(अर्थातच स्वयंचलित दुचाकीचे)

१९६६मध्ये मी पहिली  स्कूटर  घेतली .त्या काळी बचत करा आणि उपभोग्य वस्तू घ्या ,असा नारा असल्यामुळे, बँका उपभोग्य वस्तूंसाठी  कर्ज देत नसत .त्या काळी लोकांचा भर सायकलीवर असे .स्कूटर किंवा मोटारसायकल क्वचित दिसत असे .स्वयंचलित दुचाकी वाहनांच्या निर्मितीसाठी लायसेन्स लागे व ते मिळणे कठीण असे. ठरवून दिलेल्या संख्येएवढीच दरवर्षी वाहन निर्मिती करता येई.मोटार शोधून काढावी लागे.मोटार  घेण्याएवढे उत्पन्नही नसे . आणि शहर लहान असल्यामुळे गरजही वाटत नसे .एक चैनीची वस्तू म्हणूनच तिच्याकडे पाहिले जाई . लांब अंतरासाठी एसटी बसचा वापर तीही लाल गाडी (फक्त लाल गाड्या होत्या )आणि कमी अंतरासाठी घोड्याचा टांगा अशी वाहतूक व्यवस्था असे.लांब अंतरासाठी खासगी बसेस टॅक्सी वगैरे व्यवस्था नव्हती .त्याची गरजही कधी वाटली नाही कारण लोकसंख्या कमी व पैसेही कमीच होते . हल्ली लोकसंख्या वाढ, आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा, शहर अस्ताव्यस्त वाढणे,स्वयंचलित दुचाकींसाठी ओपन लायसन्स पद्धती अंमलात येणे ,सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असणे, यामुळे परिस्थिती संपूर्णपणे बदललेली आहे .त्यावेळी स्वयंचलित दुचाकीकडेही एक चेैन म्हणूनच पाहिले जात असे .            नाशिक रोडला बदली झाल्यामुळे रोज आठ दहा किलोमीटर अप डाऊन करण्यासाठी मुख्यतः स्कूटरची गरज होती.स्कूटर आली परंतु ती चालवणार कशी कोणीतरी शिक्षक हवा होता .त्याकाळी हल्लीसारखी ड्रायव्हिंग स्कूलस् नव्हती.एखाद्या गाडी चालवणाऱ्या जवळ आपण सर्व कंट्रोल्स समजून घ्यायचे व तो सांगेल त्याप्रमाणे हळूहळू शिकावयाचे अशी पद्धत असे .माझे कुलकर्णी नावाचे एक स्नेही होते त्यांनी मला शिकवण्याची जबाबदारी घेतली .स्कूटर माझ्या घरी अप्पानी (माझ्या मेहुण्यांनी) दुकानातून आणून लावली होती . ते डॉक्टर होते व त्यांच्या नाशिकला नेहमी खेपा होत असत. ते समवयस्क असल्यामुळे आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर गावात फिरत असू .मेहुणा कमी व मित्र जास्त असे संबंध होते .स्कूटर खरेदीलाही मी त्यांच्या बरोबर गेलो होतो .त्यांच्या सर्वत्र ओळखी असत . ते शिक्षणासाठी नाशिकलाच होते .  डॉक्टर म्हणून त्यांच्या  पेशंट सोबत काहीना काही कारणाने नाशिकला खेपा होत असत . नाशिकला रहात नसल्यामुळे ते मला शिकवतील अशी शक्यता नव्हती .कुलकर्णी यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता .हे कुलकर्णीही त्यांचे जिवलग मित्र होते .त्यांच्याशी ओळख अप्पा मुळेच झाली होती.  वेळ मिळेल तेव्हा येऊन ते शिकविणार होते .ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ते आले आणि त्यांच्या बरोबर मी शिकण्यासाठी निघालो .त्यांनी स्कूटर चालवीत एकदम आग्रा रोडवर गावाबाहेर आणली.हल्ली जुना आग्रा रोड असे म्हणतात तो त्यावेळी नवा आग्रारोड होता .त्र्यंबक नाका हीच गावाची सीमा होती .मुंबई नाक्यापुढे तर काही वस्ती नव्हती .गावाबाहेर पडताना मी त्यांना म्हटले की आपण ग्राऊंडवर जाऊ तिथे मी प्रथम शिकेन आणि नंतर  रस्त्यावर चालवण्याला शिकेन.त्यांचा दृष्टिकोन सर्वस्वी वेगळा होता. त्यांनी विचारले की स्कूटर कुठे चालवायची आहे ?मी त्यांना अर्थातच रस्त्यावर म्हणून सांगितले . त्यावर ते उत्तरले की म्हणूनच आपण रस्त्यावरच चालवण्यासाठी शिकले पाहिजे.दोन दिवस ते माझ्याबरोबर आले आणि नंतर त्यांनी मला तुम्ही आता स्वतंत्रपणे   चालवा म्हणून सांगितले. (रस्त्यावर सोडून दिले )वाहत्या आग्रा रोडवर मी सुरुवातीला स्कूटर चालवल्यामुळे माझा धीर चांगलाच चेपला होता . त्या वेळी रस्त्यावर वाहनांची काहीच गर्दी नसे. रस्त्यावर शिकाऊ व्यक्तीने स्कुटर चालविणे विशेष कठीण नव्हते.मी दोन चार दिवसात नाशिकरोडला स्कूटरवरून जाऊ लागलो .

पूर्वीच्या स्कूटर्स ऑटो स्टार्ट किंवा ऑटोगिअर नसत .क्लच गिअर थ्रॉटल ब्रेक सगळीकडे लक्ष ठेवावे लागे. किक मारून एंजिन सुरू करून क्लच दाबून,फर्स्ट गिअर टाकून   ,थ्रॉटल हळूहळू वाढवत, क्लचही हळूहळू सोडत, स्कूटर जाग्यावरून उठविणे ( चालू करणे) थोडे कठीण असे.बरेच वेळा गाडी झटका मारून बंद पडत असे. सवयीने सर्व काही जमत असे.थोड्याच दिवसांत मी सफाईने स्कूटर चालवू लागलो.

माझी समस्या वेगळी होती जर तुमच्याजवळ रेग्युलर(पर्मनंट ) ड्रायव्हिंग लायसेन्स नसेल आणि गाडीला अॅक्सिडेंट झाला तर  विमा कंपनी तुम्हाला काहीही पैसे देत नसे.गाडीचा इन्शुरन्स ऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह होता .मला शक्य तितक्या लवकर रेग्युलर लायसेन्स काढावयाचे होते.आणखी एक समस्या म्हटली तर होती. तुमच्या जवळ पूर्ण लायसेन्स नसेल तर पाठीमागे बसणारा /बसणारी  व्यक्ती पूर्ण लायसेन्स असणारी  आवश्यक असे .अर्थात ती काही मोठी समस्या नव्हती .हल्ली प्रमाणेच त्यावेळीही लर्निंग लायसेन्सवर बेधडक गाडी चालवली जात असे.जोपर्यंत अॅक्सिडेंट होत नाही तोपर्यंत कुणी लक्ष देत नसे. हल्ली वाहने वाढल्यामुळे ,तरुण मुले बेफाम चालवीत असल्यामुळे, पोलिसांचे थोडे बहुत  लक्ष असते .त्यावेळी पोलिसही कमी होते आणि ते स्वयंचलित दुचाकी वाहनांकडे लक्षही देत नसत .शहर वाढल्यामुळे वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहनाची गरजही अाहे.परंतु बर्‍याच गाड्या हौस किंवा आळस म्हणून घेतलेल्या असतात .लहान अंतरासाठी सुद्धा स्वयंचलित वाहनांचा निष्कारण वापर केला जातो .लहान रस्ते ,स्वयंचलित दुचाकी व चार चाकी ,रिक्षा यांची गर्दी ,यामुळे सायकल इच्छा असूनही चालवणे कठीण व धोक्याचे झाले आहे .थोडे विषयांतर झाले .

आरटीओचे ऑफिस आम्ही राहत होतो त्याच्या जवळच टिळकवाडी मध्ये होते. मी आठ दिवसातच रेग्युलर लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिसमध्ये गेलो .लर्निंग लायसन्सची तारीख त्यांनी पाहिली आणि निदान एक महिना झाल्या शिवाय तुम्हाला टेस्ट देता येणार नाही म्हणून सांगितले .टेस्ट देताना काय काय करावे लागते याबद्दल मी कुलकर्णी व इतर मित्रांकडे चौकशी केली .कुणी पाय टेकविल्या शिवाय आठाचा आकडा काढता आला पाहिजे असे सांगितले . कुणी तुम्हाला गर्दीच्या रस्त्यावर म्हणजे मेनरोडवर वगेरे घेऊन जातील आणि तिथे गाडी बंद पडल्याशिवाय चालविता आली पाहिजे असे सांगितले .कुणी तुम्हाला रोड साइन्स विचारतील आणि त्या माहिती पाहिजेत असेही सांगितले .एकाने भर रस्त्यावर तुम्हाला गाडी एकदम थांबवायला सांगतील ,परंतु स्लो डाउनचा सिग्नल देऊन डाव्या बाजूला गाडी घेऊन ती थांबविली पाहिजे .(त्या वेळी सर्व सिग्नल्स हातानेच द्यावे लागत ).भररस्त्यात ब्रेक मारून थांबवायची नाही असेही सांगितले. एक महिना झाल्यावर मी लगेच ऑफिसमध्ये पूर्ण लायसन्ससाठी गेलो .त्यासाठी आवश्यक ती अपॉइंटमेंट घेणे वगैरे गोष्टी केल्या होत्या .कोणाही एजंट शिवाय मध्यस्थाशिवाय मी लायसेन्स काढण्यासाठी गेलो होतो .उगीच एजंटला पैसे कशाला द्यायचे असा दृष्टिकोन होता .जर मेनरोडला गाडी नेण्यासाठी सांगितले तर मी कदाचित पास होईन पण बहुधा नापास होईन याची मला खात्री होती .

इन्स्पेक्टरने माझ्याकडे एकदा बघितले आणि अमुक अमुक नंबर मध्ये काय आहे असे विचारले अर्थातच ते नंबर आणि त्यातील माहिती मला नव्हती .त्याबद्दल मला कोणीच सांगितले नव्हते . इन्स्पेक्टरने मला लगेच नापास केले आणि पंधरा दिवसांनी पुन्हा तयारी करून या म्हणून हसत हसत सांगितले .कायद्याच्या त्या नंबर मध्ये काय आहे ते माहिती असणे आवश्यक होतेच पण त्याप्रमाणे आचरण करणे ही आवश्यक होते .त्या कलमांमध्ये पुढील गोष्टी सांगितल्या होत्या .१)गाडीवर एकच व्यक्ती पाठीमागे घेता येईल लहान मूलसुद्धा मध्ये बसून किंवा पुढे उभे करता येणार नाही. (त्या काळी मी व इतर आणि हल्लीसुद्धा सर्व या कलमाचे सर्‍हास उल्लंघन करताना आढळून येतात ).२)गाडीचे इंजिन चालू ठेवून आपण कुठेही जायचे नाही (थोडेसे दुकानात काम असेल तर इंजिन सुरू ठेवून बरीच मंडळी दुकानात जात असत).३)गाडी स्टॅन्डवर उभी करताना नेहमी चढाच्या दिशेने उभी करावयाची उतारावर नाही .जवळच आरटीओचे ऑफिस असल्यामुळे मला आरटीओमध्ये येण्या जाण्याचा काही त्रास नव्हता .टेस्टसाठी फी भरणे अपॉइंटमेंट  घेणे वगैरे आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी येता जाता सहज चक्कर  मारता येई.गर्दीही विशेष नसे.त्या वेळी ऑनलाइन वगैरे प्रकार अर्थातच नव्हता .कॉम्प्युटर्स मोबाइल्स स्मार्टफोन्स नव्हतेच ,एवढेच काय लॅण्डलाइन सुद्धा क्वचित असे .

पंधरा दिवसांनी मी कलमे वगैरे पाठ करून गेलो आणि त्यांच्या पुढे उभा राहिलो .इन्स्पेक्टर तोच होता .त्यावेळी आरटीओ मध्ये( गर्दी नसल्यामुळे )दोन तीनच इन्स्पेक्टर असत.

यावेळी त्याने त्या कलमांची वाच्यताही न करता एक मोठा तक्ता  उलगडला .

त्या तक्त्यावर रोड साइनस् व प्रत्येक  रोड साइन काय दर्शवते ते होते. त्याने मजकुरावर हात ठेवून रोड साइन दाखविली व त्याचा अर्थ विचारला.मला वनवे ट्रॅफिक, नॅरो ब्रीज, यु टर्न,  रोड क्रॉसिंग, रेल्वे क्रॉसिंग, हेअर पिन कर्व्ह,पुढे घाट आहे, चढ आहे ,उतार आहे  अश्या सर्वसाधारण नेहमीच्या खुणा माहिती होत्या .त्यांनी विचारलेल्या खुणा मला आता आठवत नाहीत परंतु त्या नेहमी न दिसणाऱ्या होत्या एवढे आठवते.अर्थातच मला त्या सांगता आल्या नाहीत .आणि मी नापास झालो.तो मिश्किलपणे हसला आणि पुन्हा पंधरा दिवसांनी या म्हणून मला सांगितले . कायद्यातील कलमांचा तक्ता घरी होताच ,  आता रोड साईन्सचा तक्ता घेऊन मी निघालो .आणखी काही पुस्तकी परीक्षा असते का हे मी इन्स्पेक्टरला विचारले व असल्यास तीही माहिती व कागदपत्रॆ मला द्या असे सांगितले .त्यावर हसत हसत त्याने आता  आणखी काही  पुस्तकी नाही म्हणून सांगितले .

तीन टेस्टमध्ये जर एखादा पास झाला नाही तर पुन्हा नवीन लर्निंग लायसेन्स काढावे लागते असेही कळले .आणि अर्थातच त्यानंतर पुन्हा एक महिना झाल्याशिवाय टेस्ट देता येत नाही .आत्तापर्यंत कधी नापास झालो नाही आणि आता हे काय चालले आहे माझी मलाच गंमत वाटू लागली .

प्रत्यक्ष गाडी चालवणे तर दूरच राहिले होते .हा इन्स्पेक्टर मला मेनरोडला नेणार, अाठाचा आकडा काढायला सांगणार, आणि मी कुठे तरी घसरणार असे मला वाटू लागले .या इन्स्पेक्टरचे आणि माझे काय वाकडे आहे ते मला कळेना.बहुधा मी एजंटाशिवाय आल्यामुळे तो माझी फिरकी घेत असावा असे मला वाटले.एखाद्या एजंटला बरोबर घेऊन जावे असेही मला वाटू लागले . या काळात नाशिकरोडला येणे जाणे लेक्चर्स घेणे वगैरे सर्व नेहमीप्रमाणे सुरू होते .अर्थात मी स्कूटरवरून येत जात होतो व पिलियन रायडरही घेत होतो .

पंधरा दिवसांनी मी पुन्हा गेलो त्यावेळी त्या इन्स्पेक्टरने माझ्याकडे एकदा पाहिले व लगेच माझ्या कागदपत्रांवर सही केली आणि रेग्युलर लायसेन्स आठ दिवसांनी घेऊन जा म्हणून सांगितले .मला गाडी किक मारून सुरू करण्यासाठी सुद्धा सांगितले नाही .चालवण्याची गोष्ट तर दूरच आणि आठ दिवसांनी मी लायसेन्स घेऊन घरी आलो .

ज्या विद्यार्थ्याला मी वर्गाबाहेर काढले होते ,किंवा त्याच्या अंदाजापेक्षा कमी मार्क दिले ,असे त्याला वाटत होते ,असा तो (विद्यार्थी) इन्स्पेक्टर असावा, असा मला दाट संशय आहे!! सरांना नापास केल्याचा आनंद काही विशेषच होता.असो. अशा तर्‍हेने मी आयुष्यात पहिल्यांदा व शेवटी दोनदा नापास झालो.

मला त्र्यंबक रोडला जाताना  आरटीओ ऑफिस वरूनच जावे लागे वेगळा रस्ता नव्हता .त्याची बदली होईपर्यंत तो मला अधूनमधून दिसे व आम्ही एकमेकांकडे बघून हसत असू .

६/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel