माझे वडील डोर्ले येथील मराठी शाळेवर मास्तर होते .वडिलांना मी भाऊ म्हणत असे. भाऊं बरोबर मी काही ना काही कारणांनी शाळेत अनेकदा जात असे .शाळेला स्वतंत्र इमारत नव्हती. शाळा एका वाड्याच्या माळ्यावर भरत असे .माळ्यावरील फळ्या पक्क्या बसवलेल्या नसल्यामुळे चालताना त्या डुगुडुगु हालत व पडेन की काय अशी भीती वाटे. तिथे प्रकाशही कमी येत असे .त्यामुळे कोंदट वातावरण होते.
भाऊ जे काम हातात घ्यावयाचे ते व्यवस्थितपणे पूर्ण करावयाचे अश्या प्रवृत्तीचे होते .गावातील मंडळींना एकत्र करून , शाळेचे महत्त्व पटवून देऊन,शाळेला नवी स्वतंत्र इमारत असावी, हे त्यांच्या मनावर बिंबवून ,वर्गणी द्वारे पैसा गोळा करून व सरकारकडून ग्रँट मिळवुन नवी शाळा बांधण्यात आली .
शाळेमध्ये शिकवणे हे त्यांचे काम होते नवी शाळा उभी करणे हे त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नव्हते.परंतु कोणत्याही कामामध्ये सर्वस्व ओतून झोकून देणे नफ्या तोट्याचा विचार न करता तळमळीने काम करणे हा त्यांचा स्वभाव होता .शिक्षणाला त्यांनी सर्वस्वी वाहून घेतले होते. लहानश्या क्षेत्रात शिक्षणासाठी त्यांनी काय काय केले हा एक स्वतंत्र विषय आहे .मी लहान असल्यामुळे मला काही माहिती नाही ,त्यांच्या विद्यार्थ्यांकडून मोठेपणी जी काही माहिती मिळाली तेवढीच .जिथे दहा वीस विद्यार्थी शाळेत येणे कठीण होते जिथे चारही वर्गांवर एकच मास्तर होते जिथे खाजगी वाड्यामध्ये शाळा भरत असे तिथे शाळेची नवी स्वतंत्र इमारत व हळूहळू चारी वर्गावर चार नवे मास्तर अशी स्थिती निर्माण झाली विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे इयत्ता एक ते चार पर्यंत एकच मास्तर असत . स्वाभाविक वेगळ्या खोल्या नसत एकाच हॉलमध्ये चारही वर्गातील मुले बसत व आळीपाळीने शिक्षक सर्व वर्गांचा अभ्यास घेत असत व त्यांना यशस्वीपणे नियंत्रितही करीत असत
मी पहिली मध्ये शाळेत गेलो तो नव्या शाळेतच .त्यावेळी बिगरी म्हणून एक यत्ता असे त्यानंतर मुले पहिलीत जात .परीक्षा घेऊन वरच्या वर्गात बसवण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना असे.आपल्या बरोबर शाळेत नेऊन व घरी अभ्यास घेऊन त्यांनी माझी बिगरी चार वर्षांचा असतानाच पूर्ण केली .पाच वर्षांचा होण्याच्या अगोदर मी पहिली मध्ये दाखल झालो .माझी जन्मतारीख ३०/७/१९३३ व शाळा जूनमध्ये सुरू होत असे.
त्या अगोदरचा किस्सा सांगण्यासारखा आहे .भाऊ तसे धार्मिक व भावनिक होते .तसेच ते खूप हौशी पण होते .अापण आर्थिक परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही परंतु मुलाने खूप शिकावे, मोठे व्हावे ,अशी त्यांची इच्छा होती .गुढी पाडव्याचा मुहूर्त चांगला असल्यामुळे त्या दिवशी पाटी पूजन गणपती पूजन व सरस्वती पूजन करून मीऑफिशियली खऱ्या अर्थाने शाळेत जावे असे ठरले.घरच्या घरी पूजन न करता ते शास्त्रोक्त दशग्रंथी ब्राह्मणांकडून करावे असे ठरले .त्या काळी बारा गावचा एक जोशी म्हणून विद्वान ब्राह्मण असे.घरोघरी पंचांग घेण्याची प्रथा व आर्थिक कुवत त्यावेळी नव्हती .पंचांग .वाचण्या इतकी साक्षरताही नव्हती .जोशी महिन्यातून एकदा गावात येऊन महिन्यातील महत्त्वाचे दिवस संकष्टी चतुर्थी दसरा दिवाळी गणपती अमावास्या पौर्णिमा इ. सांगत असे.त्यांना दक्षिणा म्हणून तांदूळ नारळ सुपारी व पैसे दिले जात .या दक्षिणेवर त्यांचा चरितार्थ चाले. त्याशिवाय गुरुजी म्हणून जी इतर धार्मिक कृत्ये असत त्यासाठीही ते जात .त्या वेळी भाऊ जोशी नावाचे जोशी होते ते पावस येथे रहात असत .
आधल्या दिवशी वस्तीला ते आमच्याकडे आले होते .दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून मुहूर्ता प्रमाणे पाटी पूजन सरस्वतीपूजन
गणेश पूजन झाले.पाटी या साधनांमुळे विद्या येते म्हणून पाटीपूजन ..पाटीवर भाऊंनी
ॐश्री गणेशायनम: असे लिहून दिले होते .त्यावर गंध फूल अक्षता घालून पूजन झाले .भाऊंचे हस्ताक्षर अतिशय सुंदर मोत्यासारखे होते.माझे हस्ताक्षर म्हणजे आनंदच आहे.त्या काळी वही पेन्सील पेन वगैरे काही प्रकार नव्हते.पाटीवर गणित शुद्धलेखन वगैरे अभ्यास लिहावयाचा ,गुरुजींना दाखवयाचा व नंतर पुसून टाकावयाचा.
घरी दिलेला अभ्यास पाटीवर करून तो जपून न पुसता शाळेत न्यायचा, गुरुजींना दाखवायचा व नंतर पुसून टाकावयाचा.जास्त अभ्यास घेता यावा घरी दिलेला अभ्यास पुसून जाऊ नये म्हणून बिजागिरी लावलेल्या दोन पाटया एकत्र जोडलेल्या असत .अशी पाटी श्रीमंत किंवा हौशी लोकांकडे असे. विशिष्ट प्रकारचा दगड पातळ करून गुळगुळीत करून लाकडी फ्रेम मध्ये टाकून त्या बनविलेल्या असत .त्याला दगडी पाटी असे म्हणत खाली पडल्या आपटल्या गेल्या तर त्या फुटत त्यानंतर पत्र्याच्या काळा रंग दिलेल्या पाट्या आल्या, परंतु दगडी पाट्या त्या दगडी पाट्या.हल्ली पाट्या असतात की नाही ते माहीत नाही .बॉलपेन नव्हते फाऊंटन पेन नव्हते .इंग्लिश शाळेत गेल्यावर ते मिळाले .किंवा त्यावेळी ते बाजारात आले .शाई तयार करण्याची पुडी मिळे ती पाण्यात कालवून नंतर टाकाने लिहावे लागे.शाळेत जाताना दाैत ,खाली धरायला पुठ्ठा ,टाक ,इत्यादी घेऊन जावे लागे.तिसरीमध्ये साधारणपणे शाई,दौत टाक कागद वगैरे मिळे. शाई सुकण्यासाठी वरती वाळू टाकली जाई किंवा टीपकागदाचा वापर केला जाई.
पाटीपूजना अगोदर देव्हाऱ्यातील सर्व देवांची यथोचित मंत्र म्हणून पूजा झाली
हे देवही आमचे नव्हते ज्यांच्या घरात आम्ही राहात होतो त्यांचे ते देव होते. त्यांची पूजा करण्याच्या अटीवर आम्हाला ती जागा मिळाली होती .पहाटे उठून स्नानानंतर मंत्रोच्चार सहीत पूजा ,फुले, गंध ,उजळलेल्या समया, इत्यादीमुळे वातावरण निर्मिती झाली होती .माझ्याकडून जोशीबुवांनी साग्रसंगीत सर्व पूजा व्यवस्थित करून घेतली .
आईने दूध आटवून खवा करून पुष्कळ पेढे केले होते त्या काळी हलवाई फक्त रत्नागिरीला होते .नवे कपडे करून ,बरोबर पेढे घेऊन भाऊं बरोबर मी शाळेत गेलो .गुढी पाडवा असूनही मुलांना शाळेत बोलावलेले होते.सामूहिक गणेश व सरस्वती पूजन होऊन सर्वांना मी पेढे वाटले वनंतर शाळा सुटली .माझी ही शाळेतील ऑफिशियल एन्ट्री, जुन्या वाड्यातील माळ्यावरील डुगडुगणार्या शाळेत होती.
असा होता माझा शाळेतील पहिला दिवस .
१७/५/२०१८ प्रभाकर पटवर्धन