अप्पा नात्याने जरी मेहुणा असला तरी त्यापेक्षा तो बराच काही होता .माझ्या लग्नाच्या अगोदर बायकोचा मोठा भाऊ या नात्याने दोन चारदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आला होता.त्यावेळी त्याचा उमदा स्वभाव लक्षात आला होता .लग्नानंतर स्वाभाविकपणे त्याचे आमच्या घरी बर्‍याच वेळा येणे होत असे .पेशाने ते डॉक्टर होते .निफाडला त्यांचा दवाखाना होता .त्या वेळी निफाड फार लहान शहरवजा गाव होते .त्यामुळे त्यांना  पेशंटना घेऊन किंवा अन्य कारणाने अनेकदा नाशिकला यावे लागे. स्वाभाविक त्यांची आमच्या घरी एक तरी चक्कर होत असे .माझी बायको त्यांची धाकटी लाडकी बहिण होती . माझे समवयस्क असल्यामुळे आणि त्यांचा स्वभाव  कुणालाही चटकन आपलेसे करून घेणारा असल्यामुळे ,आमची लवकरच दोस्ती झाली .ते नाशिकला आल्यावर त्यांच्या बरोबर मी अनेकदा शहरात जात असे.त्यांचे इंटरसायन्स पर्यंतचे शिक्षण इथे झालेले असल्यामुळे आणि त्यांच्या डॉक्टरीच्या व्यवसायामुळे व स्वभावामुळे त्यांचे सर्व थरातील दोस्त असत .एकदा गावात पोचले की पावला पावलाला त्यांची दोस्तमंडळी भेटत असे आणि प्रत्येकाजवळ थोड्या तरी गप्पा मारल्याशिवाय ते पुढे जात नसत .प्रत्येकाशी ते माझी ओळख करून देत .त्यांच्या बरोबर चालता चालता (खरे म्हणजे थांबता थांबता )मी काही वेळा कंटाळून जाई .तर काही वेळा त्यांच्या लाघवी  स्वभावाची गंमत वाटे .त्यांच्या बरोबर बुध्या हलवाई कडे बसून जिलबी, पांडे मिठाई वाल्यांकडे बसून गुलाबजाम ,भगवंतरावाकडे बसून मिसळ ,अनेकदा खालेल्ली आहे .विशेष म्हणजे  प्रत्येक ठिकाणी त्यांच्या हलवाई, हॉटेल मालक यांच्या बरोबर ओळखी असत.व गप्पाही होत असत .त्याशिवाय प्रत्येक ठिकाणी त्यांना आणखी कुणी कुणी ओळखीचे भेटत ते अलाहिदा .चांदवडकर लेनमध्ये जिथे ज्योती स्टोअर्स  घड्याळ्याचे दुकान आहे तिथे एक लहानसे हलवायचे दुकान होते.त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला बसून स्वतः मालक भजी तळत असत आणि ती फार कुरकुरीत नामांकित असत एवढे आठवते .तोही दुकानदार बहुधा त्यांचा वर्ग बंधू होता .दुकानाचे नाव मात्र आठवत नाही .

विविध प्रकारचे दुकानदार फोटोग्राफर्स अशा असंख्य ठिकाणी त्यांच्या ओळखी असत.मी नाशिकमध्ये नवखा त्यात माझा स्वभाव अंतर्मुख ,अबोल, एकलकोंडा , त्यामुळे मला त्यांच्या या स्वभावाचे  आश्चर्य कौतुक व आकर्षण वाटे .

सर्व नवीन व जुन्या डॉक्टरांकडे त्यांच्या ओळखी असत .ते  सर्वांकडे विभागून पेशंटना पाठवीत असल्यामुळे धंद्याच्या दृष्टीने त्यांचे स्वागत असेच परंतु मित्र म्हणूनही स्वागत असे.त्यावेळी नाशिक लहान होते डॉक्टर संख्येने फारच कमी होते त्यात स्पेशलायझेशन झालेले फारच थोडे .अप्पा मुळे माझ्याही अनेक डॉक्टरांशी ओळखी झाल्या .अप्पा म्हणजे कोणत्याही डॉक्टरकडे केव्हाही जाण्याचा तत्काळ परवाना होता .बाहेर कितीही गर्दी असली तरी अप्पा सरळ आंत घुसत असत व डॉक्टर प्राधान्यक्रमाने त्यांचे काम करीत असत .आमच्यापैकी कुणीही आजारी असले तरी अप्पांबरोबर डॉक्टरांकडे जायचे व प्रथम लगेच तपासून प्रिस्क्रिप्शन घेऊन बाहेर पडायचे ,मग बाहेर कितीही गर्दी असो अशी सवय आम्हाला लागली होती . देतो म्हटले आग्रह केला तरीही डॉक्टर पैसे घेत नसत .बरेच डॉक्टर आम्ही स्वतंत्रपणे त्यांच्याकडे गेलो तरीही फी घेत नसत . (त्याचे आम्हाला  ऋण वाटे .) मुलांच्या शिक्षणासाठी अप्पानी नाशिकमध्ये ब्लॉक घेतला .त्यांचा व माझा ब्लॉक समोरासमोर होता त्यामुळेही आम्ही एकमेकांच्या सहवासात खूप आलो . माझ्या आईचा कोकणात मांडीजवळील खुब्याचा सांधा तुटला.  तिला इथे आणल्यावर डॉक्टर काकतकर यांची ट्रिटमेंट चालू होती .डॉक्टर काकतकर अनेकदा घरी येऊन तपासत असत .ट्रॅक्शन  त्यांनीच लावले. चालण्यासाठी आई घाबरत असताना तिला धीर देऊन चालते केले  .दवाखान्यांमध्ये एकदा सुद्धा न जाता हे सर्व अप्पांमुळे शक्य झाले .एकाही व्हिजिटचे डॉक्टर काकतकरांनी पैसे घेतले नाहीत .सर्व ट्रिटमेंट आपुलकीने केली. तीही केवळ अप्पांमुळेच

ते स्वतः डॉक्टर होते व त्यांची औषध योजना अचूक असे .डॉक्टर आपले ज्ञान वअनुभव यावर रोगाचे निदान करतातच ;परंतु त्यात काही अंत:प्रेरणेचाहि (इनट्यूशनचा) भाग असतो असे मला वाटते . त्यांचे निदान व औषधयोजना अचूक असे . असा अनुभव आम्हाला अनेक वेळा  आला आहे .सौ.ला कोकणात खूप खोकला लागला . खाऱ्या नदीमधून आम्ही होडीतून बराच प्रवास  केला .त्याचा तिला त्रास झाला .आम्ही कोकणात शक्यते सर्व उपचार केले.सर्व खोकल्याची औषधे दिली गेली .काहीही बरे वाटले नाही रात्ररात्र खोकला लागत असे .इथे आम्ही आल्यावर अप्पांनी खोकला ऐकल्या बरोबर व कोकणातील ट्रिटमेंट पाहून इओसिनोफिलिया असे निदान केले आणि तेच खरे ठरले त्यांनी  पॅथॉलॉजिकल रिपोर्ट येण्या अगोदरच औषधे चालू केली व एका दिवसात खोकला संपूर्ण गेला .अर्थात औषधांचा कोर्स पूर्ण केला तो भागवेगळा .माझे वडील मेंदूतील रक्तस्रावामुळे बेशुद्ध झाल्यावर  गुप्ते (सिनिअर )डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते त्यावेळीही अप्पांच्या रोज नाशिकला चकरा असत . पॅथालॉजिकल टेस्टचा निफाडला असलेला अभाव,  स्पेशलिस्ट डॉक्टर नसणे ,यामुळे ते पेशंटना पुढील तपासण्याठी नाशिकला पाठवीत असत . बऱ्याच वेळा पेशंटबरोबर इकडे येत असत . निफाडला दवाखान्याच्या वेळा जरी ठरलेल्या असल्या तरी पेशंट केव्हाही त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावीत असत.  डॉक्टर त्यांना तपासून औषधेही देत असत  .रात्री सुद्धा पेशंटने बोलावल्यानंतर अर्ध्या झोपेत उठून डॉक्टर त्याच्याकडे जाण्यासाठी तयार असत . काही वेळा त्याचा अवास्तव फायदाही लोकांकडून घेतला जाई.डॉक्टरी हा एक धंदा किंवा पैसे मिळवण्याचे साधन असा त्यांचा कधीच दृष्टिकोन नव्हता .एक मिशन म्हणून त्यांनी डॉक्टरी केली .पैशासाठी पेशंटला कधीही अडवून धरले नाही एवढेच नव्हे तर गरिबांना त्यांनी फुकट औषधोपचारही केलेला आहे .काही वेळा स्वतःच्या पदराला खार लावूनही त्यांनी पेशंटना मदत केली आहे .

