उन्हाळ्याचे दिवस होते।आम्ही सर्व अंगणात बसलो होतो .पौर्णिमेची रात्र होती. स्वच्छ चांदणे सर्वत्र पसरले होते .एकोणीसशे साठ एकसष्ट साल असावे.

सुट्टी असल्यामुळे आते भाऊ ,मामे भाऊ ,वगैरे  आलेले होते .जेवण झाल्यावर भाऊ अंगणात येऊन तोंड धुवत होते .त्यांचा एक दात अगदी पडण्याला आला होता .तो जेवताना, गुळण्या करताना  ,सारखा मध्येमध्ये येऊन त्रास देत होता. केव्हाही पडेल असे वाटत होते परंतु पडत मात्र नव्हता.त्याचा बाकी काही त्रास नव्हता दंतवैद्याकडे जाऊन काढण्याची गरज नव्हती . त्या काळी एखादा दंतवैद्य  रत्नागिरीला असेल नसेल.रत्नागिरीला जाणेही त्रासदायक होते . आज पडेल उद्या पडेल म्हणून भाऊ चार आठ दिवस वाट पाहात होते .शेवटी ते मला वैतागून म्हणाले की हाताने उपटला तरी निघेल इतका तो ढिला झाला आहे.

तू पकडीमध्ये धरून उपटून काढ. मला तो नीट जेवू देत नाही व तोंडही धुऊ देत नाही .

त्यांची सूचना ऐकून आम्ही हादरलो .पकड म्हणजे खिळे वगैरे उपटण्यासाठी मोठ्या तोंडाची असलेली वस्तू .त्याने दात उपटायचा म्हणजे जरा फारच झाले.

भाऊ काही केल्या ऐकेनात. तेव्हा मी पकडीने तो दात उपटायचे ठरविले .

दात काढताना एखाद वेळ चक्कर येते, रक्तस्राव होतो ,वगैरे गोष्टी ऐकलेल्या होत्या. त्यामुळे रक्तस्राव झाला तर गुळण्या करण्यासाठी मीठ घातलेले कोमट पाणी, त्याचप्रमाणे रक्तस्रावावर दाबून धरण्यासाठी कापूस, बॅटरी पकड इत्यादी सर्व जय्यत तयारी केली .अगोदर दात कुठे आहे तो पकडीत सापडेल की नाही वगैरेची चाचणी घेतली .आतेभाऊ बॅटरीचा प्रकाश दाखवण्यासाठी तयार झाला व मी पकड हातात घेउन सिद्ध झालो .माझ्या आतेभावाने बॅटरीचा प्रकाश दाखवला मी एकदा पकडीत दात धरून नक्की तोच दात आहे ना म्हणून भाऊना विचारले त्यांनी  मान हलवून होकार दिलानंतर मी जोर करून तो दात उपटला .थोडेसे रक्त वाहू लागले म्हणून भाऊंनी गुऴण्या करण्याला सुरुवात केली.

गुळणी करताना तो हलणारा दात पुन्हा मध्ये मध्ये येऊ लागला व भाऊ म्हणाले, नशीब माझे अरे प्रभाकर तू माझा शेजारचा चांगला दात उपटला .त्याने माझी अजून एखादा वर्ष साथ दिली असती हे ऐकल्यावर हशा पिकला.मी म्हटले काही हरकत नाही आता तो उपटतो. सुदैवानं .विशेष रक्तस्राव झाला नाही व भाऊना त्रासही झाला नव्हता .दाताला मुळे असतात व एखादे मूळ (रूट )आत राहिले तर खूप त्रास होतो याची आम्हाला कल्पना नव्हती .मी नंतर जो दात हालत होता तोही काढला पकडीची पकड आयत्या वेळी शेजारच्या दातांवर पडली व चांगला दात उपटला गेला !!. भाऊ ज्यावेळी भलताच दात उपटला म्हणून  ओरडले तेव्हा सर्वांची हसता हसता पुरेवाट झाली .तेव्हांपासून कोणाचा दात दुखू लागला म्हणजे कुणीतरी म्हणावयाचे की बोलवा रे त्या प्रभाकरला !!! फुकट काढून मिऴेल. त्यानंतर मला दुसरा पेशंट काही मिळाला नाही .!!

‍१/६/२०१८  ©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel