतो व त्यांच्या सल्याप्रमाणे औषधात योग्य ते बदल केले जातात .चार पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे वेळ सकाळची होती. चहा नुकताच घेतला होता. बाहेरच्या खोलीत डायनिंग टेबलजवळ खुर्चीवर बसलो होतो.एकाएकी डोके प्रचंड हलके झाले अत्यंत अस्वस्थ वाटू लागले.हातापायातील त्राण गेले .सकाळची वेळ असल्यामुळे सर्व घरातच होते. मी त्यांना मला प्रचंड अस्वस्थ वाटत आहे असे सांगून कसाबसा लटपटत येऊन आमच्या खोलीत कॉटवर येऊन आडवा झालो . माझा चेहरा बघून सर्वांची धावपळ उडाली .मला खूप उकडत होते .पंखा फुल्ल स्पीड ठेवण्यात आला .प्रभंजन(मुलगा) ने मला प्रथम सॉरबिट्रेटच्या गोळ्या दिल्या .हातपाय गार पडत होते .दिपाली (सून)माझे पाय चोळत होती .प्रभा (पत्नी )हात व डोके चोळत होती .वेदव्रतने (नातू)इलेक्ट्रॉलचे पाणी करून मला चमच्याने थोडे थोडे पाजण्यास सुरुवात केली होती .सिद्धार्थ लहान होता तो घाबरून उभा होता .मला तोंड उघडण्याचे अवसान नव्हते.वेद दादा घ्या म्हणून आग्रह करीत होता .मी किंचित तोंड उघडत होतो.त्याने तोंडात घातलेले इलेक्ट्रॉलचे पाणी पिण्याचेही मला अवसान नव्हते. इच्छा नव्हती.गिळता येत नव्हते .मोठ्या कष्टाने गिळत होतो.गळ्याचे स्नायू काम करीत नव्हते .एवढय़ात मला शौचाची घाई लागली .मी नेहमी शौचासाठी गोळी घेतो .मला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. मी कसाबसा धडपडत शौचाला जाऊन पटकन आलो .गादीवर धाडदिशी आडवा झालो .माझी एकूण अवस्था बघून प्रभंजन खूप घाबरला .त्याने स्वातीला लगेच फोन लावला व सर्व हकीकत सांगितली .स्वाती व विकास(मुलगी व जावई )ताबडतोब आमच्या घरी आले .विकासने लगेच डॉक्टरना फोन लावला .त्याने परिस्थिती सांगितल्यावर ते लगेच घरी आले. डॉक्टर त्याचे मित्र असल्यामुळे हे शक्य झाले .त्यांनी प्रथम ईसीजी काढला तो नार्मल असावा .नंतर त्यांनी बीपी बघितले ते बरेच खाली गेलेले असावे .त्यांनी विकास व प्रभंजन याना मला लगेच जिथे आयसीयूची व्यवस्था आहे अशा हॉस्पिटलमध्ये आडव्या अवस्थेत हलवण्यास सांगितले .कोणत्याही परिस्थितीत बसते करावयाचे नाही असे बजावून सांगितले .स्ट्रेचर जिन्याने नेत्यांना डोके पुढे अशी स्थिती पाहिजे म्हणून सांगितले म्हणजे डोक्याकडे रक्त प्रवाह जास्त राहिल.कारण तसे न केल्यास मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होईल व त्याचा मेंदूवर परिणाम होईल असे सांगितले .प्रभंजनने लगेच डॉक्टर गुप्ते यांच्याकडे फोन लावला. आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो.त्यांची अॅम्ब्युलन्स आहे.ती लगेच आली .स्ट्रेचर गादीवर ठेवले . मला दोघा तिघांनी उचलून स्ट्रेचरवर ठेवले .स्ट्रेचर अँम्बुलन्समध्ये व अॅम्बुलन्स हॉस्पिटलच्या दिशेने निघाली.मी जरी निश्चेष्ट अवस्थेत पडलो होतो तरीही माझा मेंदू तरतरीत होता व चाललेल्या घटनांची नोंद व्यवस्थित करीत होता .आत खोलवर कुठेतरी सगळ्या घटनांची गंमत वाटत होती.अशाही परिस्थितीत मला माझ्या मेंदूचे कौतुक वाटत होते . गाडीत माझ्याबरोबर प्रभंजन स्वाती बसले आणि दिपाली विकास वगैरे स्कूटरवरुन पाठोपाठ आले .
अॅम्ब्युलन्स निघाली परंतु सायरन सुरू केला नाही . मी मनात सायरन का सुरू केला नाही असा विचार करीत होतो तोच
सायरन सुरू झाला व मला हायसे वाटले . सिनेमात अश्या घटना अनेकदा बघितल्या होत्या.आता ती मी प्रत्यक्ष अनुभवत होतो .आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. स्ट्रेचर हातगाडीवर ठेवण्यात आले.त्याबरोबर एक डॉक्टर व हेल्पर्स चालत होते.अगोदर फोन केलेला असल्यामुळे सर्व तयारीतच होते .आयसीयू मध्ये गेल्यावर सलाईन त्यातून औषधे विविध चाचण्या मोठे डॉक्टर येणे वगैरे गोष्टी सुरू झाल्या.
स्ट्रेचर हातगाडीवर घेतल्यावर लिफ्टमध्ये जाण्या अगोदर माझी परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी मला कसे वाटते असे विचारले त्यावर मी सिनेमासारखे वाटत आहे असे सांगितले .डॉक्टरांच्या व इतरांच्या चेहर्यांवरचे भाव मला पाहण्यास मिळाले नाहीत कारण मी आडवा होतो.माझ्या उत्तराने त्यांना परिस्थिती एकूण व्यवस्थित नियंत्रणात आहे असे वाटले असावे .
सर्व चाचण्यानंतर सोडियम कमी आहे असे आढळून आले .सोडियम सलाइनमधून लावण्यात आले. दोन तीन बाटल्यांमध्येच मी नॉर्मलला आलो .अशक्तपणा खूप आला होता.दोन दिवसात मी घरी परत आलो .आठ दहा दिवस बीपी वरील औषधे पूर्ण बंद होती मिठाचा खूप वापर करण्यास सांगितले . .नंतर बीपी वरील अौषध बदलून दिले . पंधरा दिवसांत मी जवळजवळ पूर्वस्थितीला आलो शरिराची एक केमिस्ट्री असते त्यात जरासा बदल होताच इकडचे जग तिकडे होते .घरातील माणसाना व इतराना काय वाटले ते मला माहित नाही .या सर्व घटनांमध्ये मी कमालीचा शांत व स्थिर होतो .मृत्यू आला तरी उत्तम न आला तरी उत्तम अशी मनस्थिती होती .अशा शांत मन:स्थितीचे माझे मलाच आश्चर्य वाटत होते .घटना घडत असतात त्या पूर्वनियोजित असतात की नाही माहीत नाही .सकाळच्या वेळी मला त्रास होणे . त्यावेळी सर्वजण घरी असणे.डॉक्टर ताबडतोब उपलब्ध होणे.ते घरी येणे . त्यांनी योग्य सल्ला देणे . अॅम्बुलन्स वगैरे सर्व गोष्टी उपलब्ध होणे .मी या एक तासात व्यवस्थित राहणे .या सर्व साखळीमध्ये एखादा दुवा जरी कच्चा निघाला असता तरीही माझे काही खरे नव्हते .लो बीपी काय चमत्कार घडवून आणतो ते अनुभवास आले .शरिराची केमिस्ट्री आश्चर्यजनक आहे (.केमिकल लोच्या झालाहोता.) त्याचप्रमाणे सेल्फ बॅलन्सिंग ही आश्चर्यकारक आहे.घटना घडायच्या त्या घडत असतात आपल्या नियंत्रणात काही नसते एवढी समज आली तरी पुरे . तत्वज्ञान सर्वच सांगतात . ते आपल्यामध्ये किती मुरले आहे ते अशा बिकट परिस्थितीत लक्षात येते .
१५/७/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com