मी मारलेली पाकिटे नव्हे तर माझ्या प्रवासात मारल्या  गेलेल्या  पाकिटांच्या कथा. आतापर्यंतच्या   दीर्घ प्रवासामध्ये फक्त दोनदा पाकिटे मारली गेली व एकदा  पाकीट मारण्याचा प्रयत्न झाला .

सीन--१--स्थळ शिवाजी नगर बस स्टॅन्ड पुणे.साल १९६० नोव्हेंबर महिना होता .मी कोकणात सुट्टी घालवून नाशिकला जात होतो .त्या वेळी रत्नागिरीहून पुण्याला येण्यासाठी फक्त एसटीच्याच बसेस होत्या . रोज फक्त एक बस व तीही दिवसाची सुटत असे.कारण माहिती नाही परंतु ती भल्या पहाटे साडेचार वाजता सुटत असे .त्यासाठी साडेतीन वाजता उठून सर्व आवरून स्टॅंडवर यावे लागे.रिक्षा त्यावेळी नव्हत्या. टांगे रत्नागिरीला केव्हाच नव्हते .सामान असल्यास सारवटगाडीने स्टँडवर यावे लागे. सारवटगाडी अगोदर सांगावी लागे.त्याला दोन बैल जोडले जात.(सारवटगाडी म्हणजे फॅशनेबल  बैलगाडी होय) घोड्यांच्या बग्गी सारखा चौकोनी हौदा. त्याला खिडक्या असत. पायरी वरून आत चढून दरवाजा लावून घ्यावा लागे.  दोन किंचित कुशनिंग असलेली बाके व प्रत्येक बाकावर दोघांची बसण्याची सोय अशी व्यवस्था असे.सामान पुढे गाडीवानाजवळ राही.थोडे बहुत आतही ठेवता येत असे.त्या वेळी रत्नागिरीला दोन तीन सारवट गाड्या होत्या .  सकाळी गाडीवानाला उठवण्यासाठीही जावे लागे.पहाटेचा हमाल मिळणे अशक्य असे. स्वतःच डोक्यावर बॅग घेऊन जावे लागे.रात्री झोपण्यासाठी उशीर झालेला असे .पावसाळी दिवस असले तर आणखीच आनंदी आनंद असे.सकाळी लवकर उठण्याचे टेन्शन  असे .त्यामुळे नीट झोप झालेली नसे. काही जण एसटीमध्ये सुरेख झोपतात परंतु मला झोप मुळीच येत नाही .त्या दिवशी पुण्याला संध्याकाळी आलो. काही कारणाने त्या रात्रीही झोप नीट झाली नाही .  दुसऱ्या दिवशी दुपारी जेऊन मी शिवाजीनगर स्टँडला रिक्षाने आलो .एस टी तीन वाजता सुटणार होती.जेवणामुळे आणि दोन रात्रीच्या जागरणामुळे डोळ्यावर झोप होती. शरीर थोडे सुस्तावलेले होते .माझे रिझर्वेशन होते . एवढ्यात एसटी आली. पाच सात बायका व दोन पुरुष गर्दी करून गाडीत चढले.मी त्यांच्या पाठोपाठ चढलो . तेवढ्यात त्या बायका व दोन पुरुष ही आळंदीची गाडी नाही ही आळंदीची गाडी नाही असे म्हणून घाई घाईने खाली उतरू लागले . स्वाभाविकपणे मी थोडा मागे होऊन त्यांना जाण्यासाठी वाट करून दिली .माझ्या एका हातात सुटकेस व दुसऱ्या हातात पिशवी होती . मला पाठीमागे कुणीतरी हात लावला असे वाटले.परंतु पाकिट काढले असे काही लक्षात आले नाही .ती मंडळी उतरून गेली.मी माझ्या जाग्यावर जाऊन बसलो . नंतर कंडक्टर आला .त्याने पैसे मागितले.रिझर्वेशन वरच्या खिशात ठेवलेले होते. त्यावेळी पूर्ण तिकीट न काढता केवळ आठ आण्यामध्ये रिझर्वेशन करता येत असे.बॅग पिशवी जाग्यावर ठेवून मी स्थिरस्थावर झालो होतो .खिशात हात घातला तो पाकीट जाग्यावर नाही. माझ्या सर्व प्रकार लक्षात आला . ती पांच सात मंडळी बायका व पुरुष हे भामटे  होते.त्यांची गॅंग होती . गर्दीकरून गाडीत चढायचे नंतर पुन्हा आपली गाडी नाही असे म्हणत खाली उतरण्याची लगबग करायची .स्वाभाविक त्याना वाट करून देण्यासाठी मनुष्य मागे होतो, त्यावेळी  त्यांचे पाकीट उडवायचे, असा त्यांचा राजरोस धंदा होता . दोन रात्रीचे थोडेबहुत जागरण, दुपारचे जेवण थोडेबहुत अंगावर चढल्यामुळे आलेला आळस,  पाकीट मुंबईत मारले जाते 'पुण्यात काय मारणार अशा प्रकारची समजूत त्यामुळे थोडा बहुत निष्काळजीपणा ,या सर्वांचा तो परिपाक होता .मी नेहमी प्रवासात दोन तीन ठिकाणी पैसे विभागून ठेवतो .या माझ्या सवयीने मला वाचवले .मी बॅग उघडून त्यात तळाला ठेवलेले पैसे काढले आणि तिकीट काढले .दुसरीकडे पैसे ठेवलेले नसते तर मला एसटीमधून उतरून परत जिथे उतरलो होतो तिथे जाऊन नातेवाईकांकडून प्रवासासाठी व रिक्षासाठी पैसे घेऊन परत यावे लागले असते.वेळ श्रम फजिती सर्व काही झाले असते .नेहमी प्रवासात पैसे दोन तीन ठिकाणी विभागून ठेवणे सुरक्षित असते .या संदर्भात मला आणखी एक आठवण झाली .त्या वेळी म्हणजे एकोणीसशे साठमध्ये नाशिक ते रत्नागिरी व परत असा  प्रवास केवळ पन्नास रुपयांमध्ये होत असे.नाशिक ते पुणे रुपये सात.

पुणे ते रत्नागिरी रुपये अकरा.रिक्षाला शिवाजीनगर ते एसपी कॉलेज फक्त बारा आणे.चार आठ आणे नाशिकला सीबीएस पर्यंत जाण्यासाठी .रत्नागिरी ते गुळे व परत रत्नागिरी या प्रवासासाठी होडी  बस वगैरे धरून एकूण खर्च रुपये दोन . पन्नास रुपयामधील उरलेले पैसे  किरकोळ खर्चासाठी असा एकूण हिशोब असे .अर्थात मी थोडे जास्त पैसे जवळ ठेवीत असे तो भाग निराळा पाकिटमाराला २५/३० रुपये मिळाले याशिवाय त्याचा काही फायदा झाला नाही .अर्थात त्यावेळचे ते रुपये होते हा भाग निराळा . आताच्या हिशोबात त्यांना अडीच ते तीन हजार रुपये मिळाले .शिवाजीनगर बस स्टँड ते एसपी कॉलेज या प्रवासासाठी जर नव्या पुलावरून गावातून गेले तर दहा आणे पडत व जंगली महाराज रोड वरून बारा आणे  पडत .  गावातून गर्दीतून प्रदूषणातून जाण्यापेक्षा मी जंगली महाराज रोडने जाणे पसंत  करीत असे .अर्थात मला पगारही त्यावेळी दोनशे पंचाहत्तर रुपये होता तो भाग वेगळा .हल्लीच्या मुलांना हे सर्व परीकथेसारखा वाटेल. त्यावेळी दशमान पद्धती आली नव्हती .

एकोणीसशे अठ्ठावन  ते एकोणीसशेसाठ दोन वर्षे मी मुंबईत नोकरीसाठी होतो .त्या वेळी गर्दीतून अनेक वेळा, कसाही प्रवास करून ,गर्दीतून फिरूनही ,माझे पाकीट मारले गेले नव्हते .मी माझ्या पैशांची चांगली काळजी घेतो .माझे पाकीट कोणी मारू शकणार नाही हा माझा भ्रम दूर झाला .

सीन--२--मुंबई -१९९३ साल --माझे मेहुणे मुंबईला हार्टच्या विकाराने खूप आजारी होते .त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवलेले होते .त्यांना भेटण्यासाठी आम्ही मुंबईला आलो होतो .आम्ही डोंबिवलीहून अप डाऊन करीत होतो.रोज दहा वाजता जेवून आम्ही निघू व रात्री दहा साडेदहाला  गाडीने बोरी बंदर स्टेशन वरून परत येत असू. जवळजवळ दोन आठवडे हा कार्यक्रम चालला  होता .पुण्याला पाकिट मारले त्याला तेहतीस वर्षे झाली होती .तेव्हापासून बस रेल्वे कुठेही गर्दीच्या ठिकाणी पाकिट पुढच्या खिशात ठेवीत असे. पाकिटात येथेहि पैसे फार कमी ठेवलेले होते . त्याशिवाय काही कागदपत्र होते .जाताना विशेष गर्दी नसे परंतु मुंबईहून परत येताना रात्री दहा साडे दहाला प्रचंड गर्दी असे.स्टेशनमध्ये शिरण्याच्या अगोदर पाकीट पुढच्या खिशात ठेवीत असे .एक दिवस मी पाकीट  पुढच्या खिशात ठेवायला विसरलोआणि गर्दीत  डब्यामध्ये शिरताना कुणीतरी पाकीट सफाईदारपणे मारले.त्याला पाच दहा रुपये मिळाले असतील कारण मी सुटे पैसे दुसऱ्या खिशात ठेवीत असे .माझे ड्रायव्हिंग लायसन्स गेले परंतु त्याचीही फारशी चिंता नव्हती कारण ओरिजनल घरीच होते.

आणखी एकदा खिसा  ब्लेडने कापण्याचा प्रयत्न झाला खिसा पॅंट कापली गेली परंतु पाकिट  कापणार्‍याच्या हाती लागले नाही .

त्या संदर्भात आणखी एक गोष्ट आठवली. आम्ही नेपाळला गेलो असताना काठमांडूला बॅग व इतर लगेज सरकत्या   प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत चामड्याची बॅग कापण्याचा प्रयत्न झाला . बॅग कापली गेली त्याला पैसे मात्र मिळाले नाहीत .   . 

बॅगेच्या वरच्या खिश्यात काही पैसे असूनही ते त्याला काढता आले नाहीत आपण योग्य ती काळजी घेत रहातो परंतु   दैवयोगाप्रमाणे लाभ हानी होत असतेच.

२२/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel