मी माझ्या वडिलांना भाऊ म्हणत असे .वडिलांना साधारणपणे बाबा  अण्णा अप्पा तात्या काका दादा क्वचित मामा असे  बर्‍याच ठिकाणी संबोधले जाते . आपल्या वडिलांना ज्या नावाने इतर संबोधित असतिल त्याच नावाने मुलेही हाक मारू लागतात .किंवा घरातील मोठी माणसे ज्या नावाने हाक मार असे सांगतात ते नाव  प्रचलित होते . मला आत्या होत्या परंतु त्या दूर असल्यामुळे त्या ज्या नावाने हाक मारीत असत म्हणजेच भाऊ या नावाने (ऐकून )मी हाक मारणे शक्य नव्हते .आईला आई म्हणून हाक मारण्यास वडिलांनी शिकविले असावे .त्याप्रमाणे मी हाक मारू लागलो .वडिलांनाही मी आई म्हणूनच हाक मारू लागलो .लहानपणी मला कोणीच अमुक नावाने हाक मार असे शिकविले नाही .

मी वडिलांचा खूप लाडका होतो .शाळा सोडली (ते शिक्षक  होते) तर इतर कुठेही जाताना वडील मला त्यांच्याबरोबर बहुतेक वेळा घेऊन जात असत.दीड वर्षाचा असेन ,(ही हकिगत वडिलांनीच सांगितलेली आहे )त्या वेळी मला , शेजारी काही कार्यक्रम होता  ,तिथे वडील घेऊन गेले होते .मला तिथे काही तरी तोपर्यंत न पाहिलेले दिसल्यामुळे मी वडिलांच्या हनवटीला हात लावून त्यांचे तोंड त्या दिशेला वळवून आई ते काय असे विचारले .त्यावर एकच हशा पिकला .कोणी तरी त्यांना विचारले की तुम्ही याला हाक कोणत्या नावाने मार ते शिकविले नाही का ?कष्ट न करता त्रास नं सोसता जर आपण आई होत असू तर ते चांगलेच आहे असे भाऊंनी त्यावर हसत हसत उत्तर दिले .आम्ही डोर्ले येथे ज्या घरात राहात होतो त्याच्या शेजारी शांताक्का व त्यांचा मुलगा सून राहात होते .शांताक्काना माझी आते वडिलांना भाऊ म्हणून हाक मारत असे हे माहित असल्यामुळे त्यांनी मला भाऊ म्हणून हाक मारीत जा असे शिकविले .  (ही सर्व हकिगत भाऊंनी कधीतरी मला सांगितलेली आठवते )अशा तऱ्हेने मी वडिलांना भाऊ म्हणून हाक मारू लागलो .!!

मी वर म्हटल्याप्रमाणे भाऊ मला त्यांच्याबरोबर केव्हाही कुठेही लांबही घेऊन जात असत. हीही हकीगत भाऊंनी सांगितलेली आहे .मला अर्थातच आठवत नाही .एकदा ते त्यांच्या बरोबर मला रत्नागिरीला घेऊन गेले होते .त्यांच्या बरोबर फिरत असताना त्यांना त्यांचे एक ओळखीचे गृहस्थ भेटले . 

याची आई नाही का पुन्हा लग्न का नाही केले अशा स्वरूपाचे त्यानी काहीतरी विचारले.त्यावर आई आहे पण मी त्याला हौशीने घेऊन आलो असे त्यांनी उत्तर दिले .

.वर्षातून दोनदाआम्ही वाणसामान आणण्यासाठी होडी घेउन पूर्णगडला ताम्हनकरांकडे जात असू  त्या वेळी नेहमीच मी त्यांच्या बरोबर जात असे .रत्नागिरीला तर बहुतेक वेळा त्यांच्या बरोबर जात असे. भाऊ काका मामा आणि भाऊंचे स्नेही गुरव मास्तर हे काही उद्देश्याने औंध संस्थानातील शेटफळे  या गावी गेले होते .त्या वेळी मी पाच सहा वर्षाचा असेन. इतरांचा विरोध मोडून काढून त्यांनी मला हौशीने  त्यांच्याबरोबर त्रास सोसून नेले.येताना कोल्हापूरला तिचाकी  सायकल हौशीने आर्थिक बळ नसूनही माझ्यासाठी घेतली.

भाऊ खूप हौशी होते त्यांच्या अनेक आठवणी  मनात आपोआप खोलवर रुजलेल्या .आहेत.नाटक सिनेमा गायन प्रवास इ.ची भाऊंना फार आवड होती.भाऊंचा आवाज फार गोड होता . अनेक गाणी साक्या दिंड्या श्लोक भजने त्यांना पाठ होती.ते कीर्तनही उत्तम करीत असत .रात्री हौशीने ते मला हातावर घेऊन अंगणामध्ये फेऱ्या मारीत असत .त्यावेळी ते गोड आवाजात गाणी म्हणत असत . गाणी ऐकतांना मी त्यांच्या खांद्यावर डोके .ठेवून केव्हाच झोपी जात असे.ते अंगणात फेऱ्या मारीत आहेत .मी त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून मधुर आवाजातील गाणे ऐकत आहे.अशी स्मृती एक दोन वर्षांचा असूनही  खोलवर कुठे तरी जाणवते. 

भाऊ रसिक होते .दुर्दैवाने त्यांचे वडील अत्यंत लहानपणी वारल्यामुळे त्यांचे शिक्षण  मोठ्या कष्टाने जेमतेम मराठी सातवीपर्यंत होऊ शकले .मराठी शाळेत शिक्षक होण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता .आजोबा रेल्वेत नोकरीला होते त्यावेळी पेन्शन वगैरे काही योजना नसल्यामुळे आजीला उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते .दोन मुलींची लग्ने व भाऊंचे शिक्षण आजीला मोठ्या कष्टाने जवळचे सोने नाणे विकून  करता आले.तिच्या भावाचा तिला फार मोठा आधार होता परंतु भावाचीही आर्थिक परिस्थिती बेतास बात असल्यामुळे त्या दृष्टीने काही मदत होऊ शकली नाही .त्याही परिस्थितीत भाऊंनी  रत्नागिरीला जाऊन इंग्रजी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला .परंतु कुणाचा कसलाही  आधार नसल्यामुळे तो प्रयत्न विफल गेला .

भाऊ कृश सडपातळ वर्ण सावळा उंचीने बेताचे जेमतेम पांच फूट  तीन इंच उंचीचे होते.नाक धारदार चेहरा तरतरीत व एकूणच देखणेपणा कडे झुकणारा होता .फार लहानपणी त्यांना देवी आल्या होत्या ते त्यांनाही आठवत नसे.त्याचे पुसट व्रण त्यांच्या चेहऱ्यावर होते. त्या काळी देवीची लस टोचण्याचा सोयी विशेष नव्हत्या आणि असल्या तरी देवीचा कोप होईल या भयाने लोक लहान मुलांना लस टोचत नसत .भाऊंना देवीचा ताप इतका जोरदार आला होता की ते जवळजवळ मृत झाले होते असे त्यांची आई त्यांना सांगत असे .अश्या आठवणी ते सांगत .भाऊंना डोर्ले येथे सर्व मास्तर म्हणत परंतु गुळे पावस रत्नागिरी किंवा नातेवाईकामध्ये त्यांचा उल्लेख किंवा त्यांना हाक नथू मास्तर म्हणून मारली जाई .त्यांचे नाक टोचलेले होते . त्यांच्या अगोदरची माझ्या आजीची मुले जगत नसत .त्यामुळे ती देवीला नवस बोलली की मला मुलगा होऊ दे तो जगू दे मी त्याचे नाक  टोचीन व त्याचे नाव नथू ठेवीन.लहानपणी सगळे त्यांना नथू म्हणून हाक मारीत पुढे शिक्षक झाल्यावर त्यांना नथूमास्तर  म्हणून सगळे म्हणू लागले .

ते सोळा वर्षांचे असताना व्हर्नाक्युलर  फायनल पास झाले व लगेच त्यांना नोकरी लागली.तसे ते चौदा वर्षांचे असताना परीक्षेला बसू शकत होते परंतु त्या वेळी सोळा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय परीक्षेला बसू देत नसत  . लगेच मुलगी सांगून आली व त्यांचे लग्नही झाले .त्या काळी म्हणजेच शंभर वर्षांपूर्वी  विवाह लहानपणी होत असत.त्यामध्ये काही विशेष गैर आहे असेही कोणाला वाटत नसे.भाऊंना इतक्यात लग्न करू नये असे वाटत होते परंतु आजीच्या  आग्रहास्तव व प्रेमामुळे  ते लग्न करण्याला तयार झाले असे ते सांगत .आई त्यावेळी केवळ सहा वर्षांची होती .गोरज मुहूर्त होता . लग्न जवळजवळ रात्रीच लागले .ती अर्धवट झोपेतच होती . लग्न झाल्यावर ती मोठी होईपर्यंत माहेरीच होती .तिला लग्न झाल्याचे अजिबात आठवत नसे.आई वडिलानी सांगितले हा तुझा नवरा आणि ती आमच्याकडे आली. माझा जन्म झाला तेव्हा आई एकवीस वर्षांची होती .आई व भाऊ  यांच्या वयामध्ये दहा वर्षांचे अंतर होते.भाऊंचे लग्न एकोणीसशे अठरा साली झाले बालविवाह कायदा त्यानंतर अकरा वर्षांनी पास झाला .तो काळ कोकणातील शहरापासून फार दूरच्या एका खेड्यातील शंभर वर्षांपूर्वीचा होता .ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानातून मुक्त केल्यानंतर काही वर्षे रत्नागिरीला स्थानबद्ध करून ठेवले होते हे लक्षात असू द्या .ब्रह्मदेशचा म्हणजे हल्लीच्या म्यानमारचा पाडाव झाल्यानंतर ब्रिटिशांनी तिथल्या राजाला म्हणजेच थिबाला रत्नागिरीला कैदेत ठेवले होते .कोकण हे त्या काळी सर्व दृष्टींनी किती दुर्गम होते ते यावरून लक्षात यावे .कोकणचा अंदमान नंतर दुसरा नंबर होता!!

भाऊ अध्यात्मिक वृत्तीचे होते .कुठचेही एखादे अध्यात्मावरील पुस्तक त्यांच्या निदर्शनास आले की ते विकत घेऊन वाचत असत व आपल्या संग्रही ठेवीत  .शिक्षक असून परिस्थिती बेतास बात असूनही त्यांच्याजवळ एक कपाट भरून अध्यात्मावरील  पुस्तके होती .स्वामी विवेकानंदांचे सर्व बारा खंड ज्ञानेश्वरी व गीता यावरील अनेक ग्रंथ त्यांच्या जवळ होते .भक्ती मार्ग ज्ञानमार्ग राजयोग कर्मयोग  यापैकी कोणता श्रेष्ठ यावर त्यांचे वादविवाद रात्र रात्र चालत .शेटफळे येथे ते त्यासाठीच गेले होते .

पावस येथील स्वामी स्वरूपानंदाचे ते प्रथम मित्र व नंतर गुरुबंधू होते.स्वामी स्वरूपानंदांचे पूर्वाश्रमीचे टोपणनाव अप्पा होते .आम्ही त्यांना अप्पा म्हणून  हाकही मारीत असू .आम्ही आप्पांच्या घरात दोन वर्षे त्यांच्या आईला सोबत म्हणून राहात होतो .ते देसाई बंधूंकडून आपल्या आईकडे राहावयास मधूनमधून येत . त्यावेळी त्यांच्या सहवासाचा योग मला मिळाला .त्यांना जवळून पाहता आले .रत्नागिरी पुणे मुंबई कुठूनही गुळे येथील आमच्या घरी जाताना प्रथम अप्पांना भेटायचे तिथे थोडा वेळ बसायचे  त्यांना नमस्कार करून पाया पडून मग पुढे मार्गस्थ व्हावयाचे असा शिरस्ता होता .                    आप्पांमुळेच भाऊंना त्यांच्या गुरुकडून अनुग्रह मिळाला असे भाऊ सांगत .त्या संबंधी आणखी एक भाऊनी सांगितलेली आठवण .भाऊंनी अनुग्रह घेतला तो माझ्या जन्मापूर्वी .भाऊ ट्रेनिंगला रत्नागिरीला असतांना साने नावाचे एक शिक्षक  ट्रेनिंगला होते .भाऊ व ते चांगले मित्र झाले. त्यांच्या व भाऊंच्या भेटी मधून मधून होत असत.पत्रव्यवहार तर नेहमीच असे. अनुग्रह घेण्यासाठी पुण्याला स्वामी स्वरूपानंदांच्या गुरूंकडे जाताना भाऊंनी  साने याना सुद्धा  आग्रहाने बरोबर घेतले होते .कारण भाऊंना साने याना सुद्धा अनुग्रह मिळावा असे वाटत होते .अप्पांच्या गुरूंनी एकालाच अनुग्रह देईन असे सांगितले. तेही अप्पांच्या  आग्रहावरून .अप्पाना भाऊंना अनुग्रह मिळावा असे वाटत होते .साने त्याबाबत निरिच्छ होते .ते म्हणाले कि मी श्रीराम जयराम जयजयराम या मंत्राचा जप करुन मुक्त होईन.मास्तर तुम्ही अनुग्रह घ्या .शेवटी भाऊंनी अनुग्रह घेतला.पुण्याहून परत येताना निवळीच्या घाटांमध्ये साने मोटारीतून उतरून आपल्या गावी चालत गेले .तीच त्यांची व भाऊंची शेवटची भेट.त्यानंतर त्यांचा  अल्प आजाराने अकाली मृत्यू झाला .त्यानंतर माझा जन्म झाला .यावरून भाऊंना काय सुचवावयाचे  होते ते सहज लक्षात येते  येते.         

भाऊ व अप्पा यांचे संबंध किती घनिष्ठ होते ते रत्नागिरीच्या डॉक्टर रामभाऊ. परांजपे यांनी स्वामी स्वरूपानंदांच्या लिहिलेल्या चरित्रावरून स्पष्ट होते त्यामध्ये भाऊंवर एक संपूर्ण प्रकरण आहे . 

भाऊंनी  खूप धर्मग्रंथ जमविले होते .त्यांच्या वाचनात कृष्णमूर्तीवरील लिखाण आले .त्यांना त्या विचारांबद्दल कुतूहल व जिज्ञासा निर्माण झाली परंतु त्यांना त्याचे आकलन होईना .त्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे ते मुळातून पुस्तके वाचू शकत नव्हते .त्यांनी मला जर एखादे चांगले कृष्णमूर्तींचे पुस्तक मिळाले तर तू मला स्वैर अनुवाद करून पाठवअसे सांगितलें व त्याप्रमाणे मी एका पुस्तकाचा अनुवाद करून पाठविला.त्याने त्यांचे समाधान झाले असावे. सुंदर हस्ताक्षरात लिहून त्यानी ते वाचनासाठी  स्वामी स्वरूपानंदांकडे ठेवले होते .त्याची सविस्तर हकीगत मी व कृष्णमूर्ती या माझ्या एका लेखात आहे.

हातात घेतलेल्या कामामध्ये संपूर्ण झोकून देण्याची त्यांची वृत्ती होती . डोरले येथे शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी पटसंख्या कशी वाढेल शाळेला स्वतःची इमारत कशी निर्माण होईल .एका शिक्षकाची शाळा तीन चार शिक्षकांपर्यंत कशी जाईल .गावांमध्ये नेहमीच दोन तीन तट असतात परंतु शाळेच्या कामासाठी हे सर्व एकत्र येऊन काम कसे करतील हे त्यांनी पाहिले .हुशार विद्यार्थ्यांना जास्त वेळ शिकवणे .विद्यार्थ्यांतील कलागुण हेरून त्याला वाव देणे .ज्याला टीचिंग एड्स म्हणजेच शिकवण्यासाठी उपयुक्त साधने म्हणतात ती त्यांनी  विद्यार्थ्यांकडून करून घेतली व त्याचा ते वापरही करीत असत .

ते प्रेमळ होते माणसे जोडण्याची कला त्यांच्याजवळ होती त्यामुळे माणसे काम हसत खेळत करीत असत .दुसऱ्याला मदत करण्याची त्यांची वृत्ती होती .त्यांचे मामा यशवंतराव परांजपे म्हणजे दादा परांजपे  हे मोठे वैद्य होते  .संजीवन चिकित्सा पद्धतीचा त्यांनी शोध लावला .लहानपणी भाऊ त्यांच्याजवळ दोन वर्षे राहिल्यामुळे त्यांना सर्व प्रकारची संजीवनी औषधे माहिती होती. त्यामुळे ते डोर्ले गावातील कुणालाही त्यांच्याकडे आल्यास औषधे देत .त्याचे त्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत.  त्या काळात खेडेगावातील अशिक्षित लोकांमध्ये जंतांचे प्रमाण फार मोठे असे.त्यामुळे साधारणपणे कोणीही पेशंट आल्यावर ,त्याला तो पहिल्यांदाच आला असल्यास ,सॅंटोमिक्स नावाची जंतांची पावडर देत. ती साधारण साखरे सारखी दिसत असे.गुळामध्ये त्यातील दहा बारा कण टाकून त्याची गोळी करून पेशंटला दिली जाई .रात्री तो गूळ खायचा व सकाळी एरंडेल तेल घ्यावयाचे म्हणजे सकाळी जंत पडून जात.पेशंटला निम्मे बरे वाटत असे .बरेच रोग जंतामुळे  होतात असे भाऊंचे मत होते .एरंडेल तेल त्यावेळी बाहेर  कोणी दुकानदार ठेवीत नसे .भाऊ त्या बाटल्या आणून ठेवीत  .व पेशंटला एक छोटी बाटली देत त्याचे पैसे त्याने दिले तर घेत नाही तर फुकट देत. संजीवन औषध पाण्यातून घ्यावयाचे असे. खेड्यातील गरीब लोकांजवळ स्वच्छ काचेच्या बाटल्या नसत .त्यामुळे भाऊ बाटल्यांचाही साठा करून ठेवीत. आपला वेळ खर्च करून हे सर्व फुकट चाले पण त्यामुळे कितीतरी माणसे जोडली जात . एक पुण्य कृत्य म्हणून भाऊ हे सर्व मनाच्या समाधानासाठी करीत .मनाने फार हळवे असल्यामुळे कोणतेही करुण दृश्य पाहिले वाचले ऐकले की त्यांच्या डोळ्यात टचकन् पाणी येत असे.

ते चांगल्यापैकी रागीट होते एकदा रागावले की त्यांच्यापुढे उभे राहण्याची कोणाची  हिम्मत नव्हती .ते मग कुणालाही जुमानीत नसत .त्यांचा स्वभाव माहीत असल्यामुळे नातेवाईकही त्यांच्या रागाचा राग धरत नसत  लहानपणी मी त्यांच्या हातचा खूप मार खाल्ला आहे . शेजारपाजारच्या मुलांबरोबर मारामारी धाकट्या भावाला चिडवणे स्वतःची हुशारी मिरवणे दुपारी भाऊ झोपलेले असताना दंगा करून त्यांना उठविणे ही माराची प्रमुख कारणे असत.लहान मुलाला केव्हाही हाताने मारू नये असे त्यांचे म्हणणे होते .हाताने मारताना कुठेतरी रागाच्या भरात जोराने वर्मी घाव लागतो व मुलांचे कायमचे नुकसान  होते .वयानुसार लहानपणी हिरकुटाची जुळी(माडाच्या झावळीचे दोन एकत्र केलेले हीर)  नंतर वेताची लहान छडी नंतर मोठी छडी असा क्रमश: वापर करावा  असे त्यांचे म्हणणे असे.रागाच्या भरात मारलेले कुठेही जास्त लागते.मारण्याचा हेतू इजा हा नसून सुधारणा हा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे राग येऊन मारण्यापेक्षा सुधारणेच्या हेतूने मारले पाहिजे असे त्यांचे मत होते. मारण्याचे साधन हातात घेईपर्यंत राग थोडासा कमी होतो व  शिक्षेचा हेतू लक्षात घेऊन कमी जोराने  मारले जाते .सकाळ संध्याकाळ शाळा असे दुपारी जेवल्यानंतर दहा पंधरा मिनिटे थोडासा आराम करण्याची त्यांची सवय होती .त्या वेळी त्यांना मुलांचा दंगा मुळीच पसंत नसे .बऱ्याच वेळा भाऊ झोपले आहेत हे लक्षात न राहून मी दंगा करीत असे .व मार खात असे.मी लहान मोठ्या सर्व साधनांनी मार खाल्ला आहे.या बाबतीत आणखी एक आठवण लक्षात आहे .भाऊंनी  मारले की आई मला जवळ घेत नसे.बहुधा भाऊंच्या भीतीने ती तसे करीत असावी .एकदा भाऊंनी  तिला समजावून सांगितले की जर आई वडिलांपैकी एकाने मारले तर दुसऱ्याने त्याला जवळ घेतले पाहिजे नाही तर मुलांनी कुठे जावे ?तेव्हापासून आई मला जवळ घेऊन लागली .भाऊ सुधारणेसाठी मारावे वगैरे म्हणत असले तरी केव्हा केव्हा रागाने ते जोरात मारीत नंतर त्यांचे त्यांनाच खूप वाईट वाटे .मग खोबरेल तेल घेऊन ते माझ्या अंगाला वेताच्या वळावर  हलक्या हाताने लावत असत  .

त्यांचा स्वभाव घाबरट होता दुःख क्लेश वेदना मृत्यू इ .ते खूप घाबरत असत .घाबरटीमुळे ते त्यांचे दुःख वेदना दसपट करीत असल्यामुळे ते खरेच किती आजारी आहेत ते कळत नसे.आणि खरेच खूप आजारी असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याचा संभव असे.विशेष आजारी नसतानाही त्यांनी काही वेळा मला लांबून बोलावून घेतले आहे.

ते अत्यंत व्यवस्थित होते प्रत्येक वस्तूला तिची जागा निश्चित पाहिजे  आणि ठरलेल्या जागेवर ती वस्तू सापडली पाहिजे ,असा त्यांचा आग्रह असे .झोपेतून उठवून जरी एखादी वस्तू आण म्हणून सांगितले तरी ते लगेच आणता आली पाहिजे.काळोखातही ठरलेल्या जागी ठरलेली वस्तू मिळाली पाहिजे .लहानपणी मी थोडा अव्यवस्थित होतो परंतु त्यांच्या दृष्टीने मात्र खूपच अव्यवस्थित होतो .त्यामुळे ते नेहमी म्हणत की तुला बायको व्यवस्थित मिळाली तर ठीक आहे नाहीतर काही खरे नाही.

त्यांचा स्वभाव मुळीच काटकसरी नव्हता .असेल त्यात भरपूर खर्च केला पाहिजे असे त्यांचे मत होते .आईला त्यांचा काटकसरी स्वभाव आवडत नसे आपण भविष्यकाळासाठी राखून ठेवले पाहिजे असे तिचे मत होते आणि त्यात काहीही चूक नव्हते.ते नेहमी म्हणत की मला कधी काही कमी पडले नाही व पुढेही पडणार नाही .कोणीही आले की त्याला देताना त्यांचा हात घसघशीत असे .त्यांचे एक वाक्य आवडते होते ते नेहमी म्हणत पुढच्या दरवाज्याने आपण देत जावे म्हणजे घरात ची पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी मागील दरवाजाने लक्ष्मी आत शिरते .  त्या मुळे भाऊ कसे तर पाबूत(पुष्कळ ) व व्यवस्थित असे प्रत्येक जण म्हणत असे .शिक्षक असताना त्यांनी शाळा व्यवस्थित नीटनेटकी ठेवली व निवृत्त झाल्यावर .आंब्याचा धंदा करताना तोही अत्यंत व्यवस्थित केला .एरवी ते कधीही हिशोब मांडत नसत परंतु धंद्याचा मात्र हिशोब पै न पै व्यवस्थित असे .आंबापोळी फणसपोळी केळेपोळी करताना किती लगद्याला किती साखर घातली म्हणजे  पोळी खुशखुशीत होईल त्याचे प्रमाण त्यांनी प्रयोगाने निश्चित केले होते .वजन करून त्याप्रमाणे साखर घातली जाई .आम्ही गुळ्याला आमच्या घरी राहण्याला गेल्यावर त्यांनी हौसेने केळीची बाग तयार केली.केळ्याचा घड तयार झाल्यावर तो आम्ही घरात खाणे शक्य नव्हते . गावात वाटून किती केळी वाटणार ?बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवून विशेष काही हाती लागेना.शेवटी त्यांनी केळ्याची साटे(पोळी) करावयाचे ठरविले .तोपर्यंत कुणीही केळ्यांची साटे केली नव्हती .त्यांनी निरनिराळे प्रयोग करून शेवटी उत्तमपैकी खुसखुशीत केळ्यांची साटे बनविली त्याला बाजारपेठही चांगली मिळाली. यामध्ये त्यांची प्रयोगशीलता दिसून येते .शिक्षकी पेशा जसा त्यांनी उत्कृष्ट प्रकारे पार पाडला त्याचप्रमाणे धंदाही उत्कृष्टपणे केला .शिक्षक म्हणून जसे ते यशस्वी झाले त्याचप्रमाणे आंब्याचा धंदाही त्यांनी उत्कृष्टपणे केला .जे काम करावयाचे ते सर्वस्व ओतून करावयाचे व यशस्वी व्हावयाचे असा त्यांचा स्वभाव  होता .

एकोणीसशे एकोणतीस साली त्यांनी घराची  मामुली डागडुजी केली होती.घर आहे तर धर आहे असे त्यांचे म्हणणे होते.  एकोणीसशे अठ्ठावन साली त्यांनी पुन्हा जवळ जवळ नवीन घर बांधले .त्यासाठी खूप पैसा खर्च झाला .जेव्हा जेव्हा त्यांनी जे जे मिळविले ते काही ना काही कारणाने खर्च करून टाकले .संचय काहीच केला नाही. तो त्यांचा स्वभावच होता .

वृद्धत्वामुळे एकोणीसशे अडुसष्ट साली ते माझ्याकडे नाशिकला राहावयाला आले .त्या वेळच्या काही आठवणी  ते सकाळी आवर्जून ध्यानाला बसत. दिवसातही जेव्हा जेव्हा वेळ मिळे त्या त्या वेळीत्यांचे ध्यान चालू असे.ते नेहमी मला म्हणत की या नाशिक भूमीमध्ये अनेक साधू संत होऊन गेले व त्यांचे वास्तव्यही झाले त्यामुळे या भूमीमध्ये हवेत मला पावित्र्याचा सुगंध येतो .माझी अध्यात्मिक प्रगती झपाट्याने होत आहे .

एकोणीसशे एकाहत्तर साली पत्नीला दिवस गेले होते .त्यांच्या मनात मुलगा होइल कि मुलगी होईल असे विचार स्वाभाविकपणे असत. त्यांना ध्यानामध्ये मुलगा असा शब्द ऐकू आला.ही गोष्ट त्यांनी त्यावेळी आईला सांगितली होती.मुलगा (प्रभंजन) झाल्यावर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली .ते म्हणाले मनी वसे ते ध्यानी दिसे असे कशावरून नसेल  म्हणून मी काही बोललो नाही .प्रभंजन झाला त्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये हजर होते. आम्ही सर्व जेवण्यासाठी घरी आलो होतो.त्यांनी घरी  येऊन ही बातमी आम्हाला सांगितली .ते हॉस्पिटलमध्ये बाहेर बसले असताना आतून त्यांना रडण्याचा आवाज ऐकू आला.त्या रडण्याच्या आवाजावर मुलगा आहे असे त्यांनी ओळखले नंतर सिस्टरला विचारून खात्री करून घेतली.

प्रभंजनला त्यांनी सर्वात प्रथम पाहिला .ते पुढे म्हणाले की आज शनिवार आहे तेव्हा मारुतीचे काहीतरी नाव ठेवा.त्यांना मान देऊन प्रभंजन हे नाव बारशाच्या वेळी निश्चित झाले .

मृत्यूच्या अगोदर काही दिवस त्यांनी आईला पुढीलप्रमाणे सांगितले होते

"मी बेशुद्धीमध्ये जाईन मला वाचवण्यासाठी काही प्रयत्न करू नका. हॉस्पिटलमध्ये नेऊ नका."आईने ही गोष्ट त्यांच्या मृत्यूनंतर आम्हाला सांगितली. मृत्यू पुर्वींच्या पाच वर्षांत त्यांनी नाटक सिनेमा इत्यादी इच्छा .काही प्रमाणात पूर्ण करून घेतल्या .शक्य असेल तेव्हा आई भाऊ दोघेही गंगेवर जाऊन बसत असत .एका वेळी ते चालत जात व एका वेळी बसने येत .टिळकवाडी ते रामकुंड एकावेळी ते चालू शकत असत.एवढी त्यांची तब्येत चांगली होती .शेवटच्या महिन्यात त्यांची तब्येत झपाट्याने खालावत गेली .शेवटचा महिना सोडला तर पांच वर्षे त्यांची तब्येत चांगली राहिली होती .ते आनंदी व समाधानी होते.हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्याच्या सर्व चाचण्या झाल्या नंतर डॉक्टरांनी आम्हाला आता ते शुद्धीवर येणार नाहीत असे सांगितले .

पुढे सुचविले की घरी नेले तर त्यांना उपासमारीने मृत्यू येईल. हॉस्पिटलमध्ये ठेवले तर केव्हा मृत्यू येईल ते सांगता येणार नाही.काय करायचे ते तुम्ही ठरवा.  .प्रथम आईला विचारले ती म्हणली की आपण त्यांना घेऊन घरी जाऊ या .आई प्रचंड धीट होती .नंतर पत्नीला विचारले ती म्हणाली की आता अमावास्येला सूर्य ग्रहण आहे.ग्रहण काळात मृत्यू चांगला नाही तेव्हा अमावस्ये नंतर घरी नेऊ .हॉस्पिटलमध्ये चतुर्दशीला पहाटे सर्व सपोर्ट सिस्टीम असताना त्यांचा मृत्यू झाला .साधू नेहमी वद्य चतुर्दशीला समाधी घेतात . चतुर्दशीचा मृत्यू चांगला असा समज आहे .

एकोणीसशे त्र्याहत्तर साली मेंदूतील रक्तस्रावाने त्यांचा मृत्यू झाला.बेशुद्धीत जाताना त्यांनी प्रभाकर म्हणून  शेवटची हाक मारली.पाच सहा दिवसांनी हॉस्पिटलमध्ये बेशुद्धीत त्यांचे देहावसान झाले .माझ्या आयुष्यातील भाऊ नावाचे एक प्रेमळ प्रकरण संपले .

६/७/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel