चक्रव्यूह १
शेखर
ती घटना घडल्यानंतर मला विचार करण्यासाठीही वेळ नव्हता .त्या टोळक्या मधून मी जोरात सूर मारला आणि क्षणार्धात तळघराच्या पायऱ्या चढून वर आलो आणि हॉटेलच्या बाहेर येऊन मोटरसायकलला किक मारून ती सुरू केली .माझ्या मागून आरडाओरडा होत असलेला व त्या टोळक्यातील तरुण धावत येत असलेले मला जाणवत होते .माझ्या पाठोपाठ मोटारीत बसून व काही मोटरसायकलवरून माझा पाठलाग करू लागले .क्षणार्धात मला निर्णय घ्यायचा होता गावात जाणे धोक्याचे होते .मी मोटरसायकल जमेल तेवढ्या वेगाने रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळविली. स्टेशनवर पोचल्यावर मी धावत स्टेशनमध्ये घुसलो.सुदैवाने एक गाडी हळूहळू स्टेशनामधून बाहेर पडत होती .जिवाच्या कराराने धावत जाऊन मी ती पकडली .माझ्या मागोमाग ते टोळके स्टेशनमध्ये घुसले. मी त्यांच्या तावडीत सापडलो असतो तर हे लिहायला मी जिवंत नसतो .
घडले ते असे घडले. मी जुगार खेळण्यासाठी त्या जुगाराच्या अड्ड्यावर तळघरात गेलो होतो.माझ्या सुदैवाने मी बऱ्याच खेळी जिंकत होतो .तीन एक तासामध्ये मी जवळजवळ तीन लाख रुपये कमावले .मी फक्त दहा हजार रुपये खिशात ठेवून तिथे गेलो होतो . माझ्याशी जो खेळत होता त्याचे पाच सात साथीदारही त्याच्या बरोबर होते.तीन तासानंतर मी तिथून निघालो .तुला असा अर्धवट गेम टाकून जाता येणार नाही असे म्हणून त्यांनी मला अडविले .खेळ किंवा आमचे पैसे टाक असे त्यांचे म्हणणे होते .सुरुवातीला दहा खेळ खेळण्याचे ठरले होते तेवढे संपल्यावर मी निघालो होतो.हा हा म्हणता त्यांनी धक्काबुक्की सुरू केली .मला पकडून सर्व पैसे त्यांना काढून घ्यायचे होते .त्यातील एकाने गावठी पिस्तूल काढून ते माझ्यावर झाडले.नाइलाजाने मी सुरा काढून जो समोर दिसला त्याला भोसकले व पळण्यासाठी वाट केली व जिवाच्या आकांताने पळ काढला .माझे कपडे पैसे वस्तू सर्व काही माझ्या खोलीवर राहिल्या होत्या .आता त्या गावात मला परत जाणे शक्य नव्हते .ती मुले माझ्या पाळतीवर नक्की असणार. एकाचा खून झाल्यामुळे पोलीसही माझ्या मागावर असणार.माझ्या खिशातील तीन लाख रुपयांशिवाय दुसरे काहीही माझ्याजवळ नव्हते.यावर मला नवीन आयुष्य सुरू करायचे होते .प्रथम मी गाडी कुठे जात आहे त्याची चवकशी केली. गाडी मुंबईला जात होती .मी सुटकेचा निश्वास टाकला .
मी लहानपणापासून बनारसला रहात होतो .माझे लहानपण मला आठवत नाही .थोडी बहुत जी आठवण आहे ती अनाथाश्रमामधली .आश्रमामधील कागदपत्रावरून कुणीतरी मला पाच वर्षांचा असताना आश्रमात आणून सोडले .बनारसच्या घाटावर बसून मी रडत होतो .अठरा वर्षांचा झाल्यावर नियमाप्रमाणे मला अनाथाश्रम सोडावा लागला .आश्रमाने मला मोटर ड्राइविंग शिकविले होते .मी ड्रायव्हर म्हणून काम करीत होतो .मला पत्ते चांगले खेळता येत असल्यामुळे मी करमणूक म्हणून जुगाराच्या अड्ड्यावर खेळण्यासाठी जाऊ लागलो .हळू हळू मला त्यातून बऱ्यापैकी पैसा मिळू लागला .निश्चित रक्कम खिशात ठेवायची व ती संपली की निघून यावयाचे असे मी करीत असे .मी नियमितपणे व्यायामासाठी जिममध्ये जात असे.चालूगिरी गुंडगिरी मारामारी आक्रमकता यामध्ये मी हळूहळू तरबेज झालो .आता मागील सर्व वाटा बंद झाल्या होत्या .मुंबईचे नवीन क्षितिज डोळ्यासमोर होते .
खिशात पैसे होते. कपडे मळलेले होते जवळ बॅग वगैरे काहीही नव्हते. तसेच हॉटेलमध्ये जाणे संशयास्पद ठरले असते .मी प्रथम एक बॅग घेतली थोडे कपडे व इतर सामान घेऊन नंतर एका मध्यम प्रतीच्या हॉटेलमध्ये एक खोली घेतली .पैसे खोलीमध्ये किंवा खिशात ठेवणे धोक्याचे होते. ओळखपत्राशिवाय बँकेत खाते उघडणे शक्य नव्हते .माझ्या पाकिटातील ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून मला हॉटेलमध्ये खोली मिळाली होती .माझ्या पाकिटात ड्रायव्हिंग लायसन्स व क्रेडिट कार्ड तेवढे होते .क्रेडिट कार्ड वापरणे धोक्याचे होते .जर त्या टोळक्याने बँकेतून ओळखी मार्फत क्रेडिट कार्ड कुठे वापरले गेले ते शोधून काढले असते तर माझी पंचाईत झाली असती.माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असता.शिवाय बँकेच्या मार्फत पोलीस माझ्या मागावर असणार होते. मी हॉटेलच्या मालकांची मदत घेण्याचे ठरविले .त्याला मला थोडे बहुत सत्य सांगणे आवश्यक होते त्याशिवाय त्याने त्याची ओळख देऊन मला बँकेत खाते उघडण्यास मदत केली नसती .माझी महत्त्वाची कागदपत्रे ब्रीफकेसमध्ये होती ती ब्रीफकेस चोरीला गेल्यामुळे माझी ओळखच हरपली असे मी त्याला सांगितले . माझ्या बोलण्यावर त्याचा फारसा विश्वास बसलेला दिसला नाही .त्याने मला खोटी कागदपत्रे करून दिली व बँकेत ओळखही देऊन मला खाते उघडण्यास मदत केली. एवढेच नव्हे तर त्याने मला त्याच्या व्हॅनवर ड्रायव्हर म्हणून काम दिले.मी नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेतले. बनारसचे लायसेन्स वापरणे धोक्याचे होते. हळूहळू मी मुंबईत रुळलो .जुगाराचा अड्डा शोधण्याची व तेथे जाऊन खेळण्याची मला मधूनमधून हुक्की येई परंतु मी तो मोह कटाक्षाने टाळत असे .
२
शेट्टी
त्या दिवशी मी काऊंटरवर होतो .मॅनेजरला मी काही कामासाठी बाहेर पाठविले होते .एवढ्यात एक तरुण तरुण कसला मुलगाच हातात एक सुटकेस घेऊन बिचकत बिचकत हॉटेलमध्ये शिरला.त्याच्या एकूण आविर्भावावरून व चेहऱ्यावरून कुठे तरी पाणी नक्की मुरतआहे असा मला संशय आला.मी चेहऱ्यावर तसे काही दर्शविले नाही.थोड्या वेळाने त्याने बँकेत खाते उघडायचे आहे ओळख वगैरे पाहिजे म्हणून विनंती केली .मी त्याला सर्व प्रकारची मदत करून उपकृत करून ठेवले .त्याला नोकरी पाहिजे होती .त्याच्याजवळ उत्तर प्रदेशमधील बनारसचे ड्रायव्हिंग लायसन्सही होते. स्वारी बनारसची आहे हे माझ्या पहिल्या दिवशीच लक्षात आलेच होते .मी त्याला तू इथे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढून घे असे सांगितले. तत्याला माझ्या डिलिव्हरी व्हॅनवर ड्रायव्हर म्हणून ठेवले.कस्टमर्सना मी ऑर्डरप्रमाणे जेवण तर पुरवत असेच पण त्याच बरोबर जेवण पॅकेट्स च्या मिषाने इतरही काही बेकायदेशीर गोष्टी गुपचूप घरपोच पाठवीत असे.माझ्या बेकायदेशीर गोष्टींमध्ये हा कदाचित मला अॅसेट ठरेल असे वाटल्यावरून मी त्याला माझ्या व्हॅनवर नोकरीसाठी ठेवून घेतले.
माझ्या अंदाजाप्रमाणे लवकरच एक नामी संधी चालून आली .नेहमीप्रमाणे क्लबमध्ये संध्याकाळी गेलो असता तिथे शिरसाट वकिलांनी सहजच एक गोष्ट सांगितली. मूळचे उत्तर प्रदेशमधले पण आता दोन पिढ्या मुंबईमध्ये सेटल झालेले एक रॉय नावाचे जोडपे त्यांच्या ऑफिसमध्ये काही कामासाठी आले होते .ते जोडपे श्रीमंत होते .त्यांना त्यांच्या संपत्तीचा एक ट्रस्ट बनवायचा होता .त्या ट्रस्टमधून गरीब व वंचित लोकांसाठी काम केले जावे असा त्यांचा मनोदय होता .थोडय़ा थोडक्या नव्हे तर पन्नास कोटी रुपयांचा हा ट्रस्ट होता.ट्रस्टची मोठी रक्कम ऐकूनच मी हादरलो होतो .त्यांच्या नातेवाईकांनी कशी परवानगी दिली. त्यांना मुलेबाळे काही नाहीत का असे कुणीतरी स्वाभाविकपणे विचारले.माझ्या डोक्यात तोच प्रश्न बरोबर आला होता .त्यांना मूलबाळ नाही परंतु त्यांचा एक मुलगा लहानपणीच कुंभमेळ्याच्या यात्रेत प्रयागला हरवला व महाप्रयास करूनही तो सापडला नाही.आता तो सापडेल असे वाटत नाही तो असता तर काही प्रश्नच नव्हता असे त्यांनी सांगितल्याचे शिरसाटसाहेब म्हणाले.त्या वेळी मी काहीच बोललो नाही परंतु झपाट्याने माझे डोके काम करू लागले होते .
३
शिरसाट
राय कुटुंबीयांची कोर्टाची कामे माझ्याकडे आज अनेक वर्षे आहेत. काल राय साहेब माझ्याकडे आले तेव्हा असेच काही कोर्टाचे काम असेल असे मला वाटले होते .त्यांना त्यांच्या सर्व संपत्तीचा ट्रस्ट करून त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून गरीब व वंचित यांच्यासाठी शिक्षण इत्यादी कामे करावयाची आहेत असे त्यांनी सांगितले .त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे मी त्यांना समजावून सांगितले .लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची एक यादीही त्यांच्याजवळ दिली .आज जवळजवळ वीस वर्षे त्यांचे काम माझ्याकडे असल्यामुळे त्यांची कौटुंबिक माहितीही मला आहे .ते प्रयागला यात्रेसाठी गेलेले असताना त्यांचा एकुलता एक मुलगा हरवला हेही मला माहीत होते .जर तो मुलगा सापडला तर एकूण ट्रस्टच्या उत्पन्नातील निम्मे उत्पन्न त्याला दिले जावे असे ट्रस्टच्या एकूण कलमांमध्ये टाकावे असेही त्यांनी सुचविले होते .ट्रस्टी कोण याबद्दलही थोडीशी आमची चर्चा झाली होती .विषय ताजा असल्यामुळे त्या दिवशी मी क्लबमध्ये गेल्यानंतर काही संदर्भांमध्ये सहज राय कुटुंबियांबद्दलही बोलून गेलो .मी सहसा कोर्टातील कामे कोर्टामध्ये ठेवतो त्याशिवाय क्लायंटची गोपनीयता म्हणून असतेच .या ट्रस्टमध्ये काही गोपनीय नव्हते म्हणून सहज मी बोलून गेलो .
शेट्टी एक क्लब मेंबर एवढीच माझी त्यांच्याशी तोंड ओळख होती .भेटल्यावर हसणे सहज राजकारण समाजकारण अर्थकारण यावर दोन चार गप्पा एकत्र चहापान ड्रिंक्स घेणे या पलीकडे आमची ओळख नव्हती .मी क्लबमध्ये सहज बोललो त्याच्या दुसर्या दिवशी दुपारी शेट्टी यांचा मला फोन आला .त्याना काही महत्त्वाच्या कामासाठी माझी अपॉइंटमेंट हवी होती. काही कोर्टाचे काम असेल अशी माझी समजूत होती .मी डायरी बघून त्यांना वेळ सांगितली .ते आल्यावर त्यांना अत्यंत गुप्तपणे माझ्याजवळ काहीतरी बोलावयाचे होते .माझा असिस्टंट स्टेनो पीए या सगळ्याना बाहेर जाण्यास सांगून आम्ही माझ्या रूममध्ये बोलत बसलो .अशीला जवळील बोलणे पुन्हा ऐकावयाचे झाल्यास त्याची सोय म्हणून व त्याचप्रमाणे खबरदारी म्हणून मी टेबलाखालील एक बटण दाबताच ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होते .ही गोष्ट माझ्या शिवाय कुणालाच माहित नाही .शेट्टी माझ्याजवळ बोलायला लागल्यानंतर अर्थातच मी तो स्विच सुरू केला.
४
शेखर
त्या दिवशी माझ्या खोलीवर मी आराम करीत पडलेला असताना कोणीतरी टकटक केली .मी दरवाजा उघडला तो शेट्टी समोर उभा होता .मला न बोलावता तो आपणहून माझ्याकडे आला त्या अर्थी काहीतरी गडबड अाहे असा मला अंदाज आला .त्यांची एकूण योजना ऐकून मी हादरून गेलो .जर मी यशस्वी झालो तर पैशात लोळणार होतो व त्या बरोबर उरलेले दोघेही ऐष करणार होते .जर योजना फसली तर मात्र तिघेही बाराच्या भावात गेलो असतो .तिघानाही तुरुंगवास कमी किंवा जास्त अटळ होता .शेट्टीने मला राय कुटुंबाबद्दल त्याला असलेली सर्व माहिती सांगितली.ही सर्व माहिती त्याला शिरसाट वकिलांकडून कळली होती .मी त्या कुटुंबाचा पंधरा सतरा वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलगा होऊन जायचे होते .एकदा त्यांचा मुलगा म्हणून माझा स्वीकार केल्यावर मी हळूहळू पोखरून शेट्टी व शिरसाट वकील यांना नियमितपणे समृद्ध करायचे होते. थोडक्यात मी रिस्क घ्यायची होती जर काही कमी जास्त झाले तर ते नामानिराळे रहाणार होते . माझ्या नाड्या जन्मभर त्यांच्या हातात राहणार होत्या .मी त्यांना विरोध करतो असे पाहिल्याबरोबर त्यांनी मला गुंतविले असते .मीही शेट्टीचा बाप होतो .बोलता बोलता रेकॉर्डिंगचे बटन ऑन करून शेट्टीचे सर्व बोलणे मी रेकॉर्ड केले होते .त्यांचा हरवलेला मुलगा जर आज असता तर माझ्याच वयाचा असता .तो बनारसला हरवला होता .मीही बनारसहून आलो होतो .मीही लहानपणी कुठे होतो मला माहित नाही .बनारसच्या एका घाटावर मी सापडलो आणि मला अनाथाश्रमात कुणीतरी दाखल केले अशी कागदोपत्री माहिती होती .कदाचित मीहि त्यांचा मुलगा असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.मी बनारसहून आलेला असल्यामुळे चांगली हिंदी बोलत होतो .रायच्या मुलाच्या हातावर लहानपणी मुरली वाजवीत असलेल्या कृष्णाचे चित्र गोंदलेले होते.तसे चित्र माझ्या हातावर नसल्यामुळे मी त्यांचा मुलगा असण्याची शक्यता नष्ट झाली होती.तसेच चित्र मला गोंदवून घ्यायचे होते.चित्र ताजे दिसता कामा नये यासाठीही योग्य ती खबरदारी घ्यायची होती .मी राय यांचा मुलगा बनण्यास तयार झालो.जर शेट्टी मला कमी जास्त ब्लॅकमेल करायला लागला तर माझ्या जवळ केलेले रेकॉर्डिंग व त्याच्या स्मगलिंगच्या पुरावा होता त्यामुळे मी त्याला विशेष घाबरत नव्हतो.शिरसाट वकील होता आणि मला त्याच्यापासून धोका जास्त होता . मी डाव्या हातावर सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या माणसाकडून गुप्तता राखून गोंदून घेतले .एकदा माझी शिरसाट वकिलांबरोबरही मीटिंग झाली .त्या वेळी अर्थातच शेट्टी हजर होता .माझ्या चाणाक्ष नजरेने शिरसाट रेकॉर्डिंग करीत आहे हे ओळखले.
ठरल्याप्रमाणे एक दिवस फूड पॅकेट घेऊन राय कुटुंबीयांकडे गेलो .मी त्यांचा मुलगा असण्याची शक्यता आहे असे शिरसाट वकिलांनी त्यांना अगोदरच कळविले होते .त्यांना मला निरखून पाहायचे होते .त्याचप्रमाणे त्यांना माझ्या हातावरील गोंदकामही पाहायचे होते.त्यांचा हेतू उघड न करता त्यांना हे सर्व करायचे होते .मलाही माझा हेतू कुठेही उघड होणार नाही अशा प्रकारे वागावे लागणार होते.त्यांनी मला बसण्यास सांगितले .नेहमी मी फुल स्लीव शर्ट घालतो .आज मी शर्टचे हात दुमडले होते.दोघेही मला न्यहाळत होती त्याचप्रमाणे सहज दाखविल्यासारखे करून मीही त्यांना न्यहाळत होतो.आईच्या डोळ्यातील भाव मातृत्वाने ओथंबलेले दिसत होते .ती केव्हाही उठून मला कुशीत घेईल की काय असे वाटत होते .मोठ्या कष्टाने ती स्वतःला नियंत्रणात ठेवीत होती.त्या मानाने बाबा जास्त वेलकंपोझ्ड व तटस्थ वाटले .हळूहळू मी फूड पॅकेट्स घेऊन वारंवार त्यांच्याकडे जाऊ लागलो .असे दोन तीन आठवडे गेल्यानंतर राय कुटुंबीयांची मीच त्यांचा मुलगा आहे अशी खात्री पटवून देण्यात मी यशस्वी झालो .
एक दिवस त्यांनी त्यांच्या हरवलेल्या मुलाबद्दल सर्व माहिती मला सांगितली .ती माहिती अर्थातच मला अगोदरपासून होती .मी त्यांचा मुलगा आहे असे त्यांनी मला सांगितले .मी दोघांच्याही पाया पडलो .आईने तर मला कुशीतच घेतले व माझ्या मस्तकाचे अवघ्राण केले.मीही अंतर्यामी कुठे तरी हललो.अशा प्रकारे मी त्यांच्याकडे त्यांचा मुलगा म्हणून रहायला सुरुवात केली.त्याच्याकडे राहायला सुरुवात केल्यानंतर एक दोन महिन्यांमध्ये शेट्टीने पैसे मागायला सुरुवात केली.मी त्याला टोलवाटोलवी करीत होतो . मला बाबांचा पूर्ण विश्वास संपादन करायचा होता .त्यांच्या व्यवसायाबद्दलही सर्व समजून घ्यायचे होते.आर्थिक गोष्टी माझ्या हातात आल्याशिवाय मला शेट्टी कंपनीला पैसा देणे शक्य नव्हते.बाबा शेट्टीच्या अंदाजापेक्षा जास्त धूर्त होते. व्यवस्थापनातील किती तरी गोष्टी त्यांनी माझ्याकडे हळूहळू सोपविल्या होत्या .परंतु आर्थिक गोष्टी त्यांच्याच हातात होत्या .जरी त्यांनी काही आर्थिक व्यवहार माझ्याकडे सोपविले तरी त्यांचे त्यावर काटेकोर लक्ष होते.मी त्यांना फसवितो असे त्यांच्या लक्षात आल्यास माझी फार पंचाईत होणार होती .त्यामुळे मीही त्यांचा पूर्ण विश्वास संपादन करीत होतो . त्यांचा मुलगा म्हणून त्यांच्याकडे राहण्यात मला हळूहळू आनंद होऊ लागला .
५
शेट्टी
हा मुलगा माझ्या अंदाजापेक्षा जास्त धूर्त व मनाचा मृदू निघाला .आई बाबा म्हणूनच त्यांच्याकडे राहण्यात त्याला जास्त समाधान वाटत होते .आज देतो उद्या देतो असे म्हणून त्याने एक कवडीही आम्हाला दिली नाही .शेवटी त्याला एकदा हॉटेलवर बोलवून जर तू आर का पार करणार नाहीस तर तुझे सर्व बिंग फोडीन असे सांगितले . तर त्याने मला माझ्या बोलण्याचे केलेले रेकॉर्डिंग ऐकविले त्याच प्रमाणे माझे स्मगलिंगचे धंदेही त्याला माहीत आहेत त्याचे पुरावे त्याच्याकडे आहेत आणि वेळ पडल्यास तो ते उघड करील म्हणून मला धमकाविले.
शिरसाट मार्फत यांच्यावर दबाव आणावा म्हणून मी एक तिघांची मीटिंग बोलावली .त्यामध्ये त्याच्या पुढे आम्ही एक वेगळीच योजना ठेविली .माझ्या हातात काहीही आर्थिक गोष्टी नाहीत त्यामुळे मी काहीही तूर्त करू शकत नाही हे एकच तुणतुणे तो सतत वाजवीत होता .त्यामुळे अशी योजना आणण्याशिवाय गत्यंतर नव्हते .
आम्ही त्याला ज्याचा पोस्टमार्टेममध्ये सुगावा लागणार नाही अशा प्रकारचे एक विष दिले. याचा तू वापर कर पुढे आम्ही सर्व काही बघून घेऊ असे त्याला सांगितले.
६
शेखर
त्या दोघांनी माझ्या हातात विषाची बाटली ठेवली आणि मी हादरून गेलो .जर मी त्यांच्या मताप्रमाणे वागलो नाही तर ते आई बाबांना कोणत्यांना कोणत्या प्रकारे ठार मारतील आणि मग माझ्याकडून त्यांना हवे तसे करून घेतील .आई बाबांच्या मृत्यूचा आरोपही माझ्यावर करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत .मी ती विषाची बाटली त्यांच्याकडून घेतली. मी त्यांच्याशी पूर्ण सहमत आहे असे दर्शविले.विषाची बाटली घरी आणल्यावर मी शांतपणे परिस्थितीचा विचार करू लागलो.हे दोघेही मला शांतपणे जगू देणार नाहीत .मी समजा त्यांच्या मताप्रमाणे वागलो तरीही ते मला शांतपणे जगू देणार नाहीत .अशा परिस्थितीत दोघांचाही काटा काढल्याशिवाय माझा रस्ता साफ होणार नव्हता .प्रथम त्यांना धमकावून पाहावे ते गप्प बसले तर ठीक आहे पण जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांना संपविल्याशिवाय इलाज नव्हता . रोज शेट्टीच्या येणार्या फोनला मी संधी पाहात आहे असे उत्तर देत होतो परंतू असे फार काळ चालणार नव्हते .एवढ्यात शिरसाट वकिलाला कोणीतरी ठार मारल्याचे पेपरमध्ये छापून आले.त्यांच्या वाकड्या व्यवहारांमुळे कदाचित कुणीतरी त्यांना उडविले असावे.या संधीचा फायदा घेऊन शेट्टीला धमकी द्यावी. गप्प बसण्यास सांगावे असे मी ठरविले.
मी पूर्ण तयारीनिशी शेट्टीच्या हॉटेलवर पोहोचलो.शिरसाटचा खून त्याने केला म्हणून त्याच्यावर आरोप केला .त्याने जर मला ब्लॅकमेल करायचे ठरविले तर माझ्यापुढे अनेक मार्ग आहेत हेही त्याला समजून सांगितले.मी एक खून करून बनारसहून आलो आहे.एका खुनाला फाशी किंवा जास्त खुनानाही फाशी असे त्याला सांगितले. तू पूर्णपणे कायमचा गप्प बस म्हणून त्याला धमकाविले .वेळ येताच तुला तुझा वाटा मिळेल म्हणूनही सांगितले.तू योजना सांगितली त्याचे रेकॉर्डिंग व तुझ्या काळ्या धंद्यांचे पुरावे हेही माझ्याकडे आहेत म्हणून सांगितले .माझ्या आक्रमकतेने तो चांगल्यापैकी घाबरला .आता तो स्वस्थ बसेल असे मला वाटते .त्याने चुळबुळ केल्यास मी त्यालाही उडविण्यास मागे पुढे पाहणार नाही.असेही त्याला सांगितले .
आई बाबांच्या प्रेमाला मी कळायला लागल्यापासून वंचित होतो.दोघांच्या सहवासात मी आनंदात आहे .एक ना एक दिवस आर्थिक गोष्टीही माझ्या हातात येतील याची मला खात्री आहे .मला उगीचच खून खराबा करायचा नाही .बनारसचा खूनही स्वसंरक्षणासाठी करावा लागला .आर्थिक गोष्टी माझ्या हातात आल्यावर मी शेट्टीला थोडेबहुत काहीतरी देत जाईन. त्याच्यामुळेच मी सुखी व आनंदी आहे .शेट्टी गडबड करायला लागल्यास मात्र मी त्याला उडविण्यास मागे पुढे पाहणार नाही .शिरसाटने केलेले गुप्त ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग जर पोलिसांना सापडले तर कदाचित मला धोका आहे.अर्थात मी पूर्ण काळजी घेतली आहे .
मला दिलेली विषाची बाटली मी नष्ट केलेली नाही . उंचावर गुप्त ठिकाणी ती मी सुरक्षित ठेविली आहे .
२६/१२/२०१८©प्रभाकर पटवर्धन