अप्पा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात नेहमीच भाग घेत असत एवढेच नव्हे तर  संघटन व कार्यवाही यांमध्येही पुढे असत ते समारंभप्रिय होते .त्यांना संगीताची आवड होती .केवळ श्रवण भक्तिच नव्हे तर स्वतः फ्ल्यूट पेटी इ.त्याना चागले वाजवता येत असे .त्यांना संगीताचा कान होता .त्या वेळच्या तंत्रज्ञानाप्रमाणे त्यांच्याकडे  निवडक रेकॉर्डचा  संग्रहही होता .कोणत्याही कामासाठी गावकऱ्यांनी त्यांना हाक मारली आणि ते धावून गेले नाहीत असे कधी होत नसे.ते थोडे बहुत ऑलराउंडर होते असेही म्हणता येईल . रांगोळी कशिदा भरतकाम स्वयंपाक अशी जी कामे स्त्रियांची म्हणुन साधारणपणे समजली जातात त्यामध्ये ही त्यांना कौशल्य होते.मुख्य म्हणजे हे काम माझे आहे आणि हे काम माझे नाही असा त्यांचा दृष्टिकोन नव्हता.कोणतेही काम हौशीने करायचे व त्यात संपूर्णपणे जीव ओतून  करायचे असा त्यांचा स्वभाव होता त्यामुळे ते कुठेही लोकांचे मन जिंकून घेत असत  . त्यांच्या प्रचंड लोकसंग्रहामागे हे त्यांचे गुण होते .

अशा माणसाला लोक अनुनयाची नशा चढते तशी त्याना चढली होती असे काही जण म्हणू शकतील .त्यांना प्रवासाची आवड होती.परंतु त्यांचा विशेष प्रवास झाला नाही . माझ्या बरोबर ते काश्मीर आणि औरंगाबाद अजंठा वेरूळ येथे  आले होते .तेवढाच त्यांचा प्रवास. या व्यतिरिक्त ते कुठेही फिरण्यासाठी गेले नाहीत . 

त्यांना पुढे डायबिटीस झाला . गोडाची तर प्रचंड आवड, त्यामुळे 

पथ्य व आवड यांमध्ये त्यांची चांगलीच ओढाताण होत असे.शेवटची त्यांची  सात आठ वर्षे अधूनमधून आजारपणातच गेली .त्यांना हार्ट अॅटॅक आले महिना महिना विश्रांतीसाठी ते नाशिकला हॉस्पिटलमध्ये दोन तीनदा अॅडमिट झाले होते .डॉक्टरांनी बायपास सुचविली होती .हे आम्हाला त्यांच्या डॉक्टरांकडून ,अप्पा वारल्यानंतर कळले . त्यावेळी बायपास मुंबईत होत असे.त्यांनी जाणून बुजून आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले .असे का केले ते कळत नाही .त्यांना एवढा गंभीर जीवघेणा आजार आहे हे आम्हाला फार उशिरा कळले .शेवटी त्यांच्या किडनी फेल झाल्या .मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट केले होते.महिना भर त्यांनी तसाच काढला .बायपासच्या वेळी किडनीवर ताण येतो आणि त्यात ते दगावतील असे बहुधा बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांना वाटत असावे .त्यामुळे डॉक्टर ऑपरेशन पुढे ढकलीत असावेत 

.अप्पा स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना सर्व कल्पना असावी .वरवर तरी ते शांत वाटत असत .अपरिहार्य शेवटाला त्यांनी शांत चित्ताने तोंड दिले असे वाटते.  आजारी असूनही उरापोटी काम करून त्यांनी आपला मृत्यू लवकर ओढवून घेतला असे आम्हाला वाटते .एकंदरीत सुदृढ प्रकृती असूनही त्यांचा एकसष्टाव्या वर्षी मृत्यू झाला .हल्लीचा दीर्घायुषी असण्याचा कल लक्षात घेतला तर ते थोडे लवकरच  गेले असे म्हणावे लागेल.प्रेमळ, मनमिळावू, कामसू ,उत्कृष्ट डॉक्टर, प्रचंड लोकसंग्रह असलेला ,हरहुन्नरी  समारंभप्रिय ,भला माणूस ,आमचा एक सुहृद  हरवला . विधिलिखितापुढे कुणाचे काही चालत नाही हेच खरे . 

१०/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel