माझी आई अतिशय कष्टाळू होती.सबंध  दिवस तिचे काहिनाकाही काम चालू असे.सुमारे शंभर वर्षांपुर्वीचा तो काळ होता.त्या काळी स्त्रियाना विशेष  स्वातंत्र्य  नसे.पुरुषांच्या अरेरावीचा व हुकमतीचा तो काळ होता.(अजूनही विशेष काही बदल झालेला नाही असे काही जण म्हणतील )भाऊ जरी समंजस असले तरी एकूतावरणचा त्यांच्यावर परिणाम होणे अपरिहार्य  होते.पुरुषांनी बायकाना मदत करणे कमीपणाचे लक्षण  समजले जाई.अश्या पुरुषाला बाइलबुध्ध्या बाइलवेडा समजले जाई .अश्या सामाजिक वातावरणचा कोणावरही परिणाम होणे स्बाभाविक होते.असेच वागले पाहिजे हे वागणे स्वाभाविक व योग्य आहे अशी समजूत होती. त्याकाळी आर्थिक व यांत्रिक  प्रगती विशेष नव्हती.दळण दळणे, रवा काढणे,धान्य निवडणे, धान्य टिकावे म्हणून  त्याला कडक सात उन्हे देणे.उन्हांत धान्य पसरणे,गोळा करणे,पाखडणे,पक्षी,गुरे धान्य खाऊ नये म्हणून त्याची राखण करणे,कपडे धुणे,भांडी घासणे,पाणी भरणे,स्वयंपाक करणे,बाहेरून गोड धोड मिळत नसल्यामुळे तेही घरात करावे लागे.ताक वगैरे  रवीने घुसळावे लागे.गोड व खार्‍या पदार्थाची नावे आठवा ते करण्यासाठीचे कष्ट लक्षात घ्या .फरश्या नव्हत्या .जमीन झाडणे ,सारवणे,जेवण,वाढणे,उष्टी खरकटी काढणे,गाद्या घालणे व काढणे, लहान मुलांचे सर्वकाही करणे,देवपूजा  तयारी शिवाय सण समारंभ,धार्मिक कृत्ये करणे इ.अनेक कामे असत .गॅस स्टोव्ह वगैरे काही नसल्यामुळे धगधगणार्‍या चुलीपुढे स्वयंपाक करावा लागे.आर्थिक संपन्नता असली तर यातील काही कामे मजुरीने करता येत व त्यामुळे कमी होत.एकत्र कुटुंबात कामे वाटली जात व काही वाढतही.कोकणात सर्द हवा घाम ,यामुळे  त्रास वाढे.अर्थात सवईने सर्व अंगवळणी पडते हा भाग वेगळा.

आमचे कुटुंब आई भाऊ व दोन मुले एवढेच  होते.लहान कुटुंबामुळे कामे किती कमी झाली असतील व किती वाढली असतील याची कोणीहि कल्पना करू शकेल.

भाऊ सबंध दिवस शाळेच्या कामात मग्न असत.घरी असले तरी त्यांची विशेष मदत होण्याची शक्यता नव्हती.आई सबंध दिवस कामात का व कशी मग्न असे याचा उलगडा आता होऊ शकेल.

पाटाचे पाणी येत असल्यामुळे विहिरीचे पाणी काढणे किंवा लांबून  पाणी भरण्याचा त्रास नव्हता परंतु पाटाचे पाणी (नदीला बांध घालून त्यातून कालव्यासारखे परंतु फार लहान प्रमाणात जे पाणी जाईल तिथपर्यंत नेले जाते त्याला पाटअसे म्हणतात)  सकाळी थोडा वेळ येई.तेव्हां भांडी भरून  घ्यावी लागत.पाटाचे पाणी थोड्या अंतरावर असल्यामुळे  तेथून भरावे लागे.भाऊंची स्बच्छता जरा जास्तच असल्यामुळे अर्धा डोंगर उतरून नैसर्गिक डोंगरातून पडणारा झरा होता तिथपर्यंत जावे लागे.दोन कळश्या भरून  ए क कंबरेवर व एक हातात घेउन अर्धा डोंगर चढून यावे लागे.त्यात अर्धा तास सहज जाई.कष्ट होत दमछाक होई.पैसे देऊन कोणा माणसाकडून पाणीभरणे भाऊंना पसंत नसे.पाटाचं पाणी फडक्यावरून गाळून घेऊन कि्वा उकळून वापरणे भाऊंना पसंत नसे.आई बिचारी मुकाटयाने पाणी भरी.आता आपल्याला हे जेवढे हट्टीपणाचे वाटते तेवढे आईला वाटत नसणार.भाऊ मराठी शाळेवर शिक्षक .पगार मर्यादित त्यामुळे जी कामे मजुरीवर करता येणे शक्य होते  तीहि घरात करावी लागत.त्यात भाऊनी एक वर्ष म्हैस आणली .त्यामुळे शेणगोठा करण्यापासून दूध काढणे व त्याची उस्तवारी करणे इथपर्यंत एक वर्ष अाईची कामे आणखी  वाढली होती.

आई सबंध दिवस दळण कांडण वाळवण स्वयंपाक कपडे धुणे पाणी भरणे देवपूजा आम्ही लहान असल्यामुळे आमचे आवरणे इ.कामात मग्न असे.ती रिकामी निवांत अशी क्वचितच दिसे.भाऊ त्यांच्या कामात वआई तिच्या कामात असा एकूण प्रकार असे. भाऊंची कामे शिक्षकाला आवश्यक याच्या बाहेरील परंतु  एकूण शिक्षणासाठी उपयुक्त अशी असत.त्यांनी पटसंख्या वाढवली एका शिक्षकाच्या जागी चार शिक्षकांची शाळा झाली .शाळेला नवी स्वतःची इमारत झाली .शिक्षणासाठी उपयुक्त शिकविण्याला उपयोगी अशी अनेक साधने योग्य मुलांना हेरून त्यांच्याकडून तयार करून घेतली अर्थात त्यांनी स्वतःही काही केली .

आम्ही डोरले येथे असताना शेजारच्या खोलीत घराची मालकीण आजीबाई राहात .त्या आजारी पडल्या तर त्यांची देखभालही आईला करावी लागे .त्यांच्या मृत्यू अगोदर त्यांना कॅन्सर सदृश्य असा काहीतरी आजार झालेला होता .मोठे गळू झालेले होते व ते काहीही केल्या बरे होईना .ते जास्त जास्त चिघळत चालले. त्यामध्ये शेवटी कृमी झाले ते गळू साफ करावे लागे.त्यांना ताप येई त्या अंथरुणाला खिळल्या होत्या त्यांचे सर्व करावे लागे.औषध घालण्यापूर्वी ते जंतुघ्न द्रवाने साफ करावे लागे.त्यांचा दत्तक मुलगा मुंबईला होता परंतु त्याने काहीही लक्ष दिले नाही .मरेपर्यंत आईने त्यांची सर्व सेवा केली.त्यामुळे भाऊ नेहमी म्हणत की तू फार मोठे पुण्याईचे काम केलेले आहे .नेहमीची सर्व कामे सांभाळून आई आजीचे सर्व करीत असे.

आईची सेवा वृत्ती व नर्सिंगचे कौशल्य आणखी एका गोष्टीमुळे अधोरेखित होते.

आम्ही अप्पांच्या(स्वामी स्वरूपानंद) घरी असताना म्हणजे अठ्ठेचाळीस एकूण पन्नास मध्ये माझी एक मावशी टीबीने आजारी पडली. तिच्या सासरहून तिला घेऊन जा म्हणून पत्र आले . मामा जाऊन तिला घेऊन आला. तिच्या सोबत दोन लहान मुलीही होत्या. त्यातील एक  जवळजवळ तान्ही होती .आईने तिच्या लहान बहिणीचे ती मरेपर्यंत सर्व कष्ट उपसले . मुलींना नंतर मामाने त्यांच्या घरी पोचवले .

माझा धाकटा भाऊ दहा अकरा वर्षांचा असताना आमांशाने वारला .त्यानंतर काही दिवसांनी  मलाही आमांश तीव्र स्वरूपाचा झाला. त्या वेळी गावात तीव्र स्वरूपाच्या आमांशाच्या साथीने तगडी तगडी अशी सुद्धा बरीच माणसे मेली होती.आई अतिशय घाबरून गेली .दुसऱ्या दिवशी सोमवार होता सकाळपासून आई काहीही खात नाही हे आमच्या लक्षात आले .चौकशी करता ती काहीही बोलण्यास तयार नव्हती .शेवटी  बरा व्हावा  म्हणून संकट सोमवारचे व्रत धरले आहे हे कळले .हे व्रत अत्यंत कडक असते. दिवसभरात काहीही खावयाचे नसते .पाण्याचा एक घोटही घ्यावयाचा नसतो .रात्रीही पाण्याचा एकच घोट व विशिष्ट प्रकारे केलेल्या प्रसादाचा एकच घास घ्यावयाचा असतो .सबंध दिवस सर्व कामे सांभाळून काहीही न खाता पिता व्रत पार पाडणे फार कठीण असते .असे व्रत करताना किंवा नवस बोलताना आपले उद्दिष्ट साध्य होऊदे मग मी अमुक अमुक व्रत किंवा नवस पार पाडीन असे साधारणपणे बोलण्याची पद्धत आहे  .भाऊंना अश्या प्रकारे नवस बोलण्याची पद्धत मान्य नव्हती .असा नवस बोलणे म्हणजे व्यापार झाला असे त्यांचे मत होते.अापण देवावर भार टाकावा तो तारील किंवा मारील असे त्यांचे मत होते .त्याला अनुसरून तिने एकदम संकट सोमवार व्रत ताबडतोब सुरू केले . अर्थात मी पुढे बरा झालो हे सांगावयाला नकोच .

आई तोंडाने फटकळ होती त्यामुळे माणसे दुखावली जात व तिच्या बद्दल वाईट मत होत असे .

वयाच्या नऊ दहा वर्षापर्यंत मी आईजवळ होतो .त्यानंतर शिक्षण नोकरी यांसाठी सतत आईपासून दूर राहावे लागले . आई माझ्या वाटेकडे डोळे लावून  बसलेली असे.मी घरी गेल्यावर तिला मला आवडणाऱ्या गोष्टी खायला घालावे असे नेहमी वाटे .झाडावरची सिताफळे ती शक्यतो न काढता माझ्यासाठी ठेवीत असे .मी आलो की ती सिताफळे काढून पिकवून मला खायला देण्यात तिला धन्यता वाटे.सीताफळांना पक्षांनी  चोची मारू नये म्हणून ती त्याला फडके गुंडाळून  ठेवी .जी गोष्ट सिताफळांची तीच अननसाची , अननस मी येईपर्यंत शक्यतो झाडावरून काढावयाचे नाहीत असे तिचे धोरण असे  .मला पातोळे फार आवडत. पातोळे हे जून काकडीपासून करतात. जून काकडीला कोकणात तवसं असे म्हटले जाते .त्याला हळदीची पाने ही लागतात .जून काकडी किसून त्यात तांदळाच्या कण्या घालून व गूळ घालून शिजवला जातो .नंतर तो हळदीच्या पानांमध्ये व्यवस्थित थापून घडी  घालून हळदीची पाने वाफवली जातात .अशा होणाऱ्या पक्वान्नाला पातोळे म्हणतात( पातळ म्हणून पातोळे) .जून भोपळ्याच्या गुळाच्या पुऱ्या ,खांडवी सांधण उकडीचे मोदक अशी अनेक मला आवडणारी पक्वाने ती करीत असे.मला   खायला देण्यात तिला होणारा आनंद स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावर दिसे.मला निरनिराळे पदार्थ खाऊ घालण्यात तिचे प्रेम व्यक्त होई.कोकणातील पक्वान्नामध्ये तांदूळ व गूळ व आणखी काहीतरी वस्तू हे प्रमुख घटक असतात .

भाऊ आजारी असताना त्यांच्या मामाकडे व बहिणीकडे होते . त्या वेळी आईही त्यांच्याबरोबर होती. अर्थातच मामांनी व त्यांच्या बहिणीने काहीही पैसे घेतले नाहीत . भाऊंजवळ द्यायला पैसे नव्हते हा भाग वेगळा . आईला तिथे राहताना ऑकवर्ड नक्कीच वाटत असणार कारण ती फार स्वाभिमानी होती .भाऊंना व मला वाईट वाटेल म्हणून तिने ते कधीही तिच्या चेहऱ्यावर  दिसू दिले नाही. ती धीट  करारी निग्रही व कठोरही होती .परंतु परिस्थितीपुढे ती विवश होती .

भाऊ निवृत्त नाईलाजाने झाले कारण प्रकृती बरी नव्हती.निवृत्त झाल्यावर भाऊंची तब्ब्येत थोडीशी सुधारली. भाऊंनी आर्थिक आधारासाठी आंब्याच्या धंद्याला सुरुवात केली .आंब्याचा धंदा साधारण तीन महिने असे.त्या वेळी तिने अतोनात कष्ट केले .आंब्यांचा मावा टिकावा म्हणून त्यात साखर घालावी लागत असे.साखर त्यावेळी रेशनिंगवर होती. बाजारात मिळत नसे .काळ्या बाजारात साखर घेतल्यावर ती दळावी लागे.मजुरांकडून ती दळता येत नसे .कारण ते धोक्याचे होते.यासाठी आई घरात साखर दळत असे .साखर दळणे फार कष्टाचे काम होते.साखर माव्यामध्ये घालून मळणे  फार कष्टाचे काम होते. साखर वरील  रेशनिंग रद्द झाल्यावर तिचे ते काम कमी झाले.पुढे आम्ही साखरेचा पाक करून त्यात मावा टाकून पक्का मावा बनवू लागलो .साखरेचा पाक करणे त्याची योग्य प्रत पाहणे त्यात कच्चा माल टाकून तो घोटणे इत्यादी अनेक कामे असत. आम्ही तिला मदत करत असू गडी माणसेही कामाला असत . परंतु मुख्य सहभाग तिचाअसे. एकूणच धंद्यांत  तिचा  सहभाग असे. पैशाचा व इतर हिशोब व सर्वत्र देखरेख भाऊ करीत . निरनिराळ्या गावी गड्यांबरोबर जाणे आंबे काढून  ते भरून पाठवणे त्याचप्रमाणे   मावा साटे इत्यादी पॅकिंग करून मार्किंग करून ते पाठवणे हे मी पाहत असे. आमचे जेवण झाल्यावर ती जेवत असे .सर्वांनी बरोबर जेवण्याची त्याकाळी पद्धत नव्हती व आम्हालाही तू आमच्या बरोबर जेव असे म्हणावेसे कधी वाटले नाही त्याची आता खंत वाटते  .त्या वेळी आपल्याला करता येण्यासारखी तिची घरातील काही कामे जर आपण  केली असती तर बरे झाले असते असे आता वाटते .आमच्या इथे दोघेही आल्यानंतर भाऊ आनंदी होते. परंतु आईला मात्र चैन पडत नसे ती लहानपणापासून स्वतंत्र व मोठ्या घरात राहिलेली होती. येथे लहान जागेत तिला गुदमरल्यासारखे होत असेल असे वाटते  .भाऊंच्या मृत्यूच्या वेळी प्रभंजन  आमचा मुलगा एक वर्षांचा होता.त्यानंतर भाऊंच्या मृत्यूपूर्वी भाऊंचे व तिचे बोलणे झाल्याप्रमाणे ती इथे दोन वर्षे राहिली .नंतर तिने मला गुळ्याला आमच्या घरी पोचवण्यास सांगितले .एवढ्या मोठ्या घरात कोणीही सोबतीला नसतानाही व शेजार दूर असतानाही ती सहज एकटी राहिली .भाऊ जेवढे भित्रे तेवढीच ती धैर्यवान  होती.पुढे म्हातारपणामुळे ती शेवटची काही वर्षे आमचेकडे पुन्हा आली.आमच्या आगरांमध्ये फणसाची झाडे नव्हती. मला बरके(चावून खाण्याच्या गर्‍याना कापे गरे म्हणतात तर गिळण्याच्या गर्‍याना बरके गरे म्हणतात अर्थात आठळा म्हणजे बिया बाहेर टाकाव्या लागतात ) गरे खूप आवडतात तेव्हा तिने घरी होती त्यावेळी बरक्या फणसाची चार झाडे लावली.नेक अॅाफ दि फिमर तुटल्यामुळे ती म्हातारपणी अपंग झाली होती .त्यालाही तिने धैर्याने तोंड दिले .भाऊ नंतर ती सतरा वर्षे जगली त्यानंतर  एकोणीसशे नव्वदमध्ये तिचा मृत्यू झाला .सेवाभावी कष्टमय सर्व असूनही अंतर्यामी एकाकी अशा जीवनाचा अंत झाला .

१२/७/२०१८©प्रभाकर पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel