जीवनात माझ्या सदा राम गुंफिन

जीवनात माझ्या सदा राम गुंफिन
सकळ इंद्रियांनी माझ्या राम चुंफिन।। जीव....।।

सत्यं शिवं सुंदराचे
पूजन मी कारिन साचे
ह्यास्तव मी या जीवाचे
मोल अर्पिन
राम गुंफिन।। जीव....।।

विमलभाव सरलभाव
मधुरभाव प्रेमभाव
सेवा नि:स्वार्थभाव
त्यात ओतिन
राम गुंफिन।। जीव....।।

ज्ञान, भक्ति, कर्म तीन
पदर असे दृढ धरुन
श्रद्धेने पीळ भरुन
मोक्ष मिळविन
राम गुंफिन।। जीव....।।

-धुळे तुरुंग, मे १९३२

तुजसाठि जीव हा उरला


कारुण्यवसंता रामा। तुजसाठि जीव हा उरला।।
या जगात तुजविण कोणी। नाहीच खरोखर रामा
तू हृदयी असुनी देवा। का चित्त भुलतसे कामा
तुज सदैव हृदयी धरुनी। तव गोड गाउ दे नामा
तुज सदैव मी आळविन
तुज सदैव मी आठविन
तू जीवन मी तर मीन
तुजविण जीव घाबरला।। तुजसाठि....।।

हृदयात जरी तू नसशी। मी अनंत मोही पडतो
तुजलगी विसरुन रामा। शतवार पडुन मी रडतो
तू नको कधीही जाऊ। हृदयातुन तुज विनवीतो
जरि मूल चुकुन दुर जाई
वापीत पडाया पाही
धरि धावत येउन आई
रघुवीर तेवि धरि मजला।। तुजसाठि....।।

जरि इतर वस्तु हृदयाशी। निशिदिन मी प्रभुवर धरितो
हृदयाच्या आतिल भागी। तुजशीच हितगुज करितो
एकांती बनुनी रामा। तुजला मी स्मरुनी रडतो
तव चरण मनि येवोनी
तव मूर्ति मनी येवोनी
येतात नेत्र हे भरुनी
कितिकदा कंठ गहिवरला।। तुजसाठि....।।

बसुनिया रघुवरा दोघे। करु गोष्टी एको ठायी
ठेवीन भाळ मम देवा। रमणीय तुझ्या रे पायी
प्रेमांबुधि गंभिर तेव्हा। हेलावुन येइल हृदयी
मन तुझ्याच पायी जडु दे
तनु तुझ्याच पायी पडु दे
मति तुझ्याच ठायी बुडु दे
तुजवीण गति दुजी न मला।। तुजसाठि....।।

एकची आस मम रामा। तू ठेव शिरी मम हात
होईन पावनांतर मी। मंगल तूच मम तात
त्वत्पर्श सुधामय होता। संपेल मोहमय रात्र
कधि मोह न मग शिवतील
पापादि दूर पळतील
भेदादि भाव गळतील
सेवीन सदा पदकमला।। तुजसाठि....।।

जे आवडते तुज देवा। ते करोत माझे हात
जे आवडती तुज देवा। ते शब्द ओठ बोलोत
जे आवडती तुज देवा। ते विचार मनि नांदोत
तनमनमती तुज अर्पीन
सेवेत सतत राबेन
जाईन त्वत्पदी मिळुन
ही इच्छा पुरवी विमला।। तुजसाठि....।।

-नाशिक तुरुंग, एप्रिल १९३३

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel