मी साधारण तीन वर्षांचा असेन.सकाळी उठलो तो आई कुठे दिसेना .इकडे तिकडे फिरल्यावर एका खोलीत आई झोपलेली आढळली .तिच्या शेजारी गोरापान हात दीड हात लांबीचा एक मुलगा झोपलेला आढळला .भाऊ(वडील ) म्हणाले हा तुझा धाकटा भाऊ, तू आता दादा झालास .बारावे दिवशी त्याचे बारसे झाले. त्याकाळी समारंभ प्रवृत्ती विशेष नव्हती.चार सहा महिने झाल्यावर त्याची प्रगती जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही असे आढळून आले.उपडे वळायला उशीर , पोटाने पुढे सरकायला उशीर, रांगायला उशीर ,नंतर तो उभे राहिना, त्याचे पाय कमकुवत आहेत असे लक्षात आले .दोन तीन वर्षे झाली तरी तो चालेना, काळजी वाटू लागली .त्याचे नाव राजाराम ठेवले होते .रत्नागिरीला भविष्य पाहणाऱ्या एका बाईने सांगितले की त्याचे नाव बदलून पाहा .त्यांनी शांताराम नाव सुचविले .शक्यते वैद्यकीय उपचार चालू होतेच. एकाने सुचविले की त्याला गरम  वाळूत कंबरेपर्यंत उभा करून रोज दोन तीन तास ठेवावा.वाळू अर्थातच भाज ण्याइतकी गरम असता कामा नये .गडी पाठवून दोन पोती वाळू पूर्णगडहून आणण्यात आली खळात (अंगण) खड्डा करण्यात आला तो व्यवस्थित  लिंपून घेतला .खळात दोन्ही बाजूला भरपूर झाडी असल्यामुळे दोन तीन तासच ऊन दुपारचे येत असे .दोन वाजता खड्ड्यांवरून ऊन जाई नंतर चार पाचच्या सुमारास आई वाळू कितपत गरम आहे ते उपसून पाही नंतर राजाला त्यात उभा करून वाळू कंबरेपर्यंत टाकण्यात येई. सुमारे तास दीड तास त्याला त्यामध्ये ठेवण्यात येई.प्रथम त्याला गंमत वाटली पुढे तो ओरडू व रडू लागला नंतर त्याला ती सवय झाली .दोन महिन्यांनंतर त्याच्यात हळूहळू सुधारणा दिसू लागली. तो कशाला तरी धरून उभा राहू लागला. नंतर कशाला तरी धरून हळुहळु चालूही लागला .सहा महिन्यांमध्ये तो व्यवस्थित चालू लागला .

त्याचे माझ्यावर खूप प्रेम होते. तो सारखा माझ्या मागे मागे असे .कदाचित सगळेच मोठे व लहान भाऊ यांच्यामध्ये अशाप्रकारचे रिलेशन असावे  .त्याची प्रगती हळूहळू असल्यामुळे मी त्याला सोडून खेळण्यासाठी बाहेर धावे.मीही अर्थातच लहान होतो व त्याची परिस्थिती समजून घेणे माझ्या कुवती बाहेर होते. भाऊ व आई अरे त्याला बरोबर घेऊन जा असे सांगत परंतु मी तिकडे दुर्लक्ष करीत असे .उलट मला त्याला चिडवण्यात रडवण्यात गम्मत वाटे.मी भाऊंच्या हातचा बराचसा मार लहानपणी यावरून  खाल्लेला आहे .

तो हळूहळू मोठा झाला  स्वाभाविक उशिरा त्याला शाळेत घालण्यात आले तो आठ नऊ वर्षांचा झाल्यावर त्याच्या मुंजीचे विचार सुरू झाले आर्थिक परिस्थिती बेतास बात असल्यामुळे मुंज लहान प्रमाणात करावी असे ठरत होते  .भाउंच्या मामेभावाच्या मुलाची मुंज होती . तोही राजाच्याच वयाचा होता .भाऊंच्या मामांनी अधिकारवाणीनेु  त्याच्याबरोबरच राजाची मुंज करू या असे सांगितले .त्यांची आज्ञा भाऊना शिरसावंद्य होती त्यामुळे मनात स्वतंत्रपणे मुंज करावी असे  वाटत असूनही राजाची मुंज मामेभावाच्या मुलाबरोबर झाली .

एक दोन वर्षांनंतर  गावांमध्ये आमांशाची साथ आली होती .त्यामध्ये गावात बरेच मृत्यू झाले .साथ अत्यंत तीव्र होती .राजालाही आमांश झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला .मलाही तीव्र स्वरूपाचा अामांश त्यानंतर झाला होता परंतु सुदैवाने मी त्यातून बरा झालो .

माझे दादापण संपले नंतर बरेच वर्षांनी लग्न झाल्यावर, आमच्या सासरेबुवांनी तुम्हाला घरी काय म्हणतात, असे विचारले त्या काळी जावयाला एकवचनी संबोधण्याची पद्धत नव्हती . प्रभाकर म्हणणे अर्थातच त्यांना पसंत नव्हते .तेव्हा मला राजा, दादा म्हणत असे याची आठवण झाली .मी तसे हिच्या जवळ बोललो .त्यानंतर मला सर्व दादा म्हणू लागले. अशा प्रकारे मी पुन्हा दादा झालो

२३/५/२०१८© प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to स्मृतिचित्रे


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
कल्पनारम्य कथा भाग १
कथा: निर्णय
अजरामर कथा
मराठेशाही का बुडाली ?
विनोदी कथा भाग १