रत्नागिरीपासून सुमारे अठरा वीस किलोमीटरवर दक्षिणेला गणेशगुळे नावाचे गाव आहे .तिथे आगर गुळे विभागात आमचे घर आहे .साधरण गावाच्या मध्यभागी आमचे घर आहे .
हल्लीचे मूळ घर आमच्या खापर पणजोबांनी बांधले.हल्लींचे घर मूळ घराच्या अर्धे आहे .त्यांचे पुनरुज्जीवन एकदा एकोणीसशे तीस साली व त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन साली झाले .भाउबंदापैकी एकाने रत्नागिरीला घर बांधण्याचे ठरविले .त्याने अर्धे घर कापून ते सामान गलबतात भरून रत्नागिरीला नेले .घर विकत द्यायलाही तो तयार नव्हता .उरलेले घर पावसात भिजून सडून पडून गेले असते .त्याची दुरुस्ती अत्यावश्यक होती .अनेक भाऊ बंदापैकी कोणालाच त्या घराची गरज नव्हती.भाऊंनी (वडिलानी)कर्ज काढून त्या घराची दुरुस्ती माझ्या जन्मापूर्वी एकोणिसशे तीस मध्ये केली.त्या वेळी भाऊ शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेवर नोकरी करीत होते .भाऊंची एक आवडती म्हण होती घर आहे तर धर आहे .पुढे भाऊ निवृत्त झाल्यावर एकूण सशेअठ्ठेचाळीस साली आम्ही घरी रहावयाला आलो.एकोणीसशेअठ्ठावन साली संपूर्ण घर पाडून त्यातील निवडक सामान घेऊन व भरीला लागेल तेवढे नवीन सामान घेऊन घर पुन्हा त्याच जागी बांधण्यात आले .त्यानंतर वेळोवेळी घराचे पुनरुज्जीवन मी गरजेप्रमाणे केले.
अठराशे सत्तावनसालच्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रज त्यांच्या पद्धतीप्रमाणे सर्व्हे नंबर पोट नंबर मालकी हक्क इत्यादी निश्चित करीत होते .माझे खापरपणजोबा त्यावेळी सर्व्हे मामलेदार म्हणून कर्नाटक विभागात काम करीत होते .निवृत्त झाल्यावर .शहरात कायमचे स्थिर होण्याचे न ठरविता ते आपले मूळगाव गुळे येथे आले .तेव्हा कोणीही साधारणपणे कुठेही नोकरी करीत असले तरी आपल्या मूळगावी येऊन राहण्याची पद्धत होती . त्यांचे बंधू इथेच होते. त्यांच्या जवळ निम्मा वाटा न मागता त्यांनी फक्त मूळ वडिलोपार्जित जागेपैकी एक जमिनीचा तुकडा घर बांधण्यासाठी मागितला .त्यावेळी हल्ली घर आहे ती जमीन शेत जमीन होती .त्याला गयाळ असे नाव होते गयाळ म्हणजे गचाळ .तिथे घर बांधले .बाजूला सुमारे एक एकर जागेला कंपाऊंड म्हणजेच गडगा घालून त्यामध्ये कलमे लावली .विहीर बांधिली.त्या काळात त्यांना शंभर रुपये पेन्शन होते .तो काळ म्हणजे सुमारे एकोणीसशेसाल .त्या वेळी पाच रुपये तोळा सोने होते असे ऐकलेले आहे. म्हणजे स्वस्ताईची कल्पना येईल .त्यानी गावात खूप जमिनी खरेदी केल्या. पुढे त्या आल्या तश्या गेल्या .तो एक स्वतंत्र विषय आहे .ते दीर्घायुषी होते त्यांनी तेहतीस वर्षे नोकरी केली .पुढे तेहतीस वर्षे पेन्शन उपभोगिले.
घरा शेजारी आमच्या मालकीचे एक दत्त मंदिर आहे .त्याचेही वेळोवेळी पुनरुज्जीवन झालेले आहे .आता चिर्याच्या भिंती मंगलोरी कौले व व्यवस्थित घुमटी व आंत दत्त पादुका आहेत.त्याचीही कथा सांगण्यासारखी आहे .
आमचे पूर्वज चारशे पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा केव्हा इथे रहाण्याला आले त्या वेळी त्यांचा स्थानिक लोकांशी संघर्ष झाला व त्यात एका प्रमुखाचा मृत्यूही झाला .पुढे त्याचा काही त्रास आमच्या त्यावेळच्या पूर्वजांना होऊ लागला .त्यांनी कोणा साधूला त्यावर उपाय विचारला. त्याने प्रमुखाचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला तिथे दिवा सतत तेवत असला पाहिजे असे सांगितले !दिवा विझू नये म्हणून त्या काळी छोटीशी घुमटी बांधण्यात आली .घुमटीत दत्त पादुका ठेवण्यात आल्या. कारण दत्तगुरूमुळे मृतात्म्यांचा त्रास होत नाही.पुढील पिढ्यांसाठी दिवा लावण्याला कारणही निर्माण झाले .तिथे सतत दिवा तेवत ठेवला जाई ,असे पूर्वजांकडून ऐकलेले आहे .ही घुमटी गयाळात म्हणजे खापरपणजोबांनी जी जागा घर बांधण्यासाठी घेतली तिथे होती .तिथेही नेहमी दिवा लावला जाई .आमच्या घराण्यात दत्त उपासना पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे .मागील पिढयांपैकी कित्येक जण गाणगापूरला जाऊन करतल भिक्षा तरुतल वास:अशा पद्धतीने कित्येक वर्षे राहिलेले आहेत. पुढे कधीतरी हल्लीचे मंदिर बांधले गेले .पहिले मंदिर त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे मातीच्या भिंती व खापरी नळेअसे होते .चिर्यांच्या भिंती मंगलोरी कौले व सुबक घुमटी खाली कोबा हे नंतर मी केले.दत्त मंदिरा बद्दल आणखी एक आठवण सा्गण्यासारखी आहे .मध्यरात्री महापुरुष आमच्या विहिरीवर स्नान करतो .नंतर दत्त पूजा करतो. त्या वेळी प्रथम तो घंटा वाजवितो।भाऊंनी ती घंटा रात्री अनेकदा ऐकलेली आहे .त्यांनी घराच्या रेज्यामधून महापुरुषाला पाहण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना तो दिसू शकला नाही .पुढे केव्हा तरी आम्ही देवळात झोपण्यासाठी गेलेलो असताना भाऊंनी देवळाचा दरवाजा उघडा ठेवण्यास सांगितला .मध्ये महापुरुषांसाठी रस्ताही ठेवण्यास सांगितले .तो आपलाच महापुरुष असल्यामुळे तो आपल्याला काही करणार नाही असेही सांगितले .आमची घाबरगुंडी उडाल्यामुळे आम्ही लगेच गाद्या गुंडाळून तिथून पळ काढला.!!
आमच्या घराला पहिल्यापासून आत येण्यासाठी बैलगाडीचा रस्ता अाहे.हल्ली मोटारीचा रस्ता कंपाउंडबाहेरून गेलेला आहे .त्यामुळे मोटार अगदी घरापर्यंत येते .पूर्वी फक्त न्हाणीघर होते परंतु संडास बाहेर लांब होता .आता या आधुनिक पद्धतीप्रमाणे टॉयलेट ब्लॉक कमोडसह घराला जोडून बांधला अाहे.समुद्र घरापासून एका हाकेच्या अंतरावर आहे .समुद्राची गाज रात्री ऐकू येते दाट झाडीमुळे समुद्र दिसत नाही .पूर्वी पाच मिनटात समुद्रावर पोचता येई हल्ली जरा लांबून जावे लागते.
७/६/२०१८ © प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com